ही तर राजकीय अंधश्रद्धा

By Admin | Updated: June 27, 2015 18:30 IST2015-06-27T18:30:26+5:302015-06-27T18:30:26+5:30

परकीय शक्ती ज्यांचा फायदा करून घेऊ पाहत होत्या, अशा विरोधकांनी इंदिरा गांधींपुढे पर्यायच ठेवला नव्हता आणि देशाचं सार्वभौमत्व व एकात्मता टिकवण्यासाठी आणीबाणी आणणं भाग होतं, हा जो युक्तिवाद जागतिक घटनांची पाश्र्वभूमी चितारून केतकर करतात, तो अतिरंजित तर आहेच, पण ही पाश्र्वभूमी वस्तुनिष्ठ आहे की नाही, हाही प्रश्नच आहे.

This is the political superstition | ही तर राजकीय अंधश्रद्धा

ही तर राजकीय अंधश्रद्धा

कुमार केतकर आणि ‘परकीय हाता’ची वाजवून गुळगुळीत झालेली जुनी रेकॉर्ड

 
- प्रकाश बाळ
 
टाइम मशीन’ या सदरातील (मंथन, रविवार, 21 जून 2015) श्री. कुमार केतकर यांचं आणीबाणीविषयक मतप्रदर्शन वाचून ते अजूनही त्याच काळात अडकले आहेत, ‘परकीय हाता’ची वाजवून गुळगुळीत झालेली तीच जुनी रेकॉर्ड लावून बसले आहेत, हे जाणवलं. अर्थात आश्चर्य मुळीच वाटलं नाही, पण व्यथित व्हायला निश्चितच झालं. आजच्या काळात हिंदुत्ववादाने उभ्या केलेल्या आव्हानांना सामोरं जाताना, एकूणच काय चुकलं, काय करायला हवं होतं याचा लेखाजोखा घेण्याची गरज असताना, अशा पक्षपाती पवित्र्यामुळंच मोदी सत्तेवर येण्याचा मार्ग मोकळा झाला, हे केतकर यांच्यासारख्या कडव्या संघ विरोधकांना जाणवू नये, यामुळे आलेली ही व्यथा आहे.
आज देशात मोदी सरकार येऊ शकलं, त्याची बीजं पेरली गेली ती अठरा पगड जाती-जमाती, वांशिक—भाषिक गट, धर्म व पंथ यांची आघाडी हे काँग्रेसचं मूळ स्वरूप बदलत गेल्यामुळे! काँग्रेसच आपलं हित सांभाळू शकते, हा स्वातंत्र्याच्या वेळचा विश्वास ओसरायला नेहरू पर्वाच्या शेवटासच सुरुवात झाली होती. पण त्याला वेग येत गेला, तो इंदिरा गांधी यांच्या कारकिर्दीत. सत्तेवर आपली घट्ट पकड बसविण्याच्या ओघात त्यांनी जी काही ‘होयबां’ची भाऊगर्दी पक्षात केली, त्यामुळं ‘विचारा’पेक्षा नेत्यावरील ‘निष्ठे’ला महत्त्व येत गेलं. काँग्रेसने स्वातंत्र्य चळवळीपासून मोठय़ा कष्टाने उभ्या केलेल्या लोकशाही चौकटीला धक्का लागण्याची ही सुरुवात होती. 
दुस:या बाजूने याच काळात डॉ. राममनोहर लोहिया यांनी जी बिगर काँग्रेसवादाची रणनीती आखली, त्यामुळे ज्या हिंदुत्ववादी शक्ती तोपर्यंत राजकारणाच्या परिघावर होत्या, त्यांना मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळत गेली. नंतर नव्वदीच्या अखेरीस जी राष्ट्रीय लोकशाही आघाडी संघाने उभी केली, ती याच ‘बिगर काँग्रेसवादा’च्या आधारे. आज मोदी जे ‘काँग्रेसमुक्त भारता’चं स्वप्न दाखवत आहेत, त्याचे खरे जनक लोहियाच आहेत. लोहियांना समाजवाद आणण्यासाठी काँग्रेसला बाजूला करायचं होतं आणि मोदी यांना हिंदू राष्ट्र बनविण्यासाठी काँग्रेस नको आहे. मात्र या दोघांना आपले डावपेच रेटता आले, ते काँग्रेसचं मूळ स्वरूप मोडीत काढून इंदिरा गांधी यांनी सत्ताकांक्षेपायी एकतंत्री व एकाधिकारशाही कार्यपद्धती अंगीकारल्यामुळेच. त्यामुळे इंदिरा गांधी ख:या लोकशाहीवादी होत्या आणि विरोधकांना लोकशाही मोडीत काढायची होती, हा केतकर यांचा दावा त्यांच्यासारख्या पूर्ण पक्षपाती विश्लेषकाविना इतर कोणालाही वस्तुनिष्ठ पुराव्यानिशी करता येणार नाही.
म्हणूनच संजय गांधी यांचा काँग्रेसवर बसत गेलेला कब्जा आणि नंतर त्यातून उद्भवलेली आणीबाणी यास इंदिरा गांधीच जबाबदार होत्या. परकीय शक्ती ज्यांचा फायदा करून घेऊ पाहत होत्या, अशा विरोधकांनी इंदिरा गांधींपुढे पर्यायच ठेवला नव्हता आणि देशाचं सार्वभौमत्व व एकात्मता टिकवण्यासाठी आणीबाणी आणणं भाग होतं, हा जो युक्तिवाद जागतिक घटनांची पाश्र्वभूमी चितारून केतकर करतात, तो अतिरंजित तर आहेच, पण ही पाश्र्वभूमी वस्तुनिष्ठ आहे की नाही, हाही प्रश्नच आहे. 
डॅनियल पॅट्रिक मॉयनिहान हे भारतातील अमेरिकेचे राजदूत होते. त्यांनी लिहून ठेवलं आहे की, 1974 साली भारत सरकारातील दोन वरिष्ठ अधिकारी मला भेटले होते आणि ‘सीआयए’चे प्रमुख विल्यम कोल्बी भारताला भेट देतील काय आणि दोन्ही देशांतील गुप्तहेर संघटना एकमेकांशी काही सहकार्य करण्याची व्यवस्था होऊ शकते काय, अशी विचारणा त्यांनी केली होती.
मॉयनिहान पुढे लिहितात की, भारतातील ‘सीआयए’च्या कारवायांची मी जरा खोलात जाऊन माहिती घेतली, तेव्हा किमान दोन राज्यांत निवडणुकीच्या वेळी ‘सीआयए’ने सत्ताधारी पक्षाला पैसे पुरवले होते, असा तपशील माङया हाती आला. 
- हे पैसे एका ज्येष्ठ महिला नेत्याच्या हाती देण्यात आले होते, अशीही पुस्ती मॉयनिहान यांनी जोडली आहे. 
अर्थात हे प्रसिद्ध झाल्यावर त्याचा ठाम इन्कार करण्यात आला, हे वेगळं सांगायला नकोच. 
मुद्दा एवढाच आहे की, केतकर जशी पाश्र्वभूमी चितारतात, जयप्रकाशजी अमेरिकेचे हस्तक होते असं सूचित करतात (तसं उघड म्हणायची राजकीय धमक ते दाखवत नाहीत) तसं ते कोणालाही दुस:या बाजूने करता येणं अशक्य नाही. 
मात्र इतकं करूनही ‘इंदिरा गांधी खरोखरच लोकशाहीवादी होत्या काय?’ या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही आणि तशा त्या असत्या, तर आणीबाणीत जे काही  घडलं, संजय गांधींनी जी दडपशाही केली, ती इंदिरा गांधी यांनी कशी चालू दिली, हा प्रश्न उरतोच. 
या प्रश्नाचं उत्तर देण्याचं केतकर यांनी सफाईनं टाळलं आहे; कारण तसं केल्यास दोष इंदिरा गांधी यांच्या पदरात टाकण्याविना त्यांना दुसरं गत्यंतर उरलं नसतं. म्हणूनच आणीबाणीत काय झालं याचा वेगळा विचार करायला हवा, असा सोयीस्कर पवित्र केतकर यांनी घेतला आहे.
आणीबाणी लादण्याची इंदिरा गांधी यांची ही घोडचूक संघाच्या पथ्यावर पडली. पुढे ऐंशीच्या दशकात राजीव गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयाचा शाहबानू निकाल रद्दबातल ठरविण्यासाठी मुस्लीम महिला विधेयक संमत करवून घेतलं. त्यावर बहुसंख्याकांत जो जनक्षोभ उसळला त्यास संघाचा प्रचार मोठय़ा प्रमाणावर जबाबदार होता. त्यावर उतारा म्हणून बाबरी मशिदीची दारं उघडण्यात आली. 
आज देशात मोदी सरकार आलं, त्याची प्रक्रि या ऐंशीच्या मध्यातील या घटनांपासून सुरू झाली. हे घडू शकलं, त्यास काँग्र्रेसचं बदललेलं स्वरूपच जबाबदार होतं आणि ते इंदिरा गांधी यांच्या एकतंत्री व एकाधिकारशाही कारभार पद्धतीमुळं ते घडून आलं होतं. राहिला प्रश्न  आणीबाणी उठवून निवडणूक घेण्याचा. त्यामागेही आडाखा होता, तो आपण पुन्हा विजयी होऊ हाच. काँग्रेस पक्षाचं स्वरूप इंदिरा गांधी यांनी बदलल्याने आणि नोकरशाहीतही जी ‘निष्ठे’ची मांदियाळी तयार झाली होती, त्यामुळे नेत्याला जे रुचेल, तेच सांगण्याकडे कल होता. उघडच आहे की, परिस्थितीची खरी जाण येईल, असा तपशील इंदिरा गांधी यांच्यापर्यंत पोचवलाच गेला नाही. तसं घडण्यास त्यांची एकाधिकारशाहीची कार्यपद्धतीच जबाबदार होती.
आज चाळीस वर्षांनंतर केतकर हे का मान्य करीत नाहीत, हे अनाकलनीय आहे. इंदिरा गांधी यांच्यावर त्यांची श्रद्धा असणं समजू शकतं. पण त्याला अंधश्रद्धेचं स्वरूप आलं आहे. त्यापायी ते काँग्रेस आणि इंदिरा गांधी ंिकवा संजय, राजीव, सोनिया, राहुल यांच्यात फरक करू शकलेले नाहीत. 
आज देश हिंदुत्वाच्या पकडीत जाण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. गांधी-नेहरूंचा काँग्रेस विचारच ही पकड ढिली करून मोडून काढण्यास आधारभूत ठरू शकतो. मोदी व संघ यांनी नेमकं हेच जाणलं आहे. म्हणूनच इंदिरा, संजय, राजीव, सोनिया, राहुल यांच्या कारभारांवर रोख ठेवून काँग्रेसनंच देशाची वाट लावली, हे जनमनात रुजवायचा संघाचा प्रयत्न आहे. उलट हिंदुत्वाच्या विचाराचा गाभाच एकाधिकारशाहीचा आहे, तसा तो काँग्रेसच्या विचाराचा नाही. 
काँग्रेसच्या विचाराचा गाभाच बहुसांस्कृतिक लोकशाहीचा आहे, हे ठासून सांगण्यासाठी इंदिरा गांधी यांची लोकशाहीला नख लावणारी कार्यपद्धती व काँग्रेस विचार यांत फरक असल्याचं दाखवून देण्याची नितांत गरज आहे.  
केतकर यांच्यासारखे राजकीय अंधश्रद्धाळू सतत इंदिराभक्तीचं कीर्तन करताना हा फरक पुढे आणणं जाणीवपूर्वक टाळतात आणि एका प्रकारे संघाला मोकळं रान करून देतात.
 
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत.)

Web Title: This is the political superstition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.