अनहद

By admin | Published: January 28, 2017 04:15 PM2017-01-28T16:15:21+5:302017-01-28T16:15:21+5:30

‘निसर्गाच्या सहवासात, माणसांच्या कोलाहलापासून दूर असलेली एकांत जागा.. तिथे फक्त रंग असतील, कॅनव्हास असतील, आवडती गाणी, चित्रं असतील. बास, माझ्या मनातला हा आदर्श स्टुडिओ..’ - अन्वर हुसेन सांगत असतात. - यातल्या बऱ्याचशा गोष्टी इस्लामपूरच्या त्यांच्या स्टुडिओत दिसतात. शिवाय आणखीही बरंच काही..

Non-existent | अनहद

अनहद

Next

- शर्मिला फडके‘निसर्गाच्या सहवासात, माणसांच्या कोलाहलापासून दूर असलेली एकांत जागा.. तिथे फक्त रंग असतील, कॅनव्हास असतील, आवडती गाणी, चित्रं असतील.  बास, माझ्या मनातला हा आदर्श स्टुडिओ..’ - अन्वर हुसेन सांगत असतात.  - यातल्या बऱ्याचशा गोष्टी इस्लामपूरच्या त्यांच्या स्टुडिओत दिसतात.  शिवाय आणखीही बरंच काही.. हिंदी, मराठी, इंग्रजी, उर्दू भाषेतल्या उत्तमोत्तम पुस्तकांची चळत, अरेबियन नाइट्सचे गौरी देशपांडेंनी अनुवादित केलेले खंड,  आशा बगे, मेघना पेठे, गौरी देशपांड, सानिया..  रेखाटनांतली वास्तवता आणि काव्यमयता.. चित्रांमधला अनाग्रही साधेपणा 
आणि हळुवारपणा.. हे सारं वातावरण आपल्यालाही भारून टाकतं..


दोन वर्षापूर्वी नोव्हेंबरमधल्या एका शांत, थंड सकाळी इस्लामपूरला चित्रकार अन्वर हुसेनच्या ‘अनहद’ अशा सुंदर नावाच्या बंगल्यासमोर मी उभी होते. त्या नावाचा अर्थ काय असावा याचा विचार करत.
अन्वर हुसेनची चित्रं फेसबुकवर बराच काळ पाहत होते. त्याच्या चित्रांमधली कधी रोजच्या जगण्यातली सहजता, कधी निळ्या स्वप्नाळू रात्रींमधला रोमॅण्टीसिझम.. चित्र विषयात असलेली समकालीनता, त्याच वेळी गतस्मृतींमध्ये रमण्याची असोशी. रेखाटनांतली वास्तवता आणि काव्यमयता.. आणि या साऱ्या विरोधाभासाला समांतर असणारा त्याच्या चित्रांमधला अनमिस्टेकन असा अनाग्रही साधेपणा आणि हळुवारपणा.. 
‘अनहद’मध्ये अन्वर हुसेनचा स्टुडिओ बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर गच्चीलगत, एकांतात..
तिथे संपूर्ण शांतता. बाकी घरात माणसांची गजबज, येजा.. अन्वरचे आई, वडील, बायको, मुले, भाऊ, वहिनी, त्यांची मुले.. शाळेत जायची गडबड, स्वयंपाकघरातली धांदल, गप्पा.. कुटुंबवत्सल कोलाहल नांदतो आहे आणि त्याच वेळी कलाकाराच्या गरजेची शांतताही. अन्वरच्या चित्रांंमधल्या लोभस विरोधाभासासारखेच हेही.. 
कसे साध्य केले हे?
अन्वर त्याच्या स्वभावाला साजेसं सौम्य हसतो. त्याचं अबोल, काहीसं अंतर्मुख व्यक्तिमत्त्व.. 
ते खुलतं रंगांच्या, स्वरांच्या सहवासात. स्टुडिओत गाण्यांचे सूर सतत पाझरत असतात. 
आपल्या कामाबद्दल बोलताना, स्टुडिओ दाखवताना अन्वर मोकळा होत जातो..
‘स्टुडिओतली ही शांतता, काम करताना मिळणारा हा एकांत अगदी आत्ताचा, हा बंगला बांधला गेल्या पाच-सहा वर्षांत तेव्हापासूनचा. पूर्वी आम्ही इथे जवळच राहायचो. घर लहानसं होतं, त्यातच काम करायचो. तिथे असतानाच चार प्रदर्शनं झाली. जहांगीरचा पहिला शोसुद्धा तिथे केलेल्या कामाचाच झाला. पण जागा खूपच अपुरी पडायला लागली. 
हा बंगला बांधतानाच स्टुडिओ कसा असायला हवा याचा अगदी बारकाईने विचार मी आणि माझ्या वडिलांनी केला. त्यातूनच ही गच्चीलगतची, वरच्या मजल्यावरची जागा स्टुडिओकरता निवडली. एका बाजूला, हवी तशी प्रकाशमान, खुली आणि त्याच वेळी बाहेरच्या कोलाहलापासून अलग, निवांत.’
नुसताच हवा असलेला एकांत ही अन्वरच्या स्टुडिओची खासियत नाही. 
सकाळच्या कोवळ्या उन्हात न्हाणारी टेबलावरची शुभ्र किटली आणि ताज्या पेपरची घडी.. खिडकीखालची आरामखुर्ची, अ‍ॅण्टीक पितळी कर्णा असलेला ग्रामोफोन, घरातल्या भिंती शेल्फमधल्या पुस्तकांच्या रांगांनी भरलेल्या, स्टुडिओतल्या टेबलावर रचलेली पुस्तकं, चहाच्या सरंजामाशेजारी विसावलेली पुस्तकं.. अन्वरच्या भोवताली पसरलेलं हे आयुष्य.. लाइफअराउंड मी.. त्याच्याच एका चित्रमालिकेचं हे नाव. अन्वरच्या चित्रांमध्ये सातत्याने दिसणारं पुस्तकांचं अस्तित्व नेमकं आलं कुठून हे ‘अनहद’मध्ये गेल्यावरच समजू शकतं. फक्त पुस्तकच नाहीत, त्याच्या चित्रांमधल्या कलात्मक अलमाऱ्या.. त्यातली व्हॅन गॉघची प्रिण्ट्स, सूर्यफुलं.. त्याची जुन्या हिंदी गाण्यांची, गझलांची आवड, सिनेमांची आवड, आवडते चित्रकार हे सगळं स्वत:चं स्वतंत्र अस्तित्व या स्टुडिओत वावरतात. या प्रत्येकाकरता स्टुडिओमध्ये स्वत:ची अशी स्वतंत्र स्पेस आहे. 
शब्द, रंग आणि स्वर यांची एक अंगभूत, सहज लय घरभर वेढून आहे. 
अन्वर हुसेनच्या पेंटिंग्जमध्ये त्याच्या खुणा म्हणूनच इतक्या सहजतेनं आणि ठळक उमटलेल्या. त्याने एके ठिकाणी स्वत:च त्याच्या या स्टुडिओचं, स्टुडिओतल्या त्याचं वर्णन केलंय..
स्टुडिओच्या टेबलावर कितीतरी कामाच्या, बिनकामाच्या वस्तूंचा पसारा..
नजर कायमच त्यावरून फिरत असते.
एक दिवस एके ठिकाणी नजर स्थिरावली.
त्यात होता एका स्त्रीचा अर्धा झाकलेला.. की अर्धा दिसणारा चेहरा.
एक पक्षी.. काही अमूर्त आकार.. झाडांसारखं काहीतरी, थोडेसे उदास रंग असलेलं.
मीच मागं एका कथासंग्रहाच्या कव्हरसाठी केलेलं.. फ्रेममध्ये बसवून तिथे ठेवून दिलेलं.
हळूहळू त्याच्या अवतीभवती बऱ्याच वेगवेगळ्या वस्तू.. काही छोटी छोटी चित्रं, जुन्या पेंटिंग्जच्या प्रिण्ट्स साठत गेल्या.
चित्राच्या मागे दोन चित्र दिसतायत.. परवा आउटडोअरला केलेल्या एका रस्त्याचं.
चित्रातल्या रस्त्यानं थोडं अंतर चालून ब्लाइण्ड टर्न घेतलेला..
आकाशाचा तुकडा रंगवलेला एक कॅनव्हासचा कोपरा.. 
वरच्या बाजूला माझ्याच एका जुन्या चित्राची प्रिण्ट.
आतच आत शिरणाऱ्या, नजरेला खोल खोल घेऊन जाणाऱ्या गूढ कमानी..
एक घड्याळ समोर, काही पुस्तकं कवितांची, जीएंचा पत्रसंग्रह आणि ख्वॉब का दर बंद है..
सगळ्यात काहीतरी बंध निर्माण झाल्यासारखं वाटू लागतं. स्त्रीचा चेहरा.. तो ब्लाइण्ड टर्न.. त्या गूढ कमानी, ते मोकळं आकाश..
आणि घड्याळाचा पुढे सरकणारा काटा..
झाकलेल्या चेहऱ्यामागे काय असेल? काय असेल त्या ब्लाइण्ड टर्नच्या पुढे?
काय असेल त्या खोलवर जाणाऱ्या गूढ कमानींच्या अंधारामध्ये?
काय असेल..
घड्याळाच्या काट्यांमधून स्त्रवत येणाऱ्या काळामध्ये?
कदाचित
मोकळं 
आकाश..
चित्रकाराचे समृद्ध व्यक्तिमत्त्व स्टुडिओच्या चार भिंतींमध्ये आणि त्या भिंतींबाहेरच्या अवकाशातही भरून आहे. आणि तेच त्याच्या चित्रांमधेही उमटत आहे. 
चित्रकार, त्याचा स्टुडिओ आणि त्याची चित्रं एकाच व्यक्तिमत्त्वाचे अंश आहेत. अभिन्न आहेत.
नॉस्टॅल्जियाच्या खुणा सन्मानपूर्वक जपलेलं, कला, साहित्य, संगीतमय घर म्हणजे अनहद..
प्रसन्न, मोकळं, शांत, समाधानी. 
घराच्या अंगणात सुंदर फुलझाडं बहरलेली. कलात्मकता, खानदानी सजावट. 
साहिर, शकील, कैफी आझमींची गाणी, पाकिझातला लताचा मधाळ स्वर.. चलो दिलदार चलो.. 
स्टुडिओच्या बाहेर गप्पांची मैफल रंगवायला सुंदर, आरामशीर जागा. 
‘घर बांधतानाच आपल्याला काम करायला स्वतंत्र स्टुडिओची जागा हवीच हे पक्कं होतं. मला काम करताना त्यात कसलाही बाहेरचा डिस्टर्बन्स येऊ नये आणि आपल्या कामाचा घरातल्या इतरांना काही त्रास होऊ नये ही अपेक्षा मनात होती. काम करत असताना आपण एका तंद्रीत असतो, आपला एक मूड असतो. त्यात काम करताना कोणी बघत असेल तर मला ते आवडत नाही. लय गेल्यासारखी वाटते. त्यामुळे स्टुडिओ घरात एका बाजूला असावा हे कटाक्षाने पाहिलं. घरातले सगळेच माझी काम करतानाची प्रायव्हसी जपतात.’
‘या स्टुडिओत मला हवं ते सगळं आहे, मात्र तरीही माझ्या मनातल्या आदर्श स्टुडिओची संकल्पना ही नाही. दूर कुठेतरी निसर्गाच्या सहवासामध्ये, एकांत जागा असावी, आजूबाजूला अजिबातच माणसांचा वावर नको, किंवा अगदी कमी असेल अशी जागा.. मग ती लहानशीही चालेल. अगदी कौलारू दोन खोल्याही. तिथे फक्त रंग असतील, कॅनव्हास असतील, आवडती गाणी असतील, चित्रं असतील बास. अजून काही नको. अशा जागी काम कितपत होईल माहीत नाही, पण जे होईल ते मनासारखं असेल हे नक्की.’ 
- अन्वर हुसेन हे सांगताना मनमोकळं हसतात. 
प्रत्येकाच्या मनात असतोच असा एक स्टुडिओ. 
‘मला फार आवडलेला स्टुडिओ म्हणजे कोल्हापूरचा रवींद्र मिस्त्रींचा. ग्रेट प्रकार आहे तो. क्लासिक पद्धतीने बांधला आहे. असं काहीतरी वेगळं असावं असं वाटायचं. बाकी मी फार कोणाकडे जात नाही. त्यामुळे खूप काही इतरांचे स्टुडिओज पाहिलेले नाहीत. चंद्रमोहन सरांच्या स्टुडिओत बरेचदा जायचो, तिथे छान गप्पा होतात. इथे माझे अनेक चित्रकार मित्र येत असतात. साहित्यिक, कलाकारही येत राहतात.’ 
‘घरात कोणीच चित्रकार नव्हते, पण कला होतीच. 


साहित्याचीही आवड सगळ्यांना आहे. वडील, भाऊ कविता करतात. मीही कधीतरी लिहितो.. चित्रांसंदर्भात लिहितो’ - अन्वर सांगतात.
अन्वरचे वडील मराठी साहित्याचे चांगले जाणकार. त्यांनी सानियांच्या, आनंद यादव यांच्या कथांचे आणि इतरही अनेक कथांचे मराठीतून हिंदीत अनुवाद केले आहेत. जागर साहित्य कला नावाचा त्यांचा एक ग्रुप आहे. लेखक आपल्या भेटीला असा एक कार्यक्रम ते चालवतात. घरात हिंदी, मराठी, इंग्रजी, उर्दू 
भाषेतल्या उत्तमोत्तम पुस्तकांनी भरलेल्या रॅक्स आहेत, अरेबियन नाइट्सचे गौरी देशपांडेंनी अनुवादित केलेले खंड समोर दिसतात. आशा बगे, मेघना पेठे, गौरी देशपांडे, सानियाही असतात. आमच्या कॉमन आवडीच्या कथा खूपच निघतात. आशा बगेंची सेतू, गौरीची थांग.. 
साहित्यिक गोष्टींची झालर गप्पांना लागते. शास्त्रीय संगीताच्या मैफलींच्या बहारदार आठवणी निघतात. त्याकरता केलेल्या प्रवासांच्याही. हंपी, विजयवाडा, गदग.. भीमण्णांचे घर. 
खालच्या मजल्यावर गडबड, वावर चालूच असते. 
अन्वर हुसेन यांचे त्या गडबडीतही कॉम्प्युटरवर डिजिटल प्रयोग चालू असतात, स्केचिंग सुरू राहते. 
मात्र सकाळी अकरानंतर सगळं शांत होतं. अन्वरची स्टुडिओमध्ये कामाला लागण्याची वेळ. चित्रकाराची हक्काची जागा, निवांतपणा जपण्याची आस्था घरातल्या प्रत्येकाला आहे. 
समोरच अन्वरने स्वत: बनवलेलं लाकडी सुंदर नक्षीकाम आणि चौकटी असलेलं पार्टीशन आहे. त्यातल्या चौकटींमध्ये नॉस्टॅल्जियाचे अनेक तुकडे, घरातल्यांच्या आवडीनिवडीच्या खुणा.. 
जुन्या हिंदी सिनेमाची पोस्टर्स, गाणी, गझला, कवितांच्या ओळी, गायकांचे, चित्रकारांचे फोटो, प्रिण्ट्स.. आणि या सगळ्याचा आकर्षणबिंदू असतो देखण्या कॅलिग्राफीतला कबिराचा दोहा. 
इस घट अंदर अनहद गरजें, 
इस में छुटत फुहारा
इस घट अंदर बाग बगीचे, 
इस में सिरजन हारा
इस घट अंदर सात समुंदर, 
इस में नौलख तारा
इस घट अंदर पारस मोती, 
इस में परखन हारा
कहत कबीर सुनो भाई साधो, 
इस में साई हमारा..
’अनहद’चा मला हवा असलेला अर्थ त्यात सामावलेला, आणि अन्वरच्या घराचं, त्याच्या आयुष्याचं तत्त्वज्ञानही. 

‘हे इझल पण यांनीच केलंय’
- नजमा.
अन्वर हुसेन यांची अतिशय गोड, शांत स्वभावाची बायको, अभिमानाने सांगते. फारच देखणं, सोयीचं इझल. ‘आजोबा सुतारकाम करायचे, वडिलांनाही वेगवेगळ्या लाकडी वस्तू बनवायची खूप आवड. ती आवड माझ्यातही उतरली. वडिलांचं वर्कशॉपच होतं सुतारकामाचं. तिथे बघत बघत शिकलो. 
इझल बरीच बघितली. मला हवं तसं मिळेना. तेव्हा हे वेस्टेजमधून बनवलं. कॅनव्हासची स्ट्रेचर्स असतात, त्यातले काही वाकलेले, न वापरलेले वापरून बनवलं. वॉटर कलरकरता यात वेगळी सोय केली आहे. त्याला जो थोडा आडवा अ‍ॅन्गल लागतो तसा यात करता येतो, शिवाय लाइटची सोयही केली आहे.’
‘चित्र नेमकं किती दिवसात पूर्ण होतं हे सांगता यायचं नाही. चित्राची कल्पना डोक्यात येऊन ते कागदावर उतरेपर्यंत अनेकदा बराच वेळ जातो. विषय डोक्यात बराच काळ घोळत राहतो. विजापुरातल्या मशिदीतल्या कमानी पाहताना चित्र समोर दिसायला लागतं आणि मग सतारीचे विलंबित लयीत सामोरे येतात. मी शक्यतो एकावेळी एकाच चित्रावर काम करतो. त्यावरच फोकस. ते पूर्ण झाल्यावर दुसरं.
मनामध्ये एक विषय बनलेला असतो. त्याप्रमाणे चित्रं होत जातात. ठरवून असं नाही पण डोक्यातला विषय पूर्ण बाहेर पडेपर्यंत त्यातच काम होत राहतं. 
स्टुडिओत काम करून कंटाळा आला की बाहेर पडतो, एक दोघे मित्र मिळून. कधी कलाविश्वचे विद्यार्थी असतात सोबत. जिथे वाटेल तिथे बसतो, की काम सुरू. कधी स्केच किंवा वॉटर कलर्स. पंधरा वीस दिवस असे भटकण्यात जातात. हायवे सिरीज त्यातूनच बनली. गावगाडा या पुस्तकाकरता शंभर वर्षांपूर्वीचं गाव, लोक, लोकजीवन, फिरस्ते, भटके, व्यावसायिक अशांची रेखाटने करायची होती, त्या काळातली वेशभूषा, राहणीमान, रीती अशा अनेक गोष्टींचे बारकावे शोधून अभ्यासायचे होते. अशावेळी स्टुडिओबाहेरील अशा सातत्याने केलेल्या भटकंतीचा उपयोग होतो. बाहेर गेल्यावर ताजी ऊर्जा मिळते.’
चित्र बाहेरच्या जगातलं असो की आपल्या अंतर्मनातल्या तळघरातलं.. त्याकरता केलेला विचार महत्त्वाचा. तो स्वत:चा आणि निखळ प्रामाणिक असायला हवा. अन्वरच्या चित्रांमधली समजूत, आस्था, बाहेरच्या, त्याच्या भोवतालच्या जगाबद्दल असलेली संवेदनशीलता कॅनव्हासवर अलगद उतरते.
‘इस्लामपुरात चित्रकलेचं वातावरण नाही. शहरात क्वचित कोणी प्रदर्शनं भरवतात. पण सातत्य नाही. चित्रांच्या नकला विकण्याचे, विकत घेण्याचे प्रमाण वाढते आहे, मात्र ओरिजिनल चित्रं विकली जाण्याचं प्रमाण फारच नगण्य. माणूस गेला की त्याचं पोर्ट्रेट बनवण्याइतपतच चित्रकलेचं महत्त्व. पण या गोष्टी असतातच. आपण आपल्या आनंदाकरता चित्रं काढत राहणं मी महत्वाचं मानतो.’ 
अन्वर हुसेनच्या बोलण्यातली खंत, किंचित कडवटपणा लपत नाही. गेली पंधरा वर्षं अन्वर हुसेन मुंबई-पुण्याच्या शहरी गजबजाटापासून दूर, इस्लामपुरात शांतपणे, आपल्याला हवी ती आणि तशीच चित्रं काढत आहे. 
कमीत कमी आणि ताकदवान रेषांमध्ये जिवंत होणारं व्यक्तिचित्रं ही अन्वरची खासियत.. मग ते ओम पुरीचं असो किंवा गालिबचं.. 
पुरातन हवेलीच्या अंगणात चांदणं लगडल्यासारखं दिसणारं रात्रीच्या अंधारातलं चाफ्याचं झाड असतं, झाडाखाली अंथरलेल्या सतरंजीवरचा गाण्यांचे सूर हवेत पसरवणारा ग्रामोफोनचा अंधारात उजळलेला पितळी चमकदार कर्णा..
अन्वर हुसेन यांची मनस्वी, काव्यमय रेषा दीर्घकाळ नजरेसमोरून हलत नाही.
त्यांनी केलेली पुस्तकांची मुखपृष्ठंही देखणी, आपला वेगळेपणाचा ठसा जपणारी.
कृष्णधवल, गजबजलेली पण नितांत सुंदर ’मुंबई डायरी..’, ‘हायवेपलीकडच्या गावात’ दिसलेली चहाची टपरी, कट्ट्यावरच्या गप्पा.. 
अन्वरच्या चित्रांमधला रिअ‍ॅलिझम घटना, वेळ, ते जग डॉक्युमेण्ट करणारा आहे. वास्तवतेच्या अखंड प्रवाहाच्या काठावरून तो निवांत विहरत आहे. तो विषयात गुंतून पडत नाही. चित्रं फक्त विकण्याकरताच काढली जातात असा समज झालेल्या आजच्या युगात अन्वरसारखा चित्रकार विरळा.
’अनहद’चा निरोप घेताना अन्वरने त्याच्या फेसबुक पेजवर लिहिलेल्या ओळी मला आठवतात..
2016 का आखरी चित्र इजल पे है...
ये रंग ओ लकीरों का सफर 
यूं ही जारी रहेगा ताउम्र...
मंजिल मिले ना मिले, 
बेशक, सफर जो जारी है, 
सुकून भरा है...
रास्ता जो तय किया है अब तक, 
कर्इं मकामों से होकर गुजरा... 
और अब ये रास्ता उस रास्ते से 
आ कर मिला है 
जो पल पल जिंदगीकी असल कहानियोंसे 
रु बरू होता रहता है ...
इनही रास्तों से कुछ कहानियां 
जिनको मैं अपने कॅनवास पे लिये 
जल्द ही आप के सामने आ रहा हूँ...
फिर एक बार उसी गैलरी कि दिवारों पे, 
जो बेहद करीब है मेरे दिल के..

(लेखिका ख्यातनाम कलासमीक्षक आहेत.)

sharmilaphadke@gmail.com 

Web Title: Non-existent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app