निमित्त. ‘चोली’!

By Admin | Updated: May 30, 2015 14:25 IST2015-05-30T14:25:37+5:302015-05-30T14:25:37+5:30

काय श्लील आणि काय अश्लील? संस्कृती आणि काळानुसार त्याच्या सीमारेषा बदलतात. ‘शृंगार कुठे संपतो आणि अश्लीलता कुठे सुरू होते हे सांगणं अवघड होतं. त्यातूनच वाद निर्माण होतात. हिंदी चित्रपटांना आणि त्यातल्या गाण्यांनाही या वादांचं वावडं कधीच नव्हतं.

On the occasion. 'Cottage'! | निमित्त. ‘चोली’!

निमित्त. ‘चोली’!

> - विश्राम ढोले
 
शरीरसंबंधाच्या प्रसंगांची अभिव्यक्ती करताना हिंदी चित्रपटातील गाणी कशी बोल्ड आणि थेट होत गेली याचे वर्णन मागच्या लेखात आले होते. हा बोल्डनेस अनेकांना धक्कादायक, अशिष्ट किंवा नकोसा वाटला तरी त्याने त्या काळातील श्लीलतेच्या सीमेमध्येच होता. हे खरेच आहे की, श्लील- अश्लीलतेच्या सीमारेषा खूप धूसर असतात. संस्कृती आणि काळानुसार त्या बदलतातही. म्हणूनच शृंगारिक (इरॉटिक) कुठे संपते आणि अश्लील (ऑब्सिन किंवा व्हल्गर) कुठे सुरू होते हे सर्वमान्य आणि सार्वत्रिक पद्धतीने सांगणो अवघड असते. त्यातून मग वाद निर्माण होतात. हिंदी चित्रपटांच्या संदर्भात तर असे वाद बरेचदा झाले आहेत. तुलनेने कमी असले तरी गाण्यांच्या संदर्भातही असे वाद झडले आहेतच.
सुभाष घईंच्या ‘खलनायक’मधील (1993) ‘चोली के पिछे क्या है’ वरून झालेला वाद त्यातील सर्वात मोठा. खलनायक प्रदर्शित होण्याआधीच्या प्रसिद्धीचा भाग म्हणून हे गाणो आधीच रिलीज करण्यात आले होते. दूरदर्शन आणि नुकतेच बाळसे धरू लागलेल्या उपग्रह वाहिन्यांवर हे गाणो दिसू लागले. कॅसेटवरून सर्वत्र ऐकू येऊ लागले. इला अरुणच्या आवाजातील हे गाणो माधुरी दीक्षितवर चित्रित करण्यात आले होते. गाण्यातील इला अरुणचा अ-नागर, पारंपरिक, जाडसर आणि कामुक आवाहनात्मक सूर आणि माधुरीच्या शरीरावर, लटक्या झटक्यांवर रेंगाळणारी कॅमेराची पुरु षी नजर यांच्यामुळे ‘चोली के पिछे क्या है, चुनरी के नीचे’ या मुळातच द्वअर्थी असलेल्या ओळींमधील दुसरा अर्थ बरोब्बर अधोरेखित होत गेला. अशी गाणी नजरेत भरतात. आणि नकळत ओठांवरही बसतात. या गाण्याचेही तेच झाले. ते जसजसे सार्वत्रिक व्हायला लागले तसतसा त्यातील द्वअर्थी आशय अनेकांना खुपायला लागला. त्यातून दिल्लीतील आर. पी. चुघ या व्यवसायाने वकील असलेल्या भाजपच्या स्थानिक नेत्याने न्यायालयात धाव घेतली. हे गाणो अश्लील, स्त्रियांचा अवमान करणारे आणि स्त्रियांविरुद्धच्या गुन्ह्याला चिथावणी देणारे असल्याचा दावा करत त्यांनी सुभाष घई, केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ (सीबीएफसी) आणि माहिती व प्रसारण खात्याला प्रतिवादी केले. घईंनी चित्रपटातून हे गाणो काढून टाकावे, तसे करेपर्यंत खलनायकच्या प्रदर्शनावर ‘सीबीएफसी’ने बंदी घालावी,  कॅसेट कंपनीने या गाण्याच्या कॅसेट बाजारातून परत घ्याव्यात आणि माहिती व प्रसारण खात्याने त्यांच्या अखत्यारितील दूरदर्शन व रेडिओवरून हे गाणो वाजविण्यावर बंदी आणावी अशा त्यांच्या मागण्या होत्या. खटल्याची बातमी वेगाने पसरली आणि त्याअनुषंगाने वादही पेटला. तरुण मुली आणि महिलांची छेड काढण्यासाठी या गाण्याचा वापर होत असल्याच्या बातम्या यायला लागल्या. आणखी एका गृहस्थाने या गाण्याविरुद्ध ग्राहक न्यायमंचाकडे दाद मागितली. वृत्तपत्रतून त्यावर लेख आणि पत्रे प्रसिद्ध होऊ लागली. अगदी थोडय़ाच दिवसात ‘चोली के पिछे’ हे गाणो श्लील-अश्लीलता, नैतिकता, संस्कृतिरक्षण वगैरे मुद्यांसंबंधी वादाचा केंद्रबिंदू होऊन गेले.
दरम्यान, ज्या खटल्यापासून हा सारा वाद इतका मोठा झाला त्याची गंमतच झाली. सुनावणीच्या पहिल्याच दिवशी चुग अनुपस्थित राहिल्यामुळे न्यायालयाने खटला तिथेच निकालात काढला. इतक्या मोठय़ा वादाचा खरंतर हा अॅण्टी क्लायमॅक्सच होता. अर्थात, त्यामुळे मूळ मुद्दा काही संपला नव्हता. कारण खलनायक आणि त्याचे ट्रेलर आता ‘सीबीएफसी’ पुढे मंजुरीसाठी आले होते. तिथे बरीच चर्चा होऊन चित्रपटाला ‘यूए’ म्हणजे ‘प्रौढांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांसाठी’ असे प्रमाणपत्र दिले गेले; मात्र तसे करताना ‘सीबीएफसी’ने तीन कट्स सुचविले. ‘चोली के पिछे क्या है, चुनरी के नीचे’ हे शब्द, गाण्यातील ‘जोबन सहा न जाए क्या करू’ या ओळीवर माधुरीने केलेल्या हावभाव व अंगविक्षेपाचे दृश्य आणि गाण्याच्या सुरुवातीला येणा:या नाचणा:या मुलींच्या लटक्या-झटक्याचे दृश्य वगळावे असे ‘सीबीएफसी चे म्हणणो होते. घईंनी त्यातील माधुरीचे दृश्य वगळण्याचे मान्य केले; मात्र इतर दोन कट्सना ठाम नकार दिला. मंडळाने त्यावर पुन्हा विचार केला आणि ‘चोली के पिछे क्या है’ हे शब्द वगळण्याचा आदेश मागे घेतला. बदल्यात घईंनीही तडजोड करीत तिसरा कट स्वीकारला. आणि अखेर ‘चोली के पिछे’सह खलनायक प्रदर्शित झाला. खरंतर या सगळ्या चर्चा व वादांमुळे खलनायकाची प्रदर्शनाआधीच अफाट प्रसिद्धी झाली. अनेकांचे तर म्हणणो होते की, अशी हवा निर्माण होण्यासाठी घईंनीच हा वाद मुद्दाम घडवून आणला किंवा त्याला खतपाणी घातले. घईंची ‘शोमन’ ही प्रतिमा आणि चुग यांच्या खटल्याचा फार्स लक्षात घेतला तर या म्हणण्यात तथ्य असल्याचा संशय घ्यायला जागा होतीच. खरे खोटे ते घईच जाणो. चित्रपट यथातथाच असला तरी बॉक्स ऑफिसवर एकदम हिट झाला.े ‘चोली के पिछे’ हे हिंदी गाण्यांच्या इतिहासात वेगळ्या अर्थाने लक्षणीय ठरले.
श्लील-अश्लील वादात चोली के पिछे हे अतिशय लक्षणीय गाणो ठरले हे खरेच. पण तसे ते काही पहिले गाणो नव्हते. हिंदी चित्रपटगीतांचे अगदी सुरुवातीच्या काळामध्ये अशा गाण्यांची संख्या बरीच असायची. स्वतंत्र भारताचे सेन्सॉर बोर्ड स्थापन होईपर्यंत हा प्रकार सुरूच होता. काही अभ्यासक तर त्याला ‘जोबन’ गीतांचा काळ असेही म्हणतात. जोबन म्हणजे खरतर यौवन. पण हिंदीमध्ये हा शब्द मुख्यत्वे स्त्रीच्या आकर्षक, तरुण शरीराच्या वर्णनासाठी आणि लैंगिक संदर्भात वापरला जातो. स्त्रीचे स्तन अशीही या शब्दाची एक अर्थच्छटा आहे. ‘न मारो जोबना के तीर चोली कस कस के’ (माँ की ममता- 1936), ‘जोबन मस्ताना मोरा मुई चोली मस्की जाए’ (काला गुलाब- 1936), ‘मेरे जोबनवा के प्याले’ (टायगर क्वीन- 1947) अशी अनेक गाणी त्या काळी येऊन गेली. तेव्हाचे ब्रिटिश सेन्सॉर बोर्ड फक्त चित्रपटामध्ये ब्रिटिश सत्तेविरोधी काही नाही ना एवढेच मुख्यत्वे पहात. अनेक सदस्यांना हिंदीचे बारकावे समतजही नसत. त्यामुळे त्या काळात अशा प्रकारची द्वअर्थी आणि अश्लील गाणी बरीच येऊन गेली. पुढे भारतीय मानसिकतेचे सेन्सॉर बोर्ड आल्यानंतर अशा गाण्यांचे प्रमाण झपाटय़ाने कमी झाले. 
पण नंतर ऐंशीच्या दशकात कॅसेट-संस्कृतीमुळे हिंदी चित्रपटाच्या गाण्यांना चित्रपटबाह्य संगीताचे मोठे आव्हान निर्माण झाले. हिंदी चित्रपटगीतांच्या उद्योगामध्ये एक भांबावलेपण आणि डेस्परेशन आले. त्यामुळे ऐंशीच्या उत्तरार्धापासून अशी गाणी पुन्हा येऊ लागली. नव्वदीनंतर तर चित्रपटांचे, संगीताचे, माध्यमांचे, बाजारपेठेचे आणि संस्कृतीचे अनेक संदर्भच बदलू लागले. त्यामुळे श्लील-अश्लीलतेच्या नव्या सीमारेषा आखत जुम्मा चुम्मा दे दे (हम), अंगूर का दाना हूँ सुई चुभो न देना (सनम बेवफा- 1990) यांसारखी अनेक गाणी येऊ लागली. एरवी चोली, चुम्मा सारखे शब्द तर अधिक उघडपणो येत होतेच. त्याच्या जोडीला हलकट, कमीने आणि डिकेबोससारखी क्लृप्तीबाज शिवीही गाण्यांमधून यायला लागली. हॉट, सेक्सी, फिल मी अप वगैरे इंग्रजी शब्दही रु ळले. त्यांच्या अशा येण्यातून, स्वीकृतीतून आणि रुळण्यातून हिंदीगाण्यांमधील श्लील-अश्लील, सभ्य-असभ्य, शिष्ट-अशिष्ट अभिव्यक्तीच्या प्रदेशाचे नकाशे बदलत गेले. चोली के पिछे क्या है चा वादही याच प्रक्रियेची नव्याने झालेली सुरु वात होती.
 
(लेखक माध्यम, तंत्रज्ञान आणि संस्कृती या विषयाचे अभ्यासक आहेत.)

Web Title: On the occasion. 'Cottage'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.