पहिला ‘सा’ लावेर्पयत जे काय घडलं असेल ते सारं मैफलीत ‘उमटतं’.
ग्वाल्हेर घराण्याची गंधर्व गायकी ताकदीनं पुढे चालवणारे तरुण पिढीचे दमदार गायकपुष्कर लेले
यांची मुलाखत
गुरूकडून आलेलं गाणं पुढे नेण्यासाठी कशाची गरज असते?
- गुरूकडून आलेलं गाणं पुढे नेण्यासाठी खूप वेगवेगळ्या आणि व्यापक गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. त्यात गरजेची असते ती इच्छाशक्ती. प्रथम इच्छाशक्तीच का? तर एक गायक म्हणून मला स्वत:ला गाण्याबद्दल, त्याच्या माङया घराण्याच्या रूपाबद्दल काही वाटतच नसेल, तर मला ते गाणं पोहोचवता येत नाही. माङयाकडे इच्छाशक्ती नसणं हा मग तिथे प्रमुख अडसर बनून राहतो. त्यानंतर लागते ती क्षमता. परंपरेने माङयार्पयत आणून ठेवलेलं गाणं रसिक दरबारात ठेवण्यासाठी माझी क्षमता काय? - असा प्रश्न स्वत:ला विचारला पाहिजे. स्वत:ची उंची आणि खोली एकदा जाणून घेतली पाहिजे. नाहीतर आपली क्षमता थेंबभर असते आणि ती घडाभर असल्याचा आविर्भाव गायक आणतो. ही गल्लत जाणकार रसिकांच्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही. त्यातून परंपरा पुढे नेणं होत नाही. त्या घराण्याच्या संख्यात्मक गायकांमध्ये तुमचीही एक भर पडते एवढंच. परंपरा पुढे नेणं म्हणजे विचार पुढे नेण्याची प्रक्रिया असते. विचार हा सक्षमेच्या अंबारीतूनच नेता येतो. त्यामुळे गायकाने आपल्या घराण्याचे विचारबळ आधी पेलायला हवे. त्यामुळे एक प्रकारची प्रदीर्घ अशी समज येत जाते. ती गाण्यात दिसते. कुठल्याही गुरूचा अस्सल शिष्य त्यांच्यासारखे गात नसतो. गुरूंची झलक त्यात निश्चित दिसते; पण ते गाणो गुरूंची ङोरॉक्स कॉपी असत नाही. याचे कारण त्यात शिष्याची समज, स्वतंत्र विचार दडलेला असतो. त्यामुळे गुरूंची गाण्यातली बलस्थाने माझी असतीलच असे नाही, हे कळले की मग त्यात स्वतंत्रता येते. ती स्वतंत्रता गुरूंचं गाणं पुढे नेण्यासाठी महत्त्वाची ठरते.
दुसरी गोष्ट म्हणजे, बुद्धी आणि मन यांचं मिळून गाणं तयार होतं. गाणं फक्त बुद्धीचं झालं तर ते अकॅडमिक होतं आणि फक्त मनाचं झालं तर ते अतीव भावव्याकूळ होतं. याचा सुवर्णमध्य साधत गाणं मांडणं म्हणजे ‘गानविवेक’ पाळणं जेव्हा गायकाला जमतं तेव्हाच ती परंपरा तो पुढे नेऊ शकतो. कारण जिथे विवेक असतो, तिथेच विचार असतो. याच्याबरोबरच गायकाचा ¨पड तयार करण्यात ज्या अवतीभवतीच्या संस्कारशीलतेचा वाटा असतो त्याचेही योगदान लक्षणीय असते. त्यात अगदी आई-वडिलांपासून ते वेगवेगळ्या टप्प्यांवर तुम्हाला भेटलेल्या व्यक्तींर्पयतचे लोक येतात. घटना, प्रसंग, वाचन, छंद, आवडीनिवडी, खानपान असे सगळेच येते. हे सर्व मिळून घडलेला, घडवलेला ¨पड म्हणजे गायक असतो. तो कसा वाढत जातो यावरही त्याचे गाणो अवलंबून असते. गुरूकडून आले आणि दिले इतकी ती सहजप्रक्रिया नाही. गुरूंची बाह्य ‘स्टाईल’ वापरून गाणं पुढे नेता येत नाही. त्यासाठी अशा वैविध्यपूर्ण विचारशक्तींचा विवेक सातत्याने ज्या गायकाच्या ठिकाणी होतो, तो गायक गुरूंचे गाणो आणि घराण्याची परंपरा पुढे नेतो.
अलीकडच्या मैफलींमध्ये रियाज दिसत नाही अशी ओरड सध्या सुरू आहे. याबाबत आपले मत काय?
- यावर माझा प्रश्न असा आहे की, रियाज, तयारी दिसावी यासाठी गायकाला अलीकडच्या मैफलींमध्ये वेळ किती मिळतो? एका मैफलीत दोन-दोन, तीन-तीन गायक आता असतात. पंचेचाळीस मिनिटांत एक राग आणि एखादी ठुमरी, अभंग, नाटय़गीत असे म्हणण्याचा आयोजकांचा आग्रह असतो. पूर्वीसारख्या पाच, सहा तास एकाच गायकाच्या मैफलीचे दिवस आता राहिले नाहीत. इन्स्टंट हवे असेल तर रियाज दिसणार कसा? हा काळाचा महिमा आहे, यात आपल्याकडील ‘आलापी’ गेली; की जी पूर्वी गायक मोठय़ा प्रमाणावर करायचे. याबरोबरच रियाज म्हणजे काय हेदेखील एकदा समजून घ्यायला हवे. रोज पहाटे दोन तास खाली बसून गाणं म्हणणं हा परंपरेने सांगितलेला बुद्धिप्रधान रियाज मान्यच आहे; पण त्याशिवाय दिवसभर संवेदनशीलतेच्या पातळीवर गाण्याविषयीचं जे काही चाललेलं असतं तोही रियाजच असतो. आणि तो गाण्यात दिसतो.
दुसरी अत्यंत महत्त्वाची बाब असा आरोप करणा:यांनी लक्षात ठेवली पाहिजे की, मैफलीत खूप ताना घेतल्या, स्वरांचे चढ-उतार दाखवले, त्यातली गती दाखवली म्हणजे खूप रियाज आहे असे होत नाही. रियाज हा दाखवण्यासाठी नसतो, तर गाणं फुलवण्यासाठी असतो. चांगला गायक, की जो ‘कलावंता’च्या पातळीवर पोहोचला आहे; तो विवेकाधिष्ठित गाणं मांडत असतो. उदाहरणार्थ भीमपलास हा राग घेतला, तर भीमपलासचं स्वरूप किंवा कुठल्याही रागाचं स्वरूप हे अत्यंत भव्यदिव्य आहे. बंदिश गाताना त्या बंदिशीच्या भावानुकूल आणि तेवढाच भीमपलास त्यात घ्यावा लागतो. तुम्ही जर सगळाच घेऊ लागलात, तर त्यात चमकोगिरी असते. तिथे गानविवेक नसतो. त्यामुळे ज्याला हे बारकावे कळतात तो असा आरोप करणार नाही आणि ताना, मुरक्या, हरकती, जागा घेणं म्हणजेच रियाज हेही चूक आहे.
मैफल, गायक, गायकी आणि रसिक यांचे नाते उलगडून सांगा.
- मैफल खुलणो, रंगणो, पडणो यासाठी अनेक घटक कारणीभूत असतात. मैफलीच्या आधी जेव्हा गायक घरातून निघतो; तेव्हापासून ते पहिला ‘सा’ लावेर्पयत जे काय काय घडेल ते सारे मैफलीवर परिणाम करीत असते. त्यामुळे त्याचा एकूण प्रभाव मैफल संपल्यावर जाणवतो. जे शुद्ध, सात्त्विक आणि सतेज आहे ते मैफलीत जरूर मांडावं; पण कायद्याने ‘टाळी’च्या मोहात पडू नये. टाळी ही व्यावसायिकतेशी संबंधित असते. त्याचा गायकीशी संबंध नसतो. किराणा घराणं हे स्वरप्रधान आहे. आग्रा तालप्रधान आहे. त्यामुळे बंदिशीतील शब्दांचे नाते दोन्ही घराण्यात बदलते. ग्वाल्हेर घराणो दोन्हींचा मध्य मानते. मलाही व्यक्तिगतरीत्या शब्दांशी नातं असावं असंच वाटतं. त्याचा रसिकप्रगल्भतेसाठी निश्चितच फायदा होतो. सहजगत्या जे रसिकाला मिळेल, मिळू शकतं ते जरूर द्यावं; पण रसिकांच्या आनंदासाठी गायकाने आपल्या गायकीशी तडजोड करू नये. आणखी एक विचार आता असा झाला पाहिजे, की दर्जा सांभाळून रसिकाला खेचून आणता आलं पाहिजे. माझा अनुभव असा आहे की कमी का होईना; पण रसिक येतात. तो टिकविण्यासाठी प्रयत्न करावेत. गायकानं स्वत:शी बोलावं. स्वत:ला तोंड द्यावं. त्यामुळे गानप्रगल्भता निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू होईल.
गायनकलेत करिअर करण्यासाठी नव्या पिढीने काय करायला हवे?
- मी याबाबतीत विचार करताना त्याचे दोन भाग मानतो. पहिला म्हणजे ‘म्युङिाकल’ आणि दुसरा ‘नॉन म्युङिाकल’. गुरूकडून शिक्षण, सिना-पसिना तालीम (ऑनलाइन नाही), स्पर्धेत सहभाग, स्थिर होईर्पयत एकाच घराण्याची तालीम, गुरूवर डोळस श्रद्धा, संगीत विषयातील पदवी, कष्ट घेण्याची मानसिकता या सगळ्याचा ‘म्युङिाकल’ या शीर्षकाखाली समावेश होतो. नॉन म्युङिाकलमध्ये मार्केटिंग, नेटवर्किग, सेल्फ प्रमोशन, कुटुंबाचा पा¨ठबा, पॉलिश्ड व्यक्तिमत्त्व, इतर कलांबद्दलचं कुतूहल आणि त्याबद्दलचा आदर मनात असला की तुम्ही बरोबर घडत जातात. हे केलं की उत्तम गाणं करता येतं. करिअरचं म्हणाल तर व्यावसायिक मैफली, संगीतशिक्षक, कार्यशाळा मार्गदर्शक अशा चांगल्या संधी आहेत. परदेशात जाऊन गाणं शिकवता येतं. तिथे चांगल्या शिक्षकाची नेहमीच गरज असते. ती तुम्ही पूर्ण करू शकता. या सगळ्याबरोबरच गायक म्हणून मिळणारं समाधान आणि आनंद फार मोठा असतो. तो या कलेद्वारे मिळतो.
मुलाखत : स्वानंद बेदरकर