अखिल भारतीय साहित्य संमेलन अध्यक्षपद निवडणूक.. आत्ता बास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 03:00 AM2018-07-08T03:00:00+5:302018-07-08T03:00:00+5:30

pulling out the rut from Marathi literary world | अखिल भारतीय साहित्य संमेलन अध्यक्षपद निवडणूक.. आत्ता बास!

अखिल भारतीय साहित्य संमेलन अध्यक्षपद निवडणूक.. आत्ता बास!

Next

- राजन खान 

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कोणतीही निवडणूक न घेता सन्मानाने मराठी साहित्यिकांना प्रदान करण्याचा साहित्य महामंडळाने घेतलेला निर्णय चांगला की वाईट हे अद्याप ठरायचे आहे. त्यासाठी काही काळ जावा लागेल. हा नवा प्रयोग स्वागतशील भूमिकेने स्वीकारायला हवा, हे मात्र खरे! या आधीची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया फार बदनाम झालेली होती. मी स्वत: त्या अनुभवातून गेलो आहे. त्यात काय घडते, कसे घडते हे मी अनुभवलेले आहे. अत्यंत घोळाची, असंख्य वैगुण्ये असलेली ती अपारदर्शी पद्धत कधीतरी मोडायला हवीच होती. त्यामुळे साहित्य महामंडळाच्या निर्णयाचे स्वागत!
- मात्र या निमित्ताने थोड्या व्यापक भूमिकेतून सध्याची साहित्यसृष्टी, साहित्य व्यवहार आणि त्यात आवश्यक असणा-या  सुधारणा यांच्याकडे पाहणे गरजेचे आहे. आव्हाने मोठी आहेत आणि उत्तरे अवघड!
साहित्यसृष्टी, साहित्याचा विकास आणि साहित्यातून कळत-नकळत घडणारा सामाजिक विकास यातले काहीच आजच्या मराठी साहित्यसृष्टीच्या प्राधान्यक्रमावर नाही. समाज आज जसा आहे तसा तो नोंदवणे आणि उद्याची भाकिते करून ठेवणे, उद्याची स्वप्ने पेरून ठेवणे ही साहित्याची खरी जबाबदारी! त्या पार्श्वभूमीवर आज कसा समाज आहे याची नोंद साहित्याच्या रूपाने होते, हे खरे ! मात्र त्या आजच्या सगळ्या नोंदींनासुद्धा जातीय आणि प्रादेशिकवाद, धार्मिकता अशा किनारी आहेत. साहित्यात ग्रामीण, दलित, ब्राह्मणी, नागर, जैन, मुस्लीम, ख्रिश्चन, आदिवासी अशा मारामा-या आहेत. यातून साहित्यसृष्टी बाहेर येणे हे महत्त्वाचे आव्हान!
आदर्श समाज कसा असला पाहिजे याच्या खूप सुप्त मांडण्या केल्या जातात. पण थेट भाष्य करणारी साहित्यकृती मराठीत अपवादानेच येते. जातिपातींच्या पलीकडले तत्त्वज्ञान आपण बोलत राहतो; पण प्रत्यक्ष इलाज सुचवणारे काहीतरी असले पाहिजे ना !
लेखक हा एका अर्थाने त्याच्या विषयाचा तज्ज्ञ असला तरीही बुद्धीने तो मानवी करुणेचा असायला हवा. त्याने व्यापक पातळीवरच संपूर्ण समाजाचा विचार केला पाहिजे. मी आणि माझी जात यातून बाहेर येऊन संपूर्ण मानवी समाज अशी त्याची पृष्ठभागावरची भूमिका हवी. दोन ओळी ज्या लिहायच्या त्या थेट लिहा; पण त्या दोन ओळींच्या मध्ये जे लेखकाने पेरायचे असते, ते निर्मळ, मानवी करुणेचे असले पाहिजे. तसे अनुभव सध्याच्या मराठी साहित्यसृष्टीत दुर्मीळच!
साहित्यसृष्टी केवळ लिहिण्यापुरतीच मर्यादित असते असे नाही. साहित्यसृष्टीतील माणसे समाजाचा भाग असतात. त्याचे दृश्य स्वरूपातील प्रकार खूपच विनोदी असतात. साहित्यिकांच्या ज्या जातीय टोळ्या किंवा प्रांतिक संघटना होऊन बसलेल्या आहेत त्या दुसºया जातीच्या चांगल्या साहित्याला कधीही पुरस्कार देताना दिसत नाहीत. हे साहित्यसृष्टीपुढचे दुसरे आव्हान आहे. ते खुलेपणाने स्वीकारायला हवे.
लेखकाने जे लिहिले आहे, त्याच्या वेदनेला जे शब्दरूप दिले आहे; ती वेदना खरी आहे हे जाणून, समजून घेण्याइतपत कारुण्य वाचक म्हणून माझ्यामध्ये ही असायला हवे. ही भावना तर आता उत्तम साहित्यकृती एवढीच दुर्मीळ झाली आहे. अमुक एक लेखक ‘आपला’ नाही या भूमिकेतून साहित्याकडे पाहिले जाणे मला क्लेशदायी वाटते. मराठी साहित्याचा साहित्यांतर्गत आणि साहित्याबाहेरचासुद्धा विकास होत नाही त्याची कारणे तशीच आहेत. या भेदसृष्टीने देशभरातील मोठे पुरस्कारसुद्धा बाधीत आहेत ही वस्तुस्थिती आहे. हे सारे बदलणे फार मोठे आणि क्लिष्ट काम आहे!
***

 

साहित्यसृष्टीच्या बरोबर नांदणा-या ज्या ज्या सृष्टी आहेत. त्यात चित्रपट, प्रसारमाध्यमे, नाटक            या सा-यातसुद्धा हे भेद शिरलेले आहेत. हा सर्व काळ आपापले गट-तट या पातळीवर आला आहे. लेखक हा आपला असतो अशी समाजालाही सवय राहिलेली नाही आणि लेखकालाही राहिलेली नाही. ज्याने-त्याने या सा-या व्यापकतेतून स्वत:ला तोडून घेतले आहे. आपापल्या प्रिय भेदापुरते स्वत:ला संकुचित करून घेतले आहे. हा चेहेरा भांबावलेला आणि क्षुद्र खरा; पण दुर्दैवाने तो अख्ख्या समाजाचाच चेहेरा होऊ पाहातो आहे.
हल्ली आपण शेतकरी कुठल्या जातीचा आहे हेही शोधतो. संत तुकाराम वैश्विक आणि मानवी तत्त्वज्ञानाविषयी बोलतो, त्याच्या त्या बोलण्याचे निरूपण करतानाही तुकारामाला पुन्हा त्याच्या जातीच्या चौकटीत कोंबणे आपण विसरत नाही, याला काय म्हणावे ! महात्मा फुले हे या महाराष्ट्राचे  दीडशे वर्षातील एक प्रगल्भ वैचारिक नेतृत्व होते. हल्ली प्रतिगामी-पुरोगामी असे नवेच कप्पे तयार झाले आहेत आपल्याकडे. त्यात फुले कुठे बसतात हेही आपण शोधत राहतो. समाज सुखी, आनंदी आणि समाधानी जगला पाहिजे या भूमिकेतून विचार मांडणारे गौतम बुद्ध, चक्रधर, चोखोबा, विसोबा खेचरांपासून तुकोबा असे खूपजण परंपरेने सांगत आले त्यांना आपण देव केले. पण त्यांनी जो विचार सांगितला तिथे आपण जात नाही ही खरी शोकांतिका !
वैचारिक व्यासपीठांवरून ज्यांची अवतरणे आपण न थकता देत असतो, ते निव्वळ लेखक आहेत आणि ते संपूर्ण मानवी हिताचे बोलत आहेत हे आपण लक्षातच घेत नाही. त्यामुळे आपण आपला वर्तमान तर सडवलाच आहे त्याच्या जोडीला आपण खेचून खेचून इतिहासही सडवायला सुरुवात केली आहे.
या सगळ्याचे काय करावे आणि याच्यावर काय तोडगे सुचवावेत?
याला समजुतीचेच मार्ग लागतील. त्यामुळे या सगळ्यावर ‘माणूस होणे’ हे एकच उत्तर मला दिसते.
सडण्यातून कधी कधी चांगल्या गोष्टी उगवतात. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक नव्या क्रांतीला जन्म देतो. केवळ भारतातच नव्हे जगभरात वाईट आणि चांगल्याचा झगडा दिसून येतो आहे. दंगली, खून, मारामाºया होत आहेत. हा अतिरेकाचा काळ आला आहे. एकमेकांच्या डोक्यात सतत भेदांची साशंकता दिसून येते. हे सारे विश्वच अतिरेकाच्या टोकाकडे निघाले आहे. कधी कधी वाटते होऊ दे एकदाचा अतिरेक. कारण या द्वेषाची उत्तरे सापडत नाहीत. हरल्यासारखे हतबल वाटते. ऐकतच नाहीत लोक. मश्गुल आहेत आपल्या जाती-धर्मात आणि भेदाला गोंजारत. सगळीकडे राडा चालू आहे.
अशाच परिस्थितीत आदर्श कसे जगता येईल याचीही मांडणी एका बाजूला होत राहाते... पण वाईटाचे मोठे जग जग या आदर्शाच्या विरोधात आहे. अतिरेकाच्या एका टोकानंतर या परिस्थितीत बदल होऊन एकदा कधीतरी या वाईटाला चांगल्याकडे यावेच लागेल. या टप्प्यावर साहित्यिकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल. त्यांना या टप्प्याला आकार द्यावा लागेल आणि जबाबदारीही खांद्यावर घ्यावी लागेल. त्यासाठी भेदाभेदाच्या पार व्हावे लागेल.
पण हे सारे कसे व्हावे?
त्यासाठी साहाय्यभूत ठरू शकणारी कुठलीही रूढ व्यवस्था आज राज्यात नाही. साहित्यासाठी काम  करणा-या संस्थाच नाहीत. ज्या सध्या दिसतात त्या जे करतात, त्याच्याशी साहित्याचा संबंध केवळ फलकावरच्या नावापुरताच! सारे वरवरचे. उत्सवी कार्यक्रमांचे. सोहोळ्यांनी भरलेले. झगमगाटाचे ! खोल उतरून समाजाच्या तळाबुडी जाऊन काहीतरी केले पाहिजे, ते क्वचितच दिसते. तळाबुडीचे म्हणजे केवळ दलित, शोषित जमाती नव्हते, तर बौद्धिक विकासाची संधी सतत हिरावून घेतला गेलेला समाजातला स्तर ! अशांसाठी व्यापक प्रयत्न साहित्यसृष्टीत आणि साहित्यिकांकडून होणे गरजेचे आहे.
जगात हिंसा आहेच; पण करुणेचा प्रवाह बळकट करण्याचा प्रयत्न साहित्यसृष्टीने केला पाहिजे. त्यासाठी फक्त आणि फक्त माणूस म्हणून काम करतील अशा संघटना पुढे यायला हव्यात.
आम्ही ‘अक्षरमानव’च्या माध्यमातून एक प्रयत्न करतो आहोत. राज्यभरात, देशभरात माझ्यासारखी अनेक माणसे काम करत आहेत.
पण झुंज खूप मोठी आहे. म्हणून मी इतरांनाही आवाहन करतो की, ‘आओ मिलके कुछ अच्छा करे... आओ पहले इन्सान बने!’

 

अस्सल शब्दाची वाट

माझ्यासारखा एक लेखक स्वप्न पाहतो, की केव्हातरी एकदा का होईना संपूर्ण साहित्यसृष्टी संपूर्ण साहित्याकडे दर्जेदार साहित्य, आजच्या नोंदीचे साहित्य आणि उद्याच्या भविष्याची भाकिते करणारे साहित्य म्हणून पाहील.
हे कसे व्हावे?
मला एकच वाटते, की लेखकाने निर्जातीय, निधर्मीय अशा भावनेने जगायला शिकले आणि जगायला लागलेही पाहिजे.  सर्वांना कवेत घेणे, एवढा एकच इलाज मला दिसतो. अर्थात, हा इलाज काहीसा भाबडा, बराचसा स्वप्नाळू आहे. 
यातील मुख्य अडचण अशी की, असे मी स्वत: जगतो हे मी तुम्हाला सांगू शकतो, तुम्हीही असे जगा हेदेखील तुम्हाला सांगू शकतो; पण तसे जगायचे की नाही हे स्वीकारणे  हा शेवटी ज्याचा-त्याचा व्यक्तिगतच निर्णय असणार!
साहित्यसृष्टीत असण्याचे लाभ हे प्रादेशिकता, जातीयता सांभाळूनच मिळत असतील तर एखादा लेखक तत्काळ स्वार्थ सोडून फक्त माणूस होण्याच्या दिशेला येईल अशी आशा कशी करावी? त्यामुळे सध्याचे तरी चित्र आशादायी दिसत नाही. कारण ज्या त्या जातीच्या, प्रदेशाच्या टोळ्या त्या त्या लेखकाला (तो सुमार असला तरी) डोक्यावर घेतात ! पण जाती-प्रदेशाच्या बाहेर, टोळ्यांना नाकारून स्वत:चा स्वतंत्र मार्ग शोधणार्‍या कुणाला हे असे डोक्यावर घेणे नशिबी येण्याची शक्यता धूसरच!
 याचा अर्थ एकच - असे कुणीतरी डोक्यावर घेण्याची गरजच नसलेला सच्चा शब्द त्या ताकदीने मराठीत लिहिला जाणे! - त्या अस्सल शब्दाची वाट पाहायची!

(लेखक ज्येष्ठ साहित्यिक आहेत.)
शब्दांकन : पराग पोतदार

Web Title: pulling out the rut from Marathi literary world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.