‘एव्हरेस्ट’चा विचका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 06:06 AM2019-06-02T06:06:00+5:302019-06-02T06:10:02+5:30

पैशाची हाव सुटल्याने वाट्टेल त्याला परमिट वाटणारे नेपाळ सरकार, हौशी गिर्यारोहकांना भरीला पाडून पैसे उकळायला सोकावलेल्या व्यापारी संस्था आणि पैसे फेकून, शेरपांच्या पाठीवर आपली ओझी लादून ‘एव्हरेस्ट सर केल्याचा’ डंका पिटायला चटावलेले नवशिके, हट्टी गिर्यारोहक या सगळ्यांनी मिळून या देखण्या शिखराचा बाजार मांडला आहे.

The reality behind the traffic jam at Everest summit, explains journalist Sameer Marathe | ‘एव्हरेस्ट’चा विचका

‘एव्हरेस्ट’चा विचका

googlenewsNext
ठळक मुद्देपैसा आणि प्रसिद्धीच्या उन्मत्त लालसेने जगातल्या सर्वोच्च शिखराच्या उंचीवरही कशी मात केली,  त्याची वेदनादायी कहाणी

- समीर मराठे

यंदा एक अभूतपूर्व घटना घडली : एव्हरेस्टवर ट्रॅफिक जॅम!
जगातलं हे सर्वोच्च शिखर. उंची 29,029 फूट (8848 मीटर)! उणे तीस ते चाळीस अंश सेल्सिअस तापमान. ऑक्सिजनची अतिशय कमतरता. चुकून पाय घसरला, तर त्या अजस्र हिमालयाच्या बर्फाळ बाहूत कायमस्वरूपी चीरनिद्रा. अपार थकव्यानं क्षमता कमी पडली तर मृत्यूशी भेट ठरलेली. इतक्या उंचीमुळे आणि दमछाक झाल्यामुळे येऊ शकणारा अल्टिट्यूड सिकनेस, हीमदंश, कायम चकाकत्या बर्फाच्या सान्निध्यात राहिल्यानं येऊ शकणारं आंधळेपण, मदतीला शेरपा असले तरी किमान आपला शारीरिक भार आपल्या स्वत:लाच पेलता येण्याची शारीरिक, मानसिक ताकद आणि सक्ती, जोडीला भयानक वेगानं वाहणारे वारे, कडे, दरडी कोसळण्याची शक्यता आणि बेस कॅम्प चारपासून पुढे जाण्या-येण्यासाठी असलेला एकच एक चिंचोळा मार्ग; ज्यावरून एकावेळी जास्तीत जास्त दोनच माणसं जाऊ शकतात.
- इतकी सारी विपरीत परिस्थिती असतानाही हौशी गिर्यारोहकांच्या गर्दीमुळे जगातल्या या सर्वोच्च शिखरावर ट्रॅफिक जॅमची वेळ आली ! त्या निमुळत्या एकेरी मार्गावर एकाच वेळी तीन-चारशे माणसं, शिवाय हे ट्रॅफिक कंट्रोल करणारा, करू शकणारा एकही जण तिथे नाही. ज्या प्रवासाला एरवी तीन, चार तास पुरेसे ठरतात, तिथे बारा-बारा तास गिर्यारोहक अडकून पडले. कोणाचा स्टॅमिना संपला, कोणी मानसिकदृष्ट्या कोलमडून पडलं, ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोणी जागच्या जागी कोसळलं. जवळपास चौदा-पंधरा मृत्यू या ट्रॅफिक जॅममुळे गेल्या काही दिवसांत घडले.
जगातल्या या सर्वोच्च शिखरावर जाण्याची भारतीयांची संख्या जास्त असल्यामुळे अर्थातच मृत्युमुखी पडणार्‍यांमध्येही भारतीयांची संख्या जास्त आहे. 
या निमित्तानं आणखीही बरेच प्रश्न उपस्थित झाले आहेत. एव्हरेस्टवर ट्रॅफिक जॅम नेमका कशामुळे झाला? त्यासाठी कोणाला जबाबदार धरायचं?.
आपल्या ढेपाळलेल्या अर्थव्यवस्थेला टेकू देण्यासाठी कुठल्याही मार्गानं पैसा मिळवण्यासाठी हपापलेल्या आणि एकाच वेळी इतके परमिट देणार्‍या नेपाळ सरकारला? हवामानाला? एव्हरेस्टवर गर्दी करणार्‍या गिर्यारोहकांना? एवढय़ा मोठय़ा संख्येनं त्यांना तिथे घेऊन जाणार्‍या, ‘तुम्हीही करू शकाल’ म्हणून भरीस पाडणार्‍या त्यांच्या संस्थांना? दोन-चार छोटी-मोठी शिखरं चढून-उतरून स्वत:ला ‘गिर्यारोहक’ समजू लागलेल्या फाजील आत्मविश्वासू ‘पर्यटकांना’, जगातल्या सर्वोच्च शिखरावर पाय ठेवण्यासाठी आसुसलेल्या आणि त्यासाठी प्राणाचीही पर्वा न करणार्‍या अननुभवी हौशी गर्दीला? आयुष्यात पुन्हा ही संधी कधीच मिळणार नाही आणि खर्च झालेले 25-30 लाख रुपये काहीही झालं तरी ‘वसूल’ करायचेच या हावरट वृत्तीला की केवळ पैशांसाठीच कोणालाही मदत करण्याची तयारी दाखवणार्‍या नेपाळी शेरपांना?.
‘त्या क्षणी’ एव्हरेस्टवर असणार्‍या अनेकांनी या घटनेचं खापर नेपाळ सरकारवर फोडलं आहे आणि त्यांच्या पैसापिपासू वृत्तीला झोडपून काढलं आहे. 
मात्र यासंदर्भात आणखीही काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत. एव्हरेस्ट संदर्भातले सर्वाधिकार नेपाळ सरकारनं वेगवेगळ्या संस्थांना देऊन टाकले आहेत. नेपाळ सरकारकडे अर्जफाटे करण्यापासून ते परमिट मिळवण्यापर्यंत आणि गिर्यारोहकांच्या खाण्यापिण्यापासून त्यांना एव्हरेस्ट समिटपर्यंत घेऊन जाण्याची सर्व जबाबदारी घेतात, त्या खासगी संस्था. गिर्यारोहकांनी निवडलेलं ‘पॅकेज’ आणि ऐपतीप्रमाणे त्यांना ऑक्सिजन सिलिंडर्स, मदतीसाठी एक किंवा दोन शेरपा, आरामदायी सोयी-सुविधा मिळतात ! गिर्यारोहकांनी दिलेल्या पैशांतूनच या संस्था नेपाळ सरकारची रॉयल्टी, शेरपांची फी देतात.
दुसर्‍या आणखी एका महत्त्वाच्या गोष्टीकडे आजवर पार दुर्लक्ष झालं आहे. ते म्हणजे जगातल्या सर्वोच्च शिखरावर जाण्याची इच्छा बाळगणार्‍यांना कुठलीच फिटनेस टेस्ट  द्यावी लागत नाही ! हा परवाना मिळण्यासाठी गिर्यारोहणातली किमान लायकी सिद्ध करण्याचीही गरज नाही. अर्जदार ‘फिट’ असल्याचं डॉक्टरांचं एक मेडिकल सर्टिफिकेट तेवढं  द्यावं लागतं (जे कसं मिळवायचं, ते प्रत्येकालाच माहीत आहे!).
आणखी एक गोष्ट. जी प्रख्यात आणि ‘खरे’ गिर्यारोहक आजकाल वारंवार सांगतात, गिर्यारोहक भले एव्हरेस्टवर जाऊन आल्याची शेखी मिरवत असतील; पण हे शिखर संबंधित गिर्यारोहक स्वत: सर करत नाहीत, ते सर केलेलं असतं त्यांच्याबरोबरच्या शेरपानं !. कारण सामान उचलण्यापासून ते चढाईचा रस्ता दाखवून सुखरूप परत आणण्यापर्यंत सारं काही केलेलं असतं ते शेरपानं. ‘एव्हरेस्टवीर’ म्हणवणार्‍यांची यात कर्तबगारी काय?.
खरं तर जगभरात आणि भारतातही शेकडो शिखरं आहेत, ज्यांची उंची एव्हरेस्टपेक्षा कमी आहे; पण ती एव्हरेस्टपेक्षा कितीतरी आव्हानात्मक आहेत. उत्तराखंडमधील हरदेओल, लडाखमधील सासेर कांगरी, स्पितीमधील माउण्ट ग्या, सिक्कीममधील दोंख्या. याशिवाय भारत, नेपाळच्या हिमालयीन पर्वतरांगा, काराकोरम, चीन या भागात अशी शेकडो शिखरं आहेत, ज्यांच्यापुढे उंचीवगळता एव्हरेस्ट अगदीच किरकोळ भासेल..
यासंदर्भात महाराष्ट्रातले पहिले एव्हरेस्टवीर सुरेंद्र चव्हाण सांगतात, ‘माझं बोलणं थोडं कठोर वाटेल; पण ट्रेकिंगचा कुठलाही सराव नसताना एखादा जण समजा कळसूबाई चढून गेला आणि थोडंफार ट्रेकिंग करणार्‍यानं एव्हरेस्ट ‘सर’ केलं. या दोन्ही गोष्टी सध्या एकाच मापानं तोलण्यासारख्या झाल्या आहेत. एव्हरेस्ट सर करण्यात आता काही चॅलेंजच उरलेलं नाही. माउण्टेनिअरिंग म्हणजे एव्हरेस्ट सर करणं नाही, हेच मी गेल्या कित्येक वर्षांपासून सांगतो आहे, तेव्हा ते कोणाला पटलं नाही; पण अशा घटनांवरून ते सिद्ध होतं आहे.’
एव्हरेस्टवर ट्रॅफिक जॅम होणं ही घटनाही अपवादात्मक नाही, गेल्या काही वर्षांपासून अशा घटना घडताहेत, यावेळचं त्याचं प्रमाण फक्त जास्त आहे, असं निरीक्षणही चव्हाण नोंदवतात..
‘शेरपा जर मदतीला नसले तर 90 टक्के गिर्यारोहक एव्हरेस्ट समिटवर जाऊच शकणार नाहीत. अननुभवी लोकांचा भरणा, खराब हवामान, जास्त परमिट्स, ‘क्लिअर वेदर विंडो’चा कमी काळ, पुन्हा अशी संधी मिळेल की नाही याची गॅरंटी नाही, म्हणून गिर्यारोहकांनी केलेली गर्दी, एव्हरेस्टचं झालेलं व्यावसायिकरण, एव्हरेस्टवारीतून आर्थिक फायदा मिळावा आणि आपली ‘दुकानदारी’ चालू राहावी या हेतुनं तिथे जाणारे काही जण. अशी अनेक कारणं यामागे असली तरी एव्हरेस्ट चढाईवर बंदी घालणं किंवा त्यांची संख्या खूप कमी करणं हा त्यावरचा शाश्वत उपाय ठरू शकत नाही, असं चव्हाण यांना वाटतं. गिर्यारोहकांना प्रशिक्षित करणं, संबंधित संस्थांना सजग करणं, केवळ पैसे खर्च केले आहेत, झाले आहेत, त्यामुळे प्राणांची पर्वा न करता फोटो काढण्यासाठी सर्वोच्च उंचीवर न जाणं. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन परत फिरणं, फिरता येणं. यासारख्या काही उपाययोजना केल्या तर ट्रॅफिक जॅमसारख्या घटना भविष्यात टाळता येऊ शकतील.’
ही घटना ज्यावेळी घडली, त्यावेळी ‘रॅम’ विजेते नाशिकचे सायकलपटू डॉ. हितेंद्र आणि डॉ. महेंद्र हे महाजनबंधूही त्यावेळी तिथेच होते. डॉ. महेंद्र सांगतात, केवळ एव्हरेस्टवर चढाई करायची आहे, म्हणून करू नका. आपण आता पुढे जाऊ शकणार नाही, हे लक्षात आल्यानंतर माघारीचा निर्णय घेता आलाच पाहिजे. अर्थातच त्यासाठीची पूर्वतयारी, फिजिकल फिटनेस, किमान सहा ते सात हजार फूट उंचीवरील शिखरावर चढाईचा अनुभवही गाठीशी हवा. आम्हीही किमान वर्षभर कठोर मेहनत घेतली होती, शिवाय तशीच वेळ आली तर ‘बचेंगे तो और भी लडेंगे’ या मानसिकतेतूनच आम्ही मोहिमेवर निघालो होतो. आपल्या सुरक्षेला केव्हाही सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे.’
एव्हरेस्टचा सध्या ‘बाजार’ मांडला गेला आहे. शिवाय त्यातलं आव्हानच संपवून टाकल्यामुळे अनेक पट्टीचे गिर्यारोहक आता एव्हरेस्टचं नावच घेत नाहीत. त्यापेक्षा कठीण आणि अस्पर्श असलेली, मळवाट न झालेली अगणित शिखरं त्यांना खुणावत असतात. एव्हरेस्टच्या दहापट कठीण असलेली शिखरं या गिर्यारोहकांनी पादाक्रांत केलेली आहेत; पण एव्हरेस्टचं ग्लॅमर या शिखरांना नाही आणि अशी शिखरं सर करणार्‍या या गिर्यारोहकांनाही नाही.
अशा मोहिमांना प्रचंड खर्च येतो. एकट्याच्या बळावर अशा मोहिमा करणं केवळ अशक्य. केवळ नाइलाजापोटी मग यातले काही आव्हानवीर एव्हरेस्टचा सहारा घेतात. जगातलं सर्वोच्च शिखर सर केलं की मग निधी मिळवण्याचा त्यांचा मार्गही थोडा सोपा होतो. स्पॉन्सर्स आपला खिसा मोकळा करतात. एव्हरेस्ट ना त्यांना खुणावतं, ना त्यावर चढाईची त्यांची इच्छा असते; पण नव्या आव्हानांवर स्वार होण्यासाठी त्यांनाही एव्हरेस्टचा सोपा आडमार्ग पत्करावा लागतो.
मोठी शिखरं सर करण्याचा ट्रेण्ड महाराष्ट्रात ज्यांनी सर्वप्रथम आणला, 1988 साली ज्यांनी कांचनजुंगा शिखरावर चढाई करण्याची पहिली नागरी मोहीम आखली आणि हरिश्चंद्र गडावरील बेलाग कोकणकडा खालून वर चढण्याची हिंमत ज्यांनी पहिल्यांदा दाखवली, ते महाराष्ट्राचे ज्येष्ठ गिर्यारोहक वसंत वसंत लिमयेही आजच्या एव्हरेस्ट मोहिमांविषयी तीव्र नाराजी व्यक्त करतात. एव्हरेस्ट चढाई हा आज निव्वळ धंदा झाला असून, अनाडी लोक त्याला बळी पडतात. गिर्यारोहणात पाणी घालून त्याला ‘पर्यटन’ बनवलं जात असल्याची तीव्र खंत त्यांना आहे. लिमये सांगतात, ‘1953मध्ये एडमंड हिलरी आणि शेरपा तेनसिंग नोर्गे यांनी एव्हरेस्ट पहिल्यांदा सर केल्यानंतर जवळपास 80च्या दशकांपर्यंत गिर्यारोहणाच्या मोहिमा उत्तम सुरू होत्या. नवी शिखरं, नवे मार्ग शोधले जात होते, आजपर्यंतच्या अस्पर्श शिखरांवर मोहिमा निघत होत्या, नव्या आव्हानांसाठी बाहु फुरफुरताना दिसत होते, साहसाच्या पुढच्या पायर्‍या ओलांडण्याचा प्रय} गिर्यारोहक करत होते; पण आता ते सारं जणू संपल्यागत झालंय. पूर्वी शेरपा बरोबर असला तरी नवे रुट ओपन करण्याचं काम गिर्यारोहकच करायचे. हल्लीचे गिर्यारोहक शेरपांचं बोट धरून फक्त चालतात. हे कसले गिर्यारोहक आणि हे कुठलं गिर्यारोहण? नेपाळ सरकारनंही काहीही करून पैसा कमावण्यात आणि एव्हरेस्टवर घेऊन जाणार्‍या संस्थांनी मार्केटिंग करण्यातच केवळ धन्यता मानली आहे. अशावेळी ट्रॅफिक जॅमसारख्या घटनांपेक्षा वेगळं काय घडू शकतं?.’
एव्हरेस्टवरील प्राणिसंग्रहालयातील एक म्हणून आपलीही ओळख होऊ द्यायची नसेल, आमिषांना बळी पडायचं नसेल आणि ‘आता पुरे’ असं म्हणायची हिंमत ज्यांच्यात असेल त्यांनीच एव्हरेस्टच्या मार्गाला जावं हे उत्तम.

‘यांची’ तर नोंदही आम्ही घेत नाही!
स्वत:ला ‘गिर्यारोहक’ म्हणवणारे जे लोक सध्या एव्हरेस्टवर जातात, त्यात त्यांची स्वत:ची कर्तबगारी काय? एव्हरेस्टवर जाणार्‍यांना मुळात आता आम्ही ‘गिर्यारोहक’च मानत नाही. इतकंच काय, तर त्यांची नोंदही आम्ही घेत नाही. ‘या सीझनमध्ये अमुक इतके जण एव्हरेस्टवर जाऊन आलेत’. बस्स, एवढीच त्यांची दखल! त्यांची नावंही आम्ही छापत नाही.
एव्हरेस्टवरील ट्रॅफिक जॅमच्या आताच्या घटनेला सर्वस्वी जबाबदार आहे ती गिर्यारोहणात शिरलेली  ‘हावरट’ मानवी प्रवृत्ती. काहीही अनुभव नसलेल्या आणि केवळ प्रसिद्धीसाठी तिथे जाणार्‍या लोकांनीच ही वेळ ओढवून आणली आहे. 
केवळ मी पैसे भरले आहेत, माझा झेंडा मला तिथे रोवायचा आहे, या लालसेपोटी लोकांनी एव्हरेस्टचं पावित्र्य मातीमोल करून टाकलं आहे. एव्हरेस्टवर चढण्यासाठी आधीच सगळीकडे रोप लावून ठेवले आहेत. ते धरून हे गिर्यारोहक चढतात, ऑक्सिजन सिलिंडर्स, शेरपा मदतीला असतात, गरज लागली तर एक्स्ट्रॉ सिलिंडर्सही असतात! ज्या एडमंड हिलरीनं शेरपा तेनसिंग नोर्गेसह 1953मध्ये पहिल्यांदा एव्हरेस्ट सर केलं, त्या शिखराजवळच्या भागाला हिलरी स्टेप म्हणतात, तिथेही आता तोडफोड करून उभं राहायला जागा करून ठेवली आहे. या सगळ्यात मग आव्हान उरलं ते कुठे?, एव्हरेस्टविषयीचा आदरच इतका सगळ्यांनी खाली आणून ठेवला आहे.
- हरिष कपाडिया
(‘हिमालयन क्लब’च्या र्जनलचे दीर्घकाळ संपादक असलेले आणि अनेक अत्यंत कठीण तसेच अज्ञात शिखरं सर केलेले ज्येष्ठ गिर्यारोहक)

बर्फाळ मृत्यूंचं हे सावट एव्हरेस्टवर का आलं?

1. यंदा नेपाळ सरकारनं एकाच सीझनमध्ये एव्हरेस्टवर जाण्यासाठी आजपर्यंतचे सर्वाधिक म्हणजे तब्बल 381 परमिट्स दिले होते.
2. या संभाव्य एव्हरेस्टवीरांव्यतिरिक्त प्रत्येकाबरोबर असलेले किमान तेवढेच शेरपा.. म्हणजे त्या चिंचोळ्या शिखरावर साधारण एकाच वेळी चढाई करू पाहणारे तब्बल 800 शिलेदार !
3. एव्हरेस्टवर चढाई करण्यासाठी एवढी मोठी फौज एकाच वेळी रांगेत उभी राहिली, याचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे हवामान! 
4. समिटवर जाण्यासाठी एप्रिलअखेर ते मे हा सर्वोत्तम काळ समजला जातो. पण खराब हवामानामुळे यंदा ‘क्लिअर वेदर विंडो’ (हवामान चांगलं असण्याचा काळ) अतिशय कमी झाला.
5. यंदा 22 आणि 23 मे रोजी हवामान चांगलं, 24 मेला खराब आणि 25 मे रोजी हवामान पुन्हा चांगलं असण्याचा अंदाज वर्तवला गेला होता.
6. या अंदाजानुसार समिटवर चढाई करण्यासाठी 22 मे हा ‘सर्वोत्तम’ दिवस म्हणून एकाचवेळी अनेकांनी चढाई सुरू केली.
7. एव्हरेस्टच्या बेस कॅम्प चारपासून पुढे जाण्या-येण्यासाठी एकच एक चिंचोळा मार्ग आहे, ज्यावरून एकावेळी जास्तीत जास्त दोनच माणसं जाऊ शकतात.
8. त्या निमुळत्या एकेरी मार्गावर एकाच वेळी तीन-चारशे माणसं, शिवाय हे ट्रॅफिक कंट्रोल करणारा, करू शकणारा एकही जण तिथे नव्हता.
9. ज्या प्रवासाला एरवी तीन-चार तास पुरेसे ठरतात, तिथे तिथे बारा-बारा तास गिर्यारोहक अडकून पडले. आणि यातच काही मृत्यूही ओढवले.

स्वप्न भंगलं, तरी..
ट्रॅफिक जॅमची आणीबाणी उद्भवली तेव्हा एव्हरेस्टवर असलेल्या; पण समिट काही मीटरवर असताना परत फिरण्याची हिंमत दाखवणार्‍या वामिनी सेठी यांनी आपला अनुभव फेसबुकवर नोंदवून ठेवला आहे. त्या लिहितात,  
‘‘आपण समिटपर्यंत जाऊ शकू किंवा नाही, हे कायम ते शिखर ठरवत असतं. एव्हरेस्टचं शिखर एकाच वेळी माझ्या खूप जवळ आणि कधीच न पोहोचू शकण्याइतकं दूरही आहे. मी आता बेसकॅम्पवर परतले आहे. अजूनही श्वास घेते आहे आणि माझे सर्व अवयव शाबूत आहेत. समिटपासून केवळ काही मीटर अंतरावर असताना आम्हाला रेडिओ कॉल आला, परत फिरा. कारण हवामान खराब होतं. गेली दोन वर्षं मी कठोर मेहनत घेतली होती, माझं सर्वस्व पणाला लावलं होतं, आजवरची जमवलेली पुंजी त्यासाठी खर्ची घातली होती, स्पॉन्सर्स आणि हितचिंतकांनी मदत केलेली होती. माझं आयुष्यभराचं स्वप्न मला असं डोळ्यांसमोर दिसत होतं; पण तरीही आम्ही परत फिरलो. बेसकॅम्पवर आलो. नव्या ‘वेदर विंडो’ची वाट पाहण्यासाठी; जी कधीच येणार नव्हती. एक स्वप्नं पुन्हा भंगलं; पण या मोहिमेनं जे शिकवलं, ती माझी आयुष्यभराची पुंजी आहे, जी कोणीच माझ्याकडून हिरावून घेऊ शकणार नाही..’

- समीर मराठे
sameer.marathe@lokmt.com

(लेखक लोकमत वृत्तसमूहात उपवृत्तसंपादक आहेत.)

Web Title: The reality behind the traffic jam at Everest summit, explains journalist Sameer Marathe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.