आठवण अमेरिकेच्या शोधाची
By Admin | Updated: October 11, 2014 18:08 IST2014-10-11T18:08:02+5:302014-10-11T18:08:02+5:30
जगभरात विशेषत: स्पेन व स्पॅनिश वसाहती ज्या ठिकाणी होत्या, त्या सगळ्या देशांत कोलंबस डे (१३ ऑक्टोबर) मोठय़ा प्रमाणात साजरा करतात. त्या दिवशी सरकारी सुट्टी असते. लोक खाणे-पिणे, मौजमस्ती करतात. त्या दिवसाचे महत्त्व आणि त्या दिवसाचा अनुभवलेला जल्लोष.

आठवण अमेरिकेच्या शोधाची
>- डॉ. रवींद्र देशमुख
अमेरिकेत शनिवार-रविवारला जोडून सुट्टी आली, की त्याला ‘लाँग वीकेंड’ म्हणतात. तसा चिलीमध्ये असताना एक आठवडा आला होता. शनिवार-रविवारची सुट्टी होतीच. त्याला जोडून सोमवारचीही सुट्टी होती. ती होती क्रिस्टोफर कोलंबस या जगविख्यात दर्यावर्दी माणसाची, ज्याने अमेरिकेचा शोध लावला. याच दिवशी कोलंबसने अमेरिकेच्या किनार्यावर पाय ठेवला आणि या नव्या भूभागाला नंतर ‘न्यू फाऊंड लँड’ असे नाव पडले. ही गोष्ट १२ ऑक्टोबर १४९२ ची. या वर्षी २0१४मध्ये ८ ऑक्टोबरला हा दिवस साजरा झाला. या दिवशी संपूर्ण उत्तर व दक्षिण अमेरिकेत सर्वच देशांत सुट्टी असते; पण काहींना हा दिवस अशुभ वाटतो, याला कारण स्पॅनिश लोकांनी स्थानिक लोकांवर केलेले अत्याचार व त्यातून अनेक वर्षांपूर्वी झालेले अमानवी हत्याकांड! पण बाकीच्या लोकांसाठी हा दिवस आनंद व्यक्त करण्याचा व अमेरिकेचा शोध ही जगप्रसिद्ध घटना साजरी करण्याचा.!
युनिव्हर्सिटी ऑफ चिलीमध्ये शिकविण्याच्या निमित्ताने मला या देशाला भेट देण्याचा योग आला. पॅसिफिक ओशन व एॅन्डेस पर्वत शृंखला यामध्ये चपखल वसलेला हा देश! स्पॅनिश सैन्याचा प्रमुख पेद्रो द वाल्दिविया यांनी या भूमीवर पाय ठेवला अन् इथले अद्भुत असे सृष्टीसौंदर्य पाहून तो स्तिमितच झाला. मंत्रमुग्ध करणारा तो निसर्ग बघून त्यांनी फर्मान सोडले, की इथे एक सुंदर शहर वसवावे, त्यासाठी त्याने पायाभरणी समारंभ करून आजच्या सान्तियागो शहराची मुहूर्तमेढ रोवली. मनुएल फर्नांडिसनी मला या समारंभाबद्दल अगोदरच सांगून ठेवले होते. मनुएल फर्नांडिस हा माझा मित्र आणि ‘फॅकलताद दि आर्कीतेक्तूरा ई अब्र्यानिझ्मो’ (फॅकल्टी ऑफ आर्किटेक्चर व अब्र्यनिझम) चा अधिष्ठाता. सान्तियागो स्थित युनिवर्सिटी ऑफ चिलीची ही एक महत्त्वाची संस्था होती. मनुएल हा स्पॅनिश व र्जमन वंशावळीतला. बरोबर सकाळी बाराला त्यांनी मला कारमध्ये घेतले व पार्टी ज्या ठिकाणी होती - त्याच्या बहिणीच्या - मारिया पाझच्या घरी आम्ही जायला निघालो. मारियाचा नवरा कालरेस हा जातिवंत स्पॅनिश होता. हे त्याच्या दिसण्यात आणि त्याच्या ऐटीत स्वच्छ डोकावत होते. घर आलिशान होते. मागच्या बाजूला प्रशस्त हिरवळ अन् बाजूलाच एका कोपर्यात पोहण्याची व्यवस्था. लॉनची प्रायव्हसी राखण्यासाठी ‘पालेमो’ व ‘लॉरेल’ हे खास चोलीअन जातीचे वृक्ष लावले होते. मधून-मधून ‘कॅनेल’ ही धार्मिक समजली जाणारी छोटी झाडेही दिसत होती. जेवणापूर्वी घेण्यासाठी पेयांची सुंदर मांडणी लॉनच्या मध्यभागी केली होती. प्लॅस्टिकच्या सफेद गार्डन खुच्र्या अर्धवतरुळावर रेषेत मांडल्या होत्या. समोर नुकत्याच पाणी शिंपडलेल्या हिरव्या गवतावर काचेचे टॉप्स असलेले टेबल्स लावलेले होते. कोक व क्रश या सॉफ्ट ड्रिंक्सच्या अनेक बाटल्या खास बायका-मुलांसाठी ठेवल्या होत्या. सफेद वाईन व फळांपासून तयार केलेले ‘पोचे’ किंवा ‘क्लेरी’ नावाचे कॉकटेल या प्रसंगी घ्यायचा रिवाज आहे. अशा पेयाबरोबर मग छान साईड डिश नसेल तरच नवल! ओनियन सास्क्ड पोटॅटो फज खार्या बिस्किटांवर पसरवून खाण्यातली मजाच काही और! तिथले सॉफ्ट चीज म्हणजे आपले पनीर! त्यावर मीठ टाकून व ओव्हा लीव्हजनी सजवून त्याचा आस्वाद घेण्याच्या नुसत्या आठवणींनी तोंडात पाणी येते! लॉनच्या दुसर्या टोकाला द्राक्षाच्या वेलीचा मंडप होता. त्या खाली एक लांबलचक टेबल लावले होते. त्यावर एक चिलीयन छोटा झेंडा, ज्याला ‘बंदेरा’ म्हणतात व स्पॅनिश झेंडा छानपैकी जवळ-जवळ क्रॉस करून लावले होते. सिग्नल रेड व यलो ऑकर या रंगांनी स्पॅनिश साम्राज्य ओळखले जाते. टेबलावरचे टिश्यू नॅपकिन्स, टेबल क्लॉथ सर्वच सूचक व सर्मपक अशा लाल-पिवळ्या रंगांत होते.
चिलीतील लोकांचे नातेसंबंध खूप घट्ट व जवळीक साधून असतात. पाहुणे आणि आयोजक एकमेकांना मिठय़ा मारून थेट युरोपियन पद्धतीने गालावर चुंबनांची देवाणघेवाण होत होती. सगळे स्थानापन्न झाल्यावर फळे-वाईनचा पंच ‘पोंचे’ फारशी औपचारिकता न बाळगता सगळ्यांना देण्यात आला. पुरुषमंडळी त्याची आतुरतेने वाट पाहतच होती. सगळ्यांनी मग हातातले पेले उंचावून टोस्ट केले. हळूहळू पोंचे आपला प्रभाव दाखवायला लागली. सगळेजण मग गप्पा करायला विभागले गेले. अगदी आपल्याकडल्या प्रमाणेच बच्चे कंपनी आपल्याच धुंदीत मस्त होती. बायकामंडळी वेगळ्याच स्तरावर स्वयंपाकातील व्यंजने व सौंदर्यसाधने अशा विषयांवर चर्चेत गढून गेली. पुरुष राजकारणातील सद्य:स्थिती हा जिव्हाळ्याचा विषय सोडायला तयार नव्हती. मला भारतात होणार्या मित्रमंडळींच्या गप्पाष्टकांची आठवण झाली. सगळ्यांमध्ये मी एकटा भारतीय बघून आश्चर्य-सम्मिश्रीत कौतुकाने बघत होती. भारत, भारतातले लोक, परंपरा, संस्कृती इ. बद्दल त्यांना खूपच कुतूहल होते. इतक्या वर्षांची विदेशी राजवट अन् तुम्ही तरीही तुमची संस्कृती जपलीत?’ त्यांना मोठा अचंबा वाटत होता. ‘आमच्याकडे तर स्पॅनिश राजवटीत आमची संस्कृती, संस्कार सगळेच लयाला गेले!’ - त्यांचा उद्वेग त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होत होता.
बराच वेळ मद्यधुंद गप्पा झाल्यावर खोळंबून राहिलेल्या जेवणासाठी उठले. दुपार उलटून उन्हं कलायला लागली होती. लांब टेबलाच्या शेवटी एका आडव्या टेबलवर पायर्यासारखी योजना करून त्यावर जेवणाचे पदार्थ सजवले होते. त्यावर इतर पदार्थांमध्ये ढी’’ं (त्याला ‘पयेया’ म्हणायचे) मोठय़ा प्रमाणात होता - आपल्याकडचा चिकन-पुलावच म्हणा ना! यात त्या व्यतिरिक्त मीट, फिश व हॅम घातलेले. आपल्याकडे जसे चवदार पुरणपोळी करायला आईचे किंवा आजीचे चार पावसाळे जास्त पाहिलेले हातच हवेत, तसेच पयेया टेस्टी बनवायला कुटुंबातली वयस्कर बाईच हवी! सगळ्यांनी पेयावर यथेच्छ ताव मारला. सोबतीला लाल वाईन अगदी वाहत्या पाण्याप्रमाणे देत होते. पूर्वीच्या काळी, अगदी वेस्टर्न सिनेमांमधून दाखविल्याप्रमाणे स्पॅनिश घोडेस्वार एक जड धातूची बाटली, त्याला छं ु३ं म्हणत - कमरेला लटकावून ठेवायचे. प्रवासात तहान लागली, की हा ‘बोता’ उंच धरून त्यातली लाल वाईन न सांडता प्यायचे, त्यासाठी बोताला एक बारीक नळी असायची, त्यातून वाईनची धार निघे. प्रवासात पाण्याची कमतरता असे, त्यामुळे सांडणारा एक थेंबही परवडणारा नसे. घोडेस्वाराचा नेम अचूक असे. ‘आ’ केलेल्या तोंडापासून फूट-दीड फुटांवर धरलेल्या बोतातून सहजगत्या तो धार तोंडात पकडे. नेम अचूक नसला तर तोंडावर इतरत्र सांडायची भीती! जेवणाच्या पंगतीत एक बोता रेड वाईनने भरून आणला गेला. ते ऐतिहासिक कृत्य पुन्हा एकदा साकारले गेले. प्रत्येक व्यक्तीने एक-एक करून बोता उंच धरून वाईनची धार तोंडात घ्यायची. नाकावर किंवा इतरत्र सांडली, की टर्न गेली! मग बोता बाजूच्या व्यक्तीकडे द्यायचा. जो कोणी सगळ्यात जास्त वेळ बोतातली धार तोंडात न सांडता घेत राहील, त्याला सगळे मोठय़ाने टाळ्या वाजवून प्रतिसाद द्यायचे. बर्याच लोकांचे सांडायचे. इतरांची मग हसून-हसून पुरेवाट व्हायची. हात अगदी कोरडे होईपर्यंत सगळे टेबलवर बसून अशा गमती-जमतीचा आस्वाद घेत होते. गप्पा अन् मस्करी चांगलीच रंगली. शेवट गोड पदार्थाने झाला. मेजवानीची सांगता जेवणाच्या सरतेशेवटीची इटालियन लॅकर अें१ी३३ (उच्चार ‘अमरेत्ताे’) घेऊन झाली. मला तर ते जड जेवणानंतरचे मसाला पान खाल्ल्यासारखेच वाटले!
यजमानांचे आभार मानत एक-एक जण जायला लागला. सगळ्यांच्या बडबडण्यातून ूँं (गुड बाय) व ु४ील्लं (गुड नाईट)चे स्वर निघू लागले. यजमानांचा निरोप घेऊन आम्हीही कोलंबसची आठवण करत घरी परतलो. ऑक्टोबर १२, १४९२ हा जगाच्या इतिहासातला सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखा दिवस! कॅरिबियन समुद्रातल्या एका छोट्याशा बेटावर दोन अपरिचित जगांची भेट घडणार होती. स्पेनसाठी क्रिस्टोफर कोलंबस सागरी सफर करत होता. त्याला अतिपूर्वेकडील देशांपर्यंत पोहोचायला एक थेट सागरी मार्ग शोधायचा होता; पण, कर्म-धर्म संयोगाने तो अमेरिकेच्या किनार्याला पोहोचला. ज्याला नंतर ‘न्यू फाऊंड वर्ल्ड’ ही संज्ञा प्राप्त झाली. क्रिस्टोफर कोलंबस (स्पॅनिशमध्ये ‘क्रिस्तोबाल कोलोन’) चा जन्म जेनोआ, इटली इथे १४५१ ला झाला. तो १५0६ मध्ये वाल्लीदोलीद, स्पेन इथे मरण पावला.या दिवसाची आठवण तिथे मात्र अशा आनंदोत्सवातून जपली जाते.
(लेखक आर्किटेक्ट आहेत.)