Social Media Influencers! | सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स!

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स!

ठळक मुद्देसोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स हे काही फक्त टाईमपास करण्याचं, एकमेकांची खिल्ली उडवण्याचं माध्यम उरलेलं नाही. तो एक व्यवसायाचा उत्तम मार्ग असू शकतो. फक्त आज सोशल मीडियावर आलं आणि उद्या पैसे मिळायला लागले असं होत नाही. 

- मुक्ता चैतन्य 

वल्र्ड इकॉनॉमिक फोरमनुसार भारतीय ग्राहक बाजारपेठ जगातली तिसर्‍या क्रमांकाची बाजारपेठ आहे. सध्या ही बाजारपेठ 1.5 ट्रिलियन डॉलर्सची आहे; जी 2030मध्ये म्हणजे पुढच्याच दहा वर्षात 6 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सची होईल असा अंदाज बांधला जातो आहे. प्रचंड वेगाने पसरणार्‍या भारतीय बाजारपेठेत आता काही नवे खेळाडू शिरले आहेत. त्यांनी ब्रॅण्डिंग, जाहिराती आणि मार्केटिंगच्या पारंपरिक पद्धतींमध्ये क्रांतिकारक बदल आणले आहेत. या खेळाडूंना म्हटलं जातं सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स! 
जगभरात समाज माध्यमांमधून निरनिरळ्या प्रकारच्या ग्राहकांवर प्रभाव टाकणारा एक मोठा समुदाय विकसित झाला आहे. यातही ठळक दोन प्रकार असतात. एक असे इन्फ्लुएन्सर्स जे इतर माध्यमांमध्ये सेलिब्रिटी म्हणून प्रस्थापित झालेले आहेत. उदा. सिनेमा, टीव्ही, ओटीटी, खेळ. अशा क्षेत्रात यश मिळवून मग सोशल मीडियावर आलेल्या या सेलिब्रिटींचा फॉलोअर बेस प्रचंड मोठा असतो. त्यामुळे त्यांच्यामुळे प्रभावित होणार्‍यांची संख्याही मोठीच असते. 
दुसरा प्रकार असतो सर्वसाधारण व्यक्तींचा; जे आता सोशल मीडिया स्टार्स किंवा सिलिब्रिटी म्हणून ओळखले जातात. म्हणजेच सर्वसामान्य माणसांचा समुदाय. जे निरनिरळ्या कारणांसाठी सोशल मीडियावर येतात, स्वत:चे व्हिडीओज टाकायला सुरुवात करतात आणि हळूहळू त्यांचा स्वत:चा प्रचंड मोठा फॉलोअर बेस तयार होतो. ही सेलिब्रिटींची दुनिया हे खरे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स असतात. या इन्फ्लुएन्सर्सच्या माध्यमातून जे मार्केटिंग आणि ब्रॅण्डिंग केलं जातं त्याला म्हणतात इन्फ्लुएन्सर्स मार्केटिंग. 
हे सगळं इतकं विस्तारानं सांगण्याचं कारण फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्युब किंवा आता बंद झालेलं टिकटॉक. या प्रत्येक माध्यमावर करोडोने फॉलोअर्स असणार्‍यांची एक वेगळी दुनिया आहे. म्हणजे युट्युबर्स कुणीही असू शकतो, पण इन्फ्लुएन्सर प्रत्येकजण असेलच असं नाही. यांना इन्फ्लुएन्सर्स म्हटलं जातं कारण या लोकांनी त्यांच्या फॉलोअर्समध्ये एक विश्वास निर्माण केलेला असतो. एक बॉण्डिंग निर्माण केलेलं असतं. ग्राहकांवर या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचा प्रचंड प्रभाव असतो. इन्फ्लुएन्सर्स आणि ग्राहक यांच्या विश्वासातून ही नवी इंडस्ट्री उभी राहिली आहे. 
ग्रुप एम या मार्केटिंग कम्युनिकेशन एजन्सीचे कन्टेन्ट अँड क्रिएटिव्ह हेड मोटिव्हेटर ‘धीरज कुमार’ त्यांच्याशी मायक्रो सेलिब्रिटीज, ह्यूमन ब्रॅण्डिंग आणि त्यांच्यातला परस्पर संबंध समजून घेण्यासाठी संपर्क साधला असता त्यांनी अतिशय महत्वाचे मुद्दे मांडले. कन्टेन्ट आणि ह्युमन ब्रॅण्ड्स यांचा एकमेकांशी असलेला संबंध स्पष्ट करताना ते म्हणाले, ‘इंटरनेटने माणसांना व्यक्त होण्यासाठी खुलं व्यासपीठ दिलं. माध्यमांचं लोकशाहीकरण केलं.  तुमच्याकडे कलागुण असतील, काही वेगळे सांगण्यासारखे असेल, ते सांगण्याचा, दाखवण्याचा आत्मविश्वास असेल तर तुम्हाला तुमची स्पेस सहज सोशल मीडियामुळे तयार करता येते. त्यासाठी इतर कुणावरही अवलंबून राहण्याची आज गरज उरलेली नाही. साधा, सोपा आणि लोकांना अपील होणारा कन्टेन्ट तुम्हाला देता आला पाहिजे. अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स असा कन्टेन्ट तयार करतात; ज्यामुळे जाहिराती आणि ब्रॅण्ड्स आपोआपच या इन्फ्लुएन्सर्सकडे वळले आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, या इन्फ्लुएन्सर्समुळे जिओटार्गेटिंग करता येतं. म्हणजे एखाद्या ब्रॅण्डला समजा फक्त बंगळुरूमध्ये ब्रॅण्डिंग करायचं असेल तर तिथे ज्या इन्फ्लुएन्सर्सचा प्रभाव अधिक आहे त्यांच्याबरोबर काम करता येतं. यामुळे होतं काय, ब्रॅण्डचं बजेट समजा 50 लाख आहे, तर ते एकाच व्यक्तीवर खर्च करण्यापेक्षा ब्रॅण्ड 20 सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सेलिब्रिटींवर खर्च करतं. यात त्या सेलिब्रिटींचाही फायदा होतो, ग्राहकापयर्ंत थेट पोचता आल्यामुळे ब्रॅण्ड्सनाही हे किफायतशीर वाटतं.’ 
हे ब्रॅण्डिंग कशापद्धतीने चालते याविषयी त्यांचं म्हणणं होतं, ‘ब्रॅण्डिंग थेट होतं किंवा सायलेंट पद्धतीने. थेट म्हणजे ब्रॅण्ड कन्टेन्टवरच क्रिएटर्स संकल्पना बनवून काम करतात आणि सायलेंट पद्धतीत ते वेगळा ब्रॅण्ड कन्टेन्ट तयार करत नाहीत. त्यांच्या नेहमीच्या क्रिएटिव्हमध्ये कुठेतरी ब्रॅण्ड कन्टेन्टचा समावेश असतो.’
भारतात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स कशावरून ठरवले जातात हे समजून घेणंही रंजक आहे.  त्या व्यक्तीची प्रसिद्धी, फॉलोअर्स, किती ग्राहकांपयर्ंत पोचलेली आहे यावरून ते ठरवलं जातं. 
ग्रुप एम या मार्केटिंग कम्युनिकेशन एजन्सीचे इन्फ्लूएन्सर्स मार्केटिंग प्रॅक्टिस, इंडिया हेड रतन सिंग राठोड यांच्याशी या विषयावर चर्चा केली असता त्यांनी सांगितले, ‘इन्फ्लुएन्सर्समध्येही प्रकार असतात. मेगा ( 10 लाख +फॉलोअर्स), मॅक्रो (1 लाख ते 10 लाख फॉलोअर्स, मायक्रो (10 हजार ते 1 लाख फॉलोअर्स) आणि नॅनो (1 हजार ते 10 हजार फॉलोअर्स) यांची ए, बी, सी, डी अशी कॅटेगरी असते. ही कॅटेगरी ज्या त्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अवलंबून असते. 
सर्वसाधारणपणे प्रस्थापित सेलिब्रिटीज, मेगा इन्फ्लुएन्सर्सना जास्त फॉलोअर्स असतातच, पण मॅक्रो, मायको आणि नॅनो इन्फ्लुएन्सर्समध्ये प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची क्षमता असते. त्यामुळे ब्रॅण्ड्सच्या दृष्टीने त्यांनाही अतिशय महत्व आहे. कारण जितका जास्त वेळ प्रेक्षक खिळून राहील, तितकी एखादी वस्तू विकत घ्यायची की नाही याचा निर्णय घेण्याकडे त्याचा कल वाढतो.’
ग्राहकाला नेहमीच विश्वासार्ह सोर्स हवा असतो. तो जर इन्फ्लुएन्सर्सच्या माध्यमातून मिळाला तर ग्राहकाच्या दृष्टीने तो त्याचा कंफर्ट झोन असतो. त्यामुळेही इन्फ्लुएन्सर्सना गेल्या काही वर्षात आणि येणार्‍या काळात विशेष महत्व प्राप्त झाले आहे, असं रतन सिंग राठोड यांचं म्हणणं होतं. 
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स हे काही फक्त टाईमपास करण्याचं, एकमेकांची खिल्ली उडवण्याचं माध्यम उरलेलं नाही. तो एक व्यवसायाचा उत्तम मार्ग असू शकतो. फक्त आज सोशल मीडियावर आलं आणि उद्या पैसे मिळायला लागले असं होत नाही. सातत्याने, रंजक किंवा लोकांच्या उपयुक्ततेचा कन्टेन्ट देत राहावा लागतो. कुठल्याही व्यवसायात यशस्वी व्हायचं असेल तर 1000 दिवस तो व्यवसाय सातत्याने करत राहावा लागतो असं म्हटलं जातं. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स बनून पैसे कमवायचे असतील तर त्यासाठीही हजार दिवसांचा हा नियम नक्कीच लागू होतो. 

सोशल मीडिया आणि मिळणारे पैसे 
विराट कोहलीला त्याच्या एका इंस्टाग्राम पोस्टसाठी 1 लाख वीस हजार डॉलर्सपयर्ंत पैसे मिळतात असं म्हटलं जातं. आणि त्याचे 66.4 मिलियन फॉलोअर्स आहेत. आलिया भटने तिचा युट्युब चॅनल सुरु केल्यानंतर एका दिवसात साडेतीन लाखाहून अधिक सबस्क्राइबर्स मिळवले होते. आलिया भटने युट्युब चॅनल का सुरु केला अशी जोरदार चर्चा झाली होती. जाहिरातीच्या सर्मथनाबरोबरच बरोबरच इन्फ्लुएन्सर्स म्हणून मिळणारे पैसे यांचं गणित त्यामागे असावं अशीही तेव्हा चर्चा होतीच. 
मायक्रो सेलिब्रिटीज किंवा इन्फ्लुएन्सर्स यांना ज्या त्या चॅनलवरच्या त्यांच्या सबक्राइबर (ग्राहक) आणि फॉलोअर (अनुयायी) बेसनुसार पैसे तर मिळतातच पण ते स्वत:च एक प्रकारे ह्युमन प्लॅटफॉर्म झाल्यामुळे ब्रॅण्डिंग आणि मार्केटिंगच्या माध्यमातूनही त्यांना पैसे मिळतात असं इंडस्ट्री इन्सायडर्स सांगतात. मिळणारे पैसे प्रत्येक प्लॅटफॉर्मनुसार आणि फॉलोअर्स किंवा सबस्क्राइबर बेसनुसार बदलतात. उदा. एखाद्या युट्युब चॅनलला रोज दहा हजार व्ह्यूज मिळत असतील तर 14 ते 24 डॉलर्स मिळतात. मात्र युट्युबवर 4000तासांचा ‘वॉच टाइम’ आणि 1000 स्बस्क्राइबर्स झाल्याशिवाय पैसे मिळायला सुरुवात होत नाही. 
फेसबुकवर पर्सनल प्रोफाईलवर पैसे मिळत नाहीत. पेजच्या माध्यमातून पैसे कमावता येऊ शकतात. त्यातही फेसबुकवर कमीतकमी दहा हजार फॉलोअर्स आणि 30,000 ‘वन मिनिट व्ह्यूज’ मिळाल्यानंतरच पैसे मिळायला सुरुवात होते. शिवाय फेसबुकने त्यासाठी किमान 18 वर्षे वयाची अट घातली आहे. शिवाय फेसबुकने इन स्ट्रीम अँड हे फिचर ज्या देशांमध्ये सुरु केलं आहे त्या देशाचे तुम्ही नागरिक असावे लागतात.  

muktaachaitanya@gmail.com
(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)

Web Title: Social Media Influencers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.