ताम्रपटाच्या निमित्ताने

By Admin | Updated: September 6, 2014 15:12 IST2014-09-06T15:12:51+5:302014-09-06T15:12:51+5:30

तब्बल १३७४ वर्षांपूर्वीचा, गुजरातमधील मैत्रक वंशाचा राजा द्वितीय ध्रुवसेन याचा एक ताम्रपट काही दिवसांपूर्वी पुण्यात आढळला. भांडारकर संशोधन संस्थेतील जाणकारांनी तो स्वच्छ केला आणि तो ताम्रपट चक्क इतिहास बोलू लागला..

On the occasion of Tamrapatra | ताम्रपटाच्या निमित्ताने

ताम्रपटाच्या निमित्ताने

 श्रीनंद बापट

 
 
 
जरातमधल्या अहमदाबाद जिल्ह्यातील राधू या ठिकाणाच्या जवळ असणारे देवपरा नावाचे खेडे इसवी सन ६४0मध्ये एप्रिल महिन्याच्या ६ तारखेला दान करण्यात आले होते. यजुर्वेदाच्या मैत्रायणी नावाच्या शाखेतील वाराह सूत्राच्या नागशर्मा आणि भद्रशर्मा यांना हे दान देण्यात आलेले होते. या गावाचे महसुली उत्पन्न घेऊन त्यातून त्यांनी वेदपाठशाळा चालवावी, अशी अपेक्षा त्यामागे होती. अशी पाठशाळा चालवण्याकरिता ते मध्य प्रदेशातील मंदसौर येथून येऊन गुजरातमधील खेडा येथे वसले होते. ही सगळी माहिती सांगणारा एक ताम्रपट नुकताच अमित लोमटे आणि अमित खिंवसरा यांच्या संग्रहात उपलब्ध झाला. 
या ताम्रपटाला दोन पत्रे आहेत. ते ३0 सेमी लांब आणि २३.७ सेमी रुंद अशा मापाचे आहेत. ते एकत्र ठेवण्याकरिता पत्र्यांना दोन दोन छिद्रे पाडून त्यात कड्या घातलेल्या आहेत. मजेची गोष्ट म्हणजे या दोन छिद्रांपैकी एक पूर्वीच फाटलेले आहे आणि ते पुन्हा सांधून त्यात तांब्याची नवीन कडी अडकवलेली आहे. तर दुसरे छिद्र आणि त्यातील ब्राँझची कडी मात्र शाबूत आहे. हा ताम्रपट २ किलो ७0७ ग्रॅम इतक्या वजनाचा आहे. भांडारकर संस्थेकडे हा ताम्रपट आला तोच मुळी त्याच्या स्वच्छतेकरिता. तांब्याच्या गंजाने तो अगदी हिरवा पडलेला होता- वाचता येणे शक्यच नव्हते. ताम्रपटाची आणखी हानी होणार नाही, अशा बेताने विविध रसायने वापरून त्यावरचा गंज काढण्यात आला. कोणतीही संहत (उल्लूील्ल३१ं३ी)ि रसायने या कामी उपयोगाची नव्हती. काढून टाकलेल्या गंजाचे वजन तब्बल ३२ ग्रॅम इतके भरले. विविध रासायनिक प्रक्रिया चार-पाच वेळा केल्यावर ताम्रपट स्वच्छ झाला आणि ‘बोलू लागला’.
या ताम्रपटाची भाषा संस्कृत असून, १३00 वर्षांपूर्वी प्रचलित असलेली कीलकशीर्षक ब्राrी (ठं्र’-ँींीि िइ१ंँ्रे) ही त्याची लिपी आहे. ताम्रपटात एकूण ४६ ओळींचा मजकूर असून, तो दोन्ही पत्र्यांवर २३ ओळी असा सारखा विभागलेला आहे असे दिसून आले. सुरुवातीला ‘स्वस्ति’ आणि ‘वलभीत:’ (म्हणजे ‘कल्याण असो’ आणि ‘हा ताम्रपट राजधानी वलभी येथून देण्यात येत आहे,’) असा मजकूर आहे. त्यानंतर राजा द्वितीय ध्रुवसेन याच्या पूर्वजांची स्तुती करणारा आणि ध्रुवसेनाचा स्वत:चा परिचय देणारा मोठा मजकूर आहे. त्यानंतर दान घेणार्‍या व्यक्तींचे आणि दान दिल्या जाणार्‍या गावाचे वर्णन येते. ‘खेटकाहार विषयातील राधानक पथकातील देवापाढक हे गाव’ म्हणजे त्या वेळच्या खेडा जिल्ह्यातील राधानक तालुक्यातील देवापाढक हे गाव दान म्हणून दिल्याचा उल्लेख त्यात आहे. यापुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे गावाकडून गोळा करण्यात येणार्‍या वेगवेगळ्या प्रकारच्या करांची आणि घेतल्या जाणार्‍या सेवांची माहिती येते. शेतकरी (शेताचे मालक) आणि शेतमजूर यांच्यावर वेगवेगळा कर बसवल्याचे त्यात दिसते. त्याचबरोबर पाळीव जनावरांवरचा कर आणि प्रवेशकर किंवा जकात यांचा उल्लेख येतो. हे उत्पन्न आता दान घेणार्‍या व्यक्तींना मिळावयाचे असे. (गवत, चामडे, लाकूड, कोळसा, दूध, फुले, फळे, धान्य, मीठ आणि इतर क्षार, मद्यार्क अशा इतर अनेक वस्तू गावातून कर म्हणून गोळा करण्याचा हक्क राजाला होता, असे इतर काही राजघराण्यांच्या दानलेखांमधून दिसून येते.) दान दिलेल्या गावातील पडीत जमीन नव्याने लागवडीखाली आणण्याचा हक्क दान घेणार्‍या व्यक्तीला होता. तसेच काही अनुचित प्रकार घडल्याशिवाय राजाचे अधिकारी आणि सैनिक यांना गावात प्रवेश करण्यावर बंदी घालण्यात आलेली होती. गावाची स्वायत्तता जपण्याचा असा प्रयत्न त्या वेळचे सर्वच राजे दक्षतेने करीत असत, असे दिसते. अशा प्रकारच्या दानलेखांच्या शेवटाकडे एक मोठा हृदयंगम मजकूर असतो. आपण काही राज्याचा अमरपट्टा घेऊन आलेलो नाही, याची जाणीव प्रत्येक राजाला आणि राजघराण्याला असे. त्यामुळे आपले राज्य गेल्यावर येणार्‍या राजवटींनी हे दान असेच शाबूत ठेवावे, अशी विनंती केलेली असे. ते शाबूत ठेवले तर त्या राजाला आमच्यापेक्षाही जास्त पुण्य मिळेल, असे आमिषही दाखवलेले असे. त्याचबरोबर जमीन दान देणारा मनुष्य साठ हजार वर्षे स्वर्गात राहतो, तर ते काढून घेणार्‍याला मात्र तितकीच वर्षे नरकात खितपत पडावे लागते, अशी भीतीही घातलेली असे.
सर्वसामान्यपणे सर्वांत शेवटी येतो तो हा ताम्रपट देण्याच्या कामी मध्यस्थी करणार्‍या वजनदार व्यक्तीचा आणि ताम्रपटाचा मजकूर तयार करणार्‍याचा उल्लेख आणि ताम्रपटाची तिथी. हा मजकूर ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असतो. राजाचा पुतण्या राजपुत्र खरग्रह हा आताच्या दानातील मध्यस्थ आहे, तर राज्याच्या अभिलेख विभागाचा प्रमुख स्कंदभट याने दानलेखाचा मजकूर तयार केलेला आहे, असे दिसते. 
ताम्रपटाची तिथी ‘संवत् ३२0, वैशाख शुद्ध १0’ अशी दिलेली आहे. भारतात अनेक प्रकारच्या कालगणना वापरात होत्या-आजही आहेत. एखाद्या लेखात कोणती कालगणना वापरात आहे हे ओळखणे महत्त्वाचे असते. मैत्रक वंशाचे राजे ‘गुप्त-वलभी संवत्’ वापरत असत. ही कालगणना इ. स. ३२0 मध्ये चैत्री पाडव्याला सुरू झाली असे मानले जाते. त्यामुळे या ताम्रपटाचे वर्ष इ.स. ६४0 हे ठरते. तर वैशाख शुद्ध दशमी ही तिथी गुरुवार दिनांक ६ एप्रिल इ. स. ६४0 या तारखेशी जुळते. दान देणार्‍या राजाच्या कारकिर्दीशीही ही तारीख व्यवस्थित जुळते. स्वच्छता आणि वाचन कोणताही मोबदला न घेता करून आता हा ताम्रपट त्याच्या मालकांना परत देण्यात आलेला आहे. त्याचा मजकूर प्रसिद्ध करण्यास त्यांनी परवानगी दिलेली आहे.
अभिलेख स्वच्छ करणे, त्याची भाषा आणि लिपी ओळखणे, तो वाचणे, मजकुराचे भाषांतर करणे, त्यात दिलेले ऐतिहासिक आणि भौगोलिक तपशील तपासणे, त्याची तारीख शोधून काढणे, असे या प्रकारच्या शोधाचे टप्पे पडतात. ते टप्पे विविध अडचणींवर मात करीत कसोशीने पार पाडले तर ‘देशाच्या इतिहासात एका ओळीची का होईना भर घातली’ या जाणिवेने होणारा आनंद आगळाच असतो.
(लेखक भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराचे प्रभारी अभिरक्षक आहेत.)

Web Title: On the occasion of Tamrapatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.