कवी ाणि चित्रकार
By Admin | Updated: March 14, 2015 18:11 IST2015-03-14T18:11:15+5:302015-03-14T18:11:15+5:30
परत त्या मुलाचा फोन आला (असेल वय पंचवीस वगैरे) म्हणाला, ‘‘चित्र दाखवायला येऊ का प्लीज? मागेपण कॉल केलता मी. तुम्ही म्हणला होता नंतर बोलू म्हणून.’’

कवी ाणि चित्रकार
चंद्रमोहन कुलकर्णी
परत त्या मुलाचा फोन आला (असेल वय पंचवीस वगैरे)
म्हणाला, ‘‘चित्र दाखवायला येऊ का प्लीज? मागेपण कॉल केलता मी. तुम्ही म्हणला होता नंतर बोलू म्हणून.’’
‘‘बरं ये’’, म्हटल्यावर पाठीवर एक मोठं दप्तर घेऊन स्टुडिओत आला.
खूप चित्रं होती. एकदोन जाड्या जाड्या फाईल्स. काही सुटे कागद. एकदोन कॅनव्हास बोर्ड, काही गुंडाळ्या, भेंडोळी.
एवढं सगळं घेऊन आला होता. मला जरा कसंसंच वाटलं. म्हटलं,
‘‘आधी थोडं दाखव.’’
एकदोन चाळली, आपण ऑलओव्हर एक नजर टाकतो तशी नजर टाकली.
.सर्वात आधी गणपती.
साईबाबा, कोणतेतरी स्वामी.
म्हटलं ये भी ठीक है.
पण माझा पाहण्याचा स्पीड मात्र नकळत वाढला. झरझर पाहिली.
ऐश्वर्या राय, सचिन (तेंडुलकर), इतर खेळाडू, सुप्रसिद्ध व्यक्ती, मग स्वत:चे नातेवाईक, लहान मुलं, असं करत करत स्वत:चं पण एक चित्र.
पक्षी, फुलं, फुलपाखरं, प्रसिद्ध वॉटरकलरच्या प्रतिकृती वॉटरकलरमधेच.
बरीचशी पेन्सिलनं नाहीतर चारकोलनं करतात ना घासून घासून, तसली. कॅनव्हासवरची ऑइलकलरनं केलेली. बरंच काय काय होतं.
ठेवून दिली.
त्यानंही तो सगळा पसारा झटक्यात आवरला. दप्तरात न ठेवता तिथंच, जरा कडेला ठेवला.
खिशातून मोबाइल काढत काढत म्हणाला,
‘‘अजून आहेत मोबाइलवर. सगळी नाही ना आणता आली! बाइकवर आलोय. पाऊस पणेना.’’
म्हटलं,
‘‘राहू दे, नंतर बघू. आणि मोबाइलवर चित्र बघूही नयेत.’’
.
‘‘तुझी चित्रं कुठेयत?’’ - मी.
‘‘म्हणजे?’’
‘‘तुझी चित्रं कुठेयत?’’
‘‘सर, ही माझीच आहेत.’’
पुन्हा तो पसारा पुढय़ात घेत त्यातलं एक वॉटरकलर
त्याला दाखवत मी विचारलं ,
‘‘हे तुझंय?’’
‘‘हो. क्लासला जात होतो त्या सरांच्या चित्राच्या फोटोवरनं बघून काढलंय. मोठा प्रिंट दिलता सगळ्यांना क्लासच्या एंडला सरांनी एकेक.’’
‘‘हे स्केच?’’
पुस्तकातलंय.
‘‘हे पोर्ट्रेट? लता मंगेशकरेत ना?’’
गानसम्राज्ञीच्या चेहर्यावर पेन्सिलच्या अस्पष्ट अशा पावपाव इंचाच्या चौकटीचौकटी आखलेल्या दिसत होत्या. बिचार्या लताबाई. कसनुसा चेहरा करून बसल्या होत्या.
एक मोनालिसापण होती.
‘‘हे?’’
‘‘हो सर. माझंच आहे. एका मासिकातलंय. आर्ट र्जनलच्या! सगळी मीच काढलीयत, सर! बघून! स्केल टाकून. माझीच आहेत सगळी.’’
‘‘बा. भ. बोरकर माहितीएत?’’
‘‘नाही सर.’’
‘‘बरं, चिं. त्र्यं. खानोलकर..?’’
गप्प.
‘‘बरं, गुलजार.. संदीप खरे तरी माहिती असेल ना?’’
‘‘हो सर, ते दोघं माहिती आहेत. कविता लिहितात.’’
‘‘कोण आवडतं?’’
‘‘तसं काय नाय. पण, .गुलजार जास्त.’’
‘‘त्यांची एक कविता देतो. पुस्तक आहे माझ्याकडे. उतरवून काढशील का कागदावर एक्झ्ॉक्टली, जशीच्या तशी सेम? जमेल का?’’
‘‘येस सर.’’
‘‘तसं केलं तर तू कवी होशील का? आणि तुझी होईल का ती कविता? की गुलजारचीच राहील?’’
(लेखक ख्यातनाम चित्रकार आहेत.)