The picture needs 'thoughts'! | चित्रात ‘विचार’ हवा !

चित्रात ‘विचार’ हवा !

ठळक मुद्देरेषा जर पक्क्या, सशक्त असतील तर ते चित्र कौतुकाला पात्र ठरतंच. रेषांइतकाच चित्रातला विचार मला महत्त्वाचा वाटतो.

- शिशिर शिंदे

* स्वत:ची चित्रशैली जपण्याचा, घडवण्याचा तुमचा प्रयत्न असतो. या शैलीबद्दल काय सांगाल?

- समोर जे दिसतंय ते हुबेहुब न काढता समोरचं दृश्य, घटना, प्रसंग याचं मनावर उमटतं ते चित्र काढणं, हा माझा विचार ! चित्राद्वारे कॅनव्हासवर मनातल्या विचारांची मांडणी करायला हवी. तरच ते चित्र प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचू शकतं. सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीच्या वेळेस मुंबई क्रिकेट असोसिएशनचे तत्कालीन अध्यक्ष शरद पवार यांनी सचिनला एक चित्र भेट म्हणून द्यायचं ठरवलं. मला ती संधी मिळाली, तेव्हा मी सचिनचं चित्र न काढता त्याच्या व्यक्तिमत्त्वाचं चित्र काढलं. माझ्या चित्रातला सचिन अजिबात तेंडुलकरांच्या सचिनसारखा दिसत नाही. मी सचिनला रामाच्या रुपात दाखवलं. त्याच्या हातात बॅटऐवजी शिवाजी महाराजांच्या हातातली तळपती तलवार, पाठीवरच्या भात्यात स्टम्प‌्सचे बाण होते. हा मला दिसलेला ‘सचिन’ होता.

* रेषा हीच माझ्या चित्रांची ताकद आहे असं तुम्ही म्हणता त्या रेषांबद्दल तुम्ही काय सांगाल?

- माझ्या चित्राचा मूळ गाभा हा रेषाच आहे. जगद‌्विख्यात चित्रकार पिकासो, भारतीय चित्रकार एफ.एम. सुझा यांच्या चित्रांचा बेस हा रेषाच होता. माझाही प्रयत्न रेषा काढून चित्र काढण्याचाच असतो. रेषा जर पक्क्या, सशक्त असतील तर ते चित्र कौतुकाला पात्र ठरतंच. रेषांइतकाच चित्रातला विचार मला महत्त्वाचा वाटतो. चित्राद्वारे मनातील विचार उत्स्फूर्तपणे मांडता येणं हे माझ्यातल्या चित्रकाराला खूप गरजेचं वाटतं.

मी प्रवास, निरीक्षण आणि अभ्यास याला खूप महत्त्व देतो. भरपूर प्रवास करतो, खूप निरीक्षणं करतो. मला एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते की आपल्या भारतीय विषयांमध्ये खूप विविधता आहे. रंग आहेत. भाव आहेत. ते सर्व मला एक चित्रकार म्हणून खूप भावतात. मी भारतीय आहे हे जसं माझ्या रंगरूपातून सहज दिसतं तितक्याच सहजपणे माझ्या चित्रातून भारतीयत्व हे मूल्य उमटतं. भारतीय समाज हा वैविध्यपूर्ण, सर्वसमावेशक आहे म्हणूनच माझ्या चित्राचे विषयही सभोवतालातले असतात. लंडनमध्ये माझं चित्रप्रदर्शन भरलं, तेव्हा माझ्या चित्रातली भारतीयता तेथील चित्ररसिकांना खूप भावली. त्याचं कारण म्हणजे जे आजवर त्यांनी फोटोमधून बघितलेलं होतं ते मी कलात्मक मांडणी करून चित्रातून दाखवत होतो. परदेशातल्या लोकांना भारतीय समाजाबद्दलची असलेली ओढ हेही त्यामागचं कारण होतं.

* चित्रप्रदर्शनाबरोबरच चित्रं प्रात्यक्षिक सादरीकरणही तुम्ही केलं आहे. त्याबद्दलच्या तुमच्या आणि चित्ररसिकांच्या अनुभवाबद्दल काय सांगाल?

- चित्र प्रात्यक्षिक सादरीकरण हा अनुभव छान असतो, खूप शिकवणारा असतो. प्रेक्षकांमधूनच उत्स्फूर्तपणे येणारा विषय कॅनव्हासवर उतरवणं हे एक आव्हान असतं. आता एवढ्या मोठ्या कॅनव्हासवर चित्र रेखाटायला हा किती वेळ घेईल असंही कुतूहल प्रेक्षकांना असतं. पण मी तेव्हा ३५ मिनिटात चित्र काढलं होतं. या चित्र प्रात्यक्षिक सादरीकरणाला चित्ररसिकांसोबतच विद्यार्थीही येतात. त्यांच्याशी गप्पांचा अनुभव सुखद असतो.

* चित्रातल्या सामाजिक भानाला तुम्ही महत्त्व देता. तसेच स्वत:ला तुम्ही सामाजिक चित्रकार म्हणवता ते का?

- सामाजिक हेतूसाठी चित्र ही माझी आवड आहे. युनेस्कोसाठी प्रकाश ही थीम घेऊन मी चित्र काढली होती, तेव्हा प्रथमच एक चित्रकार युनेस्कोसोबत काम करत होता. महाराष्ट्र गुजरातच्या सीमेवरील सापुतारामधील गाव पाड्यांवर फिरलो. (तेव्हा तिथे वीज नव्हती.) तिथे मी प्रकाश या विषयावर चित्र काढली. चित्रप्रदर्शनं भरवली. या चित्रांच्या माध्यमातून तेथील लोकांशी बोललो. हा अनुभव एक चित्रकार म्हणवून मला खूप शिकवणारा होता. सामाजिक विषयांचं भान ठेवून त्यावर चित्रकलेच्या माध्यमातून व्यक्त व्हायला, प्रतिसाद द्यायला मला आवडतं. शक्ती मिलमधील घटनेनंतर मी झाशीच्या राणीचं चित्रं काढून ते तेव्हाच्या मुंबई आयुक्तांकडे सोपवलं आणि त्या अत्याचारग्रस्त महिलेपर्यंत पोहोचवायला लावलं. माझ्या या चित्रातून तिला आयुष्यात पुन्हा उठून उभं राहाण्याची उमेद मिळावी हा त्यामागचा हेतू होता. विषय घेऊन चित्र काढणं आणि त्यात आपल्या मनातला विचार व्यक्त करणं हे आव्हानात्मक आहे. पण चित्रकार म्हणून मी हे आव्हान घेणार आहे.

मुलाखत : माधुरी पेठकर

Web Title: The picture needs 'thoughts'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.