शांतीचा संदेश देणारा विहंग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2020 06:02 AM2020-02-09T06:02:00+5:302020-02-09T06:05:05+5:30

गेल्या साठ वर्षांत विमानसेवा आधुनिक झाली. विमान वाहतूक कंपन्या आणि  प्रवाशांची संख्या जगभर प्रचंड वाढली.  विमानतळे नावीन्यपूर्ण आणि बहुमजली झाली.  अनेक हवाई कंपन्यांच्या सोयीसाठी  मोठय़ा विमानतळांची गरज वाढली.  त्यामुळे गेल्या काही दशकांत जुनी, लहान विमानतळे  निकामी ठरली, मात्र आता त्यांचाही कल्पकतेने वापर होतो आहे.

The old, small and non usable airports now give the message of peace! | शांतीचा संदेश देणारा विहंग!

शांतीचा संदेश देणारा विहंग!

Next
ठळक मुद्देसिटीज ऑफ टुमॉरो- जगभरातील ‘प्रयोगशील’ शहरांच्या कहाण्या

- सुलक्षणा महाजन

1998 साली अचानक एका अतिशय अभिनव आकाराच्या विमानतळाच्या कक्षात मी प्रवेश केला होता. न्यू यॉर्क शहरातील जेएफके विमानतळावरची ‘ट्रान्स वर्ल्ड एव्हिएशन’ (टीडब्ल्यूए) या विमान कंपनीची जगप्रसिद्ध इमारत मी त्याआधी केवळ चित्नामध्ये बघितलेली होती. पंख पसरलेल्या मोठय़ा पक्ष्याच्या आकारात या इमारतीचे काँक्र ीटचे छत बांधलेले होते. 1960च्या दशकातला हवाई प्रवासाचा तो सुरुवातीचा काळ होता आणि उड्डाण केंद्राच्या या वास्तूमधून तिच्या नावीन्यपूर्ण उपयोगाचे दर्शन वास्तुरचनाकाराने सहज मनस्वीपणे घडविले होते. 
1950 च्या दशकात व्यापारी तत्त्वावर विमानसेवा सुरू  झाली त्यावेळी अमेरिकेतील ‘टीडब्ल्यूए’ या खासगी विमान कंपनीने न्यू यॉर्क शहरामध्ये हे उड्डाण केंद्र बांधले. या नवीन प्रकारच्या इमारतीची रचना करण्याचे काम एरो सरीरीन या वास्तुरचनाकाराकडे सोपवले होते. या उड्डाण केंद्रासाठी त्याने आकाशात झेपावणार्‍या पक्ष्याच्या आकाराच्या इमारतीची संकल्पना केली. 1962 साली त्याचे उद्घाटन झाले. या आगळ्या-वेगळ्या इमारतीचे तेव्हा खूप कौतुक झाले होते. शिवाय या इमारतीची रचना तांत्रिकदृष्टीने चांगलीच आव्हानात्मक होती. कोठेही सरळ रेषा नसणार्‍या इमारतीसाठी काँक्रीटचा वापर केला होता. इमारतीचे उंच छत बाकदार, पक्ष्याने पसरलेल्या पंखांसारखे, हवेत तरंगणारे. तर ते तोलणारे खांब पक्ष्याच्या पायांसारखे. हे बांधकाम खूप नावीन्यपूर्ण म्हणून प्रसिद्ध झाले होते. न्यू यॉर्क शहराचे ते आजही मोठे आकर्षण मानले जाते. 
1998 साली न्यू यॉर्कच्या या प्रसिद्ध वास्तूचे जवळून निरीक्षण करण्याची, त्याची रचना समजून घेण्याची संधी मला मिळाली. काँक्रीटच्या पंखांखाली स्वागत कक्ष, प्रवाशांना बसण्यासाठी, तिकिटे घेण्यासाठी जागा होती. उड्डाणाची स्थानके आणि वेळा दाखविणारे स्वयंचलित फलक होते. मधल्या मजल्यावर खाद्यगृहे, विशेष अतिथी कक्ष यांची रचना होती. तेथे जाण्यासाठी गोलाकार जिने होते. या इमारतीमध्ये प्रवेश केल्यावर तेथील छतामुळे तयार झालेले बाकदार अवकाश आणि बाजूच्या उंच काचेच्या भिंती ही मानवी रचना मनाला अतिशय भुरळ घालणारी होती.  
गेल्या साठ वर्षांत अनेक प्रकारच्या आधुनिक विमानसेवा कंपन्या प्रत्येक देशामध्ये स्थापन झाल्या आहेत. जगभर विमान वाहतूक कंपन्या आणि प्रवासी संख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे प्रत्येक महानगरातले विमानतळही खूप मोठे, भव्य, नावीन्यपूर्ण आणि बहुमजली झाले आहे. त्यांचे व्यवस्थापनतंत्न आमूलाग्र बदलले आहे. अनेक हवाई कंपन्यांच्या सोयीसाठी एकच मोठे विमानतळ असण्याची गरज वाढली. परिणामी गेल्या काही दशकांत अनेक ‘टीडब्ल्यूए’सारखे जुने लहान विमानतळ निकामी ठरले. काही ठिकाणी तर ते पाडून त्या जागी मोठय़ा इमारती बांधण्यात आल्या. या साठ वर्षांत उद्योगाने जगभर भरारी घेतली असली तरी ‘टीडब्ल्यूए’ कंपनी मात्न आता अस्तित्वातही राहिलेली नाही. कंपनीची ही मालमत्ता आता न्यू यॉर्कच्या शासकीय पोर्ट संस्थेने विकत घेतली आहे.  
न्यू यॉर्क शहराचा जेएफके हा मोठा विमानतळ तेथील शासकीय पोर्ट आस्थापनेच्या मालकीचा आहे. त्यात या उड्डाण केंद्राचा समावेश असला तरी त्याचा वापर मात्न तसा होत नाही. अनेक टर्मिनल असलेली विमानतळाची नवीन इमारत बांधून आता सर्व विमान कंपन्या तेथून आपले काम करतात. या उड्डाण केंद्राचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन त्यांचे संवर्धन करण्यात आले आहे. 2019 साली उड्डाण केंद्र आणि नवीन विमानतळाच्या मधल्या जागेत  दोन आठ मजली बाकदार इमारती बांधून त्यांत हॉटेलच्या पाचशे खोल्या तयार केल्या गेल्या. त्याची बातमी वर्तमानपत्नात वाचली होती. तेव्हापासून पुन्हा एकदा ही इमारत बघण्याची इच्छा होती. आणि अचानक या हॉटेलात एक दिवस राहण्याचा योग जुळून आला. येथील निवास इतका भावला की हा लेख तेथे बसूनच लिहिला.  
मूळचे उड्डाण केंद्र आता नवीन हॉटेलचा स्वागत कक्ष झाला आहे. त्याची अंतर्गत रचना आणि तेथील विविध वापर आता नव्याने करण्यात आले आहेत. त्यात विमान प्रवासाच्या सुरुवातीच्या काळापासून वापरात असलेल्या अनेक वस्तूंचे संग्रहालय अतिशय आकर्षक आहे. शिवाय या विमानतळाची, त्याच्या मालकाची माहिती आणि त्याच्या ऑफिसमधील वस्तूंचे आणि त्याच्या अनोख्या प्रवासाचे वर्णन, फोटो, चित्ने, इमारतीचे पूर्वी हाताने काढलेले नकाशे, आशा सर्व गोष्टींचे जतन करून ठेवले आहे. त्या काळातील प्रवाशांचे फोटो जागोजागी लावलेले आहेत. गत काळातील साठवून ठेवलेल्या आठवणी आणि आजच्या, वर्तमानातील नव्या वापरासाठी केलेले बदल एकत्न बघायला मिळाले. तेथील मोकळ्या जागेत हुजेस या पायलट असणार्‍या, र्शीमंत मालकाने लाकडी सामानातून बनवून घेतलेले एक लहान विमान आहे. ते आकाशात झेपावेल असे कोणालाच वाटले नव्हते; पण केवळ काही मिनिटे त्याने भरारी घेतली इतकेच. आज त्यामध्ये जिना चढून जाता येते. त्यात पेयपान करता येते. 
शिवाय या उड्डाण केंद्रामधून दोन गोलाकार भुयारांमधून नवीन विमानतळाशी जोडणी तयार केली आहे. जेट-ब्लू कंपनीची सेवा तेथे आहे. इतर विमानसेवांसाठी असलेले चार टर्मिनल दोन डब्यांच्या हवाई मेट्रोने जोडलेले आहेत. विमानतळाच्या जवळच असलेले हे हॉटेल आता चांगलेच लोकप्रिय झाले आहे. आजच्या काळातील असे जागतिक महानगरांचे विमानतळ म्हणजे एक स्वतंत्न गाव असल्याचा भास होतो. नाना देशा-प्रदेशाचे लोक तेथे लगबगीने चाललेले दिसतात. नानाविध प्रकारची दुकाने आणि खाद्यगृहे तेथे असतात. तेथे कायम दिवसच असतो. झगमगाट आणि लोकांची वर्दळ यामुळे तेथे कधीच रात्न होत नाही. लाखो लोकांना तेथे रोजगार उपलब्ध झाले आहेत. प्रत्यक्ष न्यू यॉर्क शहर तेथून लांब असले तरी मेट्रो, बस आणि रस्त्यांनी ते जोडले गेले आहे. 
जगातील असंख्य गावांना जोडणारी, भरारी घेतलेल्या पक्ष्याच्या आकाराची टीडब्ल्यूए उड्डाण केंद्राची ही मूळ वास्तू म्हणजे मानवी कल्पनाशक्ती, तंत्नज्ञान आणि सौंदर्याचे जागतिक प्रतीक बनली आहे. आजच्या आणि उद्याच्या जागतिक शांतीचा, बहुसांस्कृतिकतेचा संदेश देणारा हा विहंग आहे. 

sulakshana.mahajan@gmail.com
(लेखिका प्रख्यात नगर नियोजनतज्ज्ञ आहेत.)

Web Title: The old, small and non usable airports now give the message of peace!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.