सोयरा..
By Admin | Updated: September 5, 2015 14:07 IST2015-09-05T14:07:43+5:302015-09-05T14:07:43+5:30
तो होताच तसा. उंच, धिप्पाड, आजानुबाहू. कोणीही त्याच्यापासून विन्मुख गेला नाही. आज वाळलेल्या गवताच्या रानानं त्याला विळखा घातला आहे. आटलेल्या तळ्याचं रूपांतर छोटय़ाशा खड्डय़ात झालं आहे आणि भरभरून वाहणारी बारव तर पार बुजून गेली आहे.

सोयरा..
>- सुहास अंजनकर
महिना झाला, पावसाची वाट पाहून-पाहून शेतकरी घायकुतीला आलाय, तर गाव-शहरातल्या बाया-बापडय़ांचा जीव पाणीटंचाईनं मेटाकुटीला आलाय. तोंडचं पाणीच पळालं आहे. तिकडे टीव्हीवर आणि वृत्तपत्रंतून हे असं का होतंय याचं गु:हाळ सुरू आहे आणि सामान्य माणूस या चक्रात आपलं कसं होईल या चिंतेत आहे.
प्रदूषण आणि वनराईचा नाश. त्यामुळे निसर्गाचं चक्रच पार उलटंपालटं झालं आहे. निसर्ग आपला आहे, आपण त्याचे आहोत ही पूर्वापार असलेली भावना आज हरवत चालली आहे.
‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ हे फक्त शब्द नाहीत, त्या शब्दांच्या मुळाशी असलेली भावना आजही तितकीच महत्त्वाची आहे. एकमेकांची सोय पाहून आनंदानं संगतसोबत करणारा तो सोयरा. तो ख:या अर्थानं आपला सखा असतो, जीवश्च असतो. तिथे व्यवहार शून्यावर येतो. या विचारासरशी मला माङया गावातला तो वटवृक्ष आठवला आणि त्यानं माङयाशी जपलेलं सोयरेपणही उमगून गेलं.
तो होताच तसा. उंच, धिप्पाड, आजानुबाहू. विशाल हृदयाचा. कोणीही त्याच्यापासून विन्मुख असा गेला नाही. माणसंच काय गायीगुरंदेखील त्याच्याजवळ अगदी निश्च्ंिात होऊन बसायची. या वडाच्या अगदी जवळ एक छोटंसं तळं होतं. या तळ्याच्या शेजारीच दगडांनी बांधलेली एक बारव होती. बारवेच्या वर दोन सीमेंटची बाकं होती बसायला. तिथूनच रुंद, प्रशस्त अशा पाय:यांनी उतरून बारवेचं पाणी काढण्याची सोय होती.
या वडाच्या एका अंगानं इतर अनेक झाडांचा समूह होता, तर दुस:या बाजूने छोटय़ा-छोटय़ा टेकडय़ा समोरच्या बारवेला आणि तलावाला कवेत घेतल्यागत उभ्या होत्या.
सकाळच्या वेळी हा परिसर गडबडीत असायचा. वेटाळीतल्या आयाबहिणी तळ्याकाठी धुणं धुण्यासाठी यायच्या. कामाबरोबरच सुख-दु:खाच्या गोष्टीही व्हायच्या या वडाच्या साक्षीनं. दुसरीकडे बारवेवर पाणी भरण्यासाठी आलेली बायामाणसंही असायची. खाली जाणा:या रिकाम्या पोह:यांचा दणदणाट आणि वर येताना सांडणा:या पाण्याचा चुबुक चुबुक आवाज कानाला संगीतदार वाटायचा. याला जोड आम्हा मुलांच्या खेळांची आणि भांडणांची. तळ्यावरच्या अंघोळी तर नित्याच्याच.
या शांत वातावरणात फांद्याफांद्यातून घुमणा:या वा:याची शीळ ऐकू येई, तेव्हा जणू तो घननीळ या वटवृक्षाच्या पानापानांवर बसून वेणुनाद करीत आहे असेच वाटे.
सावित्री सतीला धीर देणारा हाच तो वड. धैर्य, प्रेम, त्याग, दुवा आणि दवा या सगळ्याच गोष्टी या वडानं तिला दिल्या आणि त्याचा सदुपयोग करीत सावित्री अजरामर झाली. त्याच्याबद्दलची आणखीही एक कथा. एकदा म्हणो मरकडेय ऋषींनी भगवंताला त्याच्या मायेचं दर्शन करण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा भगवंतांनी प्रलयाचं दृश्य दाखवून वडाच्या पानावर पायाचा अंगठा चोखत असलेल्या बाळाच्या रूपात त्यांना दर्शन दिलं होतं. या कथेतनं भगवंताचाही आधार झालेल्या, प्रलयातही आपल्या तळहातावर त्याला जपणा:या या वडाचा मला फार अभिमान वाटून गेला.
आणखी एक संदर्भ माङया वाचनात आला आणि माङया मनात त्याच्याबद्दलचा आदर अधिकच दृढ झाला. वनातून दक्षिणोकडे जात असताना कुंभज मुनींनी श्रीरामाला पंचवटीत राहा असे सांगितल्याचा तो संदर्भ होता. पाच वडांनी साक्षात रामाला दिलेला आधार आणि दिलेली ऊर्जा रावणाशी झालेल्या युद्धात नक्कीच उपयोगी पडली असावी.
सृष्टीच्या प्रत्येक स्थित्यंतरात भगवंताच्या बरोबरीनं वावरणारा हा वड कलियुगात तर सर्वाचाच आधार आहे. हतबल झालेल्या राजा परिक्षिताला वडाच्या झाडाखाली बसूनच शुकदेवांनी भगवंताची कथा सांगितली होती. ती भागवत कथा आज संसाराच्या होरपळीत असंख्य जिवांना शांतवीत असते. भगवंताची कथा ज्याच्या छायेखाली शुकदेवांनी सांगितली त्याच वडानं माझं लहानपण पोसलं, सांभाळलं.
मी थोडा मोठा झालो आणि माझी या वडाबरोबरची ओढही वाढली. घरात अन्नयज्ञासाठी अगिAदेवतेला द्यावी लागणारी समिधा नसायची. लाकडं आणायला पैसे नसायचे. मग जळतण आणण्यासाठी मी घराबाहेर पडे. तुराटय़ांचा भारा ब:याच प्रयत्नांती मिळायचा. कधी वाळलेल्या रानशिण्या गव:या मिळायच्या, पण सकाळ-संध्याकाळ ही विवंचना मागे असायचीच.
एकदा सकाळी सकाळी या वडाच्या झाडाखाली आलो आणि ते दृश्य पाहून मी हरखलोच. रात्रीतून वाळलेल्या असंख्य काडय़ांचा वर्षावच झाला होता. ब:यापैकी जाड असणा:या या काडय़ा आमचा जठराग्नी शांत करण्यासाठी मदत करू शकतो हे ध्यानात आलं आणि मी अधाशासारख्या त्या काडय़ा गोळा करण्यात मग्न झालो. पाहता पाहता भलामोठा भारा तयार झाला होता. मी खूश होतो. माझी विवंचना कमी करण्यासाठी हा माझा सोयरा धावून आला होता. त्या दिवसापासून मग रोजच या वडानं मला कधीही समिधांची कमी पडू दिली नाही. माङयासारखीच गरिबांची इतर मुलं माझं पाहून काडय़ा वेचायला येऊ लागली. ते पाहून माझं मन उगीच व्याकूळ होत असे. जठराग्नीची आग मनात पित्ताची उसळी घेत असे आणि या काडय़ा दुस:या कुणाला मिळू नयेत अशी दुष्ट इच्छाही मनी दाटून येई. मग कुणाच्या हाती पडण्याआधीच आपण पोहोचलो पाहिजे या ऊर्मीनं मी पहाटेच तिथे जाऊ लागलो; पण मला आज जाणवतेय, त्या वडानं सर्वाचीच गरज अगदी बापाच्या मायेनं पुरवली. भागवली.
परिस्थितीचा कचाटा माणसाचं मन ढवळून काढत असतो. परिस्थितीरूपी भट्टीत मनाचा कोपरान् कोपरा कसा खरपूस भाजून तयार होत असतो; पण त्यावेळी ते कुठे कळत असतं? भाजलेल्या त्या अलवार मनानं मी वडाच्या पायथ्याशी येऊन बसायचो. हा वड खरंच खूप धिप्पाड होता. त्याची पावलं एवढी मोठी होती, की मी त्याच्या पावलांवर छानपैकी झोपू शकायचो. त्याला टेकून एका पायावर दुसरा पाय टाकून विमनस्क होऊन पडायचो, त्यावेळी हाच सोयरा वा:याच्या सोबतीनं त्याची पानं माङया अंगावर अलगद टाकून मला जोजवायचा, शांत करायचा. म्हणायचा, ‘जातील हेही दिवस. मी आहे ना! असं कधी वाटलं की येत जा इथं.’ खरंच सांगतो, थोडय़ा वेळानं मन अगदी सैल व्हायचं. उभारी घेऊन, ऑक्सिजन घेऊन मी पुन्हा परतायचो.
कालांतरानं परिस्थितीनं कूस बदलली. मला नोकरी लागली. परगावी असल्यानं माझा वड मला पारखा झाला होता. दोन पैसे हाती पडत होते. त्यामुळे सरपण विकत आणण्याएवढी परिस्थिती आली होती. एक दिवस सवड काढून मी या वडाच्या झाडाखाली आलो. झाडाच्या सर्वागावर माझी भावुक नजर भिरभिरत होती. खाली पाहिलं तेव्हा लक्षात आलं, अगदी तुरळक काडय़ाच दिसत होत्या. मी पुन्हा त्याच्याकडे पाहिलं अन् माझा बांध फुटला. आसवांची दाटी डोळ्यांच्या कडांना सोसवत नव्हती. माझा हा सोयरा माझी गरज भागवण्यासाठी स्वत: ङिाजला याची जाणीव मला झाली. माङया या आतल्या भावनेला तसाच प्रतिसाद बाजूची सृष्टीही देत आहे असे मला जाणवले. पानांची सळसळ, डोक्यावर पडणारी पानं, हवेची झुळूक आणि तळ्याच्या काठाला धडका देऊन हुंकार देणा:या लाटा मला पाहून आनंदी झाल्याचं मला सांगत होत्या. सगळ्यांकडे मी डोळे भरून पाहिलं आणि या सर्वाकडून पुन्हा ऊज्रेचं दान मिळाल्याच्या विश्वासानं सर्वाचा निरोप घेतला.
आज त्या ठिकाणची स्थिती तेव्हासारखी राहिली नाहीये. वाळलेल्या गवताचं रान त्याला विळखा घालून बसलेलं आहे. आटलेल्या तळ्याचं रूपांतर छोटय़ाशा खड्डय़ात झालेलं आणि भरभरून वाहणारी बारव तर बुजून गेली आहे. त्याला उकिरडय़ाचं रूप आलं आहे. माङया या सख्याकडे नजर वळवण्याची हिंमत आता माङयात नाहीये. त्याचं ओकंबोकं वृद्ध रूप पाहून हृदय पिळवटून जातं. थकल्याभागल्या कर्मवीराची ही अवस्था पाहून मी लज्जित होतो. ज्यानं माङयासारख्या अनेक मुलांचं लहानपण सावरलं, जोपासलं, बहरवलं तो आता तिथे एकटा आहे. गलितगात्र आहे.
(लेखक लोकमतच्या औरंगाबाद आवृत्तीत मुद्रितशोधक आहेत.)