शहरं
Join us  
Trending Stories
1
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
2
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
3
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
4
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
5
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
6
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
7
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
8
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
9
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
10
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
11
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
12
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
13
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
14
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
15
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
16
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
17
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
18
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
19
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
20
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
Daily Top 2Weekly Top 5

खरंच, हा ‘माझा’ देश आहे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 06:05 IST

तब्बल ४६ वर्षं आम्ही मेरिलॅण्ड, वॉशिंग्टन डीसी या भागात राहिलो, गेल्या ६ जानेवारीला लुटलं गेलं, ते खरंच माझं गाव होतं का?

ठळक मुद्दे- आता मनाची समजूत घालायची की यातून काहीतरी चांगलं घडेल. चांगले विचार, शक्ती एकत्र येऊन विकृत मनोवृत्तीला, प्रवृत्तीला आळा घालण्यात यश मिळवतील..

- शोभा चित्रे

२०२० साल संपलं. प्रत्येकानेच सुटकेचा नि:श्वास टाकला. नवीन वर्ष चांगलं उजाडणार यावर सर्वांचा विश्वास. शिवाय लवकरच लस मिळेल आणि काही महिन्यांतच नॉर्मल आयुष्य जगता येईल ही खात्री. आम्ही अमेरिकेतले लोक वेगळ्या कारणासाठी नववर्षाची वाट पाहत होतो. देशावरचं एक मोठंच गंडांतर नोव्हेंबरमध्ये टळलं होतं. आता २० जानेवारीला नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन येतील, देशाची धुरा समर्थपणे सांभाळतील या आशेने दिवस मोजणं चालू होतं... मनात कुठेतरी पाल चुकचुकत होती; ती का हे गेल्या ६ जानेवारीला जगाने पाहिलं.

अमेरिकेच्या इतिहासातला काळा दिवस. वॉशिंग्टन डीसीमधल्या कॅपिटॉल या अमेरिकेच्या संसदेवर जमावानं केलेला तो हल्ला. मन सुन्न करणारा! बधिर अवस्थेत मी टीव्ही पाहात होते. तो नंगानाच करणाऱ्यांच्या चेहऱ्यावर विजयाचा आसुरी आनंद आणि जिवाच्या भीतीनं पळून जाऊन लपून बसलेले आतले सर्व, सिनेटर्स, काँग्रेसमन्स इत्यादी मला बघवेना. टीव्ही बंद केला. मती गुंग झाली. मनाचा थरकाप उडाला. हा माझा देश?

जिथे हा हल्ला झाला ते माझं अमेरिकेतलं गाव. आज जरी मी फ्लोरीडात राहात असले, तरी आयुष्यातली महत्त्वाची - चांगली ४६ वर्षं आम्ही मेरिलॅण्ड, वॉशिंग्टन डीसी या भागात व्यतीत केली. त्या गावावर आम्ही मनापासून प्रेम केलं. ते आमचं ‘होम टाऊन’.

गेले कित्येक दिवस अमेरिकेच्या वेगवेगळ्या भागांतून बसेस भरभरून माणसं वॉशिंग्टन डीसीमध्ये गोळा होत होती. त्यांच्या मनातली द्वेषाची आग भडकवत ठेवण्याचं काम पद्धतशीर चालू होतं. इतक्या मोठ्या संख्येने आक्रमकपणे पुढे येणाऱ्या जमावाला तोंड देण्यासाठी फक्त मर्यादित पोलीस दल. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून अनेकांनी राष्ट्राध्यक्षांना सतत विनवणी करूनही कुमक मागवण्यात झालेली दिरंगाई. लोकशाहीच्या, देशाच्या प्रतिष्ठेपेक्षा फक्त कुणा एकाचा इगो इतका मोठा ठरतो?

मी टीव्हीसमोरून उठले. घरात इकडे-तिकडे गेले. बाहेर बागेत चक्कर टाकली. मनात त्या गावाच्या, तिथल्या वास्तव्याच्या अनेक आठवणी जाग्या झाल्या. अमेरिकेत पाय ठेवल्यावर पाच वर्षं न्यू जर्सीला राहून १९७६ साली आम्ही मेरिलॅण्डला राहायला आलो. याची नोकरी वॉशिंग्टन डीसीच्या भागात. त्या वर्षी अमेरिकेला स्वातंत्र्य मिळून दोनशे वर्षं पूर्ण होणार असल्याने, ४ जुलैला अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन मोठ्या प्रमाणावर साजरा होणार होता. या उत्सवासाठी पाच लाख माणसं ठिकठिकाणांहून आली होती. त्यातच त्या गर्दीत आम्ही दोघं, आमची दोन लहान मुलं. धाकटा तर जेमतेम अडीच वर्षांचा. त्या प्रचंड गर्दीत हा मला माहिती देत होता. एका बाजूला कॅपिटॉल, विरुद्ध दिशेला दोन मैलावर लिंकन मेमोरियल. मध्ये वॉशिंग्टन मॉन्युमेन्ट. हा सगळा परिसर ‘मॉल’ या नावाने ओळखला जातो. मॉन्युमेन्टच्या एका हाताला जेफरसन मेमोरियल आणि दुसऱ्या हाताला व्हाइट हाऊस. ठिकठिकाणी चालू असलेले करमणुकीचे कार्यक्रम. बॅण्ड‌्स, गाणी, फ्लोट‌्स, काय न‌् काय! नुसती धमाल. सकाळपासून सुरू केलेली भटकंती. घरी येईपर्यंत अडीच वाजलेले. पायाचे तुकडे पडायची पाळी. आल्या आल्याच इतक्या मोठ्या सोहळ्यात सहभागी होता आलं याचा कोण आनंद वाटला होता आम्हाला. गाव एकदम आवडून गेलं.

निदान चार-पाच वर्षं तरी इथे राहायचं म्हणताना एवढी वर्षं कशी गेली कळलंच नाही. आमच्या नोकऱ्या, मुलांचं मोठं होणं, याचं लष्करच्या भाकऱ्या भाजण्याचं काम. त्यानिमित्तानं घडणारे अनेकविध कार्यक्रम आणि घरी सतत असणारी पाहुणे मंडळी, साहित्यिक कलावंत. घर सतत काव्य, शास्रात रमलेलं. पाहुण्यांना अगत्याने घडवलेलं वॉशिंग्टन दर्शन.

राजधानीचं गाव. प्रशस्त. सुंदर दगडी इमारती. भरपूर झाडं, हिरवं गवत, फुलांच्या कुंड्या. शिवाय या परिसराचं वैशिष्ट्य म्हणजे सरकारी इमारती सोबत असलेली भरपूर नि:शुल्क म्यूझियम्स. दरवेळी इथे बदलली जाणारी प्रदर्शनं. आमच्या दोघांच्या नोकऱ्याही याच भागात असल्याने लंच टाइममध्ये पटकन कुठेतरी फेरफटका मारून येता येई.

याशिवाय इथे होणारे राजकीय सोहळेही अनुभवले. दर चार वर्षांनी होणारी निवडणूक. त्याचे प्रतिसाद, डिबेट आणि इतर चर्चा हे सर्व बघताना लोकशाहीवरचा विश्वास दृढ झाला. बराक ओबामा निवडून आले तेव्हा डोळे आनंदाने भरून आले. हा देश बदलतोय, म्हणून अभिमानही वाटला. कॅपिटॉलच्या त्या भव्य पायऱ्यांवर बराक ओबामांचा राष्ट्राध्यक्ष म्हणून झालेला विलक्षण शपथविधी सोहळा, अंगावर रोमांच आणणारा. त्यापूर्वीही हे सोहळे पाहिले होते; पण ओबामांचा शपथविधी बघताना आलेला अनुभव विलक्षण होता. असं हे गाव. त्याच्यावर मनापासून प्रेम केलं.

निवृत्तीनंतर वाढत्या वयाचा विचार करून फ्लोरिडाच्या उबदार हवेत आलो. मात्र मनात ते गाव, त्याच्या आठवणी आहेतच. त्यामुळे अशी एखादी अगम्य घटना मनाला हादरवून सोडते, मात्र एवढं भीषण नाट्य तिथे घडल्यावरही काही तासांतच आतील सर्व मंडळींनी एकत्र येऊन कामकाज चालू ठेवलं. प्रत्येकाने या घटनेचा निषेध केला आणि रात्री चारपर्यंत जागून जो बायडन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं.

- आता मनाची समजूत घालायची की यातून काहीतरी चांगलं घडेल. चांगले विचार, शक्ती एकत्र येऊन विकृत मनोवृत्तीला, प्रवृत्तीला आळा घालण्यात यश मिळवतील..

shobha_chitre@hotmail.com

(लेखिका फ्लोरीडा येथे वास्तव्यास आहेत.)