आमचे सर
By Admin | Updated: September 20, 2014 19:29 IST2014-09-20T19:29:56+5:302014-09-20T19:29:56+5:30
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. शं. ना. नवलगुंदकर हे शिक्षण विचारांनी झपाटलेले व्यक्तिमत्त्व आहे. अनेक वादळांना झेलत शिक्षणाचा वसा घेतलेले नवलगुंदकर सर येत्या २७ सप्टेंबर रोजी ८0 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्ताने..

आमचे सर
धनंजय कुलकर्णी
पुणे विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू म्हणून परिचित असलेले डॉ. श. ना. नवलगुंदकर यांनी एक राज्यशास्त्राचे निष्णात प्राध्यापक म्हणून अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये गुरुपदाचे अढळ स्थान प्राप्त केले. खरेतर सरांनी शिक्षक होण्याचा केलेला निर्णय हा त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळालेला वारसा होता. संगमनेर येथे माध्यमिक शाळेत शिक्षक असणार्या सरांच्या वडिलांची परंपरा सरांनी पुण्यात प्रथम भारत हायस्कूल, नंतर शाहू महाविद्यालय, गरवारे महाविद्यालयातून राज्यशास्त्र विषयाचे अध्यापन करत पुढे दीर्घकाळ मॉडर्न महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख व महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून नवृत्त झाले, हा केवळ त्यांच्या अध्यापनाच्या कार्याचा आलेख आहे. परंतु अध्यापनाच्या क्षेत्रात आल्यामुळे उच्च शिक्षणातील अनेक आव्हाने त्यांच्यासमोर होती, ती त्यांनी स्वीकारली.
पुणे विद्यापीठाच्या अधिकार मंडळाच्या निवडणुकीत प्रामुख्याने अभ्यास मंडळे, अधिसभा, व्यवस्थापन परिषद या निवडणुकीत सरांनी १९७५ ते त्यांच्या नवृत्तीपर्यंत काम केले. विद्यापीठात असलेल्या गटातटांच्या राजकारणामध्ये विद्यापीठ हित केंद्रस्थानी ठेवून सरांनी विद्यापीठात अधिसभा, विद्वतसभा, व्यवस्थापन परिषदेत सदस्य म्हणून काम केले, हे दीर्घकाळ स्मरणात राहील. त्यांनी प्रा. दाभोलकर, डॉ. राम ताकवले, डॉ. वि. ग. भिडे या कुलगुरूंबरोबर कार्य केले. डॉ. वि. ग. भिडे यांनी त्यांना विद्यापीठाच्या प्र- कुलगुरुपदी नियुक्त केले. या विद्यापीठातील कार्यकाळात सरांना अनेक संघर्षाला तोंड द्यावे लागले. अनेक विद्यार्थी आंदोलनांत विद्यापीठ प्रशासनातील भूमिका निश्चित राहील यासाठी प्रयत्न करावे लागले. जेव्हा अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी ‘कॅरी ऑन’च्या मागणीसाठी आंदोलन केले, तेव्हा ही मागणी गुणवत्तेच्या निकषावर फेटाळून लावण्यात सरांनी महत्त्वाचे योगदान दिले. विद्यापीठ गट-तटात कुठेही सहभागी न होता कार्य करणे अवघड होते. ती कसरत त्यांना करावी लागली. नेहमी समन्वयाने विद्यापीठातले प्रश्न सुटतील, यासाठी त्यांनी प्रयत्न केला. याची विद्यापीठाला नोंद घ्यावी लागेल.
सरांनी केवळ आपल्याला विद्यापीठ राजकारणात अडकवून घेतले नाही. सरांनी आपला शोधप्रबंध ‘सावरकरांचे राष्ट्रवादी विचार’ या विषयावर सादर करून डॉक्टरेट पदवी प्राप्त केली. या संशोधन अध्यापनाच्या आधारे सरांनी सावरकरांच्या विचार प्रचारासाठी महाराष्ट्रात, देशात व मॉरिशस, अमेरिकेत जाऊन व्याख्याने दिली. सावरकर विचारांविषयी जेव्हा जेव्हा काही वादळ निर्माण झाले, तेव्हा सरांनी सावरकरांच्या विचारांचे अभ्यासपूर्ण प्रतिपादन केले. पुण्यातील कर्वे रस्त्यावरील सावरकरांच्या स्मारक उभारणीत सरांचे मार्गदर्शक म्हणून असलेले योगदान निश्चित स्मरणात राहील.
केवळ सावरकरांच्या विचारांचे प्रबोधन एवढाच सरांच्या व्याख्यानाचा विषय नव्हता. राष्ट्रवादी विचारांच्या प्रसारासाठी केलेली भाषणे आजही स्मरणात आहे. संघ संस्थापक डॉ. हेडगेवारांच्या जन्मशताब्दी समारंभात पुण्यातील कार्यक्रमात कुलगुरू डॉ. वि. ग. भिडे यांच्या अनुपस्थितीत केलेले भाषण दीर्घकाळ स्मरणात राहणारे होते. नानासाहेब गोरेंनी व कुलगुरू डॉ. वि. ग. भिडे यांनी संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यास आक्षेप घेतला. वादंग माजला या वादाच्या पार्श्वभूमीवर प्र-कुलगुरुपदावर असताना सरांनी कार्यक्रमात दिलेला सहभाग सरांच्या राष्ट्रवादी विचाराशी असलेली आपली निष्ठा वादातीत होती हे सिद्ध करणारा होता.
महाराष्ट्रात जनजागरण अभियानात शनिवारवाड्यावरील सभेत सरांनी सभेच्या अध्यक्षस्थानावरून केलेले भाषण जनजागरण चळवळीला गतिमान व सक्षम करून गेले. सरांनी महाराष्ट्रात हजारो गावांतून व्याख्याने दिली. या व्याख्यानांनी अनेक गावांतील तरुण राष्ट्रवादी चळवळीत जोडले गेले.
सरांनी मॉडर्न महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्य करताना प्राचार्यपदाची धुरा सांभाळली. त्या काळातही त्यांना संस्थाअंतर्गत वादाला तोंड द्यावे लागले. परंतु या वादातही आपली नेमकी भूमिका ढळू न देता ते त्या वादावर स्वार होऊन लढत राहिले.
सरांनी त्यांच्या कार्याच्या वाटचालीत अनेक सामाजिक संघटनांची पदे स्वीकारली. राष्ट्रीय शिक्षण मंडळ, भारतीय शिक्षण मंडळ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग संघचालक या विविध संघटनांच्या पदावरून काम करताना त्यांनी संघटनेला व संघटनेच्या विचारालाच प्राधान्य दिले. सरांनी महाराष्ट्रातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरू निवड समितीत काम करून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची कुलगुरुपदी निवड केली. यामुळे महाराष्ट्राला भूषणावह असणार्या प्राचार्य शिवाजीराव भोसलेंना कुलगुरुपदावर विराजमान झालेले पाहायला मिळाले. त्यांनी गोवा विद्यापीठासाठी त्यांच्या निवड समितीने डॉ. पद्माकर दुभाषी यांची निवड केली व एका शिक्षणतज्ज्ञाचा योग्य सन्मान केला.
सरांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन केंद्र सरकारने सरांची रवींद्रनाथ टागोरांच्या शांतीनिकेतन येथील केंद्रीय विद्याभारती विद्यापीठात राष्ट्रपतींचे प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली, तर इंडियन कौन्सिल फॉर सोशल सायन्सेस, या राष्ट्रीय संस्थेवर सदस्य म्हणून नियुक्ती केली. शिलाँगच्या उत्तरपूर्व विद्यापीठात राष्ट्रपतींचे प्रतिनिधी म्हणून झालेल्या नियुक्तीने सरांच्या शैक्षणिक कार्याला राष्ट्रीय पात्रता मिळाली. सरांच्या मार्गदर्शनाखाली १२ विद्यार्थ्यांनी आपली पीएच.डी. पदवी संपादन केली.
शालेय शिक्षक ते विद्यापीठात शिकवणारे प्राध्यापक, महाविद्यालयातले विभागप्रमुख ते विद्यापीठाचे प्र-कुलगुरू, सावरकर विचारांचे अभ्यासक ते राष्ट्रवादी विचारांचे प्रचारक, राष्ट्रीय शिक्षण मंडळ ते विश्वभारती विद्यापीठ अशा विविध संस्थांतील त्यांचा सहभाग सरांच्या कर्तृत्वाची साक्ष देणारा आहे. या कार्य विस्तारात आलेल्या वादळांना त्यांनी सर्मथपणे तोंड दिले. आज ते ८0व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यांना आम्हा सर्व चळवळीतील कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा!
(लेखक पुणे विद्यापीठाचे माजी अधिसभा सदस्य आहेत.)