Siddi .. The search of an ethnic group inhabiting in the dense forest of India | सिद्दी..

सिद्दी..

ठळक मुद्देकाळ्या ‘गुहे’तली रहस्यं उलगडण्याचा प्रवास

- मुक्ता चैतन्य

घनदाट जंगलाच्या पोटात आत आत शिरत होतो. धुवाधार पाऊस सुरू होता. अनोळखी प्रदेश आणि अनोळखी जंगल. पावसाच्या आवाजाच्या गाण्यानं सारा परिसर काबीज केला होता. घनदाट झाडींमध्ये अधून मधून भाताच्या शेतीचे हिरवे लुसलुशीत चौकोन. त्यात काही स्री-पुरुष काम करताना दिसत होते. काही स्रिया डोक्यावर भारा घेऊन इकडून तिकडे निघाल्या होत्या. मी ज्या माणसांच्या शोधात निघाले होते ती हीच माणसं असावीत असं लांबून वाटत होतं. जसजशी जंगलातल्या वस्तीपाशी पोहोचले, माझी पक्की खात्नी पटली.
गावात शिरले तर गाव सुनसान. सगळ्या घरांना कुलूप. जो तो शेतीवर गेलेला दिसत होता. कारण घरांच्या पल्याड जंगलाच्या जवळ शेतीचे विखुरलेले तुकडे दिसत होते. सहज एका घरापाशी डोकावले. घर तसं साधंसं. उतरत्या छपरांचं. पुढे अंगण, मग घराचा चौकोनी तुकडा. आजूबाजूला भरपूर फुलझाडं. कुंपणाच्या बांबूने बनवलेल्या दारावरून ढांग टाकून आत गेले तशी डाव्या हाताच्या झाडावर रानडुकराच्या मस्तकाचा सापळा लटकवलेला दिसत होता. सगळ्या दुष्ट शक्ती, इच्छा आणि वाईट भावना घरापासून दूर राहाव्यात यासाठी केलेली तजवीज ! बाजूला गोठा होता. एका बाजूला गोवर्‍यांची सुरेख चळत लावलेली.
कुणाशी बोलता येईल का याचा अंदाज घेत होते तितक्यात पलीकडच्या घराला जाग आहे असं वाटलं. म्हणून तिकडे गेले तर अंगणात काळ्या तुकतुकीत रंगाचे आणि दाट कुरळ्या केसांचे एक गृहस्थ बसलेले होते. अंगात झब्बा आणि धोतर. डोक्याला मुंडासं. नुकतेच शेतातून आले असावेत असं वाटलं. शेजारी त्यांची बायको. गृहस्थांपेक्षा जराशी उंच. सतेज काळ्या कांतीची आणि कुरळ्या केसांचा सुरेख अंबाडा घातलेली. त्यात लाल रानफूल खोवलेलं. अंगात कारवारी साडी. एरवी सगळं काही दांडेलीच्या दंडकारण्याच्या गावपाड्यांसारखं दिसणारं, फक्त या माणसांची चेहरेपट्टी वेगळी होती. त्यांची चकचकीत काळी कांती आणि केसांचा कुरळेपणा इथल्या मातीचा नव्हता. तो थेट आफ्रिकन. पण घरांच्या ठेवणीपासून अंगातले कपडे, दागदागिने, भाषा मात्न याच मातीतली. अस्सल.
दोन वर्षांपूर्वी इंटरनेट सर्फिंग करताना या माणसांविषयी पहिल्यांदा वाचलं होतं. तेव्हापासून आपल्या शेजारी राहणार्‍या आणि जगाला परिचित नसलेल्या या माणसांना भेटायचं होतं. भारतापासून हजारो मैल दूर असलेल्या आफ्रिकेतल्या बंटू जमातीच्या भारतीय वंशजांच्या गावात मी उभी होते. या समुदायाचं नाव सिद्दी. सिद्दी म्हटल्यावर सगळ्यात पहिल्यांदा डोळ्यासमोर नाव येतं ते सिद्दी जोहर. पण त्या अलीकडे आणि पलीकडे सिद्दी या शब्दाशी आपला फारसा कनेक्ट नाही. जवळपास सातशे वर्षांपूर्वी काळाच्या निरनिराळ्या टप्प्यात ही माणसं भारतात आली आणि इथेच वसली, या माणसांची गावंच्या गावं विखुरलेली आहेत याची अजिबातच कल्पना नव्हती.
सिद्दी लोक भारतात आल्यापासून जंगलांच्या कुशीत वसलेले आहेत. दुर्गम भागातल्या या माणसांचा शोधही सोपा नव्हताच. त्यांच्यापर्यंत पोहोचायचं कसं हा मोठा प्रश्न होता. ते कुठली भाषा बोलतात हे माहीत नव्हतं. इंटरनेटवरून मिळणार्‍या माहितीवर कितपत विश्वास ठेवायचा हे समजत नव्हतं. पिढय़ानुपिढय़ा दुर्गम भागात राहणारी ही माणसं का माझ्याशी बोलतील? का त्यांनी त्यांच्या कहाण्या मला सांगाव्यात?. - असे अनेक प्रश्न मनात होते. त्यामुळे सिद्दींना भेटायचं तर त्यांच्याशी संपर्क असलेलं कुणीतरी सोबत असणं आवश्यक होतं. इंटरनेटवरचे एक दोन लेख आणि एक व्हिडीओ इतकं काय ते हाताशी होतं. त्यात कुठेही, कसलेही संपर्क नव्हते. पण माणसांची नावं मात्न होती. या नावांचा शोध घेत घेत तिथंपर्यंत पोहोचायचं ठरवलं. बरीच शोधाशोध केल्यानंतर एक संस्था या समुदायाच्या संपर्कात आहे, अशी माहिती मिळाली आणि कामाला लागले. संपर्क झाला. 
आफ्रिकन जमातीच्या माणसांच्या भारतीय गावात मी उभी होते आणि जाणवलं माणसांच्या स्थलांतरांची कहाणी मोठी अजब आहे. जगातली मोठी युद्धं, मोठय़ा भौगोलिक आपत्ती, जगण्याचा आणि अन्न-पाण्याचा शोध, स्वत:सकट कुटुंबकबिल्याचा जीव वाचविण्याची धडपड, जे जग माहीत नाही ते शोधण्याची आस, गुलामी अशी अनेक कारणं. त्याचे दृश्य-अदृश्य परिणाम ज्या त्या काळाने बघितले आणि सोसले आहेत. कितीतरी कहाण्या काळाच्या उदरात जशा दडलेल्या असतात तशाच त्या वर्तमानातही असतात.
आफ्रिकेतून येऊन भारतात वसलेल्या, बाकी देशापासून काहीशा तुटलेल्या, वेगळ्या  दिसणार्‍या; पण याच मातीला रक्त, घाम देऊन वाढलेल्या माणसांची कहाणी मी शोधत गेले, ती वाचायला मिळेल यावर्षीच्या  ‘दीपोत्सव’मध्ये !
muktaachaitanya@gmail.com
(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)

यावर्षीच्या ‘दीपोत्सव’चं दार उघडताना.. 

अंकाविषयी अधिक माहिती -
deepotsav.lokmat.com
1. ऑनलाइन खरेदी :deepotsav.lokmat.com
2. व्हॉट्सअँप मेसेज पाठवून प्रत मिळवा : 955-255-0080
3. ई-मेल : sales.deepotsav@lokmat.com
4. स्थानिक वृत्तपत्र विक्रेत्याकडे मागणी नोंदवा

Web Title: Siddi .. The search of an ethnic group inhabiting in the dense forest of India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.