द्रष्टा अणुयात्रिक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 06:00 AM2019-12-15T06:00:00+5:302019-12-15T06:00:07+5:30

डॉ. अनिल काकोडकर यांच्यासारख्या असाधारण प्रज्ञावंताचे चरित्र लिहिणे हे खरोखरच एक मोठे आव्हान होते. त्यांच्याबरोबरच्या प्रत्येक भेटीत वेगवेगळ्या गोष्टी उलगडत गेल्या आणि मी थक्क होत गेले. त्यांच्या बालपणापासून ते त्यांच्यावरील संस्कारापर्यंत, त्यांना आलेल्या अडथळ्यांपासून ते त्यांच्या यशापर्यंत अशा अनेक गोष्टींचा धांडोळा घेतला. लेखनाला आकार आल्यावर मला साक्षात्कार झाला, की डॉ. काकोडकरांच्या आयुष्याचा आढावा घेताघेताच भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमाचा प्रवासही समांतरपणे चित्रित झाला आहे !

Nuclear physicist and great scientist Dr Anil Kakodkar's biography by Aneeta Patil - 'Surayakoti Samaprabha : Drashta Anuyatrik ! | द्रष्टा अणुयात्रिक!

द्रष्टा अणुयात्रिक!

Next
ठळक मुद्देअणुवैज्ञानिक डॉ. अनिल काकोडकर यांच्यावरील ‘सूर्यकोटि समप्रभ : द्रष्टा अणुयात्रिक’ या चरित्रग्रंथाचे प्रकाशन दि. 21 डिसेंबर रोजी ठाण्यात होत आहे. त्यानिमित्त..

- अनीता पाटील

हयात असलेल्या व्यक्तीचे चरित्न लिहिणे हेच मुदलात एक आव्हान असते. ‘सूर्यकोटि समप्रभ : द्रष्टा अणुयात्रिक’ या डॉ. अनिल काकोडकर यांच्या चरित्नाच्या निमित्ताने ते शिवधनुष्य उचलण्याची संधी मला मिळाली.
या चरित्नलेखनाला सुरुवात करताना काही  महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे शोधणे गरजेचे होते. या चरित्नाचे प्रयोजन काय? रूढार्थाने याचा बाज प्रचलित चरित्नाचा असावा की अन्य काही? ही थोरांची ओळख असणार की घटनाक्रमांची निव्वळ नोंदवजा साखळी असणार, याची जी उत्तरे मला मिळाली त्याचेच प्रतिबिंब या चरित्नात सापडेल. 
‘चि. अनिल काकोडकर ते  पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर’ असा प्रवास झालेल्या यात्रिकाच्या आयुष्याचा हा मागोवा आहे.
सर्वसाधारणपणे त्यांच्याविषयी ज्ञात असलेली माहिती त्यांच्या आयुष्याचे सार सांगत नाही. त्यातून दिसतो तो पाण्याच्या पृष्ठभागावर आलेला हिमनगाचा केवळ एक अष्टमांश भाग. अदृश्य राहिलेला सात अष्टमांश भाग हे त्यांच्या आयुष्याचे सूत्न आणि तीच त्यांची जीविका ! खरे म्हणजे उपजीविकेपेक्षा त्यांची जीविका उलगडण्यासाठी मी कामाचा आराखडा तयार केला. 
मेडिकल अँण्ड सायकीअँट्रिक सोशल वर्कर या माझ्या पेशामुळे मला समाजशास्र आणि मानसशास्र या अंगाने अनेक पैलूंची उकल करणे शक्य झाले. माझे वडील शास्रज्ञ असल्याने टीआयएफआर, बीएआरसी यांसारख्या देशभरातील विज्ञानसंस्था मला परिचयाच्या होत्या. तशात मी ‘बीएआरसी’त कार्यरत झाल्यावर अशा संस्थांचे अनेक पदर उलगडत गेले. या पृष्ठभूमीचा डॉ. काकोडकरांचे चरित्र लिहिताना लक्षणीय फायदा झाला. परिणामी या चरित्रात सुरुवातीच्या टप्प्यात अनेक क्रमवार घटनाक्रम अपरिहार्यपणे आले असले तरी प्रामुख्याने त्यांचे कार्य, योगदान, कार्यप्रणाली आणि विचारधारेचा मागोवा हाच गाभा राहिला आहे.
असाधारण प्रज्ञावंतांनादेखील टप्प्याटप्प्याने होणार्‍या प्रगतीच्या मार्गानेच जावे लागते. फरक इतकाच की यांचा मार्ग अधिक वेगवान असतो.
पायापासून ते कळसापर्यंतच्या अध्यायांमध्ये अशा व्यक्तींनाही अडथळ्यांना सामोरे जावे लागते का? वैचारिक संघर्ष, वा विरोधाभासांना सामोरे जावे लागते का? शिखरस्थ होतानाची त्यांची मानसिक तयारी कशी होते? 
उच्च पदावर विराजमान झाल्यावर, उदंड यश मिळाल्यावर पाय जमिनीवर ठेवणे सोपे असते का?  पोखरणसारख्या प्रकल्पात सहभागी झाल्यानंतर आज वीस वर्षांनीदेखील त्याबद्दल ते गोपनीयता कशी कसोशीने  बाळगतात? अमेरिकेसारख्या बलदंड देशाशी  123 करार करताना एवढा कणखरपणा कसा आला?  त्यातून जे गवसले त्याचाच हा धांडोळा.
चरित्रलेखनात दोन प्रकारचे स्रोत मूलभूत ठरतात.  खुद्द चरित्र नायकाकडून तपशील जाणून घेण्याची आगळी संधी मला मिळाली.
दर भेटीत एक ठरावीक विषय घेऊन आधी त्या विषयाचा अभ्यास करून त्याबाबतचे प्रश्न घेऊन मी जात असे. भेटींमधील संवाद मी ध्वनिमुद्रित केले.
नोंदी आणि ध्वनिमुद्रण यांनी माझ्यातून एखादा मुद्दा सुटणार नाही याची काळजी घेतली. 
यथावकाश लेखनाला आकार आला आणि मला साक्षात्कार झाला की, डॉ. काकोडकरांच्या आयुष्याचा आढावा घेताघेताच भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमाचा प्रवास समांतरपणे चित्रित झाला होता.
याबरोबरच डॉ. काकोडकर यांना आई कमलाताईंकडून लाभलेला देशप्रेम, स्वावलंबन, अहिंसा या मूल्यांचा संस्कार किती खोलवर रुजला आहे, उच्चपदावरील व्यक्तीला धोरणात्मक निर्णय घेताना ही मूल्ये कशी पथदर्शी ठरतात या सार्‍याची जाणीव झाली.  कमलाताईंना गांधीजींच्या महिलार्शमात मिळालेले शिक्षण आणि संस्कार तसेच मादाम मॉँटेसरीकडून मिळालेले  बालमानसशास्राचे शिक्षण यांचा या अणुयात्रिकाच्या आयुष्यावर पडलेला प्रभाव हाच त्यांचा स्थायिभाव कसा बनला याची अनुभूती घेणे हा लेखन प्रक्रि येतील अपूर्व भाग होता.
बुद्धिमत्ता आणि सुसंस्कृतपणा, नम्रता आणि कणखरपणा एकत्न नांदू शकतात याचे पदोपदी दाखले मिळाले. नेतृत्वाची धुरा सांभाळताना शिस्तीबरोबरच सहृदयता आणि तारतम्य या गुणांची इष्टता अधोरेखित झाली. विज्ञान तंत्नज्ञानातील प्रगतीची फळे तसेच शिक्षणासाठीच्या सुविधा फक्त शहरवासीयांपुरती र्मयादित राहू नयेत, ग्रामीण भागातील लोकांनादेखील त्याचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्नशील असणार्‍या  डॉ. काकोडकरांच्या या रूपाची नव्याने ओळख झाली.
कुठल्याही माणसाच्या व्यक्तिमत्त्वात त्याच्या बालपणीचे अनुभव, पालकांनी केलेले संस्कार, रुजविलेली जीवनमूल्ये याचे दर्शन घडते, याची वारंवार जाणीव झाली. 
या चरित्रलेखनाच्या निमित्ताने मी परत विद्यार्थिदशेत गेले. माझ्या वडिलांनी केलेल्या शिस्तीचा आणि नियोजनाचा संस्कार लिखाणासाठी फार मोलाचा ठरला. शब्दांची मांडणी करीत असताना यातीलच एक संस्कार सातत्याने माझा लिहिता हात अडवित असे. चरित्र लेखन बव्हंशी तटस्थ असावे आणि विशेषणे नामाला मारतात, याचे भान लेखणीला असावे या संस्काराने या संपूर्ण प्रक्रि येत माझी सोबत केली. या चरित्नलेखनाच्या निमित्ताने मी काही कौशल्ये आत्मसात केली.  संगणकाशी ओळख होती; पण त्यावर चालणार्‍या बोटांचा हातखंडा नव्हता. मग मराठी टायपिंग शिकले. लेखणी बाजूला ठेवून थेट संगणकावरच शब्द उमटविले. हे करताना माझ्या जाणिवा नेणिवांमध्ये फरक पडला. एखाद्या विषयाकडे किती निराळ्या दृष्टीने बघता येते याची जाणीव झाली.
सिद्ध झालेल्या चरित्राइतकाच डॉ. काकोडकरांच्या सान्निध्यातील अनुभव महत्त्वाचा ठरला. माझे अनेक प्रश्न वरकरणी बालिश वाटले तरी जिज्ञासा हेच त्याचे मूळ आहे हे समजून डॉ. काकोडकरांनी शंकासमाधान केले; तेही आजोबांनी नातवंडाच्या शंकांचे निरसन करावे इतक्या ममत्वाने. 
 आपल्या ठायी असलेली तेज:पुंज प्रज्ञा इतरांसाठी दाहक ठरू नये याची त्यांनी दिलेली ही अलवार प्रचीती होती. 
 त्यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाचे प्रतिबिंब ‘रोझेन्थाल इफेक्ट’ या संकल्पनेच्या अंगाने चरित्नात उमटले. 
या संपूर्ण प्रवासात मला झालेले या द्रष्ट्या अणुयात्रिकाचे रूप ज्ञानेश्वरांच्या दार्शनिक प्रतिमेतूनच सांगता येईल.. - सूर्यकोटि समप्रभ !

सूर्यकोटि समप्रभ : द्रष्टा अणुयात्रिक
लेखन : अनीता पाटील
संपादन : चंद्रशेखर कुलकर्णी
मनोविकास प्रकाशन

Web Title: Nuclear physicist and great scientist Dr Anil Kakodkar's biography by Aneeta Patil - 'Surayakoti Samaprabha : Drashta Anuyatrik !

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.