याद

By Admin | Updated: June 27, 2015 18:22 IST2015-06-27T18:22:04+5:302015-06-27T18:22:04+5:30

आमच्या संभाषणाला भडक रंग येतोय असं वाटून पुलं घाईघाईत, सुनीताबाईंना बाजूला करून, ‘काय झालं, कोण आहे?’ असं म्हणत दरवाजात आले आणि पुलंनी सिच्युएशनचा ताबा घेतला.

Remember | याद

याद

>-चंद्रमोहन कुलकर्णी
 
पुलं तेव्हा ‘मालती माधव’मध्ये राहत होते.
बेळगावच्या एका प्रकाशकाच्या पुस्तकाचं एक छोटंसं काम माझ्याकडे चाललं होतं. पुण्यात ते आले, की त्या निमित्तानं ते माझ्याकडेही चक्कर मारत असत.
असेच एकदा रात्री उशिरा म्हणजे जवळजवळ नऊ वाजता माझ्या स्टुडिओत घाईघाईत आले, माझ्या हातात असलेल्या त्यांच्या कामाबद्दल अगदीच जुजबी बोलले आणि हातातलं मोठं बाड माझ्या टेबलावर ठेवीत म्हणाले,
‘आमचं एक रिक्वेष्ट होतं.. म्हणजे बघा.. हे स्क्रिप्ट तेवढं पुलंच्याकडे पोचवायचं होतं..!’
 
त्यांच्या पुण्यातल्या मुक्कामात ते जे काही स्क्रिप्ट त्यांना मिळणं अपेक्षित होतं, ते काही त्यांना वेळेत मिळालं नव्हतं. मिळालं तेव्हा खूपच उशीर झाला होता, अगदी त्यांची बेळगावची परतीची बस सुटायच्या जेमतेम आधी. त्या स्क्रिप्टवर सुनीताबाई की पुलं म्हणे एक नजर टाकणार होते आणि मगच ते स्क्रिप्ट प्रेसमधे जाणार होतं. आणि आता स्क्रिप्ट मिळायला उशीर झाल्यानं पुलंच्याकडे ते स्क्रिप्ट नेऊन देण्याची ठरलेली वेळ उलटून गेली होती.
पुलंची दुस-या दिवशी सकाळी अकरा वाजताची नवी वेळ त्यांनी घेतली होती आणि आता माझ्या पुढय़ात बसले होते. ते स्क्रिप्ट दुस:या दिवशी सकाळी मी पुलंकडे नेऊन द्यावं अशी रिक्वेस्ट ते मला करत होते, मला गळ घालत होते.
 
इतकं महत्त्वाचं काम आहे, तर बेळगावला जाणं रद्द करून दुस-या दिवशी त्यांनी स्वत:च ते स्क्रिप्ट पुलंकडे का नेऊन देऊ नये, असं मी त्यांना विचारल्यावर अक्षरश: काकुळतीला येऊन त्यांची घरगुती अडचण मला त्यांनी सांगितली. अडचण जेन्युइन होती. मी जाण्याव्यतिरिक्त दुसरा काही पर्याय दिसत नव्हता.
मी म्हणालो, ‘बरं जातो मी, पण तुम्ही फोन करून सांगा त्यांना.’
‘हो, हो. सांगतो तर! चला, आत्ताच सांगतो, चला खाली जाऊन हॉटेलमधून फोन करू आपण.’
खाली जाऊन फोन केला, फोन करून झाल्यावर मीच त्यांना स्कूटरवरून स्वारगेटला, एस. टी. स्टॅण्डवर सोडलं.
 
मी काही त्यांच्याकडनं पुलंचा फोन नंबर घेतला नव्हता आणि नंबर असता तरी एकदा रात्री फोन झालाय म्हटल्यावर मी काही पुन्हा आधी फोनबीन करून जायच्या भानगडीत पडलोही नसतो.
स्टुडिओवरून स्क्रिप्ट उचललं आणि स्कूटर थेट ‘मालती माधव’च्या दिशेनं दामटली.
मला खरं तर ते तसलं कुणाकडे काही नेऊनबिऊन द्यायचा फार कंटाळा येतो. त्यात त्या कामात आपला काही संबंध नसला तर फारच नकोसं वाटतं.
पण बाबांची अडचण होती. म्हटलं, चालतं. वास्तविक पुलंच्या घरी जायला मिळत होतं. मला खरं तर आनंद व्हायला हवा होता, पण मला उलट ते प्रकरण जरा नकोसंच वाटत होतं.
दुस-या काही चित्रकला वगैरे कारणानिमित्त मी गेलो  असतो तर ठीक होतं. पण हे काम तसं काही नव्हतं. कुणाचंतरी कसलंतरी पुलंकडे स्क्रिप्ट नेऊन द्यायचं हे काम मला उगाचंच कमी दर्जाचं वाटत होतं. मला ते थोडंसं कमीपणाचंही वाटत होतं बहुतेक.
मनातले असे सगळे विचार सुरू असताना एकीकडे स्कूटर ‘मालती माधव’पाशी पोचलीसुद्धा!
डिक्कीतनं बाड काढून हातात घेतल्यामुळे की काय कोण जाणे, ते सगळं प्रकरणच मला लचांड वाटू लागलं. हातातलं स्क्रिप्टही जरा जड वाटू लागलं.
जिने चढून गेलो वर कसाबसा, उगाचच जड झालेल्या अंत:करणानं. एका हातात आता जरा जास्त जड वाटू लागलेलं बाड.  
 
दार अर्थातच बंद होतं.                  
बेल वाजवली.
बराच वेळ काहीच घडलं नाही.
तसाच तिष्ठत उभा राहिलो.
पुन्हा एकदा दारावरची कॉलबेल वाजवावी की काय, ह्या विचारात असतानाच दार थोडं किलकिलं झाल्यासारखं वाटलं.
आता दरवाजा उघडणार, म्हणून मी सरसावून थोडा पुढे सरकलो.
पण दरवाजा काही पूर्ण उघडलाच नाही. आधीच्यापेक्षा पाचसहा इंच जास्त उघडला गेला, इतकंच!  
मी अंदाज घेत होतो, कारण दरवाजा उघडायला कोण येतंय ह्याबद्दल मला उत्सुकता होती. स्वत: पुलं येणार नाहीत, ह्याची का कोण जाणे, पण खात्री वाटत होती. एखादा नोकर येईल? की त्यांच्याकडचा एखादा नातेवाईक, पाहुणा की सुनीताबाई?
माझा शेवटचा अंदाज खरा ठरतोय, असं मला वाटत होतं. दरवाजाच्या आत बहुतेक सुनीताबाई होत्या. एकमेकांना स्पष्ट दिसावं म्हणून मी आणखी थोडा पुढे सरकलो, तेव्हा त्या सुनीताबाईच आहेत, ह्याबद्दल माझ्या मनात मग मात्र शंका उरली नाही.
अर्धवट उघडय़ा (आणि ब-याचशा बंद!) दाराआड बाहेरचा अंदाज घेत उभी असलेली ती व्यक्ती म्हणजे सुनीताबाईच होत्या. 
 
‘काय पाहिजे?’
थोडय़ाशा त्रसिक, विशिष्ट पुणेरी आवाजात त्यांनी विचारलं.
मी एका दमात माझं नाव, गाव, पत्ता आणि कामाचं स्वरूप भरभर सांगितलं.
मला हे असं काहीतरी ओशाळवाणं वगैरे वाटणार असं का कोण जाणे, मला वाटलं होतंच, दार उघडलं जाण्याच्या आधीच !!   
 
माझं बोलणं ऐकून घेऊन त्या म्हणाल्या, ‘आता एवढी मोठी फाईल मी कुठे ठेवून घेऊ? कितीतरी लोक नेहमी काहीना काही आणून देतच असतात वाचायला  वगैरे. आणि आमची जागाही तशी लहानच आहे, शिवाय भाईलाही वेळ नको का? तो त्याचं काम करील की हे सगळं बघत बसेल? तेव्हा तुम्ही हे जे काही आणलंय, ते काही मला ठेवून घेता येणार नाही.’ 
त्यांच्या एकेक वाक्याबरोबर मला राग येत चालला होता. त्यांचं म्हणणं बरोबर असेलही, पण ती फाईलही काही ‘माझी’ नव्हती.
मला त्यांचं बोलणं आवडलं नव्हतं.
मग राग कसाबसा आवरत मी पुन्हा एकदा ती फाईल माझी नसून बेळगावच्या त्या सद्गृहस्थांची कशी आहे आणि ती पुलंच्या हातात द्यायला फक्त मी कसा आलो आहे आणि एकप्रकारे फक्त कुरियरचं काम कसं मी फक्त केलंय आणि म्हणून ती फाईल त्यांना ठेवून घ्यावीच लागेल, असं मी त्यांना सांगितलं. इतकंच नव्हे, तर बेळगावच्या त्या गृहस्थांनी पुलंना रात्री फोन करून ह्या सगळ्याबद्दल आधी कल्पना दिलेली आहे, हेसुद्धा मी (आता थोडय़ा चढय़ा आणि वैतागलेल्या आवाजात) सांगितलं.
आमच्या संभाषणाला थोडा भडक रंग येतो आहे असं बहुतेक वाटून पुलं एकदम घाईघाईत, सुनीताबाईंना एका हातानं बाजूला करून, काय झालं, कोण आहे? असं म्हणत म्हणत दरवाजात आले. पुलंनी सिच्युएशनचा ताबा घेतल्यावर सुनीताबाई आत निघून गेल्या.
आता दरवाजा पूर्ण उघडून पुलं दरवाजाच्या चौकटीत पुढे येऊन उभे राहिले.
(पूर्वार्ध)
 
(लेखक ख्यातनाम चित्रकार आहेत.)

Web Title: Remember

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.