खांद्यावरचं डोकंडोक्याखालची उशी

By Admin | Updated: August 29, 2015 15:08 IST2015-08-29T15:08:24+5:302015-08-29T15:08:24+5:30

एक महंत, एकटेच. निवांत. एका बाजूला बसलेले. त्यांच्या बरोबरीचे बाकी सारे दरबार लावून माणसांच्या गोतावळ्यात, स्वस्तुतीच्या आणि भक्तांच्या सेल्फीच्या मोहात अडकलेले. हे महंत मात्र एका बाजूला शांत. त्यांना सहज विचारलं, ‘मागच्या सिंहस्थात आणि आता सुरू होत असलेल्या सिंहस्थात तुम्हाला काय फरक दिसतो?’ ते म्हणाले, ‘पहले लोग दर्शन को आते थे, अब सिर्फ देखने को आते है!’

The pillow below the shoulder | खांद्यावरचं डोकंडोक्याखालची उशी

खांद्यावरचं डोकंडोक्याखालची उशी

>मेघना ढोके
 
बारा वर्षापूर्वीच्या कुंभात ज्या दिवशी चेंगराचेंगरी झाली, चारदोन चांदीच्या सिक्क्यांसाठी गरीब माणसं बेमौत मेली, तोच दिवस. ‘त्या’ दिवशी कुंभातली तिसरी पर्वणी होती, यंदा मात्र त्याच तारखेला पहिली पर्वणी तीन दिवसांवर येऊन ठेपली होती.
तोरणंपताकांनी सजलेल्या साधुग्रामात बारावर्षापूर्वीचा तो दिवस इथे कुणाला आठवतही नव्हता. इथल्या उत्सवी ङोंडय़ांवर त्या सुतकी आठवणींना जागाच नव्हती. माणसांच्या जगण्याला बहुतेक कायमच आजच्या दुखण्यावर औषधं हवी असतात, उद्याच्या व्यथांची काळजी असते. कालच्या जीवघेण्या वेदनांची ठसठस आठवलीच तरी आजचे उत्सव थांबत नाही!
पण इथे तर त्या वेदनांचा आठवही नव्हता, कितीही शोधलं तरी त्या भयाण दिवसाची कुठलीही आठवणखूण मला काहीकेल्या साधुग्रामात पुसटशीसुद्धा दिसली नाही.  
बारा वर्षात गुरुग्रह एक नवं भ्रमण पूर्ण करून सिंह राशीत आला,  त्याच्या भ्रमंतीनं पूर्वीच्या ब:यावाईट घटना गोदेच्या पोटात गडप करून टाकल्या आणि एक नवीन भ्रमणकक्षा आरंभली.
साधुग्रामात फिरताना क्षणभर मलाही वाटलं, आता पुरे आठवणींचा पसारा. आता नव्या कुंभमेळ्यातलं हे नवंकोरं जग पहात फिरावं पुन्हा त्याच को:या नजरेनं.
तसं फिरलं तर पर्वणीच्या आदल्या दिवशीचं साधुग्राम दिसतं, तोरणपताकांनी सजलेले खालसे-आखाडे, लालचुटूक जाजमं, मलमली गालिचे, महंतांची छत्रचामरं, त्यांच्याभोवतीचे दरबार, पायाशी आशाळभूतासारखी उभी श्रीमंत माणसं, दूर लांब उभी गरीबदरिद्री जनता आणि जवळच ‘रसोई’तून येणारे पदार्थाचे दरवळ. पन्नासाठ किलो भाज्या-भात एकदम शिजतील एवढाली पातेली, कढाया, डेक नी तपिलं नी त्याबाजूला पथा:या लावून पडलेली खालसावाली भीड!
हे सारं चित्र काय सांगतं?
आपण स्वत:लाच प्रश्न विचारायचा; मात्र उत्तरबित्तर द्यायच्या भानगडीत न पडता पायाचे तुकडे पडेस्तोवर फिरत रहायचं साधुग्रामात, जायचं या आखाडय़ातून त्या खालसात आणि त्या खालश्यातून दुस:या खालसात. उभं रहायचं. पहायचं. वाटलं तर बसायचं. कुणाशी बोलावंसं वाटलं तर बोलायचं, नाही तर निघायचं.
साधुग्रामात असं दिवसदिवस फिरलं ना तर साधुसमाजी माणसं आणि संसारसमाजी माणसं नवनवी रूपं घेऊन भेटत राहतात. जगणंच बहुरूपी होऊन खेळ दाखवायला लागतं.
तो खेळ फक्त पाहत रहायचा.
अट एकच, जजमेण्टल व्हायचं नाही! ते झालं की या कुंभातल्या डुबकीतलं पाणी डोळ्यात जाऊन काही दिसण्याची शक्यताच अंधूक होते.
अशीच फिरता फिरता डाकोर इंदौर खालसात गेले.
तोर्पयत त्या खालसाचा त्यांचा म्होरक्या असलेल्या दिगंबर आखाडय़ाबरोबर वाद चालला होता. स्नानबहिष्कार, त्यातले समझौते असं काहीबाही राजकारण पेटलं होतं. त्याच डाकोर इंदौर खालसातल्या रईसी तामझामात गेले. बाजूलाच मुख्य महंतांचा दरबार भरलेला. सभोवताली साधू-महंत, बडे रईस लोक, त्यांचं फोटोसेशन, नमस्कारचमत्कार, सेल्फीबिल्फी सारं यथासांग चाललेलं!
बाजूला उभ्या गर्दीत उभं राहून ते सारं पाहतानाच एकदम धक्का लागला तर शेजारी छातीला बिलगलेलं लहान लेकरू घेऊन एक विशीबाविशीचा तरुण उभा. त्या बाळाचाच धक्का लागला तसा एकदम चटकाच बसला. पोर तापानं फणफणलेलं, मलूल झालेलं. बापाच्या छातीला घट्ट चिकटलेलं.
‘डॉक्टर को दिखाया?’
-विचारलं तर तो तरुण 
म्हणाला, त्यासाठीच आणलंय. खालशाच्या बाहेर फिरत्या दवाखाना असलेल्या व्हॅनसमोर बरीच मोठी रांग होती. आई त्या रांगेत उभी. मूल रडायला लागलं म्हणून गंमत दाखवायला बाबा इकडे घेऊन आला. मग जरा चौकशी केल्यावर कळलं की हे नवरा-बायको अमरावती जवळच्या धारणीहून आलेले. शेतमजूर. यंदा शेतीची कामं कमीच. म्हणून कुंभात काम शोधायला आले. दोघं होलसेलमधून डाळींब घेतात, साधुग्रामात विकतात. एक जागा धरून ठेवलीये तिथं राहतात, खाण्याची तर चंगळ आहेच, तो प्रश्न नाही, जेवायला फुकट मिळतं. पुढचा महिना दीडमहिना राहून मिळेल तेवढे पैसे कमावून गावी जायचं, हेच या फळवाल्या राठोडचं ध्येय. 
समोर रईसीचा डोळे दिपावेत एवढा लखलखाट, आणि बाजूला पोटाची आग! हे वास्तव सरसकट दिसतंच साधुग्रामात. धर्म, भक्ती, अध्यात्म  हे सारं नंतर. पोटाची खळगी, जगण्याचं वास्तव असं रांगेत सगळ्यात पुढे जाऊन उभं राहतं. सगळीकडे हेच दृश्य. रुद्राक्षाच्या माळा विकणा:या आयाबाया, प्लास्टिक कमंडलू विकणारे विक्रेते. तयार शर्टपॅण्ट विकणारे काही. सगळ्यांचा धंदा तेजीत. 
माळा विकणा:या बाया तर साधूंनाच अशी काही पट्टी पढवत मार्केटिंग करतात की ती सेल्समनशिप पाहत रहावी; मात्र सगळ्यात जास्त गर्दी कुठे असेल तर ती प्लॅस्टिकच्या हवा भरून फुगवायच्या उशी विक्रेत्यांभोवती! तीही साधूंची!
साधुबाबांचं एक टोळकं गाठलं, साधू म्हणजे फक्कडभाई टाइपवाले. जे कुठल्याच आखाडय़ाचे नसतात, त्या वर्गातले.
एरवी ही माणसं नॉर्मलच कपडे घालतात. आता कुंभात आलेत म्हणून भगवे चोले, डगले, कमंडलूनी माळांची इन्स्टण्ट खरेदी करुन ‘साधू’ झालेले! तर त्यांना विचारलं की, या उशांसाठी काय एवढा तोलभाव करताय?
तर सगळ्यांनी मान आवटळल्याची तक्रार पुढे केली. पथारी कुठंही लावता येते, पण उशी मिळत नाही. 
मग डोक्याखाली काय घ्यायचं?
म्हणून उशी फार महत्वाची आणि तिचे भावही चढे!
गंमत वाटते, आसक्ती आणि विरक्तीच्या या मेळ्यात खांद्यावरचं डोकं आणि डोक्याखालची उशी हे ताप देतातच! 
पण अशा व्यापतापापासून अलिप्त राहणंही जमतं अनेकांना! चतु:संप्रदाय आखाडय़ात गेलं तर चार वेगवेगळ्या महंतांच्या गाद्या दिसतात. तीन वेगवेगळी कान्हाजींची मंदिरं आणि एक रामाचं! संप्रदाय एकच पण भक्तिमार्ग निराळे. 
बाकीचे महंत आपापले दरबार भरवून बसलेले, तिथं एक गादी मात्र रिकामी दिसते. शेजारच्या खोलीत महंत श्री रामलखनदासजी महाराज एकटे बसलेले. ते यवतमाळचेच हे तिथं लावलेल्या पाटीवरून कळतंच. 
त्यांना जाऊन भेटले. 
आखाडय़ाविषयी गप्पा झाल्या, तसं त्यांना सहज विचारलं की, ‘मागच्या सिंहस्थात आणि आता सुरू होत असलेल्या सिंहस्थात तुम्हाला काय फरक दिसतो?’ 
‘पहले लोग दर्शन को आते थे, 
अब देखने को आते है!’ 
एका वाक्यात त्यांनी सगळ्या गोष्टी सांगून टाकल्या. साधूंचं जग पहायला जत्र भरल्यासारखे लोक येतात. गंमत पाहतात. टाळ्या वाजवतात, अप्रूप वाटून घेतात, परत जातात. 
पूर्वी व्यासंगी साधू होते, त्यांच्याविषयीचा आदर आता कुठं नजरेत दिसतो? बाबाजी तेच तर सांगत होते.
मग त्यांना विचारलं की, बाहेर तर बाकीच्यांचे दरबार भरलेत, तुम्ही असे शांत -एकटे बसलात?
ते म्हणाले, 
‘यहॉँ सारे साधनोंके पिछे है, 
साधनसे कोई बडा नहीं होता, 
साधनासे होता है! वैसे भी क्या बोलना,
साधूने तो कमही बोलना चाहिए.’
बडबोल्या साधूंच्या गर्दीत हे महंत असे वेगळे भेटतात. 
एकटे-शांत-निवांत. त्या गर्दीतही असून, त्या गर्दीत नसल्यासारखे.!
कुंभ ‘पहायला’ आलेली बाहेरची गर्दी, जत्र, त्यातली बडेजावकी, दिखावा, प्रतिष्ठेचं राजकारण आणि पैशांची श्रीमंती यासा:यात महंत रामलखनदासजी महाराजांसारखे अत्यंत साधे बाबाजी भेटतात, हेच मोठं म्हणायचं?
-की बाकी सारं पाहून अस्वस्थ व्हायचं.
त्या फळवाल्याला वर्षभराची कमाई करता येईल या कुंभात याचा आनंद मानायचा की त्याचं पोर आजारी पडत कसंबसं त्या जत्रेत जगणार याचं वैषम्य.
अशा दुविधेतच त्या जत्रेतून बाहेर पडत होते.
तेवढय़ात व्हॉट्सअॅपवर एक मेसेज आला.
गरिबोंके बच्चे भी खाना खा सके त्योहारों में,
इसलिए भगवान खुद बिक जाते है 
बाजारो में.
फॉरवर्ड मेसेजमध्येही वास्तव असतं म्हणायचं कधीकधी.
 
(लेखिका ‘लोकमत’मध्ये मुख्य उपसंपादक आहेत)
meghana.dhoke@lokmat.com
 

Web Title: The pillow below the shoulder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.