रॅम्पवर रेश्माबानो
By Admin | Updated: September 17, 2016 13:35 IST2016-09-17T13:35:38+5:302016-09-17T13:35:38+5:30
१९ वर्षाची, अॅसिड हल्ल्यामुळे एक डोळा गमावलेली, चेहरा विद्रूप झालेली एक तरुण मुलगी. हिमतीनं आणि जिद्दीनं ती स्वत:च्या चेहऱ्यापलीकडच्या ओळखीनं न्यू यॉर्क फॅशन वीकचा रॅम्प चालली. त्या हिमतीची एक ओळख..

रॅम्पवर रेश्माबानो
>ओंकार करंबेळकर
त्याने माझ्या चेहऱ्यावर अॅसिड ओतलं आणि माझा चेहरा खराब केला, यात माझा काय दोष... त्याच्या स्वार्थासाठी, त्याने केलेल्या कृत्यासाठी मला बळी ठरवू नका. मी व्हिक्टीम नाही..’
- हे वाक्य आहे १९ वर्षाच्या रेश्माबानो कुरेशीचे. अॅसिड हल्ल्यामुळे चेहरा विद्रूप झाला पण हिमतीनं, जिद्दीनं आणि स्वत:च्या चेहऱ्यापलीकडच्या ओळखीनं डिझायनर अर्चना कोचर आणि वैशाली शडांगुळेचा हात धरून ती थेट न्यू यॉर्क फॅशन वीकच्या रॅम्पवर उतरली. आणि जगभरातल्या माध्यमांसमोर तिनं दिसण्यापलीकडे फॅशन आणि आत्मविश्वासाची नवी मिसाल पेश केली.
२०१४ सालच्या मे महिन्यातली गोष्ट. बहिणीच्या नवऱ्याने आणि त्याच्या मित्रांनी तिच्या चेहऱ्यावर अॅसिड ओतले. त्यात तिचा एक डोळा पूर्ण निकामी झालाच पण सुंदर चेहराही जळून गेला. उपचार झाल्यावर काही आठवड्यांनंतर रेश्माने जेव्हा स्वत:ला आरशात पाहिले तेव्हा ती हादरलीच. तिचा आत्मविश्वास पार धुळीस मिळाला. सगळ्या जगापासून स्वत:ला तोडले आणि आतल्या आत घुसमटत जगू लागली.
पण याच काळामध्ये तिला रिया शर्मा भेटली. मेक लव्ह, नॉट स्कार्स ही संस्था ती चालवते. रेश्मासाठी रिया अगदी देवदूतासारखी धावून आली. रेश्माला नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी रियाने झटून प्रयत्न केले. तिच्या उपचारासाठी आणि न्यायालयीन लढाईसाठी क्राऊड फंडिंगद्वारे तिने पैसे गोळा करून दिले. तुझ्या चेहऱ्यावर अॅसिड ओतले आहे, तुझ्या स्वत्वावर नाही याची जाणीव तिने रेश्माला करून दिली आणि पायावर उभे केले. रियाच्या जबरदस्त प्रयत्नांमुळे रेश्मा हळूहळू सावरली. रियाची मदत आणि आपल्यावर ओढावलेली स्थिती यावर तिने विचार सुरू केला आणि ती अंतर्बाह्य बदलली. या घटनेत माझा काहीच दोष नाही, मी का आयुष्याचा आनंद घ्यायचा नाही, असा प्रश्नच तिने स्वत:ला विचारला आणि अॅसिड हल्ल्यांविरोधात ठामपणे उभे राहायचे ठरवले. २०१५ साली ती एकदा चर्चेत आली होती, आपल्या देशात लिपस्टीकपेक्षा अॅसिड मिळवणे सोपे आहे हे तिने दाखवून दिले होते.
एफटीएल मोडा या संस्थेच्याही ती याच काळात संपर्कात आली. ही संस्थाही रेश्मासारख्या महिलांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी प्रयत्न करते. रेश्माची जिद्द, तिचे विचार पाहून या संस्थेने तिला थेट न्यू यॉर्क फॅशन वीकमध्ये सहभाग घेण्याची संधी दिली. अर्चना कोचर या प्रसिद्ध फॅशन डिझायनरने केलेला पांढरा गाऊन, त्यावर फुलांचे डिझाइन आणि डोक्यावर मुकुट अशा वेशात ती न्यू यॉर्कच्या रॅम्पवर उतरली. ‘आमच्याकडे फक्त सहानुभूतीच्या नजरेनं पाहण्याची लोकांना सवय आहे, पण नकोय ती नजरेतली बिच्चारी सहानुभूती. आम्ही कोणी वेगळे नाही. डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर, त्यापेक्षा खुलेआम होणारी अॅसिड विक्री रोखा, तशी मागणी करा’ असं तिनं फॅशनवॉकनंतर माध्यमांना स्पष्ट सांगितलं.
अर्थात अॅसिड हल्ल्यानंतर असा एखादा दिवस आपल्या आयुष्यात येईल असं तिला कधी वाटलंही नव्हतं. अॅसिडनं जाळलेल्या खुणा तर चेहऱ्यावर आहेत, पण त्यापलीकडे सौंदर्य असू शकतं असं जगाला ठामपणे सांगण्याची हिंमत या १९ वर्षीय मुलीनं आणि तिला रॅम्पवर उतरवण्याचं धाडस करणाऱ्या आयोजकांनीही दाखवली हे महत्त्वाचंच आहे.
न्यू यॉर्क फॅशन वीकने रेश्माला संधी देऊन केवळ नव्या डिझाइनच्या वस्त्राला बाजारात आणलेले नाही, तर त्याने तिच्यासारख्या हजारो मुलींना संदेश दिला आहे.. तुमच्याबरोबर झालेल्या घटनेत तुमचा काहीच दोष नाही, तुम्ही गप्प बसलात तर तुम्हाला उभे राहता येणार नाही. त्यापेक्षा आयुष्याचा रॅम्प हिमतीनं चाला..
प्रीती राठी ते रेश्मा कुरेशी
२०१३ च्या मे महिन्यामध्ये नौदलाच्या रुग्णालयात नर्सचे काम करणाऱ्या प्रीती राठीवर अंकुर पनवार नावाच्या मुलाने अॅसिड फेकले होते. दुर्देवाने प्रीतीचा त्यामध्ये मृत्यू झाला. गुरुवारी ८ सप्टेंबर रोजी अंकुरला या गुन्ह्याबद्दल फाशी झाली, आणि त्याच वेळेस रेश्माने न्यू यॉर्कमध्ये आत्मविश्वासाचा नवा वस्तूपाठ घालून दिला होता. अंकुरला फाशी सुनावली जाणं आणि रेश्माचा ऐतिहासिक रॅम्पवॉक एकाच दिवशी एकाच वेळेस घडला. हा योगायोग असला तरी तो भीषण आहे. भारतात दरवर्षी अॅसिड हल्ल्याच्या १००० घटना घडतात, म्हणजे दिवसाला दोन ते तीन घटना या देशात होतात. प्रीती, रेश्मासारखं अन्य मुलींच्या अंगावर अॅसिड फेकलं जाऊ नये म्हणून कठोर कायद्याची गरज आहेच.
(लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीत उपसंपादक आहेत.)