Now fight for sunshine too? | आता  सूर्यप्रकाशासाठीही लढा?

आता  सूर्यप्रकाशासाठीही लढा?

ठळक मुद्देउजेड आणि अंधार - आपल्या जीवनावर कसा प्रभाव पाडतात याबद्दल आजवर अनेक संशोधने झाली आहेत आणि अजूनही सुरू आहेत.

- विनय र. र. 
दिवसा लख्ख प्रकाश आणि रात्री झोपेच्या वेळी गडद अंधार माणसाला आणि संपूर्ण सजीवसृष्टीला का हवा आहे, यासंदर्भात आजवर अनेक ठिकाणी, अनेक वेळा संशोधन झाले आहे.
या संशोधनांनी स्वच्छ सूर्यप्रकाशाची आवश्यकता आणखी गडद केली आहे. अर्थात याबाबत भाग्यशाली लोक फारच थोडे आहेत. कारण अनेक गोष्टींना र्मयादा आहेत. मात्र त्यावर पर्याय शोधण्याचे प्रय}ही सुरू आहेत.
सर्वचजण चालत किंवा सायकलने कामावर जाऊ शकत नाहीत; मोठय़ा खिडकीच्या जवळ बसून काम करण्याची जागा प्रत्येकाला मिळू शकत नाही किंवा दुपारचे जेवण झाल्यावर प्रत्येकजण उन्हात जाऊन फेरी मारून येऊ शकत नाही. पण अगदी चार भिंतींच्या आत राहूनही, आपण आपल्यासाठी योग्य तितका प्रकाश मिळवू शकतो. 
यूकेमधील राष्ट्रीय मानदंड संस्थेने इमारतींमध्ये पुरेसा उजेड राखण्यासाठी काय करता येईल - याबाबत मार्गदर्शक तत्त्वे प्रकाशित केली आहेत. उदाहरणार्थ -  पाळणाघरे, रुग्णालये, शाळा आणि कार्यालयांमध्ये ‘मानव केंद्रित’ उजेडाच्या रचना वाढत आहेत. त्यात कल्पना अशी आहे की निळा प्रकाश आणि प्रखर प्रकाश यांचे समायोजन करून चार भिंतींबाहेरच्या परिस्थितीच्या अधिकाधिक जवळ जाणारा उजेड चार भिंतींच्या आत राखत आपण आपली झोप, आरोग्य सुधारू शकतो आणि कल्याण करून घेऊ शकतो ! 
यासंदर्भात ठिकठिकाणी अनेक कल्पक प्रयोगही करण्यात आले आहेत.
डेन्मार्कमधील हॉर्सन्स गावातील सेरेस सेंटरमध्ये स्मृतिभ्रंश झालेल्या रुग्णांसाठी एक निवासी विभाग आहे. दिवसा तेथे निळी झाक असणारे, पांढरा उजेड देणारे दिवे लावले जातात, संध्याकाळ होत जाईल तसे मंद पिवळसर प्रकाश पाडणारे दिवे लावले जातात. झोपेच्या खोल्यांमध्ये रात्नी अंधार ठेवला जातो. तथापि ज्यांना मध्येच झोपेतून जाग येऊन उठावेसे वाटते त्यांच्यासाठी बाथरूममध्ये मंद पिवळसर उजेड देणारे दिवे लावण्याची व्यवस्था केलेली आहे. 
मागच्या दशकात नेदरलॅण्ड्समध्ये एक क्लिनिकल चाचणी करण्यात आली. त्यातून असा संकेत मिळाला की प्रकाशयोजनेत सुधारणा केल्यास काही उपाय सापडू शकेल. या चाचणीत सहा रुग्णांच्या देखभाल घरांमध्ये अतिरिक्त उजेड पाडता येईल, अशी व्यवस्था केली होती. ज्यामुळे सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या दरम्यान आतील प्रकाशाची पातळी हवी तशी बदलता येऊ शकेल. इतर सहा देखभाल घरांमध्ये प्रकाशव्यवस्था बदलण्याची अशी कोणतीही तजवीज केलेली नव्हती. साडेतीन वर्षांनंतर, असे आढळले की दिवसाच्या काळात लख्ख प्रकाशात राहिलेल्यांमध्ये असमंजसपणा आणि निराशा कमी झाल्याचे आढळले. लख्ख उजेडातील वावर आणि सोबत मेलाटोनिन पूरके दिली गेली, तेव्हा त्यांना झोपदेखील चांगली आली आणि त्यांची चंचलताही कमी झालेली आढळली.
बर्‍याच रु ग्णालयांमध्ये दिवसाचा उजेड अपुरा असतो. 2017 साली यूकेमध्ये केलेल्या एका अभ्यासात असे आढळले की, अतिदक्षता विभागांमध्ये दिवसाचा प्रकाश सरासरी 159 लक्स होता, तर रात्नी 10 लक्स. यूकेच्या युनिव्हर्सिटी ऑफ मँचेस्टरमधील संशोधक डेव्हिड रे म्हणतात, अशा प्रकारच्या प्रकाशयोजनेमुळे बर्‍याचदा रुग्णांच्या शारीरिक चलनचक्रात अडथळा येतो आणि त्यामुळे तब्येत सुधारण्याच्या प्रक्रियेत अडथळा येतो. त्याखेरीज अतिदक्षता विभागातील रु ग्णांना मॉर्फिनसारखी गुंगीची औषधे दिल्यामुळे शारीरिक चलनचक्र ात आणखी व्यत्यय आणू शकतात. रु ग्ण दिवसाच्या प्रकाशात जास्तीत जास्त काळ राहिल्यास अधिक जलद बरे होतात. एका अभ्यासात असे दिसून आले की, हृदयाची शस्रक्रिया झाल्यानंतर रिकव्हरीसाठी ठेवलेल्या रुग्णांचे दवाखान्यात राहावे लागण्याचे प्रमाण दिवसाच्या प्रकाशात प्रत्येकी 100 लक्स वाढीसाठी 7.3 तास कमी झाले.
उंदरांवर झालेल्या एका संशोधनातून याचे कारण स्पष्ट होऊ शकेल. यात हृदयविकारासारखा आघात करून काही उंदीर जखमी केले गेले. त्यातले काही उंदीर दिवसरात्नीनुसार नैसर्गिकरीत्या कमी-जास्त होणार्‍या उजेडात ठेवले तर काही अतिदक्षता विभागात असणार्‍या प्रकाशमान अवस्थेत ठेवले. या दोन भिन्न परिस्थितीत ठेवलेल्या उंदरांमध्ये - हृदयापर्यंत पोहोचलेल्या रोगप्रतिकारक पेशींची संख्या, त्यांतील विविधता आणि झालेल्या जखमा भरून आणणार्‍या उतींची संख्या यात लक्षणीय फरक आढळून आला. 
अंधार-उजेडावर अवलंबून राहणारे शारीरिक जीवनचक्र  विस्कळीत झालेल्या उदरांमध्ये जखमांमुळे मृत्यू पावण्याची शक्यता जास्त आढळली. निरोगी व्यक्तींनाही मानव-केंद्रित प्रकाशमानता मदत करू शकते, त्यांच्या झोपेच्या प्रतीत सुधारणा होते. 
उजेड आणि अंधार - आपल्या जीवनावर कसा प्रभाव पाडतात याबद्दल आजवर अनेक संशोधने झाली आहेत आणि अजूनही सुरू आहेत.
आपण पाहिलेले दृश्य मेंदूपर्यंत पोहोचविण्याची कामगिरी करणार्‍या रॉड आणि कोन आकाराच्या पेशी आपल्या डोळ्यांच्या आत असतात. त्या पेशींच्या मागच्या भागात प्रकाश संवेद्य पेशी असतात. त्यांना - नेत्नपटलावरील मूलभूत प्रकाशसंवेद्य गॅँग्लियन पेशी असे म्हटले जाते. सर्व रंगांच्या- प्रकारांच्या प्रकाशाला त्या प्रतिसाद देतात; परंतु त्यातल्या त्यात त्या निळ्या प्रकाशासाठी विशेष संवेदनशील आहेत. विविध प्रकारचे एलक्ष्डी दिवे तसेच कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाइल अशांच्या पडद्यांमधून बाहेर पडणारा प्रकाश प्रखर निळ्याकडे झुकणारा असतो.
या पेशी मेंदूच्या विशिष्ट भागाकडे संदेश पाठवतात. जागे राहण्यासाठी लागणारी शारीरिक सतर्कता या भागाकडून नियंत्रित केली जाते. कमी तीव्रतेच्या निळ्या प्रकाशात एक तास वावर झाला की मिळणारी शारीरिक उत्तेजना सुमारे दोन कप कॉफी प्यायल्यावर मिळणार्‍या उत्तजनेइतकी असते, असे एका अभ्यासात आढळून आले आहे. या पेशींचे संदेश मेंदूतील आणखी एका छोट्याशा केंद्राकडे म्हणजे सुप्रा कियास्मॅटिक केंद्राकडेही (सुकिकेंद्र) पाठवले जातात. सुकिकेंद्र आपल्या शरीरातील सर्व पेशींमध्ये परस्परांशी मेळ घालते. तसेच दिवसाच्या विविध प्रहरांतील बदलांशी शरीर अनुकूल राखते, शरीरांतर्गत घडामोडींचा मेळ घालण्याचेही कार्य करते. 
अशी निरीक्षणे इतर ठिकाणीही आढळून आली आहेत. डच संशोधकांनी 20 लोकांवर प्रयोग केले. लोक किती उजेडात वावरले ते मोजण्यासाठी त्यांच्या शरीरांवर प्रकाशमापक बसवले तसेच त्यांच्या रात्नीच्या झोपेचीही नोंद घेतली. दिवसाच्या उजेडातला वावर जेवढा अधिक तेवढी रात्नी गाढ आणि अखंडित झोप लागते असे या संशोधनात दिसून आले. ‘झोप लागण्यामुळे कोणालाही सकाळी ताजेतवाने वाटते’, असे ग्रोनिंएन विद्यापीठातील संशोधक मरायके गोर्डेन म्हणतात. 
मानवी जीवनात आणि सजीवसृष्टीत सूर्यप्रकाश किती महत्त्वाचा आहे, हेच विविध संशोधनांनी दाखवून दिले आहे. सूर्यप्रकाश हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. मात्र त्यासाठीही लढा उभारण्याची वेळ आज त्याच्यावर आली आहे. 

निळा प्रकाश किती वाईट? 
निळसर प्रकाशात संध्याकाळी वावरल्यामुळे आपल्या शरीरातील नियमितपणे चालू असणार्‍या चक्रांचा ताल बिघडतो आणि आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. न्यू यॉर्कमधील रॅन्स्सेलिअर पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमधील लाइट रिसर्च सेंटरच्या मारियाना फिग्युइरॉ आणि त्यांच्या सहकारी हे तपासण्यासाठी शरीरातील मेलाटोनिनची मोजणी केली. मेलाटोनिन हे संप्रेरक आपल्या झोपेशी निगडित आहे आणि विशेषत: आपल्या शरीरातील जैविक घड्याळाला अनुसरून संध्याकाळी त्याची शरीरातील पातळी वाढते. अनेक अभ्यासांतून असे सुचित झाले आहे की, स्मार्टफोनमधील प्रकाश झोपेमध्ये व्यत्यय आणू शकतो. फिग्युइराँच्या शोधगटाला असे आढळले की, मेलाटोनिनच्या पातळीवर प्रभाव पाडण्याएवढय़ा प्रमाणात निळसर-पांढर्‍या प्रकाशाची निर्मिती टीव्ही, कॉम्प्युटर, लॅपटॉप अधिक करतात. हे प्रमाण एक तासात 85 लक्स एवढे दिसते. तथापि यापेक्षा कमी तीव्रतेचा प्रकाश स्मार्टफोनमुळे दीर्घकाळ डोळ्यावर पडला तर तो मेलाटोनिनचे प्रमाण कमी करू शकतो. सामान्यपणे घरात लावले जाणारे उबदार प्रकाश देणारे बल्ब किंवा प्रखर पांढरा प्रकाश देणारे एलक्ष्डीसारखे उष्ण रंग उत्सर्जित करणारे दिवे मेलाटोनिनची पातळी दडपत नाहीत. दोन मीटर किंवा त्यापेक्षा जास्त अंतरावरून टीव्ही पाहिल्यामुळे मेलाटोनिनची पातळी कमी दडपली जाते. मोबाइलमधील नाइट शिफ्ट मोडमुळे निळसर प्रकाश कमी होतो, तर आयपॅडमुळे मेलाटोनिनवर घातक प्रभाव पडू शकतो. त्यामुळे ‘संध्याकाळनंतर आयपॅड बंद करा’, अशी शिफारस संशोधक करत आहेत.
(उत्तरार्ध)

Vinay.ramaraghunath@gmail.com
(लेखक विज्ञान प्रसारक आणि मराठी विज्ञान परिषदेच्या पुणे शाखेचे क्रियाशील कार्यकर्ते आहेत.)

Web Title: Now fight for sunshine too?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.