जुन्या परंपरा आणि रुढी
By Admin | Updated: September 20, 2014 19:28 IST2014-09-20T19:28:15+5:302014-09-20T19:28:15+5:30
‘जुने जाऊ द्या मरणालागुनी’ असे म्हणताना ‘जुने ते सोने’ असाही एक वाक् प्रचार आहे, हे लक्षात ठेवायला हवे. जुन्यातील अनावश्यक गोष्टी काढून टाकतानाच आपण नवे स्वीकारताना त्यातही अनावश्यक असे काही नाही ना, याचे भान ठेवले, तरच परंपरांमध्ये लपलेल्या भारतीय संस्कृतीच्या खर्या अर्थाचा उमज पडेल.

जुन्या परंपरा आणि रुढी
भीष्मराज बाम
प्रश्न :- सध्या पितृ पंधरवडा सुरू आहे; त्यामुळे आपल्याकडे सर्व कामे बंद असतात. श्राद्धासारख्या जुनाट कल्पना टाकून द्यायला हव्यात, असे नाही वाटत?
- आपल्या पूर्वजांनी जे-जे केले ते-ते सारे जुनेच असते आणि त्यातल्या बर्याच संकल्पना जुनाट म्हणून गळून पडत असतात. प्रत्येक संस्कृतीमधल्या चालीरीती कालांतराने बदलतच जातात. सगळ्याच चालीरीतींना कायद्याचा/धर्माचा आधार देण्याचा प्रयत्न प्रस्थापितांकडून होत असतो. या दृष्टीने महाराष्ट्रात गेल्या शंभर वर्षांत जे बदल झाले, त्यांचा अभ्यास करणे मनोरंजक ठरेल. पगडी, कोट, पागोटे, उपरणे या सार्या गोष्टी बाद झाल्या आहेत. टोपी न घालता बोडक्याने घराबाहेर पडणे हे अशुभ आहे, असे माझ्या आई-वडिलांचे म्हणणे होते. त्यांचा विरोध मी निर्धाराने मोडून काढला आणि टोपी न घालता वावरलो. पण, पोलीस खात्यातली नोकरी धरल्यावर रोज डोक्यावर टोपी घालणे टाळता आले नाही. आई-वडील रूढीची भीती घालून सक्ती करण्याचा प्रयत्न करीत होते त्याविरुद्ध मी बंड करू शकलो; पण कायद्याविरुद्ध बंद करणे शक्य झाले नाही. नाखुषीने का होईना, डोक्यावर टोपी चढवावीच लागली. पण, आधीची नाखुषी नंतर नाहीशी झाली आणि माझ्या गणवेशाचा व त्या टोपीचाही मला अभिमान वाटायला लागला.
पितृ पंधरवडा पितरांच्या श्राद्धविधीसाठी राखून ठेवलेला आहे. असे विधी कालांतराने फक्त कर्मकांड बनून शिल्लक राहतात. त्यामागची कल्पना काय आहे, याचा विचारच फारसा कोणी करीत नाही. आपले पूर्वज आणि आपल्या परंपरा यांची स्मृती आपण जागी ठेवायची असते. ज्या पूर्वजांनी मोठे नाव कमावले असेल त्यांचे आणि ज्यांनी मोठे प्रमाद करून घराण्याला बट्टा लावला असेल त्यांचेही. आपण कोणाचे अनुकरण करायचे ते ठरवायचे. जे वाईट वागले असतील त्यांचे दोष आपल्या उत्तम कर्माने धुऊन काढायचे असतात. जे चांगले वागले असतील, त्यांचे नाव आपण लावणार आहोत याची जाण ठेवून त्यांच्यापेक्षाही मोठे नाव कमावण्याचा प्रयत्न करायचा. नेहमी त्यांची स्मृती जागी राहीलच असे नाही. म्हणून श्राद्धविधी असतात. आपण थोर व्यक्तींची जयंती आणि पुण्यतिथी साजरी करीत असतो त्याच्यामागेसुद्धा हाच उद्देश असतो. नाही तर त्यांचे महान कार्य काळाबरोबर विस्मृतीत जाण्याचा धोका असतो.
जुनी कर्मकांडे टाकून दिली, तरी समाजमन नवी कर्मकांडे तयार करीत असते. त्याबद्दल कोणी फारसा विचार करायला तयार नसते. भारताला स्वातंत्र्य मिळाले, लोकनेत्यांनी गणराज्य प्रस्थापित केले. त्यामुळे १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दोन तारखा आपण सणासारख्या सार्जया करायला लागलो. आपल्या इतर सणांमागच्या संकल्पना आपण विसरून जाऊन फक्त त्यातला उत्सवाचा व चैनचंगळ करण्याचा भाग तेवढा उत्साहाने अमलात आणायला लागलो, तसेच या नव्या सणांचेही झाले. झेंडावंदनाचा उपचार पार पाडला, की तो दिवस सुटीचा म्हणून हवा तसा घालवायचा. ज्यांच्यावर या उपचाराची सक्ती नसते ते तर या दिवसांच्या महत्त्वाचा विचारसुद्धा करायला बांधील नाहीत. क्रीडास्पर्धा भरवायच्या असतील तेव्हा संयोजकांना उद्घाटन व समारोपाच्या समारंभाचा उपचार पार पाडावा लागतो. जितक्या मोठय़ा स्पर्धा असतील, तितके मोठे लोक प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले जातात. खेळाडूंचा या समारंभामध्ये प्रेक्षक म्हणून सहभाग असतो. हे कार्यक्रम शक्य तितके रटाळ करण्याची आपल्याकडे पद्धत झाली आहे. पाहुण्यांची वाट पाहण्यात बराच वेळ जातो. मग अहवालवाचन आणि कंटाळवाणी भाषणे ऐकावी लागतात. या अशा गोष्टींमध्ये रस असणारा एखादा खेळाडू आढळला, तर त्याचा जाहीर सत्कारच करायला हवा. मी खेळाडू व प्रशिक्षक या नात्याने अशा स्पर्धांचे हे समारंभ प्रत्यक्ष अनुभवलेले आहेत. या कार्यक्रमांतून ही सारी शिक्षा भोगत असताना खेळाडू आपसात जे बोलतात ते टेप करून ऐकवले गेले, तर फार लोकप्रिय होईल.
अशाच एका उद्घाटन समारंभात मला प्रमुख पाहुणा म्हणून बोलावले होते. तेव्हाही आचारसंहिता लागू असल्याने व्यासपीठावर असलेल्या इतर मंडळींत कोणी राजकीय पुढारी नव्हते. क्रीडाक्षेत्र गाजवलेल्या एका व्यक्तीने त्याचा आदल्या दिवसाचा अनुभव सांगितला. त्याच्या नात्यातील एका माणसाच्या दहाव्या दिवसाच्या विधीसाठी त्याला जावे लागले. दोन अडीच तास पिंडाला कावळा शिवला नाही म्हणून सगळी मंडळी ताटकळत बसलेली होती. मग गुरुजींनी पर्याय सुचवला. ते पिंड गायीला घालण्यात आले. आता हे आधीच का केलं नाही, हा त्याला प्रश्न पडला होता. आता त्या कार्यक्रमात दिवेच गेले आणि किती तरी वेळ सगळे ताटकळत होते. आम्ही अंधुक उजेडात व्यासपीठावर बसलेलो होतो, तेव्हा त्याने हा किस्सा सांगितला. मी म्हटले, की काल जसे तुम्ही पिंडाला कावळा शिवायची वाट पाहत होतात, तसेच आताही आपण वाट पाहत बसलो आहोत. या उद्घाटनाच्या कार्यक्रमात कोणालाच रस नाही. समोर बसलेल्या खेळाडूना तर मुळीच नाही. त्यांच्यावर या नुसते बसून राहण्याचा शारीरिक आणि मानसिक दोन्ही दृष्टींनी वाईट परिणाम होऊ शकतो. त्यांना असे बसून राहायला लावणे हे अन्यायाचे आहे. आपण फक्त दीपप्रज्वलन करून घेऊ आणि त्यांना मोकळे करू. आम्ही तसे केले आणि मी उभा राहून एवढेच जाहीर केले, की उद्घाटन झालेले आहे आणि दिवे आल्याबरोबर स्पर्धा लगेच सुरू होतील. माझ्या या भाषणाला जोरदार टाळ्या मिळाल्या.
ज्या जुनाट रूढी असतील, त्या टाकून देताना त्या का अस्तित्वात आल्या आहेत, याचा अवश्य विचार व्हावा आणि अनावश्यक भाग तेवढा टाकून द्यावा. पण, त्याचबरोबर नव्याने तितक्याच अनावश्यक रूढी आचारात येत असतील, तर त्याबद्दलही जागरूक राहायला हवे. आपण आपल्या सगळ्याच परंपरा टाकून द्यायला निघालो, तर पितरांबरोबारच आजोबा-आजी व आई-वडील या मागल्या पिढय़ाही नकोशा व्हायला फारसा वेळ लागणार नाही, याचे भान ठेवायला हवे, असे वाटते.
(लेखक ज्येष्ठ क्रीडाप्रशिक्षक व
सामाजिक घडामोडींचे अभ्यासक आहेत.)