Passing through a fire test .. | अग्निपरीक्षेतून जाताना..

अग्निपरीक्षेतून जाताना..

ठळक मुद्देऑस्ट्रेलियातील सण, उत्सवांच्या या काळानं पहिल्यांदाच इतका भीतिदायक अनुभव घेतला..

- आशय देव
जंगलांना आगी लागण्याचे प्रकार ऑस्ट्रेलियात तसे नेहमीचेच. दरवर्षी अशा आगी इथे लागतात. पण यावेळी ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनार्‍यावरील जंगलांना  आतापर्यंतची सर्वाधिक भयानक आग लागली आहे. जंगलातील वणव्यांचा हा ‘सीझन’ यंदा नेहमीपेक्षा थोडा लवकर आला. समोर येईल त्याला कवेत घेत न्यू साउथ वेल्स, व्हिक्टोरिया आणि दक्षिणेकडच्या काही भागावर आक्रमण करत या आगीनं आता ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण-पूर्व किनार्‍यापर्यंत झेप घेतली आहे. 
जगभरातील पर्यटकांची पसंती असलेल्या इथल्या लोकप्रिय पर्यटनस्थळांची अवस्था भग्नावस्थेतील गूढ, भयकारी स्थळांमध्ये झाली आहे.
ऑस्ट्रेलियातील सण, उत्सवांच्या या काळानं पहिल्यांदाच इतका भीतिदायक अनुभव घेतला. 
किनारपट्टीवरील मल्लाकुटा या रमणीय शहरात मी आणि माझ्या कुटुंबानं अनेक हॉलीडे मौजमस्तीत घालवले होते, तेच ठिकाण आज पूर्णपणे बेचिराख झालेलं आहे. माझ्या या आवडत्या शहराचे हे हाल उघड्या डोळ्यांनी पाहताना मनाला अतिशय वेदना होताहेत. पण असं असलं तरी आशेची एक वातही इथे तेवते आहे. अक्षरश: अग्निपरीक्षेचा हा काळ. पण या आपत्तीत एकमेकांना मदत करण्याच्या भावनेनं सारेच नागरिक एकत्र येताहेत. आपलं सुख-दु:ख वाटून घेताहेत. जोडीला स्थानिक प्रशासनानं ठिकठिकाणी मदतकेंद्रं स्थापन केली आहेत. सरकारी मदत पोहोचेल, तेव्हा पोहोचेल; पण स्थानिक व्यापार्‍यांनी त्याआधीच लोकांना अन्नधान्याचं फुकट वाटप सुरू केलं आहे. शीख समुदायाचा यासंदर्भातील वाटा लक्षणीय आहे. 
‘क्राउड फंडिंग’च्या माध्यमातूनही पैसे जमवले जात आहेत. सेलिब्रिटीजही आपल्याला शक्य ती सारी मदत मनापासून करताहेत. माजी क्रिकेटपटू शेन वॉर्ननंही आपल्या ‘बॅगी ग्रीन कॅप’च्या लिलावातून आलेले लाखो डॉलर्स आपद्ग्रस्तांना दिले. नागरिकांच्या बचावासाठी इतर देशांतूनही मदत आणि अग्निशामक जवानांचा ओघ सुरू आहे. 
या आपत्तीच्या प्रसंगी प्रत्येक नागरिक आपापल्या परीनं काही ना काही करतो आहे. प्राण्यांना वाचवण्यासाठी प्रय}ांची पराकाष्ठा करतो आहे. सर्वस्व गमावूनही आपली मान उन्नत ठेवण्याचा प्रय} करतो आहे. याच ‘फायटिंग स्पिरिट’साठी तर ऑस्ट्रेलिया ओळखला जातो! आगीत सापडलेले नागरिक, प्राणी आणि वनसंपदा वाचवण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांनी तर अक्षरश: आपले प्राण पणाला लावले आहेत.
ऑस्ट्रेलियात असे वणवे दरवर्षी पेटतात. पूर्व किनारपट्टीच्या भागात त्याचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे ग्रामीण ऑस्ट्रेलिया आणि तेथील जंगलांना नेहमीच धोका पोहोचतो. त्यापासून दूर राहण्याचा प्रय} आम्ही नागरिक दरवर्षीच करतो; पण यावेळची आग फारच धगधगती आणि अक्राळविक्राळ आहे. 2009च्या ‘ब्लॅक सॅटर्डे’ नंतरची ही दुसर्‍या क्रमांकाची आग आहे. या आगीच्या संकटातून वाचण्यासाठी आणि त्या नुकसानीतून बाहेर पडण्यासाठी ऑस्ट्रेलियन सरकारनं ‘नॅशनल बुशफायर रिकव्हरी एजन्सी’ स्थापन केली आहे.
‘सर्व काही संपलंय’ असं वाटत असताना एकजुटीनं उभा राहिलेला समाज, सरकारची भक्कम साथ, ऑस्ट्रेलियाचे शेजारी देश आणि जगानं दिलेला पाठिंबा यामुळे या अग्निप्रलयात झालेल्या वाताहतीतूनही आशेची एक नवी वात तेवताना दिसते आहे. 

- आशय देव, मेलबर्न, ऑस्ट्रेलिया

aashay.deo@gmail.com

Web Title: Passing through a fire test ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.