गंध मनातले

By Admin | Updated: October 11, 2014 17:52 IST2014-10-11T17:52:36+5:302014-10-11T17:52:36+5:30

ज्याच्या मनाला रसिकतेचा स्पर्श झाला आहे, तो प्रत्येक जण निसर्गातील गंधांनी नक्कीच स्वत:ला विसरून जातो. मग तो गंध सोनचाफ्याचा असो, प्राजक्तफुलांचा असो, रातराणीचा असो वा पहिला पावसानंतरचा मृद्गंध.. मनातला एक कोपरा या गंधासाठी कायम जागा असतो.

Scent | गंध मनातले

गंध मनातले

>- शेखर जोशी  \
 
चाफा बोलेना.. चाफा चालेना..
चाफा खंत करी काही केल्या फुलेना.. एका रुसलेल्या मुलीसाठी लिहिलेले हे गीत ऐकताना माझ्याही मनात चाफ्याचा गंध उमलू लागतो.. पिवळ्याधम्मक पाकळ्यांचा सोनचाफा, कवठी चाफा त्याच्या आकार आणि रंगरूपासकट माझ्या डोळ्यांसमोर येतो. आमच्या ऑफिसमधील एक स्नेही न चुकता दररोज त्याच्या बागेतील लालर्जद जास्वंद, कधी अनंताचं फूल, तर कधी चार-दोन सोनचाफ्यांची फुले घेऊन येत असे. सारा दिवस त्या रंग-गंधाने सभोवताल घमघमून जात असे. कामाचा शीण आणि अधूनमधून डोकं वर काढणारी खिन्नता त्या गंधाने पार नाहीशी होत असे. 
पावसाची चाहूल लागलेल्या अशाच एका दुपारची आठवण.. सगळीकडे उष्म्याचा दाह भरून राहिलेला.. जीव कासावीस झालेला. झाडांच्या पानांना थोडंसं हलण्याचं त्राणही नव्हतं.. पक्षी सावली शोधून वळचणीला शांत बसलेले. उन्हाच्या काहिलीत काही प्राणीदेखील एखादे तळे पाहून त्यातील कोमटशा पाण्यात अंग भिजवीत बसलेले. एकंदरीत, निसर्गाचा प्राणच कंठाशी आलेला. जीवनरसच जणू आटलेला. अशी काहीही सुचू न देणारी ती वेळ. बघता-बघता आभाळ भरून आले.. आणि पहिल्यावहिल्या वळीव सरीचे आगमन देणारा गडगडाट कानी आला.. तापलेली भुई आपला कंठ भिजवायला उत्सुक झालेली. दोन-तीन महिन्यांचा भडकलेला वणवा पोटात घेऊन ती माती मेघाच्या प्रतीक्षेत जणू थांबलेली. अचानक गार वारे झुळूक होऊन सवर्दूर फिरत राहिले.. मेघाला आपल्यात सामावून घ्यायला अधीर झालेली, त्याच्या विनवण्या करून दमलेली धरणीमाता.. आणि तो आला..बरसला. सर्वस्व देण्याला आसुसलेली ती आणि रिता होण्यास आतुर झालेला तो.. ‘सजल नयन नित धार बरसती’.. एकमेकांना भेटली.. भिजून चिंब झालेले मातीचे सावळे अंग..त्या क्षणी त्या मिलनाची साक्ष देणारा तो गंध आसमंतात दरवळला. देण्या-घेण्यातला हा स्वर्गीय गंध म्हणजे ‘मृद्गंध’! पोटातली कस्तुरी बेफामपणे उधळणारी धरतीसारखी प्रेयसी या भूतलावर शोधून सापडणार नाही. 
या कस्तुरीवरून आठवले.. आमचे एक ज्येष्ठ स्नेही असेच गंधवेडे आहेत. एकदा गप्पांच्या ओघात कस्तुरीचा विषय निघाला.. त्यांनी हळूच एक छोटीशी डबी उघडली.. अत्तराचा ठिपका पालथ्या हातावर लावावा, तशी ती कस्तुरी माझ्या घामाने मळलेल्या हातावर लावली.. क्षणार्धात माझे मन सोनचाफ्याच्या सुगंधात हरखून जाते तसे मोहून गेले..एका वेगळ्या गंधविश्‍वात रमून गेले. कस्तुरी अभावाने मिळते.. दूर हिमालयातल्या हरणाच्या पोटातून ती मिळवावी लागते. असले बारीकसारीक तपशील ऐकायला माझे मन जागे कुठे होते? ते तर बिचारे कस्तुरी-मृगात रमून गेलेले !
सांजकिरणे उतरणीला लागल्यावर मारव्याच्या सुरांची एखादी लडिवाळ लड मनात गुणगुणत येते. दिवेलागणीची वेळ हुरहूर लावून जाते म्हणतात..‘त्याची’ वाट बघणे असह्य होत जाते.. फार पूर्वी ‘बकुळ-माळां’नी सायंकाळी सजलेल्या असत, असे म्हणतात. कुणी शायर म्हणतो- 
फिर छेडी बात, बात फुलों की.. 
रात है या बारात फुलों की
फूल के हार फूल के गजरे.. 
शाम फुलों की रात फुलों की
अशी अवघी रात्र आणि सारी गात्रे गंधालीच्या पहार्‍यात जखडून गेलेली.. सकाळी अंगणभर प्राजक्ताचा शिंपणसडा..पाकळ्यांच्या अंगांगाला लपेटून घेणारा नि:संग पांढरा रंग आणि भक्तीचा शेंदरी रंग.
दूर कुठे तरी केतकीचा गंध कुणा-कुणाला आमंत्रण देतो. तरल कविमन म्हणते - 
‘केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर
गहिवरला मेघ नभी सोड ना गं धीर’..
पण, अधीर झालेल्या तिला त्या गंधवेणा सोसवत नाहीत.. मनातले प्रीतीचे कढ डोळ्याआड लपून राहत नाहीत.. बंद कुपीतले अत्तरदेखील त्या दोघांच्या श्‍वासात मिसळून जाते.. अस्तित्व संपवण्यासाठी उमलून येणे असते.. मोकळे होण्यासाठी दाटून येणे असते.. लुटण्यासाठीच जपलेले ते गंध-दान असते..केवड्याच्या पानाला तरी आपल्या गंधाच्या अस्तित्वाचा अर्थ कुठे कळतो.. तसेच  तिलाही !     
तो दूर केवडा फुलतो मी इथे उमलून आले, नकळत पानालाही हे रान इथे घमघमले.. 
मनाच्या रानात केवड्याच्या अनवट गंधाचे पक्षी मनसोक्त भरारी घेऊ लागतात..मनाच्या कॅन्व्हासवर त्या गंधात रंगही मिसळून जातो..सर्वच फुलांना कुठे गंधाचे वरदान असते? विविध रानफुले, सोनटक्का, अबोली, सदाफुली, तेरडा, गुलबक्षी, कमळ, बोगनवेल..आणि हो, आताशा ते कृष्ण-कमळ कुठे दिसते, कुणी सांगू शकेल? आपला असा गंध जगाला न कळू देता उमलत राहणारी. केवळ रंगाच्या जातकुळीतला.. शेंदरी किंवा भगव्या रंगछटेकडे झुकणारा तो ‘अबोल रंग’. अबोलीचा.. भारतातील दक्षिण भागात या फुलांचे हातभर लांब गजरे लांबसडक वेणीवर माळून सकाळच्या प्रहरी लगबगीने चालणार्‍या त्या ललनांचे सौंदर्य ती अबोली इतकी खुलवते, तिच्या मनातले सगळे बोलून टाकते..          
निसर्गातल्या अशा गंधांचा-‘न गंधांचा’ खजिना मनात खोलवर कुठे तरी दडून बसलेला असतो. उमलत्या वयात मुलींनी केसात माळलेल्या फुलांच्या रूपाने ती गंध-धुंदी अगदी उतू जात असते.. आपल्या सौंदर्याचा गंध जपणारी एखादी रूपगर्विता..मोगरा. ऐन भरातील त्याची ती बेहोश करणारी धुंदी जिवाला वेड लावते..मन बहकून जाते. सखीने केसांत माळलेला तो गजरा - आपल्याला माळणार्‍या सखीच्या केसांचे सौंदर्य आणि देहभान इतके खुलवून टाकतो, की ‘त्याने’ लुब्ध होऊन आपला जीव मोगर्‍यासकट तिच्यावर ओवाळून टाकावा.. रात्री आपल्या उशीशेजारी ओलसर रुमालात ओंजळभर मोगर्‍याची फुले ठेवून निद्रादेवीला थोपवून धरणारे किती गंधवेडे या दुनियेत असतील.. गणती करणे मुश्कील! आणि तशात खिडकीशी बहरलेली रातराणी घरातल्या गंधबावर्‍या सम्राज्ञीला आपल्या मनातले गूज तर सांगत नसेल?  - ‘अगं वेडे, आपलं आस्तित्व लुटून देण्यासाठीच तर असतं..’ सायली, चमेली, जाई-जुई ही मोगर्‍याच्या गंध-कुळातली फुले दिसायला आणि हाताळायला तर इतकी नाजूक.. पण आसपासचा भोवताल सुगंधित करून टाकतात. ही नाजूक नावे काही पिढय़ांपूर्वी अनेक मुलींना देण्याची एक लाट येऊन गेली.. अर्थात, आपल्याकडे चमेली या नावाचा थोडा अपवाद. 
आजही उन्हाळा आला, की आणखी एक गंध आठवतो. कडक उन्हातून घरी आल्यावर तहान शमविण्यासाठी माठातले पाणी पिण्याची इच्छा होतेच.. पण त्यातही वाळ्याचा एक अनुठा सुगंध पाण्याच्या अस्तित्वाला अनोखी उभारी देत जातो. वाळ्याच्या सोबतीने मोगरा माठात रमला, की वेगळाच मिश्र गंध उमलून येतो.. गवयाने गाताना थोडा कोमल गंधार किंवा धैवत लावला, की रागाची खुमारी अगदी न्यारी होऊन जाते, तसे काहीसे..
जिथे जमिनीपर्यंत सूर्यकिरणेदेखील पोहोचत नाहीत, अशा भीमाशंकर किंवा महाबळेश्‍वरसारख्या  घनदाट जंगलात फिरताना सर्वत्र दाटून राहिलेला असाच एक अनामिक गंध आजही मनात अवचित भरून राहतो. पाने, फुले, माती यांचा एकत्रित ओलसर असा तो संमिश्र गंध..  
तसे तर कितीक गंध.. उधळत येतात वार्‍यावरून
रंग गंधांसवे.. माणसेही.. येतात कधी बहरून  
मोजकेच पण जातात जीव लावून..चिंब भिजवून   
‘गंध मनातले’ दरवळत राहतात..
अवचित अधून-मधून 
पण..अनादी काळापासून या पृथ्वीवर आपल्या श्रमामधून नंदनवन निर्माण करणारा घामाचा गंध.. निसर्गाचीच भेट ती.. त्याला कसं विसरता येईल? या विश्‍वात ‘श्रम-गंध’ आहे, म्हणूनच अनेक गंधांची साठवण मनात होत असते..त्यांची आठवण येते.. मनातला एक कप्पा त्या गंधासाठी राखून ठेवू या.. 
(लेखक व्यवस्थापन सल्लागार आहेत.)

Web Title: Scent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.