प्रेमभावाचा विसावा.
By Admin | Updated: July 18, 2015 13:37 IST2015-07-18T13:37:19+5:302015-07-18T13:37:19+5:30
पालखीच्या वाटचालीचे तीन मुख्य भाग पडतात. एक म्हणजे भजन म्हणत होणारी ‘वाटचाल’, दुसरे म्हणजे ज्या गावाला पोहोचायचे तो ‘मुक्काम’ आणि तिसरी गोष्ट म्हणजे वाटचालीतील मधला ‘विसावा’.

प्रेमभावाचा विसावा.
>डॉ. रामचंद्र देखणो
ज्ञान, ध्यान आणि समाधान या तत्त्वांच्या त्रिवेणीची अनुभूती म्हणजे वारी. ज्ञान-भक्तीच्या समचरणावर, नीती आणि कृतीच्या समचरणावर, आचार आणि विचारांच्या समचरणावर उभी असलेली विठाई माउली वैष्णव वारक:यांना समाधानाचे माहेरपण देत राहिली. तुकोबाराय म्हणतात,
चला पंढरीसी जाऊ।
रखुमादेवीवरा पाहू।।
डोळे निवतील कान।
मना तेथे समाधान।।
पंढरीनाथाच्या दर्शनाने डोळे निवतील. त्याच्या नामसंकीर्तनाने कान तृप्त होतील. संतांच्या भेटीने कीर्तनरंगी भक्तिप्रेमाचे भरते येईल आणि मुक्तीपेक्षाही या तृप्तीच्या आनंदाने वारकरी नाचू लागेल. या आनंदाचा आणि वारकरी संप्रदायाच्या एकात्मिकतेचा विराट आविष्कार म्हणून आपण ‘वारी’ सोहळ्याकडे पाहतो. प्रसिद्ध विचारवंत प्रा. गं. बा. सरदार यांनी म्हटले आहे, की ‘वारकरी पंथाच्या प्रसाराचे आणि लोकप्रियतेचे रहस्य हेच, की त्यांच्या प्रवक्त्यात बुद्धी आणि भावना यांच्या गुणांचा मनोज्ञ मिलाफ झाला होता. त्यांच्याजवळ विचारांचे वैभव कमी नव्हतेच; पण भावनेचे ऐश्वर्यही अपार होते.’ निकोप जीवनदृष्टीच्या खंबीर पायावर वारीच्या माध्यमातून संतांनी प्रबोधनाचे यशोमंदिरच उभारले.
पंढरीची वारी निश्चित केव्हा सुरू झाली, हे सांगणो कठीण आहे; परंतु पंढरीच्या वारीला किमान एक हजार वर्षाची परंपरा आहे. ही वारी ज्ञानदेवांच्या पूर्वीही होती. ज्ञानदेवांचे वडील विठ्ठलपंत हे पंढरीचे वारकरी होते, तर त्यांच्या घराण्यात पंढरीच्या वारीची मिराशी होती. ज्ञानदेवांच्या अगोदरपासून पंढरपुरी वारीला जाण्याचा प्रघात होता. त्यावेळी ‘दिंडी’ ही संकल्पना नसावी. वारकरी एकटे दुकटे किंवा समुदायाने नामगजर करीत, पंढरपुरी वारीला जात असत. परंतु पहिली दिंडी ही पंढरपूरहून आळंदीला आली आहे. ज्ञानेश्वर माउलींनी समाधी घेण्याचा मनोदय जेव्हा व्यक्त केला, तेव्हा संत नामदेव महाराजांच्या मार्गदर्शनाखाली संत गोरा कुंभार, नरहरी सोनार आदि संत मंडळींनी भजनाची दिंडी तयार केली आणि ती दिंडी घेऊन विठ्ठलाच्या गावाहून म्हणजे पंढरपुराहून संत मंडळी माउलींच्या समाधी सोहळ्यासाठी आळंदीस आले. ज्ञानेश्वर माउलींच्या अगोदरपासून पंढरपुरी वारीला जाण्याचा प्रघात होता; पण दिंडी नव्हती. आता दिंडी सुरू झाली आणि ही पंढरपुरी पायी जाणारी मंडळी दिंडीत सहभागी झाली. त्या काळच्या साधू-संतांनी हा प्रघात चालू ठेवला. संत एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज, मल्लप्पा वासकर आदि संतपरंपरेने हा पुण्यमार्ग वाढविला आणि वैष्णव भक्तीचे वर्म, वारीचा धर्म घेऊन दिंडीच्या रूपात नाचू लागले. वारीची परंपरा तुकाराम महाराजांच्या घरात पिढय़ान्पिढय़ा चालू होती.
‘पंढरीची वारी आहे माङो घरी’ असे तुकाराम महाराज अभिमानाने सांगतात. विश्वंभरबाबा हे तुकाराम महाराजांच्या घराण्याचे मूळ पुरुष. तुकाराम महाराज हे त्यांच्यापासून आठव्या पिढीचे वंशज होत. विश्वंभरबाबा दर पंधरा दिवसांनी पंढरपूरला जात असत. तुकोबारायांचे वडील बोल्होबा अखंडपणो चाळीस वर्षे वारी करीत होते, असे महिपतीने वर्णिले आहे. त्यानंतर तुकोबाराय हे स्वत: ज्ञानदेवांच्या पादुका गळ्यात बांधून आपल्या टाळक:यांसह टाळ-मृदंगाच्या गजरात पंढरीची वारी करीत. तुकोबारायांच्या वैकुंठगमनानंतर त्यांचे बंधू कान्होबा यांनी वारीची परंपरा चालू ठेवली आणि त्यानंतर वारीच्या परंपरेची आणि संप्रदायाची धुरा तुकोबारायांचे धाकटे पुत्र नारायणबाबा यांच्या खांद्यावर दिली. ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या पादुका एकाच पालखीत ठेवून ‘ज्ञानोबा-तुकाराम’ असे भजन करीत पंढरपूरला जाण्याची परंपरा नारायणबाबांनी सुरू केली आणि वारीला दिंडीचे स्वरूप प्राप्त झाले.
पालखीच्या वाटचालीमध्ये तीन भाग महत्त्वाचे पडतात. एक म्हणजे भजन म्हणत होणारी ‘वाटचाल’, दुसरे म्हणजे ज्या गावाला पोहोचायचे तो ‘मुक्काम’, तर तिसरी गोष्ट म्हणजे वाटचालीतील मधला ‘विसावा’. चालणारा वारकरी आहे आणि वाट वेगळी आहे. वारकरी आणि वाट दोन्ही मुक्कामाच्या गावी पोहोचतात. म्हणून म्हणावेसे वाटते, की द्वैतभावाची वाटचाल, अद्वैत-भावाचा मुक्काम; पण प्रेमभावाचा विसावा म्हणजे पंढरीची वारी होय. वारीच्या वाटेवर काही ठिकाणी रिंगण केले जाते. उभे रिंगण आणि गोल रिंगण असे रिंगणाचे दोन प्रकार असतात. सर्व वारकरी, टाळकरी, ङोंडेकरी, वीणोकरी गोलाकार उभे राहतात. नामगजर चालू होतो. टाळ-मृदंगाच्या एकाच तालात आणि एकाच लयीत पदन्यास करीत वारकरी नाचू लागतात आणि या तालातच भरधाव वेगाने माउलींचे अश्व गोलाकार प्रदक्षिणा करीत माउलींना अभिवादन करतात. टाळ-मृदंगाचा वेग, जयजयकार आणि वायुवेगाने धावणारे अश्व हे सारे दृश्य विलोभनीय असते. रिंगण संपते आणि हमामा, फुगडय़ा, हुतुतु, एकीबेकी यांसारखे खेळ सुरू होतात.
रिंगण ही प्रथा का सुरू झाली? तिचे रूपक काय? हे समजणो आवश्यक आहे. पंढरीची वारी आणि त्यातील आविष्कार हाच एक बहुरूपी संतखेळ आहे. दमलेल्या-चाललेल्या वारक:यांना खेळायला मिळालेला मुक्त आविष्कार म्हणजे रिंगण. त्यातून काही शारीरिक व्यायाम आणि योगासनेही आपोआपच घडतात आणि वाटचाल सुलभ होते. रिंगण करायला, त्यात खेळायला आणि पाहायलाही खूप लोक उत्सुक असतात. एका लोकगीतात त्याचं सुंदर वर्णन आलं आहे -
पंढरीच्या वाटं दिंडय़ा पताका लोळती।
देव त्या विठ्ठलाचं साधु रिंगण खेळती।।
रिंगणाचं रूपकही आगळंवेगळं आहे. रिंगण म्हणजे गोलाकार खेळ. एखाद्या सरळ रेषेतील सुरुवातीचा आणि शेवटचा बिंदू दाखविता येतो. रिंगणात मात्र कोणत्याही बिंदूपासून वर्तुळ सुरू होते आणि पुन्हा त्याच बिंदूला येऊन मिळाल्यावर परिपूर्ण होते. तसेच जीवनाच्या कोणत्याही क्षणापासून आपल्याला पारमार्थिक रिंगणात प्रवेश करता येतो. माउली म्हणतात, ‘हृदय शुद्धीचा आवारी’ म्हणजे अंत:करणाच्या शुद्धतेच्या आवारात हे मनाचे रिंगण सुरू होते. आत्मस्वरूपापासून निघून व्यापक शिवस्वरूपाला वळसा घालून पुन्हा आत्मस्वरूपाला स्थिरावणो म्हणजे रिंगण पूर्ण होणो होय.
माउली त्या विश्वव्यापी रिंगणात मनाला सोडतात आणि म्हणतात -
म्हणोन तुमचा देवा। परिवारू जो आघवा।
तेतुले रूप होआवा। मीचि एकु।
देवा तुमचा जो सर्व परिवार आहे, तितक्या रूपाने मी एकटय़ानेच बनावे. मीच सर्व रिंगणभर व्हावे आणि रिंगणाइतकं व्यापकत्व माङयात यावे. खेळ रिंगणात खेळतात. विश्वाची निर्मिती हा भगवंताचा खेळ, तर जीवन जगणं हाच जिवाचा खेळ. आपण घालून दिलेल्या मर्यादेच्या आत म्हणजेच धर्म, नीती, तत्त्व, आचार या परिघातच जीवनाचा खेळ रंगवून आनंदाचं रिंगण करायचे आहे.
‘एकान्त, लोकान्त आणि त्यात रंगलेला वेदान्त म्हणजे वारी होय.’ भगवंत एकच आहे. त्या एका भगवंताच्या ठिकाणी स्वत:च्या ‘मी’पणाचा अंत करणो म्हणजे ‘एकान्त’ होय. अरण्यात जाणो म्हणजे एकान्त नव्हे. लौकिक लोकजीवनात स्वत:ला विसरणो हा ‘लोकान्त’, तर ‘मी’पणा जाणो हाच ‘वेदान्त’. तो कृतीत उतरवायचा असेल, तर संतखेळात रमायला हवे. तुकोबाराय वर्णन करतात -
खेळ मांडियेला वाळवंटी घाई,
नाचती वैष्णव भाई रे..
क्रोध अभिमान केले पावटणी
एक एका लागती पायी रे..
वैष्णवांनी वाळवंटात देवाशी ऐक्यभावाचा खेळ मांडला. क्रोध, अभिमान, जातभेद यांना पायाखाली घालून ते नाचत-नाचत खेळू लागले. जीव, शिव दोघेही खेळात रमले. परमात्म्याच्या महाद्वारात जिवाशिवाची फुगडी रंगली.
अभंग, भजन, भारुड, निरूपण, फुगडी, उडी, धावा या सा:यातून बहुरूपी संतखेळ उभा राहतो आणि आनंदाची अनुभूती घडवितो. हा खेळ एकीकडे प्रपंचाशी, तर दुसरीकडे परमार्थाशी जोडला जातो. ग्रंथातून, निरूपणातून किंवा तत्त्वचिंतनातून मांडलेले अध्यात्म समजायला काहीसे अवघडच; पण अशा संतखेळातून सहजतेने अध्यात्म सोपे होते आणि वारीच्या अनुभूतीतून प्रपंचाच्या खेळाबरोबर आत्यंतिक आनंदाचा पारमार्थिक खेळही रंगतो व ‘नाचत पंढरीये जाऊ रे खेळिया। विठ्ठल रखुमाई पाहू रे’ म्हणत दिंडी नाचत-गात पंढरीला येऊन मिळते.
4हैबतबाबांची ‘लष्करी’ शिस्त
ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याला आज जे नेटके रूप प्राप्त झाले आहे ते हैबतबाबांमुळे. ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारांच्या पदरी सरदार असलेले हैबतबाबा माउलींचे परमभक्त होते. त्यांनी त्यावेळचे औंधचे प्रतिनिधी यांच्याकडून आणि पुढे बेळगाव जिल्ह्यातील अंकली गावच्या सरदार शितोळे यांच्याकडून घोडे, तंबू, सामान वाहण्यासाठी गाडय़ा, नैवेद्यासाठी सेवेकरी हा सारा स्वारीचा लवाजमा मागविला, जो आजतागायत चालू आहे. औंधचे पंतप्रतिनिधी श्रीमंत पेशवे सरकार आणि पेशवाई नष्ट झाल्यावर ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य सुरू झाले. त्यांनीही वारीचा हा खर्च देण्याचे चालू ठेवले. पुढे शितोळे सरकारांचे हे सेवाकार्य आजतागायत अखंडपणो चालू आहे. हैबतबाबा हे लष्करात वावरले असल्यामुळे त्यांनी वारीला लष्करी शिस्तीचे वळण दिले. आजही वारीची शिस्त हा एक अभ्यासाचा विषय आहे. आजही वाटचालीत चालण्यामध्ये शिस्त आहे, अभंग म्हणण्यात शिस्त आहे. आजचे वारीचे स्वरूप पाहता सहज लक्षात येते, की वारी हा लष्करी शिस्तीचा आध्यात्मिक आविष्कार आहे.
(लेखक संतसाहित्याचे गाढे अभ्यासक आहेत.)