२०१८- मराठी रंगभूमी- टू बी ऑर नॉट टू बी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 06:00 AM2018-12-30T06:00:00+5:302018-12-30T06:00:06+5:30

मोडकळीला आलेल्या नाट्यगृहांच्या भिंती आणि भक्कम अर्थबळावर स्वार होऊन आलेला ‘हॅम्लेट’..

Prashant Damle looks back at Marathi Theater and the year gone by... | २०१८- मराठी रंगभूमी- टू बी ऑर नॉट टू बी..

२०१८- मराठी रंगभूमी- टू बी ऑर नॉट टू बी..

Next
ठळक मुद्देसरत्या वर्षाचं एक वैशिष्ट्य सांगायचं तर नाटकाच्या प्रसिद्धीसाठी झालेला सोशल मीडियाचा प्रभावी वापर मला महत्त्वाचा वाटतो.

- प्रशांत दामले

मराठी रंगभूमीवर प्रतिभेचा, नव्या प्रयोगांचा दुष्काळ पडला आहे, असा मोठा कालखंड फारसा नाहीच. ही रंगभूमी कायमच बहरती राहिली आहे. सरत्या वर्षाचं एक वैशिष्ट्य सांगायचं तर नाटकाच्या प्रसिद्धीसाठी झालेला सोशल मीडियाचा प्रभावी वापर मला महत्त्वाचा वाटतो.

यावर्षी ‘झी’ या माध्यम समूहाने मराठी नाट्य व्यवसायात केलेलं पदार्पण हा एक महत्त्वाचा बदल ! त्यांनी ‘अलबत्या गलबत्या’ केलं, ‘हॅम्लेट’चा मोठा प्रयोग साकार केला. मराठी नाट्य व्यवसायात उद्योगसमूहांचा, व्यावसायिक कंपन्यांचा सहभाग वाढला, तर भविष्यात मराठी नाटकांच्या निर्मितीमूल्यांमध्ये मोठा फरक पडल्याचं दिसेल.

अर्थात मराठी रंगभूमीवर या प्रकारच्या निर्मितीमूल्यांचा अनुभव नवा आहे. हिंदी रंगभूमीला हे प्रयोग नवीन नाहीत. ‘मुघल-ए- आझम’सारखं हिंदी नाटक एनसीपीए व अन्य ठिकाणी मर्यादित शोजच्या स्वरूपात गेली काही वर्षं चालू आहे. प्रियांका बर्वेसारखी मराठी मुलगी त्यात काम करतेय. ते नाटक आहे; पण त्याचा दृश्यानुभव सिनेमाशी स्पर्धा करणारा आहे, हे नक्की ! पण ते साधणंही तसं कठीणच की ! आपला नाटकाचा सेट हा साडेनऊ फुटाचा असतो. ‘हॅम्लेट’मध्ये सेट दुमजली आहे. हे स्टेजवर दाखवणं खूपच अवघड आहे. तो अनुभव मराठी रंगभूमीवर यावर्षी प्रथम आला, हे महत्त्वाचं ! हे मराठी निर्मात्यांनी स्वीकारलेलं आव्हानच, फक्त ते मोठ्या संस्थेच्या आर्थिक सहभागामुळे पेललं इतकंच.

रंगभूमीवर बड्या कंपन्यांनी आपला पैसा लावून उतरणं याला काहींचा गंभीर आक्षेप आहे, हेही मी मान्य करतो. ‘कार्पोरेट’ निर्मितीत उतरतात तेव्हा पारंपरिक निर्मात्यांमध्ये असू शकते तशा परस्परसंवादाला जागा उरते का? - असे प्रश्न मला विचारतात, त्यांना मी ‘अमर फोटो स्टुडिओ’ आणि ‘संगीत देवबाभळी’ या नाटकांचं उदाहरण देतो. या नाटकांना कॉर्पोरेट सपोर्ट आहे का? नाही ! - पण तरीही तीे धो धो चालतायत. कारण त्यांच्याकडे आहे दर्जा आणि त्यांच्या मागे आहेत प्रेक्षक ! म्हणजे बड्या कंपन्यांच्या प्रवेशामुळे छोट्या प्रयोगांसाठी अवकाश उरणार नाही, ही शंका काही खरी नव्हे !‘साखर खाल्लेला माणूस’ अशा मदतींवाचून चाललंच की !

बदलत्या काळात मराठी रंगभूमीसमोर असलेलं आणखी एक आव्हान म्हणजे नाटकाची प्रसिद्धी. आधुनिक भाषेत प्रमोशन ! सगळी नवी माध्यमं आणि त्यांच्या उपयुक्तता लक्षात घेता हा भलताच चॅलेंजिंग भाग होऊन बसला आहे.

पण हेही खरं की, ‘प्रमोशन’ने सुरुवात उत्तम होऊ शकते. पुढचा प्रवास चालतो तो केवळ दर्जाच्या सातत्यावर! नाटक हे सिनेमासारखं नाही. एकदा छापलं की रोल फिरवत राहायचा. प्रत्येक नाटक हा एक लाइव्ह प्रोग्रॅम असतो. त्यामुळं अतिशय शांतपणे काम करत राहावं लागतं. सोशल मीडिया आणि अन्य माध्यमं वापरून तुम्ही नाटकाचं कितीही प्रमोशन केलं तरी फार फारतर वीस पंचवीस प्रयोग चांगले जातील. खरं तर प्रमोशनपेक्षाही नाटक जास्त चालतं ते माउथ पब्लिसिटीवर. माध्यमांकडून अतिप्रचार केल्यामुळं हानी होऊ नये हेही अखेर तुमच्याच हातात असतं.

परदेशी राहणाऱ्या मराठी माणसांच्या आधाराने मराठी रंगभूमीसाठी एक नवी बाजारपेठ खुली झाली आहे. तिला सरत्या वर्षात मोठं बळ मिळालं, असं मी नक्की म्हणेन. अर्थात, तिकडले प्रेक्षकही विलक्षण चोखंदळ आहेत.

हे झालं ‘तिकडचं. ‘इकड’ची परिस्थिती - त्यातही नाट्यगृहांची अवस्था बिकट आहे. हा आजार सरत्या वर्षातही सरलेला नाही दुर्दैवाने.महाराष्ट्रात त्रेसष्ठ ठिकाणी नाटकांचे प्रयोग होण्याच्या पूर्ण शक्यता आहेत; पण आम्ही प्रयोग करू शकतो का? चिपळूणचं नाट्यगृह पाच वर्ष बंद आहे. कोकणात तर आम्हाला जाताच येत नाही. पूर्वी वाशी, रत्नागिरी, गोवा असाच दौरा करायला लागायचा. आता पनवेल, रोहा, अलिबाग येथे सोय झालीय. पण खासगी नाट्यगृहांची भाडी परवडत नाहीत. त्यातल्या त्यात मराठवाड्यात बरी परिस्थिती आहे.. अन्न, वस्र, निवारा या गरजांनंतर ‘नाटक’ हा सगळ्यात शेवटचा चॉइस आहे लोकांसाठी आणि राजकारणी लोकांसाठीही. सगळं झाल्यावर आवड व वेळ असला तर नाटक !

मराठी रंगभूमी हे गेल्या पस्तीस वर्षांचं माझं घर आहे. खूप टप्पे अनुभवले. त्याचा भाग झालो. प्रयोग केले. थोडं अपयश; पण बहुतांश यशच पाहिलं मी. शेवटी ३५ वर्षांचा अनुभव आहे. मी चुका करत राहिलो; पण तीच चूक परत केली नाही. काळ घडवतो आपल्याला. वाढवतो. त्यातूनच माझा वावर सहज सोपा झाला. नव्या पिढीला वेग फार आहे आणि संयम नाही. आजची पिढी आधी आपला खर्च ठरवते आणि त्याप्रमाणे पैसे मिळवते. क्षेत्रात पाऊल ठेवताच दोन वर्षात मुलं गाड्या घेतात. या कलाकारानं घेतली, म्हणून तो घेतो. कशाचे किती हप्ते द्यायचेत याचा महिनाखेरीचा दबाव असतो. सगळं वेगानं हवं असल्यामुळं तिथं नैराश्य टपून बसलेलं असतं. हातातले पैसे खर्च करण्याबाबतीत व कामाची वाट बघण्याबाबतीत खूप जास्त संयमाची गरज असते. पण हे ऐकण्याच्या, अनुसरण्याच्या मन:स्थितीत सध्यातरी तरुण मुलं नाहीत. पूर्वी मुलंमुली नाटकात या करता येत की ती पायरी पटकन चढून पुढे सिनेमात जाता यावं. आता उलटंही झालंय. सिनेमातून रंगभूमीवर येऊ म्हणतात. पण त्यात गोंधळ होतो जास्त ! कारण आवाजच तयार नसतो. शिवाय सिनेमात यश मिळाल्यामुळं असा भ्रमही असतो की मला सगळं येतं. त्यामुळं शिकण्याची तयारी कमी असते.

- पण हे होणारच. आम्हीही चुकतच शिकलो की आमच्या परीने. नवी मुलंही ते जमवतीलच बहुदा!
 

शब्दांकन : सोनाली नवांगुळ

manthan@lokmat.com

Web Title: Prashant Damle looks back at Marathi Theater and the year gone by...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Natakनाटक