'सिम्पल है डाल तू बिंधास
By Admin | Updated: January 3, 2015 15:12 IST2015-01-03T15:12:59+5:302015-01-03T15:12:59+5:30
मैदानावरची आकडेवारी, हारजीतीचे हिशेब, रेकॉर्डस हे म्हणजेच फक्त धोनी नव्हे. -तो क्रिकेटपलीकडचा कुणीतरी आहे. हिंमतवाला!

'सिम्पल है डाल तू बिंधास
भारत-पाकिस्तान फायनल, ती ही विश्वचषकाची.
दोन्ही देशातली काही कोटी माणसं मारण्यामरण्याच्या ईर्षेने मॅच पाहताहेत. शेवटची ओव्हर. काहीही होऊ शकतं. जिंकलो तर डोक्यावर हरलो तर मातीत अशी दोन्ही संघाची अवस्था.
इतक्या पराकोटीच्या तणावाखाली असताना एक तरुण कॅप्टन शेवटची ओव्हर टाकण्यासाठी आपल्या सगळ्यात नवख्या खेळाडूच्या हाती चेंडू देतो.
‘ये जिताएगा.?’ देशात आणि सीमापारच्याच नाही तर जगभरात क्रिकेट पाहणार्या माणसांच्या मनात एकमेव प्रश्न. ज्याचं उत्तर अनेकांनी मनातल्या मनात ‘नाही’ असं ठरवून टाकलेलं. लोकांना वाटलं होतं जुगार लावतोय हा कप्तान!
पण ‘तो’ ठाम असतो. जोगिंदर शर्मा नावाच्या अत्यंत कोवळ्या बॉलरच्या हाती चेंडू सोपवून म्हणतो,
‘सिम्पल है, डाल तू बिंधास’.
हरियाणातल्या रोहतक नावाच्या छोट्या शहरातला जोगिंदर. एका पानटपरीवाल्याचा मुलगा. त्याचं करिअरच स्टेकला लागलेलं.आणि संघासह देशाच्या विजयाची आशाही.
मात्र ‘कप्तान’ कूल. एकच म्हणणं असतं त्याचं, ‘डाल तू बिंधास.’
शेवटी कोवळा जोगिंदरनं जीव खाऊन ती ओव्हर टाकतो आणि टी-ट्वेण्टीच्या जगज्जेतेपदाची ती ट्रॉफी भारताच्या हाती येते.
हे सारं घडतं ते ही एकदम ‘सिम्पल’. जसं काही स्ट्रेसबिस असं काही नसतंच. नसावंच.
आज हा ‘इतिहास’ आठवण्याचं कारण म्हणजे ज्यानं ऐन मोक्याच्या क्षणी हा असला जुगार लावण्याचा धोका पत्करला, तो कप्तान. एमएसडी. महेंद्रसिंग धोनी.
त्यानं कसोटी क्रिकेटमधून अकाली नवृत्ती घेतल्यानंतर त्याच्या ‘यशस्वी’ कॅप्टन कूल असण्याच्या कहाण्या गाजल्या. मात्र ‘एमएसडी’ हा ब्रॅण्ड फक्त क्रिकेटपुरता र्मयादित नव्हताच कधी! भारतातल्या खुर्दब्रुद्रूक गावात राहणार्या आणि ‘तरुण’ होत असलेल्या मुलांची स्वप्नं ही किती उत्तुंग आहेत, आणि पॉलिश चकचकाटासमोर त्यांच्या ‘रॉ’ गुणवत्तेचा टणटणाट किती चकीत करू शकतो याचं पहिलं खणखणीत उदाहरण म्हणजे धोनी.
नाहीतर भारताच्या नकाशात रांची असते कुठे हे माहिती नसणार्या बहुसंख्य लोकांना तिथल्या तरण्या पोराच्या लांब केसांचं आणि अडीच लिटर दूध पिण्याचं अप्रूप वाटायचं काय कारण होतं? तसंही होतं काय त्या रांचीत? एका मेनरोड भोवती फिरणारं शहर, तिथली दुकानं हाच अनेकांसाठी फॅमिली बिझनेस. वडिलांनंतर मुलानं सांभाळायचा गल्ला. त्या कायम रिकाम्या गल्लाच्या पलीकडची श्रीमंती ज्यानं रांचीलाच नाही तर देशालाही दाखवली त्या स्थित्यंतराचं नाव : ‘धोनी’.
ना कुणी गॉडफादर, ना फार शिक्षण, ना काही ‘कॉण्टॅक्ट्स’. तरी हा मुलगा अशा भारतीय संघापर्यंत पोहचला जिथे सचिन तेंडुलकर, कुंबळे, द्रविड, गांगुली, लक्ष्मण, सेहवाग, जहीर खान नावाचे बडेबडे खेळत होते. त्यांच्या पंक्तीत जाऊन बसण्याइतपत तडाखा बॅटिंग करावी आणि म्हणता म्हणता कप्तानी गळ्यात यावी अशी गुणवत्ता जगासमोर सिद्ध करण्याच्या हिंमतीचं नाव होतं धोनी.
नव्वदचं दशक संपून २000 साल उजाडलं होतं, भारत नावाचा देश जागतिकीकरणाला तर सरावत होताच पण बडी शहरं आणि तिथल्या श्रीमंती बाजारपेठा गोठायला लागल्या तसे बडे कार्पोरेट पाच-पाच रुपयांच्या श्ॉम्पूच्या बाटल्या नी दोन-दोन रुपयांचे बिस्किटांचे पुडे घेऊन खेड्यापाड्यात निघाले होते. छोटी शहरं मोठी होऊ पाहत होती.
त्या छोट्या शहरात राहणार्या माणसांना टीव्हीमुळे नवं जग कळत होतं. फाडफाड इंग्रजीत चटपटीत बोलणं आपल्याला जमत नसलं, तरी आपल्या मनगटातली रग इतराएवढीच आहे, त्यांच्यापेक्षा मोठी आहे, हे समजायला लागलं होतं. शहरातच मिळतात अशा संधींची दारं ठोठावण्यासाठी जाऊन बेधडक धडकण्याची नवी कोरी आक्रमकता ज्यांच्या रगारगात भिनली होती, त्यातला पहिला धोनी.
धोनी भारतीय संघात येण्यापूर्वीची अवस्था भलती सोवळी. एकेकाळी मुंबई रणजी टीममधले आठआठ खेळाडू भारतीय संघात खेळायचे. एकदा तुम्ही मुंबई रणजी खेळलात की थेट भारताची ‘कॅप’ डोक्यावर हे पक्कं होतं. त्यानंतर मग दिल्ली, बंगरुळू, चेन्नई, कोलकाता, कोचीन, हैद्राबाद या शहरातले खेळाडू पुढे यायला लागले. संघात अशी वेगळी नावं दिसायला लागली. मुंबईबाहेर या शहरात सुविधा वाढल्या, प्रशिक्षणाच्या सोयी पोहचायला लागल्या होत्या.
गमतीनं म्हटलं जात की, पांढरे कपडे मळल्यावर ते स्वच्छ धुवायची आणि क्रिकेटचं किट विकत घ्यायची ज्याची ऐपत आहे, त्यानंच क्रिकेट खेळावं. ही अशी मानसिकता आणि प्रशिक्षणाच्या सुविधाच नसलेलं वास्तव असताना छोट्या शहरातल्या धुळधाण गल्लय़ातून एखादा धोनी येतो, तोच एकनवा अँटिट्यूड घेऊन. स्वच्छ नसतील कपडे, ना सही! मळके कपडे घालून खेळू. नसेल क्रिकेटचं महागडं किट परवडत तर फळकुटासारख्या बॅटनं खेळू. पुस्तकातले तंत्राचे शॉट्स नाही कुणी शिकवले तर ना सही, आपण आपल्या पद्धतीनं आक्रमक खेळ खेळू. उचलून मारू, धुमसून खेळू, जी काय आपल्यात आग आहे, ती काढू मैदानावर!
तोवरची सारी सोवळी गुंडाळून फेकणारा धोनी हा नवा ‘अँग्रेसिव्ह अँटिट्यूड’ घेऊन आला. क्रिकेट खेळता येतं ना, मग बास झालं! तुम्ही मारता ते शॉट क्रिकेटच्या ‘रुलबुक’मध्ये असो नाही तर नसो, त्या शॉटवर रन्स झाले पाहिजेत एवढाच हा साधा मामला होता. त्यातून आला ‘आत्मविश्वास’. हरायची भीती होती कुणाला? आणि रेप्युटेशन पणाला लावण्यासारखं गाठीशी काही नव्हतंच. सामने जिंकण्यासाठी खेळायचे, हारण्यासाठी, ड्रॉ करण्यासाठी नव्हे; हे धोनीनंच ‘तरुण’ संघावर जास्त बिंबवलं. ‘बिंधास्त खेळा’ हेच त्याचं सूत्र. तो हिशेब लावत बसत नसे, त्याचा रफनेस त्याच्या खेळात दिसायचा. जे होईल ते होईल, पाहून घेऊ, करून मोकळं होऊ असं म्हणत त्यानं सगळ्याच बाबतीत ‘चौकटीबाहेरचे’ निर्णय घेतले. आणि ते नुस्ते इतरांसाठी नाही तर स्वत:साठीही!
त्याचा हेलिकॉप्टर शॉट कुठल्याच चौकटीत बसत नाही, त्यानं घेतलेले क्षेत्ररक्षणाचे निर्णंय, त्याचं यष्टीबाहेर झेपावत सातव्या-आठव्या स्टम्पाबाहेरचे चेंडू रोखणं, त्याचे गेमप्लान्स, सारंच चौकटीबाहेरचं होतं, कारण मुळातच तो सगळ्या चौकटी मोडूनच ‘कप्तान’ झाला होता.
भारतीय क्रिकेटचा ‘मेट्रो’वाला शहरी चेहरामोहराच त्यानं बदलून टाकला. तो त्यानं एकट्यानं बदलला असं नाही पण त्याच्यापासून प्रेरणा घेत छोट्या शहरातली मुलं झपाट्यानं पुढं आली, आपणही भारतासाठी खेळू शकतो हे स्वप्न पाहत इंडिया कॅपवर हक्क सांगू लागली.
धोनी संघात आला तेव्हाचा भारतीय संघ पहा आणि आजचा पाहा. आज सार्या संघात खुर्दबुद्रूकवाल्याच खेळाडूंचा भरणा अधिक आहे. जम्मू-काश्मीर, राजस्थान, हरीयाणा, यूपी-बिहार मधले खेळाडू दुसर्या टप्प्यातून पुढे सरकत आहेत.
-धोनीनं जी आक्रमकतेची वाट दाखवली त्या वाटेवर आज विराट कोहली धोनीहून चार पावलं पुढे उभा आहे, इतकंच!
त्यामुळे मैदानावरची आकडेवारी, हारजीतीचे हिशेब, रेकॉर्डस हे म्हणजेच फक्त धोनी नव्हे.
-तो क्रिकेटपलीकडचा कुणीतरी आहे.
हिंमतवाला.
छोट्या शहरात रुजलेल्या नव्या महत्वाकांक्षेचं, गुणवत्तेच्या नव्याकोर्या अस्सलतेचं प्रतीक.
-‘कर तू बिंधास’ हा बेधडक आत्मविश्वास भारताच्या रक्तात टोचणार्या पिढीचा प्रतिनिधी!
धोनीनं एकदा एखादी गोष्ट ठरवली तर तो मागे हटत नसे, जबाबदारी नाकारत नसे. एखादं काम दुसरं कुणीतरी करेल म्हणून वाट पाहत बसत नसे, तो जबाबदारी घेऊन ते करुन टाकायचा. आणि जे काम त्याला स्वत:ला करायला आवडणार नाही ते दुसर्या कुणाच्या गळ्यात त्यानं चुकूनही कधी मारलं नाही. आपण जे करू ते पूर्ण ताकदीनं, गुणवत्तेनं आणि सर्मपणभावानं करणं हीच धोनीची ताकद होती.’’
-राहुल द्रविड
-ललित झांबरे/ चिन्मय लेले