बोली
By Admin | Updated: March 1, 2015 15:16 IST2015-03-01T15:16:39+5:302015-03-01T15:16:39+5:30
‘स्वनाम’प्रेमाची नक्षी विणलेला आपला‘तो’ सूट लिलावात काढून समाजोपयोगी कामासाठी पैसा उभारण्याची मोदींची ‘ट्रीक’ नवीन नाही. ‘सेलिब्रिटी ऑक्शन’च्या जगात हा ट्रेण्ड चांगलाच रुळला आहे.

बोली
>अर्चना राणे- बानवान
‘स्वनाम’प्रेमाची नक्षी विणलेला आपला‘तो’ सूट लिलावात काढून समाजोपयोगी कामासाठी पैसा उभारण्याची मोदींची ‘ट्रीक’ नवीन नाही. ‘सेलिब्रिटी ऑक्शन’च्या जगात हा ट्रेण्ड चांगलाच रुळला आहे.
-----------
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नुकतीच झालेली भेट चांगलीच गाजली. अर्थात त्यापेक्षाही अधिक गाजला तो मोदी यांनी या भेटीच्या वेळी घातलेला बंद गळ्याचा तो ‘ऐतिहासिक’ सूट!
मोदींच्या ‘स्वनाम-प्रेमा’चे प्रतीक ठरलेला हा सूट पुढे भारतीय राजकारणात ‘विविध’ कारणांनी गाजला आणि गंगा शुध्दी मोहिमेसाठी केला गेलेला त्या सूटचा लिलावही!
मोदींच्या नावाची नक्षी विणलेला हा सूट सूरतमधील एका हिरे व्यापार्याने तब्बल ४ कोटी ३१ लाख रुपयांची बोली लावून खरेदी केला.
सेलिब्रिटींच्या वस्तू लिलावात काढून त्याद्वारे मिळणारी रक्कम समाजकार्यासाठी वापरण्याची रीत जगभरात तशी नवी नाही. आपले बॉलीवूड आणि कला-क्रीडाक्षेत्रानेही असे लिलाव याआधी केले आहेत.
इतिहासात अजरामर होऊन गेलेल्या व्यक्तींच्या वस्तूंचा लिलाव होण्याची प्रथाही आपल्याकडे तशी जुनीच. राजा रवी वर्माने रेखाटलेले एखादे चित्न असो की महात्मा गांधींची दुर्मिळ पत्ने. त्याविषयी समाजात नेहमीच आकर्षण राहिले आहे. अलीकडच्या काळात मात्र सेलिब्रीटींच्या कपड्यांचा किंवा वस्तूंचा लिलाव करण्याचा एक नवा ट्रेंड चांगलाच रुजतो आहे. या लिलावातून मिळणारी रक्कम बहुतेकदा सामाजिक कार्यासाठी वापरली जाते.
अलीकडच्या काळात गाजलेल्या काही सेलिब्रिटी लिलावांचा तपशील मोठा रोचक आणि भारतातल्या सेलिब्रिटींना खास कानमंत्र देणाराही आहे.
मोहम्मद अलीचे ग्लोव्ज
बॉक्सिंग जगतातील महान खेळाडू मोहम्मद अली याच्या फँटम पंचने भल्याभल्या मुष्टियोद्धय़ांना आसमान दाखवलं. अशा नामी बॉक्सरचे ग्लोव्ज न्यूयॉर्कमध्ये नुकतेच तब्बल ११ लाख डॉलरना विकले गेले. २५ मे १९६५रोजी सोनी लिस्टन या तितक्याच ताकदीच्या बॉक्सरसोबत झालेल्या लढतीत अलीने हे ग्लोव्ज वापरले होते.
र्मलिन मन्रोचं पहिलं ‘मॉडेल शूट’
आपल्या अभिनय आणि सौंदर्याने जगभरातील रसिकांना भुरळ पाडणारी हॉलीवूड अभिनेत्नी र्मलिन मन्रो. चित्नपटात येण्यापूर्वीचा तिचा फोटो इंग्लंडमधील विल्टशायर येथे १४ फेब्रुवारी रोजी लिलावात काढण्यात आला. ‘चित्नपटात येण्यासाठी इच्छुक असलेल्या एका तरूणीच्या आग्रहाखातर छायाचित्नकाराने इच्छा नसतानाही घाईघाईत काढलेला फोटो’, असं खरं तर या छायाचित्नाचं वर्णन करता येईल. पण १९४६मध्ये जोसेफ जग्वार याने १९ वर्षाच्या मन्रोचं हे छायाचित्न टिपल्यानंतर हॉलीवूडची दारंच जणू तिच्यासाठी खुली झाली. मन्रोच्या मृत्यूनंतर तब्बल ५३ वर्षांनी गेल्या आठवड्यात तब्बल 3 हजार युरो मोजून एका अज्ञात संग्राहकानं हे छायाचित्न खरेदी केलं.
माधुरीची ‘धकधक’ साडी
लाखोंच्या दिलावर राज करणार्या माधुरी दीक्षितचा ‘बेटा’ चित्नपटातील ‘धकधक करने लगा’ या गाण्याचा लूक आठवतोय? हे गाणं पाहताना आजही रसिक घायाळ होतात. याच गाण्यातील माधुरीच्या ‘त्या’ साडीसाठी तिच्या एका चाहत्यानं तब्बल ८0 हजार रुपये मोजले! ही रक्कम नंतर अनाथ मुलांसाठी काम करणार्या एका स्वयंसेवी संस्थेला देणगीरुपाने देण्यात आले.
सलमानचा टॉवेल
‘जिने के है चार दिन’ असं म्हणत सलमान खानने केलेला टॉवेल डान्स आता जणू डान्सचा एक प्रकार बनला आहे. ‘मुझसे शादी करोगी’ या चित्नपटातील गाण्यादरम्यान सलमानने प्रॉप म्हणून वापरलेला हा टॉवेल मुंबईतील सोसायटी फॉर न्यूट्रीशन एज्युकेशन अँड अँक्शन या एनजीओकरिता निधी उभारण्यासाठी लिलावात काढण्यात आला. एका चाहत्याने १ लाख ४२ हजार रु पये मोजून तो टॉवेल खरेदी केला.
सेलिब्रिटींचे कपडे किंवा वस्तू यांचीच केवळ नव्हे, आता सेलिब्रिटींची भेट घेवून त्यांच्यासोबत प्रवास करणे, वेळ घालवणे आणि गप्पा मारण्यासाठीही बोली लावली जाते. आपला ‘वेळ’ अगर ‘कौशल्य’ देऊन समाजोपयोगी कामासाठी निधी उभारण्यासाठी विविध क्षेत्रातले मान्यवर आता पुढाकार घेऊ लागले आहेत.
अमिताभबरोबर प्रवास
अलिकडेच फ्लाय विथ व्हीआयपी डॉट कॉमने अमिताभ बच्चन यांच्या शेजारी बसून हवाईप्रवास करण्यास इच्छुक असणार्यांसाठीही बोली लावली होती. अशोक अजमेरा या मुंबईतील बँकरने बिग बी सोबतची ही हवाई भेट जिंकली. यासाठी त्याने किती पैसे मोजले हे उघड करण्यात आले नसले तरी त्यातील ८५ टक्के रक्कम शालेय मुलांसाठी माध्यान्ह भोजन पुरवणार्या ‘अक्षयपात्न फाऊंडेशन’ या संस्थेला देण्यात आली.
सचिनची बॅट, टीशर्ट आणि त्याच्यासोबत एक दिवस
मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरसोबत एक दिवस आणि शिवाय त्याच्याकडून क्रिकेटचं प्रशिक्षण! ‘इबे’च्या वतीनं यासाठी े बोली लावली गेली होती! व्हर्लपूल कंपनी आणि दोन अज्ञात दात्यांनी प्रत्येकी सहा लाखाची बोली लावून सचिनचा हा ‘दिवस’ आपल्या नावे केला. या लिलावातील रक्कम ‘अपनालय’ या सेवाभावी संस्थेला अर्पण करण्यात आली तर बोली जिंकणार्या दोन अज्ञात दात्यांनी या निमित्ताने अनाथ मुलांची सचिनसोबत भेट घडवून आणली.
मास्टरब्लास्टरनं मैदानात केलेल्या पराक्रमांप्रमाणेच त्याच्या वापरातल्या वस्तूंनीही सेलिब्रिटी ऑक्शनच्या क्षेत्रात नवनवीन विक्रम केले आहेत. सचिनची बॅट, दहा क्रमांक असलेला त्याचा टीशर्ट आणि एक टाय या वस्तू तब्बल दीड कोटींना खरेदी करण्यात आल्या. पुण्यात झालेल्या या लिलावातील रक्कम अनाथ मुलांच्या संगोपनासाठी देण्यात आली.
स्टेफी आणि आंद्रेकडून टेनिसचे धडे
टेनिस जगतातील दिग्गज खेळाडू दाम्पत्य आंद्रे आगासी आणि स्टेफी ग्राफ हे दोघे मिळून युध्दग्रस्त देशातल्या निर्वासित मुलांसाठी मोठी संस्था चालवतात. या संस्थेकरता निधी उभारण्यासाठी स्टेफी आणि आंद्रेनेही सेलिब्रिटी ऑक्शनचा मार्ग अनेकदा अनुसरला आहे. काही वर्षांपूर्वी एक बोली लावण्यात आली होती. या लिलावात जिंकणार्यास स्टेफी व आगासीला भेटण्याची, अख्खा दिवस त्यांच्याबरोबर घालवण्याची संधी मिळणार होती शिवाय त्यांच्याकडून टेनिसचे धडेही गिरवता येणार होते. यासाठीची प्राथमिक बोलीच होती २६ हजार डॉलर! मात्न स्टेफी-आगासीचा हा क्लास चाहत्याला किती डॉलरला पडला ते कळू शकलं नाही, कारण आयोजकांनी याची माहिती उघड केली नाही.
आमीरची ‘लगान’बॅट
‘लगान’ चित्नपटात भुवनने शेवटच्या चेंडूवर लगावलेला सिक्सर आठवतोय? खर्याखुर्या मॅचइतकाच रोमांचक असलेला हा सामना. त्याचा हिरो अर्थातच भुवन म्हणजे आमीर. आमीर खानने आपली ती बॅट २00४मध्ये लिलावात काढली. माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू इम्रान खानच्या कर्करोग रुग्णालयाकरिता निधी उभारण्यासाठी लाहोरमध्ये या बॅटचा लिलाव करण्यात आला तेव्हा तिला तब्बल ६0 लाख रुपये मिळाले !