बिटापासून साखर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 06:04 AM2018-12-16T06:04:00+5:302018-12-16T06:05:08+5:30

महाराष्ट्रात ऊस गळिताचा हंगाम पूर्वी सहा महिने चालायचा. हाच हंगाम आता चार महिन्यांवर आल्याने कारखान्यांतील यंत्रणेचा वापरच होत नाही. त्यामुळे याच यंत्रणेचा वापर करून बिटापासून साखरनिर्मितीचा प्रयोग आता महाराष्ट्रात मूळ धरू पाहतो आहे...

Now sugar from beetroot in Maharashtra ! | बिटापासून साखर!

बिटापासून साखर!

googlenewsNext
ठळक मुद्देहिवाळी हंगामात लागवड करून पाच ते सहा महिन्यांत काढणी केल्यास ६५ ते ७५ टन प्रतिहेक्टर बीट उत्पादन होते. १ टन बिटापासून १२० ते १५० किलो साखर, ३५ किलो मळी अणि ४५ किलो वाळलेला पल्प मिळतो.

- विश्वास पाटील
साखरनिर्मितीत महाराष्ट्र कायमच अग्रेसर राहिलेला आहे. पण आता त्यात आणखी एक पाऊल पुढे पडू पाहते आहे. उसापासून साखरनिर्मितीत ठसा उमटविलेला महाराष्ट्रातील साखर उद्योग आता बिटापासून साखरनिर्मितीच्या उंबरठ्यावर आहे.
महाराष्ट्रात सध्या १०१ सहकारी व ८७ खासगी कारखाने ऊस गळिताचा हंगाम घेतात. एक काळ असा होता की, ऊस हंगाम किमान सहा महिने चालत असे; परंतु आता कारखान्यांची वाढलेली संख्या, लवकर ऊस गाळप करण्याची शेतकऱ्यांची मानसिकता यामुळे गाळप हंगाम चार ते साडेचार महिन्यांवर आला आहे. कर्नाटकात तर खासगी कारखाने ‘जे काही गाळप करायचे ते १०० दिवसांत करून घ्या,’ हा पॅटर्न राबवीत आहेत. त्यामुळे १०० दिवस हंगाम आणि वर्षाचा खर्च करावा लागत आहे; म्हणून उसाचा हंगाम झाल्यानंतर आणखी किमान ३० ते ४५ दिवस तीच यंत्रणा वापरून आपण बिटापासून साखरनिर्मिती करू शकू का, असा विचार पुढे आला आहे.
हा प्रयोग महाराष्ट्रात कितपत यशस्वी होईल, यासंबंधीचा विचार वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटतर्फे सुरू आहे. या संस्थेचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार व ‘व्हीएसआय’चे महासंचालक शिवाजीराव देशमुख यांच्यासह मान्यवरांचे शिष्टमंडळ मध्यंतरी युरोपमध्ये जाऊन बिटापासून साखरनिर्मिती कशी होते, त्यातील तंत्रज्ञान व ते महाराष्ट्रात वापरायचे झाल्यास काय करावे लागेल, हे प्रत्यक्ष पाहून आले आहेत.
‘व्हीएसआय’ राजारामबापू साखर कारखाना (वाळवा), समर्थ शुगर (जालना) येथे बीट उत्पादनाचे प्रयोग गेली दोन वर्षे घेत आहे. यंदा हा प्रयोग बारामती अ‍ॅग्रो कारखान्याच्या क्षेत्रात घेतला जात आहे.
वेगवेगळ्या हवामानांत हे पीक कसे येते, याचा संशोधनात्मक अभ्यास सुरू आहे. बिटापासून साखर म्हणजे ऊस बंद असे नाही तर उसाचा हंगाम संपल्यानंतर बंद ठेवाव्या लागणाºया यंत्रणेचा वापर करून उत्पादन घेणे, उत्पादन खर्च कमी करणे व त्यातून शेतकºयाला चार पैसे जास्त कसे मिळतील असा विचार यामागे आहे. साखर उत्पादन जास्त झाले तरीही त्यापासून इथेनॉल करता येते, त्यामुळे हा प्रयोग फायद्याचाच आहे.
शरद पवार केंद्रीय कृषिमंत्री असताना २००४-०५ व २००७-०८ या कालावधीत ‘व्हीएसआय’च्या प्रक्षेत्रावर विविध चाचणी प्रयोग करण्यात आले. विकसित तंत्रज्ञानाचा वापर करून, सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर बीट लागवड करून, त्यावर प्रक्रिया करण्याचे ठरविण्यात आले. नवी दिल्लीच्या साखर विकास निधीने त्यासाठी अर्थसाहाय्य पुरविले व त्यातून १०० टन प्रतिदिवस क्षमतेचा प्रक्रिया प्रकल्प ‘नॅशनल हेवी इंजिनिअरिंग, पुणे’ यांच्या मदतीने तयार करण्यात आला. त्याची उभारणी कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना, जालना येथे करण्यात आली. पुढच्या टप्प्यात सांगली जिल्ह्यातील वाळवा येथील राजारामबापू कारखाना व कर्नाटकातील रेणुका शुगर्सने लागवड व प्रक्रिया केली.
वाळवा येथील मशिनरी आता बारामती अ‍ॅग्रो येथे आणण्यात आली असून, तिथे बिटापासून साखर निर्मितीचा प्रयोग या हंगामापासून सुरू होत आहे. या लागवडीसाठी तांत्रिक ज्ञान मिळावे यासाठी ‘व्हीएसआय’ने कृषिशास्त्र विभागाचे संचालक विकास देशमुख, शास्रज्ञ पी. व्ही. घोडके आदींसह सहा तंत्रांचा गट स्थापन केला आहे.
बिटाचे वैशिष्ट्य म्हणजे उसाच्या तुलनेत या पिकाला निम्मेच पाणी लागते. हलक्या जमिनीत त्याची लागवड करता येते. रब्बी हंगामात गहू पिकास बीट हा जास्त उत्पन्न मिळवून देणारा चांगला पर्याय आहे. बिटाचे बियाणे पुरविणारी बेल्जियमची एकमेव कंपनी आहे. तीच कंपनी जगातील ५० देशांना या बियाणांचा पुरवठा करते. शेतकºयांना त्यावर अवलंबून राहावे लागू नये यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटतर्फे बियाणे विकसित केले जाणार आहे. शेतकरी बीट उत्पादन करू लागले आणि नंतर बियाणे मिळत नाही अशी तक्रार येऊ नये याची दक्षता घेण्याच्या सूचना शरद पवार यांनी केल्या आहेत.
बीट हे साडेचार ते पाच महिन्यांचे पीक असून, मुख्यत: जास्त थंडी असलेल्या प्रदेशांत ते चांगले येते. युरोपमध्ये त्यापासून साखर तयार करणारी कारखानदारी आहे. ब्राझिलसह भारत, थायलंड, आॅस्ट्रेलिया व आफ्रिकन देशांत मुख्यत: उसापासून साखरनिर्मिती होते. जगातील एकूण साखर उत्पादनांपैकी ३० टक्के उत्पादन बिटापासून होते. या पिकापासून साखरेबरोबरच इथेनॉल, हिरवा चारा, लगदा (पल्प) व चोथा मिळतो. उरलेला भाग जमिनीस सेंद्रिय खत म्हणून वापरता येतो.
भारतात १९६०पासून ऊस संशोधन संस्था, लखनौ, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे आणि मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथे बीट पिकावर संशोधन करण्यात येत असून, त्याचे व्यापारी लागवडीसाठी उत्पादन तंत्रज्ञान विकसित झाले आहे.
मात्र यासंदर्भात काही मर्यादाही आहेत. बीटपासून साखरनिर्मिती करायची झाल्यास त्यासाठी सध्याच्या साखर कारखान्यांत डिफ्युजर बसवावा लागतो. त्याची किंमत सुमारे २० ते २५ कोटी रुपये आहे. चांगली आर्थिक क्षमता असलेले कारखाने ही गुंतवणूक करू शकतील. इतर कारखान्यांना साखर विकास निधीकडून दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देण्याची गरज आहे. शिवाय बीट हे उसासारखे कमी कष्टाचे पीक नाही. भाजीपाल्यास जशी रोज निगा ठेवावी लागते, तशी शेतकºयांना या पिकाची निगा ठेवावी लागते. त्यामुळे बीट ुउत्पादनासाठी शेतकºयांची मानसिकता तयार करणे हेदेखील एक मोठे आव्हान आहे.
बिटापासून साखरनिर्मिती हा प्रयोग महाराष्ट्रात यशस्वी झाला, तर शेतकरी आणि साखर कारखाने या दोघांसाठीही तो मैलाचा दगड ठरेल आणि साखरउद्योगाला एक नवे वळण मिळेल.
बीट लागवडीचे फायदे -
१) हिवाळी हंगामात लागवड करून पाच ते सहा महिन्यांत काढणी केल्यास ६५ ते ७५ टन प्रतिहेक्टर बीट उत्पादन होते. १ टन बिटापासून १२० ते १५० किलो साखर, ३५ किलो मळी अणि ४५ किलो वाळलेला पल्प मिळतो.
२) एक टन बिटापासून ९० लिटर इथेनॉल तयार होते.
३) या पिकाचा कालावधी पाच ते सहा महिने इतका आहे.
४) उसाच्या तुलनेत पाण्याची गरज ४० ते ५० टक्के आहे.
५) हे पीक क्षारपड चोपण जमिनीत चांगले वाढते.
६) जमिनीमध्ये बीट सोटमुळासारखे वाढते; त्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो.
७) बीट प्रक्रियेनंतर राहिलेला पल्प जनावरांना वैरणीमध्ये वापरता येतो व त्यामुळे दूध उत्पादन वाढते.
८) उसाच्या पूर्वहंगामी लागवडीमध्येही बीट पिकाचा आंतरपीक म्हणून समावेश होऊ शकतो.
(लेखक लोकमतच्या कोल्हापूर आवृत्तीत
मुख्य बातमीदार आहेत.)

vishwas.patil@lokmat.com

Web Title: Now sugar from beetroot in Maharashtra !

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.