सकारात्मक,सर्वसमावेशक दृष्टीसाठी

By Admin | Updated: July 5, 2014 14:51 IST2014-07-05T14:51:14+5:302014-07-05T14:51:14+5:30

योगाभ्यास आणि योगसाधना हे एक जीवनव्रत आहे. आत्मसाक्षात्काराचा तो मार्ग आहे. जीवनप्रवासात थकलेल्या, वाट चुकलेल्या, स्वत:पासूनच हरवलेल्या असंख्य व्यक्ती व त्यांचे जीवनानुभव व नंतर योगसाधनेने त्यांच्यात झालेले आमूलाग्र परिवर्तन हा प्रवास उलगडणारे नवे सदर..

For a positive, comprehensive look | सकारात्मक,सर्वसमावेशक दृष्टीसाठी

सकारात्मक,सर्वसमावेशक दृष्टीसाठी

- डॉ. संप्रसाद विनोद

 
अध्यात्ममहर्षी न्यायरत्न धुंडिराजशास्त्री विनोद आणि संस्कृत पंडिता मैत्रेयी विनोद यांच्यासारखे आईवडील मिळाल्यामुळे  माझं सगळं बालपण एका वेगळ्या वातावरणात गेलं. आईवडिलांच्या वागण्या-बोलण्यातून, विचारसरणीतून, सहजपणे बुद्धिनिष्ठेचे, विशुद्ध अध्यात्माचे, विशुद्ध ज्ञानाचे आणि मुख्य म्हणजे समाजाभिमुखतेचे वस्तुपाठ मिळत गेले.  
लोकांचं निरीक्षण करणं, त्यांना समजून घेणं, प्रत्येक प्रश्नाच्या मुळाशी जाणं, शोध घेणं, चिकित्सा करणं, प्रयोग करणं ही माझी नैसर्गिक प्रवृत्ती होती आणि त्यात मला चांगली गतीही होती. शोधक, बंडखोर वृत्तीमुळे कुठलाही विचार, संकल्पना मग ती कितीही मोठय़ा माणसाने-म्हणजे अगदी माझ्या वडिलांनी सांगितली तरी ती आंधळेपणाने जशीच्या तशी कधी स्वीकारावीशी वाटली नाही.  
पण, ५0-६0 वर्षांपूर्वीर्चा काळ खूप वेगळा होता. वडीलधार्‍यांची आज्ञा नेहमी पाळावीच लागायची. प्रश्न विचारणं हा उद्धटपणा समजला जायचा. मी घरात सगळ्यात लहान असल्यामुळे मोठय़ांकडून माझी प्रत्येक बंडखोरी नेहमी मोडून काढली जायची. या दडपशाहीचा मला खूप राग यायचा. त्रास व्हायचा. पण माझी बाजू मी कितीही  नेटाने लावून धरली तरी त्याचा फारसा काही उपयोग नसायचा. नंतर फक्त उपदेशाचा प्रचंड भडिमार व्हायचा; जो मला अजिबात आवडायचा नाही. त्यामुळे, वारंवार संघर्षाचे प्रसंग यायचे; पण त्यातून फारसं काहीच निष्पन्न व्हायचं नाही. थोडंसं कळायला लागल्यावर मी या अडचणीतून एक व्यवहार्य मार्ग काढला. आपली बाह्य वागणूक वरिष्ठ किंवा वडीलधारी मंडळी म्हणतील तशी ठेवायची, पण आपलं ‘आंतरिक स्वातंत्र्य’ मात्र सतत जपायचं. आपल्याला पडणार्‍या प्रश्नांचा, शंकांचा आपल्या परीने शोध घ्यायचा आणि परिस्थितीचं, लोकांचं सूक्ष्म निरीक्षणही चालू ठेवायचं. व्यक्तिगत योगसाधना करताना मला माझ्या या स्वभावाचा खूप उपयोग झाला आणि आजही होतो आहे. या प्रवृत्तीमुळे योगविद्येविषयीच्या सर्व संकल्पना नीट समजून घेणं, त्यावर प्रयोग, चिंतन, मनन करणं आणि स्वानुभवाने त्या जाणून घेणं यावर कायम भर दिला गेला. आईवडिलांच्या वागण्या-बोलण्यातून ‘योग जगणं’ म्हणजे काय हे रोज पाहायला, अनुभवायला मिळत होतंच. त्यामुळे योगाभ्यासाकडे पाहण्याचा एक सूक्ष्म, सखोल, सर्वस्पश्री आणि व्यापक दृष्टिकोन विकसित होत गेला. त्यातूनच पुढे ‘अभिजात योगसाधना’ ध्यानमय योगासनं आणि ध्यानमय जीवन’ या संकल्पना आकाराला आल्या. या संकल्पनांवर आधारलेले, विविध प्रकारच्या शारीरिक, मानसिक, भावनिक व्याधी असणार्‍या लोकांना उपयुक्त ठरतील असे अनेक उपक्रम सुरू झाले. गेल्या ३0-३५ वर्षांत या उपक्रमांमधे हजारो लोक सहभागी झाले. त्यांना त्याचे आश्‍चर्यकारक परिणाम मिळाले. साहजिकच त्यांना योगाभ्यासात अधिकाधिक रुची निर्माण झाली. परिणामी, नियमित योगाभ्यास करणं त्यांना सोपं जाऊ लागलं. ते एक रूक्ष ‘कर्तव्य’ न राहता आनंदाचा विषय झाला. नियमित योगसाधनेमुळे सुरुवातीला मिळालेले परिणाम हळूहळू स्थिरावू लागले. त्यांना योगविद्येबद्दल एक निष्ठा निर्माण झाली. कालांतराने हे सगळे लोक खूप जवळचे होत गेले. त्यातूनच एक योगपरिवार आकाराला येत गेला. 
योगाभ्यास किंवा योगसाधना शिकायला येणार्‍या लोकांना शारीरिक योगासनांबरोबरच आनंदी, समाधानी, ताणविरहित, संपन्न जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारी एक सकारात्मक, सकस, सर्वसमावेशक दृष्टी देऊन स्वयंपूर्ण करण्यावर नेहमी भर दिला. त्यासाठी, वेळोवेळी त्यांच्याशी मोकळेपणाने बोलून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी योगविद्येचा कसा उपयोग होऊ शकतो हे समजावून सांगितलं. योगसाधना ही प्राधान्याने ‘अंतर्यात्रा’ असल्यामुळे ती शिकताना आणि शिकवताना वातावरण अनुकूल असावं लागतं. यासाठी, योगप्रशिक्षण सभागृहातलं वातावरण शांत, खेळीमेळीचं, मोकळं, अनौपचारिक आणि सुसंवादाचं ठेवण्याबाबत आवश्यक ती सर्व दक्षता घेतली. योगाभ्यास शिकवताना योगप्रशिक्षक प्रशिक्षणार्थींशी धसमुसळेपणा, जबरदस्ती करून त्यांच्यावर अवाजवी ताण टाकत नाहीत ना, हे काटेकोरपणे पाहिलं. योगप्रशिक्षकांकडून कुठेही अरेरावी, आक्रमकता होणार नाही याची खबरदारी घेतली.
हे सगळं ज्ञान लोकांपर्यंत कसं पोचवावं या विचारात असताना असं लक्षात आलं, की योगाभ्यासासाठी, योगसाधनेसाठी आणि योगोपचारासाठी आलेल्या प्रत्येक व्यक्तीमधे तिच्या स्वभाववैशिष्ट्यामुळे आणि तिला आलेल्या योगविषयक अनुभवांमुळे एक कथाबीज दडलेलं आहे. मग, या दृष्टीने विचार करायला लागल्यावर गेल्या ३५ वर्षांत येऊन गेलेले असंख्य लोक डोळ्यांपुढे आले. त्यांना आलेले अनुभव, त्यांच्याशी झालेले संवाद, त्यांना मिळालेले परिणाम हे सगळं आठवू लागलं. त्यांच्यातले काही परदेशी होते. काही ग्रामीण, शहरी युवक होते. काही व्यसनाधीन तर काही गुंड होते. काही अति संवेदनशील, भाबडे, तर काही व्यवहारचतुर होते. त्यातील काही अनुभव व्यक्तिगत संपर्कातील नसले तरी खूप काही सांगून जाणारे होते.
त्यांच्यात दडलेल्या कथाबीजाला, त्यांच्या अनुभवविश्‍वाला, भावविश्‍वाला दिलेलं साकार शब्दरूप म्हणजे या कथा आहेत. ‘अभिजात योगसाधना’ हा या कथांचा प्राण, आत्मा आहे. म्हणून, त्या खर्‍या अर्थाने ‘योगकथा’ आहेत. या कथांमुळे वाचकांना त्यांच्या आरोग्याच्या, मानवी परस्परसंबंधांच्या, मानसिक ताणाच्या आणि ताणांमुळे निर्माण होणार्‍या समस्यांचं निवारण करणं नक्की सोपं जाईल, असा विश्‍वास वाटतो.  
(लेखक हे महर्षी न्यायरत्न विनोद यांचा विशुद्ध अध्यात्माचा आणि अभिजात योगसाधनेचा वारसा चालविणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे योगगुरू आणि योगोपचारतज्ज्ञ आहेत.)

Web Title: For a positive, comprehensive look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.