ओSS व्हिक्टोरिया..
By Admin | Updated: June 21, 2015 12:58 IST2015-06-21T12:58:59+5:302015-06-21T12:58:59+5:30
‘‘आमच्या घोडय़ांमुळे प्राणिमित्रंना एवढा त्रस होतो, म्हणून ते कोर्टात गेले, मग रेसकोर्सच्या घोडय़ांवर का नाही बंदी आणली? रेसकोर्स वगैरे सगळा श्रीमंतांचा खेळ आहे.
_ns.jpg)
ओSS व्हिक्टोरिया..
>ओंकार करंबेळकर
‘‘आमच्या घोडय़ांमुळे प्राणिमित्रंना एवढा त्रस होतो, म्हणून ते कोर्टात गेले, मग रेसकोर्सच्या घोडय़ांवर का नाही बंदी आणली? रेसकोर्स वगैरे सगळा श्रीमंतांचा खेळ आहे, त्याच्याआड कोणीही येत नाही. आम्ही पडलो गरीब, म्हणून आता तडीपारी नशिबी येणार आहे.’’
--------------------
‘हम तो ठहरे अनपढ गंवार, हमे दुसरा कौनसा धंदा आता ही नही. अब ये व्हिक्टोरियाका धंदा हम चार पिढीसे कर रहे है. ये बंद करेंगे तो हम कहाँ जाये?’
- सुबोध ठक्कर यांच्या या प्रश्नाला माङयाकडे उत्तर नव्हते. मी काय सांगणार?
त्यांचे बोलणो थांबेना. त्यांना प्रश्न विचारण्याआधीच सटासट उत्तरे मिळत होती.
‘‘कोणो एकेकाळी आम्ही पोट भरण्यासाठी मुंबईमध्ये आलो. हा घोडा आणि ही व्हिक्टोरिया. हा आमच्या जगण्याचाच भाग आहे. ते वेगळे नाहीतच आमच्यापासून’’. म्हणत सुबोधभाईंनी त्या अद्वैताचे एकेक पुरावे दाखवायला सुरुवात केली-
..ही पहा घोडय़ाची नाल असलेली अंगठी. हे पहा घोडय़ाचे किचेन. हे पहा घोडय़ाचा फोटो असलेले कुशन..
एकेक वस्तू सुबोध ठक्कर दाखवत राहिले आणि मग कळकळीने म्हणाले, ‘‘देखो हम घोडोंसे कितना प्यार करते है..’’
प्राणिमित्र संघटनांनी दाखल केलेल्या याचिकेनंतर मुंबईतल्या व्हिक्टोरिया - म्हणजे बोलीभाषेत घोडागाड्या - वर्षभराच्या कालावधीत बंद करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. हौसमौज म्हणून किंवा लग्नसमारंभात घोडागाडी वापरण्यापुरता मर्यादित राहिलेला हा व्यवसाय तसाही नव्या वेगवान जमान्यात चांगलाच आकुंचन पावत गेला आहे. आता बंदी येणार म्हटल्यावर कोठे जाणार हे विचारायला, त्यांचे काम पाहायला म्हणून घोडे पुरविणा:या व्हिक्टोरिया चालविणा:यांना भेटायला गेलो होतो.
साधारणत: दक्षिण मुंबई आणि चौपाटय़ांवर व्हिक्टोरिया चालवल्या जातात. त्यामुळे दक्षिण मुंबईत असणा:या कंपन्यांचे ऑफिस शोधून काढले. ठक्कर आडनावाची गुजरातमधून आलेली काही कुटुंबे व्हिक्टोरिया पुरवण्याच्या व्यवसायात आहेत. त्यापैकी सुबोध विठ्ठलभाई ठक्करांची भेट झाली. आता व्हिक्टोरिया बंद होणार म्हणून आपल्या व्यवसायाचे प्रश्न आणि अडचणी सर्वाना लवकर समजाव्यात अशी सुबोधभाईंची धडपड दिसली. आता पुढे काय करणार विचारल्यावर त्यांनी मुंबईतल्या घोडागाडीच्या भूतकाळापासूनच गप्पांची गाडी सुरू केली.
एकेकाळी मुंबईत येणारे लोक व्हीटी स्टेशनला उतरत. मग घोडागाडय़ांमधून भुलेश्वर, पायधुणी, कुंभारवाडा, काळबादेवी, प्रार्थना समाज, नरिमन पॉईंट असे जात. गुजरात, उत्तर प्रदेश, बिहारमधून लोक आले की गच्च सामान भरून येत. अशा लोकांचे सामान फियाट, अॅम्बेसडर गाडय़ांमध्ये कोणीच घेत नसे, त्यांना घोडागाडय़ांचा आधार होता.
‘‘आज आता वाहतुकीला पर्याय आल्यावर आणि सर्वाचे जीवन घाई-गडबडीचे झाल्यावर आम्ही अचानक नकोसे झालो आहोत. ट्रॅफिकला आमचा अडथळा वाटू लागला आहे.’’ - 12परवाने आणि 22 घोडय़ांचे मालक असलेले सुबोधभाई बोलताबोलता अचानक भिंतीवरचा फोटो किंवा वर्तमानपत्रतील कात्रणो दाखवत होते.
एकेकाळी व्हिक्टोरिया मुंबईची ओळख होती. आज या व्हिक्टोरियाला वाईट दिवस आले आहेत. एकेकाळी पूर्ण शहरावर राज्य करणा:या या राणीला तडीपार व्हावे लागणार, याचे दु:ख त्यांच्या बोलण्यात होते. ते सांगत होते.
‘‘आता एका फटक्यात सातशेहून अधिक लोक बेकार होणार आहेत. मालीशवाले, व्हिक्टोरिया चालविणारे, मेकॅनिक या सगळ्यांना दुसरा व्यवसाय शोधावा लागणार. हे लोक कोठे जाणार? आता लढायची ताकदही उरली नाही आणि खटले चालवू शकू इतके आम्ही हुशारही नाही.’’
- या गप्पा चालू असतानाच एक म्हातारा व्हिक्टोरियावाला समोर येऊन उभा राहिला. त्याला पाहताच सुबोधभाई म्हणाले, ‘ये देखो, ये है उस्मान कुरैशी. जब बारा साल का था, तब मुलुखसे आया. अब सत्तरका होगा. इसका कोई नही है. अब ये कहॉँ जायेगा, इसे तो भीखही मांगना पडेगा.’
उस्मानभाईंनी त्यांची व्हिक्टोरिया दाखविली. जुनी होती. पण तिच्यात एक ‘खास’ बात होती. तिचे लायसन्स. परवाना क्रमांक एक. तबेल्यात जायचे म्हणून उस्मान गडबडीने निघून गेले.
सुबोधभाईंना विचारले, इतके घोडे आणता तरी कोठून?
‘‘आता संपले हो ते जुने वैभव!’’ - ते कळवळून म्हणाले. ‘‘एकेकाळी पाच हजार व्हिक्टोरिया या शहरात होत्या, आता पन्नास-शंभरसुद्धा राहिल्या नाहीत. जे घोडे आहेत ते आम्ही पंढरपूरच्या बाजारातून आणतो.’’
कार्तिकी एकादशीच्या काळात पंढरपुरात मोठा बाजार भरतो. महाराष्ट्राच्या खेडय़ापाडय़ातून, पंजाब, गुजरात, राजस्थानातून व्यापारी घोडे विकायला आणतात. पसंत पडली की जनावरे मुंबईत आणली जातात. पहिला महिनाभर घोडय़ाला मुंबईची सवय होण्यातच जातो. गर्दी, गाडय़ा, दमट हवा यांची सवय व्हावी लागते. ट्रेनच्या आवाजाने घोडे बुजतात, त्यामुळे त्यांचीही सवय व्हावी लागते. थोडय़ा महत्त्वाच्या आणि काही जुजबी आज्ञा शिकल्या, की घोडा व्हिक्टोरियासाठी तयार होतो असे म्हणतात. पण एखादा नाही तयार झाला तर त्याला पुन्हा पाठवून द्यावे लागते. घोडय़ांचा खर्च परवडणो तितके सोपे नाही.
गप्पा करता करता तबेल्यात जायचे ठरले. सुबोधभाईंनी लगेच एका माणसाला बोलावले.
ठेंगणा, अत्यंत साधे आणि मळके कपडे घातलेला माणूस. रामनारायण मिश्र.
मैं चालीससे ज्यादा बरस गाडी चला रहा हूं. कुल्र्याला पोरंबाळं राहतात. मी मात्र तबेल्यातच राहतो. औरतको मैने छोड दिया.. वगैरे माहिती ऐकत आम्ही फॉकलंड रोडवरच्या तबेल्याकडे निघालो.
मगाशी उस्मानचाचांची आणि रामनारायणचीही पँट घोटय़ाच्या थोडी वर असलेली दिसली. घरी जराही आखूड पँट घातली की, काय टांगेवाला आहेस का? असा प्रश्न विचारला जायचा. आखूड पँट घातलेले टांगेवालेच दिसले म्हणून त्याचे कारण विचारले, तर रामनारायणभाई म्हणाले,
‘‘व्हिक्टोरियातून चढता-उतरताना त्रस होऊ नये म्हणून आम्ही आखूड पँट वापरतो.’’
बोलता-बोलता फॉकलंड रोड आलाच. खेतवाडी आणि इतर जवळच्या परिसरापेक्षा फॉकलंड रोड फार भडक. जवानी की रहस्य वगैरे पिक्चर लागलेले एक टॉकिज, दोन-तीन मजल्यांच्या माडय़ा, भडक लिपस्टिक लावलेल्या बायकांचे गट, जागोजागीच्या पानवाल्यांच्या गाद्या ओलांडून पुढे जाऊन आम्ही मिश्रंच्या तबेला चाळीत शिरलो.
घोडय़ाची लीद आणि चिखलातून वाट काढत आत गेलो. अनेक घोडेमालकांनी या चाळीत तबेला तयार केला आहे. पांढरेशुभ्र, चॉकलेटी, तांबूस रंगाचे भरपूर घोडे एकाच ठिकाणी रांगेत बांधलेले होते. तबेल्यातील एकेक गोष्ट आणि एकेक घोडा रामनारायण दाखवू लागले.
..ये है काजल, ये है हीना.. अशा शुभ्र घोडय़ांची फिल्मी नावे सांगू लागले. एक काळे तोंड असलेल्या घोडय़ाकडे बोट दाखवून म्हणाले, वो है कालामुंडी. इसका नाम मैं राजपूत रखनेवाला है.. ये अभी बच्च है, इसका नाम अबलख रखेंगे.
- रामनारायण तबेल्यात गेल्यावर एकदम बदलूनच गेले. लहान मुले घरी नव्या आलेल्या मुलाला किंवा पाहुण्याला एकेक खेळणी बाहेर काढून दाखवतात तसे रामनारायणचे झाले होते. हे पाहा, ते पाहा असे चालले होते. फिल्मी नावांची लड संपल्यावर शेवटी करण-अजरुन नावाची जोडीही दाखवली. दोघांचे अजिबात पटत नाही असंही लटक्या रागाने सांगून झाले. पण हे सगळे सांगताना त्या वृद्ध चालकाची जबरदस्त धडपड दिसत होती. रामनारायण म्हणाले,
‘‘सकाळी घोडय़ांची लीद काढणो, त्यांचे मूत्र बाजूला करणो, त्यांना खायला घालणो, मालीश करणो या सगळ्या गोष्टी आम्ही करतो. गूळ, चणो, हिरवा चारा याबरोबर मालीशही तितकीच लागते. घोडय़ांच्या खाण्याचा खर्च मालक देत असला तरी आम्ही प्रेमापोटी घोडय़ांसाठी गाजर खायला घालतो. आमची पोरेच आहेत ती.’’
सर्वाच्या बोलण्यात मालीशचा उल्लेखही वारंवार येत होता म्हणून त्याचे कारण विचारले, यावर मालीशमुळे घोडय़ाची त्वचा स्वच्छ राहते आणि जखमा होत नाहीत. जखमांवर माश्या बसतात आणि मग त्या चिघळतात म्हणून करावे लागते, असे ते म्हणाले.
लिदीमुळे माश्या भरपूर होत्या आणि माश्या हाकलायला घोडय़ांच्या शेपटांचे वायपर्सही सतत सुरू होते.
ब:याच घोडय़ांच्या पायांवर आणि अंगावर लांबी- व्हाइट सीमेंट लावल्यासारखे दिसत होते. तुम्ही घोडय़ांना चुना लावता का असे सहज विचारताच रामनारायण जोरात म्हणाला,
‘‘नहीं नहीं. चुना नाही. बोरिक पावडर आणि एक क्रीम एकत्र करून जखमांवर लावतात. त्यामुळे जखमा भरतात. खूप काही गंभीर असेल तर मग परळच्या दवाखान्यात घेऊन जातो. घोडय़ाच्या खुराला आतून यू आकाराचा खोलगट भागही करावा लागतो. त्यावर नाल ठोकली जाते. ही सगळी कामे आता हेच लोक करतात.’’
नाल ठोकणारी माणसे अगदीच कमी राहिली, असे सांगून रामनारायण यांनी घोडय़ाच्या खुराच्या आतली बाजू दाखविली. नाल आवश्यकच असते का असे विचारताच ते जोरात म्हणाले, ‘‘इस सीमेंट के रास्तेने सब बेडा गर्क किया है, इसपर घोडा चल ही नहीं सकता. इसिलिये नाल मारनी पडती है.’’
एकेक घोडा दाखविल्यावर रामनारायणांनी बाजूलाच असलेले खोपटे दाखवले,
‘‘वो देखो मैरा शिशमहल.’’
स्वर मजेचा असला तरी रामनारायण मनातून दुखावल्यासारखे दिसत होते. ताडपत्रींनी झाकलेली एकदम मोडकळीस आलेली झोपडी. तबेल्याच्या वातावरणातच, त्याच माश्यांमध्ये, वासामध्ये, कुटुंबापासून दूर जवळजवळ साडेचार दशके त्यांनी काढली होती. मुंबईत पूर आला तेव्हा काय केले असे विचारताच म्हणाले, ‘‘जोरसे पानी उपरसे आया, तब औरतभी यहीं पे रहती थी, मैने कहा. जाने दो झोपडा, जान बचनी चाहीये’’ असे म्हणून तिचा हात धरून बाहेर आलो असे ते सांगत होते.
रामनारायण बोलत असताना आमच्या मागून तबेल्यातली इतर मुलेही उत्साहाने काहीबाही सांगत
होती. अनिस नावाचा व्हिक्टोरियावाला म्हणाला, वो महाभारत का बताओ ना उनको. महाभारत या टीव्ही सिरियलची बात निघताच रामनारायणभाई खुलले.
‘‘मैने महाभारत सिरीयलमें रथ चलाया है. चार घोडों का रथ. बहोत बार शूटिंग के लिये गोरेगाव गया हूँ’’ असे सांगू लागले. ‘‘महाभारत छोडो, पूनम धिल्लोंके शादीमें मैने बारा घोडों का रथ चलाया था. सब लोग पूनम को छोडके मुङोही देख रहे थें की कैसे ये बारा घोडों की गाडी चला रहा है?
..त्याच वातावरणात अनेक झोपडय़ांमध्ये कुटुंबे नांदत होती. कोंबडय़ा, बक:याही अधूनमधून फिरत होत्या. एका टांगेवाल्याने आमचे बोलणो सुरू असतानाच कोळशाची चूल पेटवली आणि कागद घालून स्वयंपाकाची तयारी केली. हे सगळे टांगेवाले बाहेर जेवतात किंवा इथेच स्वयंपाक करून जेवतात असे कोणीतरी म्हणाले. दुपारी सुबोधभाईंनीही या लोकांमध्ये व्यसनाचे प्रमाण अधिक असल्याचे सांगितले. रोजच्या रोज रोख कमाई असल्याने पैसे त्याच दिवशी संपून जातात. त्यातून व्यसनांची संगत लागते, असे सुबोधभाई म्हणाले होते.
रामनारायण आणि त्याच्या मित्रंशी गप्पा होईतो आता गाडय़ा जुंपून बाहेर जाण्याची वेळ आली होती. गाडय़ा स्वच्छ करणो, सजवणो सुरू झाले.
तेवढय़ात एक चॉकलेटी बनियन घातलेले साईजादा नावाचे मेकॅनिक येऊन बसले. मुंबईतील व्हिक्टोरिया दुरुस्त करणारे हे एकमेव मेकॅनिक उरलेत म्हणो.
‘‘रोज गोरेगाववरून फॉकलंडला या कामासाठी येतो. माङो हात थकले आता. लेकिन क्या करे? जवान बच्चे आना नही चाहते इस लाईनमें’’ - ते सांगत होते.
एवढय़ात गाडय़ा तयार झाल्या, घोडे जुंपले गेले.
अनिस म्हणाला, तुम्ही माङयाबरोबर नरिमनला चला.
मग फॉकलंड रोड, खेतवाडी वगैरे दिशेने आमचा टांगा नरिमन पॉइंटकडे जाऊ लागला.
अनिसही रामनारायणसारखाच बोलू लागला,
‘‘हा माझा आवडता घोडा आहे, मजनू. सगळे घोडय़ांची नावे चेतक वगैरेच ठेवतात. म्हणून मी मुद्दाम वेगळे काहीतरी म्हणून मजनू नाव ठेवलेय याचे. आता बघा याला सगळा रस्ता पाठ आहे. सिग्नलला बरोबर थांबतो. पण रेल्वे स्टेशनच्या जवळून जाताना ट्रेनच्या आवाजाला थोडा घाबरतो. आता सांगा, ट्रॅफिकला थोडातरी त्रस होतोय का आमचा? तरीपण आमच्यावर हजार बंधने आहेत. संध्याकाळीच आम्हाला गाडी बाहेर काढण्याची परवानगी आहे. त्यामुळे दिवसभर बसून राहावे लागते. पावसाळ्यातसुद्धा काही करता येत नाही. अनेकदा पोलिसांचाही त्रस सहन करावा लागतो. पण आता दुसरे काहीच करणो शक्य नाही म्हणून हा व्यवसाय करावा लागतो. शिक्षण नाही त्यामुळे आम्हाला बाहेर काहीच किंमत नाही. त्यामुळे घोडागाडय़ा बंद झाल्या की कोठे जायचे हा प्रश्नच आहे.’’
बोलता बोलता त्याला भरूनच आले एकदम. मग म्हणाला, आमच्या घोडय़ांमुळे प्राणिमित्रंना एवढा त्रस होतो, म्हणून ते कोर्टात गेले आमच्या विरोधात, मग रेसकोर्सच्या घोडय़ांवर का नाही बंदी आणली? रेसकोर्स वगैरे सगळा श्रीमंतांचा खेळ आहे, त्याच्याआड कोणीही येत नाही. आम्ही पडलो गरीब, म्हणून आता तडीपारी नशिबी येणार आहे.’’
अनिसच्या गाडीतून नरिमन पॉइंटला गेलो. त्याचा व्यवसाय सुरू झाला. एनसीपीएच्या इमारतीपासून एअर इंडियाच्या इमारतीर्पयत तो मुलांना, कुटुंबांना फिरवून आणू लागला.
रंगीबेरंगी फुले लावलेल्या, चांदीसारख्या दिसणा:या स्टीलचे पत्रे ठोकलेल्या या व्हिक्टोरियांच्या आत अनेक प्रश्न, दु:ख आणि बेकारी अडकल्याचे पाहिले होते.
घोडय़ांच्या टापांची मजा वाटेना. अनिसच्या फे-या चालूच होत्या. त्याने विचारले, ‘‘पुन्हा बसायचे आहे का व्हिक्टोरियात?’’ ‘‘नको आता जातो.’’ म्हणत मी सवयीने टॅक्सीला हात केला आणि व्हिक्टोरिया टर्मिनस गाठले.
-----------------
इस सीमेंट के रास्तेने सब बेडा गर्क किया है साहब. क्या करे? इसपर हमारा घोडा चल ही नही सकता. इसिलिये नाल मारनी पडती है. दुख इतना होता है, की जैसे अपने बच्चे को जला रहे है.- रामनारायण
व्हिक्टोरियाचालक
----------------
रोज गोरेगाववरून फॉकलंडला येतो व्हिक्टोरिया रिपेअर करायला. माङो हात थकले आता. लेकिन क्या करे? जवान बच्चे आना नहीं चाहते इस लाईनमें. - साईजादा, अख्ख्या मुंबईत व्हिक्टोरिया
दुरुस्त करणारे एकमेव मेकॅनिक
------------------
घोडा हेच आमचे एकमेव भांडवल, त्याची काळजी आम्ही घेणार नाही का? एखाद्या मालकाचा घोडा जखमी आढळला म्हणून सगळेच घोडे वाईट अवस्थेत ठेवले जातात असे नाही. एका माणसाने चूक केली असेल, त्याचे परिणाम सर्वानी का भोगावे? माङो घोडे माङया मुला-भावांसारखे आहेत. त्यांना रोज मालीश करतो, खायला-प्यायला देतो, इतकेच नव्हे तर दस:याला त्यांची पूजाही करतो.
- सुबोधभाई ठक्कर, व्हिक्टोरियाचे 12 परवाने आणि 22 घोडय़ांचे मालक
(लेखक ‘लोकमत’च्या मुंबई आवृत्तीत उपसंपादक आहेत)