तर जग काय खाईल>

By Admin | Updated: December 20, 2014 16:32 IST2014-12-20T16:32:57+5:302014-12-20T16:32:57+5:30

खरीप गेले, रब्बीचा पेराच झाला नाही. गेल्या वर्षीही गारपिटीने होत्याचे नव्हते केले. माणसांचे काय होईल? जनावरांच्या चार्‍या-पाण्याचीही सोय लागेना, या चिंतेने मराठवाडा अन् विदर्भातील शेतकरी खचला आहे. परंतु, प्रतिकूल परिस्थितीला अनुकूलतेत बदलण्याची धमक बळीराजामध्येच आहे. दुष्काळाच्या अंधाराला छेदून ‘तांबडं फुटतंय’चा संदेश देणारेही शेतकरीच आहेत; पण शासनाने अनास्था सोडून काही ठोस, दूरगामी केलं, तरच दुष्काळाचं दुष्टचक्र संपेल. अन्यथा..

So what the world will eat> | तर जग काय खाईल>

तर जग काय खाईल>

 धर्मराज हल्लाळे

 
पाणी नाही... चारा नाही...या दुष्काळ कथा अन् व्यथांनी मन सुन्न होत असतानाच आहे त्या परिस्थितीचा मुकाबला करीत वाटा शोधणारे बहाद्दर शेतकरीही आपल्या अवतीभवती आहेत. त्यांना साथ देणे, मदतीचा हात देणे हे समाज अन् सरकारचे आद्यकर्तव्य आहे; परंतु आजवरची समाज व शासनाची धारणा आणि धोरणे जणू शेतकर्‍यांना मरणवाटा दाखवीत आहेत. आत्महत्येनंतर दिल्या जाणार्‍या मदतीसाठीसुद्धा शेतकरी पात्र अन् अपात्र ठरतात. त्यांच्या मरणाची कारणमीमांसा होते. कोणी म्हणते कुटुंबातील कलहाने गेला, कोणी म्हणते व्यसनाने गेला. शेवटी माझ्या मतदारसंघातील शेतकरी कुटुंबाला निकषात बसवून कशी मदत दिली, याचे भूषण सांगणारेही महाभाग आहेत. मात्र, कलह का झाला? व्यसन का जडले? कर्ज का वाढले? यांची उत्तरे शोधायला व्यवस्थेला वेळ नाही. याउलट, जे लाखो शेतकरी दुष्काळाशी लढा देत आहेत, परिस्थितीशी दोन हात करीत सक्षमपणे उभे आहेत, त्यांच्या कष्टाचा सन्मान करण्याचा मोठेपणाही समाजाच्या अंगी नाही. 
मराठवाड्याचा दुष्काळवाडा झाला. गेल्या १0 वर्षांत ३ वर्षांचा अपवाद वगळता सरासरी १00 टक्के पाऊस झाला नाही. निसर्गाचे संकट कायम ‘आ’ वासून उभे आहे. अशा वेळी खचणारे कणभर, तर धिराने उभे असलेले मणभर आहेत. त्यांच्या पाठीशी आपण उभे राहिलो नाही, तर खरेच जग काय खाईल? हा प्रश्न आहे. (मराठवाड्याच्याच भाषेत सांगायचे झाले तर... ‘शेतकरी करंना गेला पेरा, तर जग काय खाईल धतुरा....’)
खरीप गेले, रब्बीचा पेराच झाला नाही. गेल्याही वर्षी गारपिटीने होत्याचे नव्हते केले. माणसांचे काही तरी होईल; जनावरांच्या चार्‍यापाण्याचीही सोय लागेना, या चिंतेने मराठवाडा अन् विदर्भातील शेतकरी खचला आहे. केंद्रीय पथके दुष्काळी भागात भुर्रकन् येऊन गेली. अशातच अख्ख्या मराठवाड्यात अंतिम 
पैसेवारी घोषित झाली. सर्व गावांची पैसेवारी ५0 च्या आत आहे. 
आता सार्‍यांचेच सरकारी मदतीकडे डोळे लागले आहेत. त्या मदतीने पेरणीचा खर्च अन् बळीराजाची मेहनत निघाली तरी शेतकरी धन्य होतील. हा सर्व आशा अन् निराशेचा खेळ जून-जुलैपर्यंत संपणार नाही. पुन्हा पावसाची प्रतीक्षा, पुन्हा जीवघेणे दुष्टचक्र; परंतु यातून सुटका म्हणजे मृत्यू नव्हे, असा संदेश देत शेतकरीच पुढे येत आहेत. 
 
नांदेड जिल्ह्यातील सांगवी (करडखेड) हे दुर्गम गाव. तिथे आपल्या हिश्शाला आलेली वडिलोपाजिर्त केवळ २0 गुंठे जमीन घेऊन जगायचे कसे, हा माधवराव गुंडुरे यांचा प्रश्न. पिकवायचे किती, खायचे किती अन् जगायचे कसे, हा तर आपल्यासारख्यांसमोर संशोधनाचाच विषय. परंतु, प्रतिकूल स्थितीला अनुकूलतेत बदलण्याची धमक बळीराजामध्येच आहे. जमीन अत्यल्प असल्याने त्यांनी चार्‍यासाठी निव्वळ गवत पेरले. तिथेच जनावरांचा मुक्त गोठा उभारला. चार्‍याने जनावरे जगली. जनावरांमुळे गांडूळ खताची निर्मिती झाली. त्यातूनच माधवरावांनी महिना ५0 हजार रुपयांचे उत्पन्न मिळविण्याची किमया साधली.  
भोकर-मुदखेड रस्त्यावर पांडुर्णाजवळ असलेल्या गारगोटवाडीच्या मारोती खुपसे या आदिवासी शेतकर्‍याने स्वत:च विहीर खोदली. आज गावातील अन्य विहिरींनी तळ गाठला आहे. खुपसे यांच्याच विहिरीला पाणी आहे. कुटुंबांचा आधार बनताना मारोतींनी गावापर्यंत स्वखर्चाने पाईपलाईन अंथरून पाण्याची संजीवनी गावकर्‍यांपर्यंत पोहोचविली आहे. याहीपेक्षा भीषण स्थिती कंधार तालुक्यात आहे. एक-दोन नव्हे, तब्बल १२0 एकरांचा कोरडवाहू शेतकरी, त्यांची ७ मुले, अंगणात ८८ जनावरे, असा वैभवी लवाजमा आजही असणारे घोडजतांड्यावरील सखाराम राठोड दुष्काळझळांनी घायाळ झाले आहेत. एक मुलगा नोकरीला, तिघे शहराकडे गेलेले. दोघे मिळेल त्या कामावर आणि एक जण चक्क ऊसतोडणीला गेला आहे. तर, दारात दावणीला बांधलेल्या ८८ पशुधनाची काळजी घ्यायला एक जण घरीच आहे. डोंगराळ, थेंबभर पाणी न थांबणार्‍या याच जमिनीत सखाराम राठोड यांच्या कुटुंबाने कधीकाळी २0 खंडी (३२0 पोती) ज्वारी काढली. तिथे आज मणभर (८0 किलो) धान्यही निघाले नाही. गेल्या ११ महिन्यांत चार दिवसांना एक शेतकरी प्राण सोडत आहे. तिथल्या उजाड माळरानाकडे बघितले तरी डोळ्यांत पाणी येते. याही दुष्काळी स्थितीत माणुसकीच्या ओलाव्याने एकमेकांच्या पाठीशी उभे राहणारे शेतकरीच आहेत. तांड्यासारखीच टंचाई घोडजमध्येही आहे. २,४00 लोकसंख्येच्या या गावाची तहान भागविण्यासाठी सीताराम पाटील गाडेकर आणि माधव शिवराम टोकलवाड यांनी आपले बोअर खुले केले आहेत. मुखेड तालुक्यातील कामजळगा येथील शेतकरी वामनराव बिरादार यांनीही शाळेची, वस्तीची पाणी समस्या सुटण्यासाठी स्वखर्चाने स्वत:च्या विहिरीवरून गावात पाईपलाईन आणली. त्यांच्या निधनानंतर ब्रह्मनंद बिरादार यांनीही अख्ख्या वस्तीला मोफत पाणी दिले आहे. सरकारी मदतीची वाट न पाहता, दुष्काळाच्या अंधाराला छेदून ‘तांबडं फुटतंय’चा संदेश देणारेही शेतकरीच आहेत. औसा तालुक्यातील नागरसोगा येथील विजयकुमार मिश्रा यांनी कधी काळी एकट्यानेच विहीर खोदली. १८ फूट खोलीची अन् ४0 फूट व्यासाची विहीर पूर्ण केली. तिथे पाणी लागले. त्याच जोरावर साडेपाच एकर जमीन घेतली. आता ते साडेनऊ एकरांचे धनी आहेत. निसर्ग आपल्या नियंत्रणात नाही. पडणारे पाणी आणि हाताशी आलेली स्थिती आपल्या बाजूने वळवून कुटुंब उभारणारे विजयकुमार यांच्यासारखे विजयी शेतकरीही आहेत. 
उसवलेले आयुष्याचे आभाळ कष्टानेच जोडण्याची ताकद शेतकर्‍यांइतकी कोणाकडे नाही. देवणी तालुक्यातील कमालवाडीत एकत्र कुटुंबात रमलेला तेलंग परिवार आव्हानांना एकजुटीने पेलतो आहे. सुभाष व प्रकाश तेलंग हे दोघे कतर्े. ५२ जणांचे कुटुंब अन् २८ एकर शेती. दुष्काळाने सारे उत्पन्नच कोलमडले. मुला-मुलींची लग्ने, आरोग्य, शिक्षण हे सारे काही शेतीवरच. ऊस मोडला, भाजीपाला खुडला; तरीही हिंमत हरली नाही. कधी काळी बागायतदार कुटुंब, आज अस्मानी संकटाने मजुरीवर जाणे भाग पडले. मुले गुर्‍हाळावर गेलेली. जगण्याची ही लढाई सुरू असताना हसत-खेळत सगळ्यांच्याच सुख-दु:खांत सहभागी होणारे हे एकत्र कुटुंबही जीवनयात्रा संपविणार्‍यांना ‘थांबा, जीवन सुंदर आहे’ हेच सांगत आहे. 
उत्साहाचे औषध
कर्जाचा डोंगर आणि गारपिटीने शेतातील पिकांची केलेली नासधूस पाहून कीटकनाशक प्राशन केलेले लातूरजवळचे गोंद्रीचे भुजंग भोसले दवाखान्यात उपचाराअंती बचावले. आत्महत्येच्या प्रयत्नातून जीवनाची दोरी तुटता-तुटता घट्ट बांधणार्‍या भुजंगरावांना आपली ती चूकच होती, हे उमजले. गरीब वृद्ध वडिलांच्या चेहर्‍यावरची काळजी, पत्नीचे रडणे, मुलांचा टाहो मनाला चटका लावणारा ठरला. या प्रसंगाने काळीज पिळवटून निघाले. शेवटी ठरवले, रडायचे नाही, संपायचे तर नाहीच नाही, आता फक्त लढायचे. जीव राहिला तर वावरच कर्जाचे डोंगर फेडील, हा विश्‍वास त्यांनी शेतकर्‍यांना दिला. एखाद्याच्या मनात आत्महत्येचे, जीवन संपविण्याचे नकारात्मक विचार आले, तर सकारात्मक विचारांचा सल्लाच त्याचा जीव वाचवू शकतो. उदासीनता हा क्षणात संपविणारा तर उत्साह क्षणात जीवन फुलविणारा असतो. आयुष्य संपविणारी व्यक्ती सूचक बोलत असते. तिची निराशा पूर्णपणे दूर होऊ शकते. सरकारची आर्थिक मदत, समाजाचा पाठिंबा शेतकर्‍याला तारेल; पण सोबत्यांचे दोन धिराचे शब्द त्याला कायमचे जगवतील, हेच अनेक घटनांतून दिसून आले आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अशाच शेतकर्‍यांसाठी समुपदेशन मोहीम राबवीत आहे. प्रत्येक जिल्ह्यात असणारे मानसोपचारतज्ज्ञ, समुपदेशक, समाजकार्याचे विद्यार्थी व सजग नागरिक आपल्या अवतीभोवतीच्या आत्महत्या सहज, सुलभपणे थांबवू शकतात. कर्जाच्या ओझ्याने दबलेल्या एखाद्या शेतकर्‍याशी संवाद साधला, तरी जीवनाचा सेतू अखंड उभा राहील. 
दुष्काळाच्या दुष्टचक्राला विराम
ज्यांना शंभर एकर जमीन होती, त्यांची नातवंडे आता अल्पभूधारक झाली आहेत. एकत्र कुटुंब विभक्त झाले. शेतीचे तुकडे झाले. बैल-बारदाना सांभाळण्याची ऐपत लहान शेतकर्‍याकडे राहिली नाही. त्यात पाऊस नाही. विहिरीने तळ गाठला. बोअरही बंद पडू लागले. शेती अधिकाधिक परावलंबी झाली. आधीच पिकत नाही. पिकले, की विकत नाही. मागणी आणि पुरवठय़ाच्या अर्थशास्त्रात शेतकर्‍यांना योग्य भाव मिळत नाही. उत्पादनखर्च-आधारित शेतीमालाला भाव देण्याची पद्धत अजूनही अस्तित्वात नाही. अशा वेळी शिरपूर पॅटर्नचा अवलंब, पोपटराव पवारांच्या आदर्श गाव योजनेतील ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’ योजनेची अंमलबजावणी, अल्पभूधारक कोरडवाहू शेतकर्‍यांसाठी गटशेती, शेततळी, सिंचनासाठी छोट्या तलावांची निर्मिती हा दीर्घकालीन कार्यक्रम शासनाने राबविला पाहिजे, तरच दुष्काळ नावाच्या दुष्टचक्राला विराम मिळू शकतो.
शेतीवरचे ओझे कमी करण्यासाठी शिक्षण हाच पर्याय दिसतो. शेतीसोबतच व्यापार, नोकरीत सहभाग असणारी शेतकरी कुटुंबेच बागायती शेतीकडे वळली. हा लांबचा पल्ला असला तरी नजीकच्या काळात शेतीला जोडव्यवसाय म्हणून दुग्धव्यवसाय, शेळीपालन, आदिवासींसाठी गौण वन उपज हे कागदोपत्री राहिले नाही, तर परिवर्तनाची गती वाढेल. त्या दिशेने कित्येक शेतकरी, संस्था कामही करीत आहेत. त्यांची ही छोटी-छोटी बेटे दुष्काळाला हद्दपार करतील. किनवट तालुक्यातील एकट्या शिवराम खेड्याच्या आदिवासींनी १२ क्विंटल मध संकलन केले. वर्धा येथील संशोधक डॉ. गोपाल पालीवाल यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने जंगली मधमाश्यांच्या मध उत्पादनाला गती दिली. किनवटचे सहायक जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, कार्यकर्ते गोवर्धन मुंडे, डॉ. अशोक बेलखोडे, गुलाबराव मडावी यांनी या कामासाठी आदिवासी युवकांना जोडले. दुष्काळाच्या झळांचा केवळ शाब्दिक कळवळा न करता ‘लोकमत’ने पुढाकार घेतला. जंगलातील नैसर्गिक मध आणि बांबूच्या वस्तूंचे प्रदर्शन उभारले. तिथे तीन दिवसांत पाच क्विंटल मधाची विक्री झाली. असा प्रयोग करणारे कैक शेतकरी आहेत, अनेक शेतकर्‍यांचे गट आहेत. त्यांची एकजूट करण्याची जबाबदारी सरकार अन् समाजाची आहे. 
(लेखक लोकमत औरंगाबाद (नांदेड) आवृत्तीमध्ये 
उपवृत्तसंपादक आहेत.)

Web Title: So what the world will eat>

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.