राजकारणही सोशल

By Admin | Updated: October 11, 2014 19:10 IST2014-10-11T19:10:43+5:302014-10-11T19:10:43+5:30

निवडणुकांसाठी जाहिरातबाजी करणं हे राजकारण्यांसाठी नवीन नाही. पण सोशल मीडियावरच्या कॉमेंट्सनी आणि विनोदांनी ते कँपेन यशस्वी होणं किंवा अपयशी होणं हा प्रकार मात्र चांगलाच नवीन आहे. सगळ्याच राजकीय पक्षांना आता ही इंटरनेटची आणि त्यातल्या सोशल मीडियाची ताकद समजली आहे. त्या दिशेने पावले पडायलाही सुरुवात झाली आहे..

Politics Social | राजकारणही सोशल

राजकारणही सोशल

-माधव शिरवळकर

 
'याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा’ असं तुकोबारायांनी लिहिलं होतं. त्यांचे ‘दिस गोड व्हावा’ हे शब्द महाराष्ट्रातलं १५ ऑक्टोबरचं मतदान आणि १९ ऑक्टोबरचा निकालाचा दिवस यांनाही सध्या लागू होत आहेत. निवडणूक जिंकावी म्हणून पाच प्रमुख पक्षांचा चाललेला प्रचंड अट्टहास आता चांगलाच रंगात आला आहे. त्या धुळवडीच्या रंगात सोशल मीडियाचं इंद्रधनुष्यही चमकतं आहे. सध्याचा सोशल मीडियाही पंचरंगीच म्हणायचा. फेसबुक, ट्विटर, यू ट्यूब, ब्लॉग आणि व्हॉट्स अप हे सोशल मीडियाचे पाच पक्ष सध्या निवडणुकीची मजा अक्षरश: लुटत आहेत. 
मनोरंजनाची मेजवानी : ‘कुठं निऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’ यावर तर असंख्य विनोद आले. ते एकमेकांना सातत्याने पाठवले गेले. आता हा विनोद भाजपाच्या बाजूला पडणारा आहे की विरोधात पडणारा आहे? असा प्रश्न मला पडला. काहींनी छातीठोकपणे सांगितलं, की अरे त्यातल्या विनोदाला लोक हसणार, पण आठवणार कोणाला? भाजपाला. हॅमर कोणासाठी होतंय, तर भाजपासाठी. हा विनोद भाजपाच्या बाजूला पडणारा आहे अशा मताचे काही होते. तर काहींच्या मते भाजपाच्या जाहिरातीतली हवाच त्या विनोदाने काढून टाकली आहे. पण एक निश्‍चित, की व्हॉट्स अपवर व्हायरल झालेला हा विनोद निवडणूक प्रचाराच्या वातावरणात एक अनामिक भूमिका बजावतो आहे. 
विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात मनोरंजनाची अशी किनार असलेले किती तरी विनोद, कोट्या, तिरकस शेरे यांची रेलचेल सध्या दिसते आहे. दुसरीकडे हमरीतुमरीवर आलेली चर्चा, वाद, अशी शिवीगाळीसह चाललेली धुळवड फेसबुकच्या कट्टय़ावर गाजते आहे. अशा वातावरणात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मनसे या पाच पक्षांची सोशल मीडियातली कामगिरी कशी आहे, यावर कटाक्ष टाकणे यातही एक वेगळ्या प्रकारची करमणूक आहे. 
पळा पळा, कोण पुढे पळे तो : ‘पळा पळा, कोण पुढे पळे तो’ नावाचं एक विनोदी मराठी नाटक पूर्वी गाजलं होतं. त्यात विनोदमूर्ती बबन प्रभू आणि त्यांचे सहकारी कलाकार रंगमंचावर अक्षरश: धुमाकूळ घालत आणि धमाल उडवून देत. सध्या पाच राजकीय पक्षांनीसुद्धा सोशल मीडियावर ‘पळा पळा’चा प्रयोग चालवून कोण पुढे जास्त पळतोय याची शर्यत लावलेली आहे. सोनिया गांधींचा देशव्यापी काँग्रेस पक्ष आणि दुसरा 
देशव्यापी भाजपा या दोन मोठय़ा पक्षांच्या शर्यतीत काय चाललय याकडे नजर टाकली तिथेही अनेक गंमतीजंमती दिसून येतात. त्याचवेळी या माध्यमांच्या प्रभावी वापराविषयीचं विविध पक्षांचं भानंही अधोरेखीत होतं. महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीची मदार आहे मुंबई प्रदेश काँग्रेस समितीच्या  आणि अखिल देशस्तरावरच्या संकेतस्थळावर आणि त्यांना जोडून असलेल्या फेसबुक व ट्विटरच्या पानांवर. पण काँग्रेसची ही संकेतस्थळे आणि इतर सोशल मीडियावरील निवडणूक प्रचाराचा उत्साह हा नगण्य म्हणावा इतका कमी आहे. पंचरंगी लढतीतील पाच पक्षांमध्ये सोशल मीडियात काँग्रेसने फार हिरीरीने लक्ष घेतल्याचे दिसून येत नाही.  
भाजपाचे मात्र काँग्रेसच्या अगदी उलट आहे. खास महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी भाजपाने हे विचारपूर्वक तयार केलेले संकेतस्थळ मतदारांपुढे ठेवले आहे. त्याला जोडून यू ट्यूबचा चॅनेल आहे, फेसबुक आणि ट्विटरवरही उत्साहाचा धुमाकूळ आहे. दोन राष्ट्रीय पक्षांच्या सोशल मीडियाच्या वापरासंबंधीच्या धोरणातील ही दोन टोकांची तफावत पाहिली, की लक्षात येते, की काँग्रेस पक्षाने आजही सोशल मीडियाची गंभीर दखल प्रचारासाठी घेतलेली नाही. 
राष्ट्रवादी काँग्रेसचे संकेतस्थळ आणि त्याला लागून असलेली फेसबुक व ट्विटरची पाने पाहिली, की लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीने सोशल मीडियाला गांभीर्याने घेतल्याचं दिसतं. त्यांच्या प्रयत्नात भाजपासारखी सफाई दिसत नसली तरी प्रारंभ गांभीर्याने झाल्याचं स्पष्ट दिसत आहे. शरद पवारांच्या स्वत:च्या ट्विट्स निवडणूक प्रचाराच्या काळात वारंवार दिसताहेत. मोदींवरील त्यांची टीका प्रकर्षाने मांडलेली तिथे दिसते. अजित पवारांचीही हजेरी ठळकपणे दिसते. 
शिवसेना आणि मनसे या दोन राज्यस्तरीय पक्षांनी भाजपाइतकी सफाई गाठली नसली, तरी सोशल मीडियाला गांभीर्याने घेतलेलं आहे. त्यांची संकेतस्थळे आणि त्यावर दिलेल्या फेसबुक व ट्विटरच्या लिंक्स पाहिल्या, की निवडणुकीची हलचल त्यावर दिसते. स्वत:चा प्रचार, आणि विरोधकांवरील टीका तिथे असणार हे अपेक्षितच आहे.
सर्वच संकेतस्थळांवर निवडणूक जाहीर सभांचे दैनंदिन कार्यक्रम नियमितपणे प्रसिद्ध होत आहेत. विरोधकांची वैगुण्ये ज्यात आहेत अशा अन्यत्र प्रकाशित झालेल्या बातम्यांची कात्रणे झळकवली जात आहेत. हे सर्व असलं आणि विविध पक्षांनी एकूणच सोशल मीडियावरील प्रचारात आघाडी घेतलेली दिसत असली तरी एक महत्त्वाचा प्रश्न अनुत्तरित राहिलेला दिसतो. तो प्रश्न म्हणजे या विधानसभा निवडणुकीत खुद्द मतदारांनी सोशल मीडिया गांभीर्याने घेतला आहे का, की त्याच्याकडे ते फक्त एक मजा म्हणून पाहात आहेत? पक्षांच्या फेसबुक पानांवर जनतेने गर्दी केली आहे, तेथे मौलिक चर्चा होताना किंवा मुद्दे रंगताना दिसत नाहीत. एकांगी टीका, एकांगी स्तुती, अतार्किकतेने ओतप्रोत भरलेले, अपुर्‍या माहितीवर आधारलेले मुद्दे चर्चेत वारंवार आणि भरपूर प्रमाणात आलेले दिसल्यानंतर जनता तिथून काढता पाय घेताना दिसतात. मग तीच ती मंडळी त्याच त्या प्रकारची बाळबोध उलटसुलट चर्चा करताना, मुद्दे शोधण्यासाठी जंगजंग पछाडताना दिसतात. 
राजकीय पक्ष, मतदार, इतर संबंधित असे सगळेच सोशल मीडियाच्या बाबतीत बालवगार्तून इयत्ता पहिलीत आले आहेत आणि पहिलीच्या वर्गात शाळा सुरू झाल्यानंतर जसा गोंधळ उडालेला असतो तसं काहीसं वातावरण तिथे दिसतं. मात्र सुरुवात झाली आहे यात मात्र शंका नाही. निवडणुकांच्या नंतर, निकाल लागल्यानंतर राजकीय पक्ष आणि उमेदवार सोशल मीडियाचा आणि संकेतस्थळांचा उपयोग तेवढय़ाच उत्साहाने करीत राहतील का? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. 
चार महिन्यांपूर्वीची लोकसभा निवडणूक आणि आताची विधानसभा निवडणूक यांची तुलना सोशल मीडियाच्या वापराच्या संदर्भात केली तर असं निश्‍चितपणे म्हणता येईल, की लोकसभेच्या वेळी भाजपाने एकतर्फीपणे सोशल मीडियाची शर्यत जिंकली होती. पण विधानसभेच्या वेळी तसा एकतर्फी लाभ भाजपाला मिळताना दिसत नाही. तरीही निवडणूक प्रचाराच्या बाबतीत आपल्याकडला सोशल मीडिया अजून वयात आलेला नाही हेच खरं.
(लेखक विज्ञान अभ्यासक आहेत.)

Web Title: Politics Social

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.