हिंदी गाण्यांतला दुर्मीळ ‘स्त्री-स्वर’

By Admin | Updated: June 27, 2015 18:25 IST2015-06-27T18:25:13+5:302015-06-27T18:25:13+5:30

हिंदी चित्रपटातील नायिका, स्त्री पात्रे धीट, कर्तृत्ववान, आधुनिक वगैरे दाखवली गेली तरी पुरुषप्रधान मानसिकतेचे कुंपण त्या पार करू शकत नाहीत. व्यवस्थेविरुद्धचे त्यांचे बंड, आव्हान प्रेमप्रांताच्या चौकटीपलीकडे फारसे जात नाही. अर्थात गाण्यांतही हे बंड क्षीणच राहते.

The rare 'woman-tone' of Hindi songs | हिंदी गाण्यांतला दुर्मीळ ‘स्त्री-स्वर’

हिंदी गाण्यांतला दुर्मीळ ‘स्त्री-स्वर’

>विश्राम ढोले
हिंदी चित्रपट म्हणजे पुरुषी मानसिकतेतून मुख्यत्वे पुरुषांना सांगितलेली गोष्ट अशी टीका केली जाते. ती खूप प्रमाणात खरीही आहे. त्यामुळे अर्थातच स्त्रियांचे चित्रण पुरुषी मानसिकतेला पटेल, त्यातील पूर्वग्रहांना ङोपेल आणि अपेक्षांना पुरेल अशाच पद्धतीने करण्याकडे हिंदी चित्रपटांचा स्वाभाविक कल असतो. म्हणूनच हिंदी चित्रपटांतील नायिका व अन्य स्त्री पात्रे अनेक बाबतीत धीट, हुशार, कर्तृत्ववान, आधुनिक वगैरे दाखविली गेली तरी असे चित्रणही या पुरुषप्रधान मानसिकतेचे कुंपण पार करू शकत नाही. तिची धिटाई फक्त पुरु षांच्या स्त्रीविषयक फॅण्टसी पूर्ण करण्याइतपत मर्यादित राहते. तिची हुशारी वा कर्तृत्व तिच्या वैयक्तिक वा कौटुंबिक समस्या सोडविण्यातच गुंतून पडते. तिची आधुनिकता पोशाखी किंवा दिखावू बनून राहते आणि तिचे व्यवस्थेविरुद्धचे बंड किंवा आव्हान मुख्यत्वे प्रेमाच्या प्रांतापुरतेच सीमित राहते. या फॅण्टसी, समस्या, आकर्षण किंवा आव्हानांमागील मूळ पुरुषप्रधान मानसिकतेची चौकट बहुतेकवेळा तिला जाणवतच नाही. प्रसंगी जाणवली तरी ती न्याय्य, नैसर्गिक किंवा नशीब म्हणून स्वीकारण्याकडे तिचा कल असतो. त्यामुळे या मानसिकतेचीच झाडाझडती घेण्याची, तिला जाब विचारण्याची गोष्टही दूर. आता मूळ चित्रपटांमध्येच हा आव्हानाचा सूर फारसा नसल्यामुळे गाण्यातही तो उमटत नसणार हे तसे ओघानेच आले. 
तरीही या सा:या मर्यादांना पार करत काही गाण्यांनी या मानसिकतेला जाब विचारण्याचे आणि मूळ व्यवस्थेवरच टीका करण्याचे धैर्य दाखविले आहेच. अशा गाण्यांची संख्या अतिशय कमी आहे. त्यातील झाडाझडतीचा आविष्कारही पॉप्युलर पातळीवरचा आहे. तरी त्यांच्यातील आव्हानक्षमतेमुळे त्यांची दखल घ्यावी लागते. ‘साधना’मधील (1958) ‘औरत ने जनम दिया मदरें को. मदरें ने उसे बाजार दिया’ हे गाणो अशा या मोजक्या गाण्यांमधील एक महत्त्वाचे गाणो. साधनाची गोष्ट त्या काळच्या मानाने बरीच पुढची होती. मोहन नावाचा प्राध्यापक (सुनील दत्त) त्याच्या आजारी आईच्या इच्छेसाठी लग्नाचे नाटक करायला तयार होतो. जिच्यासोबत तो हे करायला तयार होतो ती चंपाबाई (वैजयंतीमाला) एक वेश्या असते. मोहनला हे माहीत नसते. आईसाठीचे हे नाटक वठविताना मोहनचं तिच्यावर प्रेम बसतं. पण तिला तिच्या मर्यादा माहीत असतात. त्यातच फूस मिळाल्याने ती मोहनच्या घरून दागिने चोरते. तिची पाश्र्वभूमी, कोठय़ावर होणारा तिचा अपमान, आजूबाजूच्या लोकांची कारस्थाने, बदनामीची भीती असे अनेक अडथळे तिच्या मार्गात येतात; शिवाय आपल्या कमीपणाची टोचणीही तिला असतेच. पण मोहनच्या आईचा विश्वास आणि अनेक योगायोगाच्या घटना यामुळे चित्रपटाचा सुखान्त होतो. 
‘साधना’ला पन्नाशीच्या दशकातील पुरोगामी विचारांची प्रेरणा होती हे खरेच; मात्र कथेतून जाणवणा:या पुरोगामीपणापेक्षाही ‘औरत ने जनम दिया मदरें को’ या गाण्याचे आव्हान भारी होते. एकतर हे गाणो येते स्त्री सुरात (लता मंगेशकर) आणि ते महत्त्वाचे आहे. कारण याआधी आणि नंतरही अशा प्रकारची गाणी ब:याचदा पुरुष पात्रंच्याच तोंडी आली आहेत. प्यासामधील ‘ये कुचे ये नीलाम घर दिलकशी के. जिन्हे नाझ है हिंद पर वो कहाँ है गाणो’ त्याचे लखलखीत उदाहरण. वेश्यावस्तीतील दाहक वास्तवाचे वर्णन करणा:या कवी विजयचा ‘जरा मुल्क के रहबरों को बुलाओ. ये कुचे ये गलिया ये मंजर दिखाओ’ असा बोचरा उपहासही त्यात पहायला मिळतो. हे सारे उत्तम असले तरी हे वर्णन व टीका प्रामुख्याने वेश्यावस्तीच्या संदर्भात येते. तिथल्या शोषित स्त्रियांचा कैवार घेत असल्याचे एक सूक्ष्म अस्तरही त्यात जाणवते. खरंतर दोन्ही गाण्यांना साहिर लुधियानवीच्याच विचारांचा आणि प्रतिभेचा स्पर्श लाभला आहे. पण ‘औरतने’मध्ये विशिष्ट अशा शोषित स्त्रियांपेक्षा स्त्रीच्या व्यापक शोषणाचा मुद्दा केंद्रस्थानी आहे. ‘मदरें के लिए हर ऐश का हक. औरत के लिए जीना भी सजा’, ‘मदरें ने बनाई जो रस्मे उस को हक का फर्मान कहा. औरत के जिंदा जलने को कुर्बानी और बलिदान कहा’ अशा थेट आणि धारदार शब्दांतून या शोषणाचे व्यवस्थात्मक रु प समोर येते. पुरूषांची सत्ता आणि स्त्रीचे शोषण यातील परस्परसंबंध हे गाणो ओळीगणिक मांडत जाते. त्यातील अभिव्यक्ती काही ठिकाणी किंचित कर्कश असली तरी शोषक व्यवस्था अनेक पातळ्यांवर कसे काम करत हे मात्र गाण्यातून भेदकपणो समोर येत रहाते. साधना चित्रपटाच्याच कशाला एकूणच हिंदी चित्रपटसृष्टीच्याच प्रकृतीला फार ङोपणार नाही इतक्या प्रखरपणो- थेटपणो हे गाणो या व्यवस्थात्मक अ़न्यायाला वाचा फोडत रहाते. 
हिंदी चित्रपट स्त्री व्यक्तीरेखांना प्रेमाव्यतिरक्त इतर प्रांतात व्यवस्थेविरु द्ध स्पष्ट शब्दात टीका करण्याचीअशी संधी फार क्वचित देतात. संवेदनशील चित्रपट देणा:या बिमल रॉय यांच्या सुजाता (1958) सारख्या उत्तम चित्रपटामध्येही हे दिसून येते. सुजाताची कहाणी उच्चवर्णीय घरात वाढलेल्या अस्पृश्य मुलीची. पण स्त्री आणि  अस्पृश्यता असे दोन महत्त्वाचे मुद्दे आणि आपण दलित आहोत हे कळल्यानंतर येणारा स्व प्रतिमाभंगासारखा महत्त्वाच्या प्रसंग असूनही त्यावर गाणं मात्र नाही. हे काही कोणी मुद्दाम केलेले नाही. पण अस्पृशतेसारख्या विषयावर स्त्रीला बोलतं करावे हे काही नैसर्गिकपणो प्राधान्यक्र मावर आला नाही, हे मात्र खरे. या पार्श्वभूमीवर आरती (1962) मधील ‘बने हो एक खाक से. अमीर क्या गरीब क्या’ हे लताचे गाण अपवादात्मक वाटत. चित्रपटात हे गाणं कथेतील नैसर्गिक भाग म्हणून फार येत नाही. नायिका (मीना कुमारी)  ते रंगमंचीय आविष्कार म्हणून सादर करते. एरवी अशा प्रसंगी हिंदी चित्रपट स्त्रीव्यक्तीरेखेला बहुतेकवेळी प्रेम, नातेसंबंध, भक्ती, निसर्ग, व्यक्तिगत स्वप्ने, कलाप्रेम वगैरे विषयांवरचीच गाणी देतात. त्यामुळे सामाजिक व्यवस्थेवर भाष्य करण्यासाठी अशा प्रसंगाची योजना करावी आणि  सशक्त स्त्री व्यक्तीरेखेकडून (डॉक्टर) ती व्यक्त करून घ्यावी याचे अप्रुप वाटते. ‘गरीब है वो इस लिए की तुम अमीर हो गए’ असा अस्सल डावा विचार मांडून ‘खता है ये समाज की भला बुरा नसीब क्या. लहु का रंग एक है अमीर क्या गरीब क्या’ असा परखड सवालही हे गाणो विचारते. आता अशा विचारांनी भारलेल्या गाण्यांची हिंदी चित्रपटांना सवय नाही असे नाही. पण ते स्त्री व्यक्तीरेखांच्या तोंडी येण्याचे प्रसंग फार कमी. जणूकाही समाजाच्या स्थितीवर बोलण्याचा, प्रेमाबाहेरच्या प्रांतातील समतेचा उद्घोष करण्याचा स्त्रियांना अधिकारच नाही. म्हणूनच ‘बने हो एक खाक से’ खूप वेगळे ठरते. केवळ स्त्रीयांच्याच संदर्भात नव्हे तर एकूणच समाजाच्या संदर्भातही प्रश्न विचारण्याचा, काहीतरी परखडपणो सांगण्याचा स्त्रीयांनाही हक्क आहे असे सुप्तपणो जाणवून देणारे ते एक दुर्मिळ गाणो ठरते.
.पण अशी अपवादात्मक गाणी वगळता हिंदी चित्रपटांनी कथेतून किंवा कथेपेक्षा जास्त स्वातंत्र्य घेऊ शकणा:या गाण्यांमधूनही स्त्रियांना मोठे अवकाश मिळू दिले नाही. पडद्यावरील तिच्या अस्तित्त्वाला प्रेम, नाते आणि कुटुंबांच्या चौकटीत पक्के बांधून टाकले. प्रश्न विचारण्याचा, समानतेसाठी झगडण्याचा, समाजावर टीका करण्याचा अधिकार दिला तो मुख्यत्वे एवढ्याच चौकटीपुरता. मागील लेखात आल्याप्रमाणो स्वत्व शोधण्याचा किंवा बंडखोरी करण्याचा रस्ता दाखिवला तोही मुख्यत्वे प्रेमाच्याच प्रांतात. म्हणूनच या सा:यांच्या पलिकडे जाऊ पाहणा:या औरत ने जनम दिया मदरें को किंवा बने हो एक खाक से सारख्या वेगळ्या स्त्रीस्वराची आदराने दखल घेणो गरजेचे बनते.
 
 
1 ‘साधना’चे दिग्दर्शन होते बी. आर चोप्रा यांचे तर संगीत दिले होते एन. दत्ता अर्थात दत्ता नाईक यांनी. चोप्रा आणि एन. दत्ता यांचे सांगितिक सूर पुढे ‘धुल का फुल’मध्येही फुलले. 
 
2  ‘आरती’चे दिग्दर्शन होते फणी मुजुमदार यांचे तर संगीतकार होते रोशन. ‘बने हो खाक से’सह आरतीमधील सगळी गाणी लिहीली ती मजरूह सुलतानपुरी यांनी. 
 
3 एकीकडे स्त्रियांकडे भोगवस्तू म्हणून पाहत असतानाच दुसरीकडे हा भोगधर्म एक मोह किंवा मोक्षमार्गातील एक अडथळा आहे, असे मानण्याचा एक खास पुरु षी पारंपरिक दृष्टिकोनही आपल्याकडे आहे. एकदा असे मानले की स्त्री, तिचे प्रेम, तिचे सौंदर्य, तिच्याशी नाते या एरवी आकर्षक वाटणा:या गोष्टीही मग त्याज्य बनायला लागतात. या एकूणच पारंपरिक विरोधाभासावर चित्रलेखा (1964) या चित्रपटातील ‘संसार से भागे फिरते,  हो. भगवान को क्या तुम पाओंगे’ या गाण्यात मार्मिक भाष्य आहे. ‘ये भोग भी एक तपस्या है तुम त्याग के मारे क्या जानो’ अशा शब्दात हे गाणो या विरोधाभासावर बोट ठेवते. (संगीत- रोशन, गीत- साहिर लुधियानवी, गायिका- लता मंगेशकर)
 
(लेखक माध्यम, तंत्नज्ञान आणि संस्कृती या विषयाचे अभ्यासक आहेत.)
 

Web Title: The rare 'woman-tone' of Hindi songs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.