सोपान कुंभार

By Admin | Updated: November 8, 2014 18:48 IST2014-11-08T18:48:10+5:302014-11-08T18:48:10+5:30

दारिद्रय़ माणसाला अनुभवांची श्रीमंती देतं. जगण्याच्या लढाईत बळ पुरवतं. माणसाला अधिक समंजस बनवतं आणि गरज कोणती व चैन कोणती, यातला फरक शिकवून जातं. कष्टाळू सोपानचं जगणंही असंच; पण श्रीमंतीत लोळणार्‍या मामलेदाराला ते कसं समजणार?

Sopan potter | सोपान कुंभार

सोपान कुंभार

 प्रा. डॉ. द. ता. भोसले

 
सोपान कुंभार हे त्याचे नाव. घरात मातीची मोठी श्रीमंती. अंगणात कोरडी माती. कोपर्‍याला ओली माती. सार्‍या घरातही मातीचं साम्राज्य. बापाचे आयुष्य माती तुडवितच मातीत गेले. हाही माती तुडवित तुडवित आयुष्याला आकार देण्यासाठी धडपडत होता. दिवसभर मातीत खेळायचा म्हणून बापानं त्याला शिक्षा म्हणून शाळेत घातलं आणि बघता बघता सार्‍या शिक्षकांचा तो लाडका झाला. तल्लख बुद्धिमत्ता, रसरशीत स्मरणशक्ती, उत्कृष्ट पाठांतर आणि उदंड विद्याप्रेम या बळावर तो प्रगत ज्ञानाचे सोपान झपाट्याने चढत गेला. या प्रवासात अनेक संकटे आली. आईबापाचे छत्र नष्ट झाले. दिवसभर कष्ट करायचा आणि रात्रभर अभ्यास करायचा. तोही देवळातल्या दिव्याच्या प्रकाशात आणि मागून आणलेल्या पुस्तकांवर. तो मॅट्रिकच्या परीक्षेत म्हणजे, जुन्या अकरावीत शाळेत पहिला आला आणि केंद्रातही दुसरा आला. आमच्या महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर काही दिवसांतच तो मला भेटला. पहिल्या भेटीतच माझ्या लक्षात आलं, की हे मातीचं मडकं कच्च्या मातीचं नाही. मळलेल्या मातीचं आहे. पक्क भाजलेलं आहे. आणि त्यावर प्रकाशाची अक्षरे सहज काढता येण्यासारखी आहेत. 
दारिद्रय़ माणसाला अनुभवांची श्रीमंती देतं. जगण्याच्या लढाईत बळ पुरवितं. माणसाला अधिक समंजस बनवितं आणि गरज कोणती व चैन कोणती यातला फरक शिकवून जातं. तो भेटला, की चांगली पुस्तकं वाचायला मागायचा. दुसरं काहीच मागत नसे. तसं म्हटलं तर त्याचं सारं आयुष्यच मागा-मागीवर-मदतीवर चाललेलं. पुस्तकं मागून आणलेली. कपडे कुणीतरी दिलेले. शालेय साहित्य असंच कुणीतरी दिलेलं अन् अन्नही तिथे केलेल्या कामापोटी मिळणारं. त्याच्या स्वत:च्या मालकीच्या वस्तू दोनच. त्याची तल्लख बुद्धी आणि कष्टानं न थकणारं त्याचं शरीर. एकदा-दोनदा पुस्तके देताना मी त्याला सहज बोलून गेलो. ‘हे ठेव पन्नास रुपये तुझ्याकडे. 
कधी चहा घ्यावासा वाटला, कधी हॉटेलमध्ये खावेसे वाटले, तर असावेत जवळ.’ नकार देत तो म्हणाला, ‘गरज भासली तर मागेन मी. चैनीसाठी नकोत. जिभेचा हट्ट पुरविला, की शरीर लाडावून जातं आणि शरीराचे लाड केले, की आपल्या मनाला ते जुमानत नाही. आपला रस्ता चुकतो त्यामुळे. जे मिळतं त्यात समाधान मानत गेलं, की आपलं जगणं सुंदर होतं. निदान शिक्षण घेत असताना तरी मला हाच विचार योग्य वाटतो.’ त्याचं हे उत्तर ऐकून माझ्या मनात आलं, ‘चाइल्ड इज द फादर ऑफ मॅन’ हे खरोखर त्रिवार सत्य असावं. त्याच्या मुखातून ते सहजपणे व्यक्त झालं होतं. कॉलेजमध्येही तो प्रत्येक परीक्षेत यश मिळवायचा. एकदा त्याच्या अंगाला तंबाखूचा वास आला. मी थोडा चमकलो. संशयाने त्याला विचारले, ‘काय रे सोपाना, तंबाखू खायला सुरुवात केली का? तुझ्या सार्‍या कपड्याला तंबाखूचा वास येतो?’ आपल्या पायजम्याचे दोन्ही खिसे उपडे करून मला दाखवत म्हणाला, ‘नाही सर, दुपारी तीन तास एका कारखान्यात मी तंबाखूच्या पुड्या भरण्याच्या कामाला जातो. त्यामुळे वास येतोय कपड्यांना.’
त्याची ही जिद्द आणि शैक्षणिक प्रगती पाहून प्राचार्यांना सांगून मी त्याला वसतिगृहात आणले. तिथे त्याच्या आयुष्याला एक वेगळेच वळण मिळाले. झाले असे, की शिष्यवृत्तीच्या कागदपत्रावर शासकीय अधिकार्‍याची सही घेण्यासाठी तो एका मामलेदारांकडे गेला. मामलेदार होते उच्च वर्गातले. विद्येची समृद्ध परंपरा असलेल्या वंशाचे वारसदार. त्यांनी याचे गुण पाहिले आणि त्यांच्या मनात आले., की आपल्या मुलाबरोबर अभ्यास करण्यासाठी यालाच आपल्या घरी बोलवावे. त्यांचा मुलगाही त्याच वर्गात शिकत होता. त्याच विषयाची परीक्षा देणार होता. मात्र, त्याचे कॉलेज दुसरे होते. मामलेदारसाहेबांनी त्याला जवळ बोलाविले. घरची चौकशी केली आणि म्हणाले, ‘माझाही मुलगा तुझ्याप्रमाणे शेवटच्या वर्षाला आहे. त्याचं अभ्यासाकडे फारसं लक्ष नसतं. तू आमच्या घरी ये. दोघे मिळून अभ्यास करा. घर मोठं आहे. अभ्यासासाठी स्वतंत्र खोली आहे. तुझ्यासोबत तोही चांगला अभ्यास करील. अडले तर तू त्याला मार्गदर्शन करू शकशील. तुझ्याप्रमाणे त्यालाही चांगले गुण मिळावेत, अशी माझी इच्छा आहे. अभ्यासाची सारी पुस्तके त्याच्याकडे आहेत. शिवाय, लागली तर आणखी आणून देतो; पण तू नकार देऊ नकोस.’
दोनच दिवसांत ठरल्याप्रमाणे सोपान साहेबांच्या बंगल्यावर अभ्यासाला जाऊ लागला. जणू ईश्‍वरीकृपाच आपल्यावर झाली, असे त्याला वाटले. दोघे मिळून अभ्यास क रू लागले. मामलेदारसाहेबांना खूप आनंद झाला. त्यांना आपल्या या सुपुत्राला आपल्याप्रमाणेच मोठे शासकीय पद मिळावे, असे वाटत होते. महिना-दीड महिना असा चांगल्या अभ्यासात गेला. नंतर मात्र साहेबांच्या पत्नीच्या वागण्यात फरक पडला. आपला मुलगा झोपलेला आणि हा मात्र अभ्यास करीत असेल, तर त्या त्याला म्हणायच्या. ‘अरे तू पण झोप ना. कशाला जागतोस? तुझ्या या खोलीतला उजेड आमच्या बेडरूममध्ये पडल्यामुळे आमचीही झोपमोड होते. त्रास होतो आम्हाला.’ तो एखादे नवे पुस्तक वाचत असेल, तर त्या म्हणायच्या, ‘अरे, त्याच्यासाठी आणलंय हे पुस्तक. त्याला आधी वाचू दे. नंतर तू वाच.’ एखाद्या परीक्षेमध्ये याला त्याच्यापेक्षा अधिक गुण पडलेले पाहिले, की त्या म्हणायच्या, ‘दोघेही एकत्रच अभ्यास करता. तरीही तुला चांगले गुण कसे पडतात? तू त्याला नीट सांगत नसशील. नाहीतरी तुला एवढय़ा गुणांची गरजच नाही. कुठेतरी क्लार्क किंवा शिक्षक होण्यासाठी कमी गुण असले तरी चालतात ना?’ 
दोघांनीही शेवटची परीक्षा दिली. सोपान विशेष प्रावीण्यासह पास झाला. साहेबांचा पुत्र द्वितीय श्रेणीत पास झाला. निकालानंतर मामलेदार मला भेटायला आले व त्यांनीही संशय व्यक्त केला. त्यावर मी म्हणालो, ‘साहेब, बुद्धिमत्ता आणि त्यातून मिळणारे यश एका विशिष्ट वर्णात पिकत नाही. ते वारशातून येत नाही. पैसा टाकून ते बाजारात विकत घेता येत नाही. मातीत गाडलेल्या दगडालाही देवपण येऊ शकते. पिढय़ान् पिढय़ा अंधारात गाडलेल्या माणसाच्या बुद्धीचा प्रकाश कमी समजू नका. तो तुम्हालाही गिळून टाकू शकतो. हे डॉ. आंबेडकरांनी दाखवून दिले आहे. अंगठा मागणार्‍या द्रोणाचार्यांच्या शिष्यानेही दाखवून दिले आहे. 
(लेखक ज्येष्ठ साहित्यिक असून, मराठी भाषा, लोकसंस्कृती यांचे ज्येष्ठ अभ्यासक व नवृत्त प्राचार्य आहेत.)

Web Title: Sopan potter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.