निर्मला : कुस्करलेली कळी

By Admin | Updated: September 13, 2014 14:48 IST2014-09-13T14:48:58+5:302014-09-13T14:48:58+5:30

कोवळ्या वयात निर्मलाच्या बाबतीत जे काही घडलं, त्यात तिची खरंच काय चूक होती? तरीदेखील ‘महापाप’ केल्याची बोचणी तिलाच होती. ती खंत तिचे अवघे आयुष्य व्यापून उरली होती. समाजात अशा निर्मला कमी आहेत का? त्यांचं आयुष्य सावरायचं असेल, तर बिघडत चाललेलं समाजमन मुळातून बदलायला नको का? काय करता येईल त्यासाठी..?

Nirmala: Mistaken bud | निर्मला : कुस्करलेली कळी

निर्मला : कुस्करलेली कळी

 डॉ. संप्रसाद विनोद

 
निर्मलाच्या बालपणी घडलेल्या घटनेचा परिणाम तिच्या मनावर किती खोलवर झाला होता, हे आपण पाहिले. या प्रसंगामुळे तिच्या मनात पुरुषांविषयीच एक अढी निर्माण झाली होती. लग्नानंतर आपण नामदेववरही अन्याय करतोय अशी तिची तीव्र भावना झाली. गणपतभाऊंच्या गैरवर्तनात या समस्येचं मूळ दडलेलं आहे, हे तिच्या पूर्णपणे लक्षात आलं नव्हतं. आपल्या बाबतीत काहीतरी भयंकर घडलंय, एवढंच तिला माहीत होतं. त्याबाबत ती कोणाशी काहीच बोलली नव्हती-अगदी जन्मदात्या आईशीही. 
या गोष्टीचं मला खूप आश्‍चर्य वाटलं. सगळे ताण, दु:खं, यातना बिचारी एकटीच सहन करत राहिली. कोवळ्या वयात ते अवघडच होतं. पण, आपल्यामुळे आईला आणि घरच्यांना त्रास होऊ नये यासाठी निर्मलानं हे शिवधनुष्य पेललं. अशा परिस्थितीत सामान्य नवर्‍याने पत्नीला मारहाण करून तिला माहेरी हाकलून दिलं असतं; पण नामदेवने असं केलं नाही. तो तिच्या पाठीशी उभा राहिला. लग्नाच्या वेळी घेतलेल्या ‘सर्व प्रसंगांमधे एकमेकांना साह्य करू’ या शपथेला तो इमानेइतबारे जागला. म्हणूनच, मला तो खूप वेगळा वाटला. त्याचं कौतुक वाटलं. समजदार असल्यामुळे नामदेव तिला समुपदेशक आणि मानसोपचारतज्ज्ञांकडे घेऊन गेला. पण, निर्मला त्यांच्यापुढेही मोकळी झाली नाही. त्यामुळे, त्याचा फारसा उपयोग झाला नाही. शेवटचा उपाय म्हणून ती दोघं माझ्याकडे आली. 
प्राथमिक बोलणं झाल्यावर निर्मला नियमितपणे योगसाधनेसाठी येऊ लागली. नामदेव त्याच्या कामाच्या व्यापामुळे येऊ शकला नाही. निर्मला हळूहळू ‘अभिजात योगसाधनेमध्ये’ रूळू लागली. रमू लागली. साधनेच्या निमित्ताने आमचं अनौपचारिक बोलणं सुरू राहिलं. बोलण्याच्या ओघात एकदा ती तिच्यावर गुदरलेल्या भयानक प्रसंगाविषयी माझ्याशी थोडंसं बोलून गेली. मग, हळूहळू सगळा तपशील तिने मला सांगितला. हे सगळं सांगताना आपण केलेल्या ‘महापापा’ची आपण ‘कबुली’ देतोय अशी तिची भावना असल्याचं मला जाणवलं. त्यामुळे निर्माण झालेल्या अपराधीपणाचं ओझं असल्याने ती मधूनमधून रडत राहिली. ते स्वाभाविकही होतं. काही वेळा तिचं ते बांध फुटून रडणं आणि हुंदके देणं इतकं वाढायचं, की तिला बोलणंदेखील अशक्य व्हायचं. दु:खाचा आवेग ओसरला, की परत बोलणं सुरू व्हायचं. तिच्याबरोबर ज्या दोन-चार प्रदीर्घ भेटी झाल्या, त्या वेळी कमी-अधिक प्रमाणात असंच होत राहिलं. या प्रसंगाविषयी प्रथमच ती कोणाशी तरी बोलल्याचं आणि तिच्या डोक्यावरचं वर्षानुवर्षांचं, मणामणाचं ओझं उतरल्याचं तिने मला सांगितलं. 
नंतर तिला हे नीट समजावून सांगावं लागलं, की घडलेली घटना ही अतिशय क्लेशकारक असली तरी तिचं अजाण वय पाहता त्या घटनेला ती नक्कीच जबाबदार नव्हती. त्यामुळे, तिने कोणत्याही परिस्थितीत स्वत:ला अपराधी समजू नये. जे घडलंय ते फार मनाला लावून घेऊ नये. त्या प्रसंगाला फार महत्त्वही देऊ नये. निरागस वयात अज्ञानापोटी घडलेल्या घटनेबद्दल तिने स्वत:ला अपराधी तर अजिबात समजू नये. निर्मलाने हे सगळं खूप चांगल्या प्रकारे समजून घेतलं. नियमित योगसाधनाही चालू ठेवली. तिच्याशी  आणि नामदेवशी माझं वेळोवेळी बोलणं व्हायचं. हळूहळू दोघांचं वैवाहिक जीवन सुरळीत होत गेलं. वैवाहिक संबंधातल्या अडचणी दूर झाल्या. तिला योगविद्येच्या परिणामकारकतेची स्वानुभवाने खात्री पटली. निर्मलातले बदल पाहून नामदेव प्रभावित झाला आणि तोही योगसाधनेकडे वळला. 
या कथेमधील निर्मला ही एक बाधित, पीडित महिला आहे; पण ती केवळ निमित्त आहे. निर्मलासारख्या अनेक किशोरवयीन मुलींवर असे अत्याचार होत असल्याचं आपण नेहमी ऐकतो, वाचतो. पूर्वीदेखील अशा घटना घडत होत्या; पण त्या तेवढय़ा प्रभावीपणे लोकांपयर्ंत पोहोचत नव्हत्या. आता प्रसार-माध्यमांमुळे अशा घटनांना लगेच प्रसिद्धी मिळते. म्हणून, या संदर्भात अधिक व्यापक आणि सखोल विचार व्हायला हवा. निर्मलाचं अल्लड वय लक्षात घेतलं तर तिला या कृत्यासाठी नक्कीच जबाबदार धरून चालणार नाही हे उघड आहे. पण, तरीही ती इतकी वर्षे स्वत:ला जबाबदार का धरत होती? आपल्याकडे स्त्री-योनीच्या पावित्र्याला प्रमाणाबाहेर महत्त्व दिलं जात असल्यामुळे असं झालं असेल का? त्यामुळे, योनीचं ‘पावित्र्य’ भंग पावलं की स्त्रीला ते ‘महापाप’ वाटतं!! बर्‍याच वेळा समाजही अशा स्त्रीकडे कौमार्य घालवलेली पापिणी म्हणून पाहतो. त्यामुळे, अशी बाधित स्त्री प्रचंड धास्तावते आणि अशा प्रसंगाविषयी पूर्ण गोपनीयता बाळगते. जशी निर्मलाने बाळगली. लोकापवादाच्या भयामुळे अशी बहुसंख्य प्रकरणे कायम गोपनीयच राहतात. लोकांपुढे ती कधी फारशी येतच नाहीत. पण, म्हणून काही अशा घटना घडायच्या थांबतही नाहीत. शिवाय, गोपनीयता हा काही या प्रश्नावरील ‘दीर्घकालीन’ उपाय म्हणता येणार नाही. गणपतभाऊंना देखील स्त्रीलंपट, कामांध, म्हातारचळ लागलेला नराधम असं संबोधून, त्यांचा धिक्कार करून, मारहाण करून, तुरुंगात डांबून, चौकात उघडं करून, फटके मारून फारसं काही साधेल असं वाटत नाही. त्यामुळे, फार तर प्रसारमाध्यमांना चर्वितचर्वण करायला आणखी एक गरमागरम विषय मिळेल इतकंच! वाचक-प्रेक्षकांनाही तावातावाने त्यावर बोलायची, दुसर्‍याच्या चारित्र्याचे धिंडवडे काढून आपल्या पावित्र्याचं उदात्तीकरण करायची संधी मिळेल. पण, काही काळानंतर त्या विषयाचं बातमी मूल्य कमी झालं, की प्रसारमाध्यमं दुसर्‍या एखाद्या चमचमीत विषयाकडे वळतील. निर्मलासारख्या बाधित महिलेला कुलटा, बाहेरख्याली म्हणून संबोधून, तिचा धिक्कार करूनदेखील फारसं काही साधणार नाही. निष्कारण, तिचं सगळं आयुष्य फक्त उद्ध्वस्त होईल. मग यावर दीर्घकालीन उपाय काय असू शकतो? पालकांनी लहान वयाच्या मुलामुलींना कधी कोणाबरोबर कोणाकडे पाठवायचं थांबवणं किंवा कोणी अशी मदत देऊ केली तर त्याच्या हेतूंविषयी नेहमी संशयी दृष्टीने पाहायचं हे देखील त्यावरचं उत्तर वाटत नाही. गणपतभाऊंना या वयात असं कृत्य करावंसं का वाटलं, याचादेखील मुळातून शोध घ्यायला हवा. हल्ली दूरचित्रवाणी, जाहिराती, चित्रपटांमधून सतत कामवासना चाळवणार्‍या साहित्याचा, उत्तान चित्रपटांचा, दूरचित्रवाहिन्यांवरील बाजारू मालिकांचा जनमानसावर जो भडिमार होतोय, त्याचा हा परिणाम आहे असं वाटतं. हे सगळं चालू ठेवण्यात अनेकांचे हितसंबंध गुंतलेले असल्याने त्यात बदल घडवून आणण्यासाठी प्रचंड राजकीय इच्छाशक्ती आणि समाजप्रबोधनाची गरज आहे. ते होईल तेव्हा होईल. पण, तोपर्यंत व्यक्तिगत पातळीवर योगाच्या साह्याने बरंच काही साध्य करता येईल. 
‘ध्यानमय योगसाधना’ करून तरुणांमधे        स्व-स्थ-ता आणता येईल. त्यामुळे, ते आपल्या ठिकाणी स्थिर होतील. स्थिरतेमुळे त्यांना शांती, समाधान, आनंद मिळेल. आनंदामुळे बाह्य जगाकडे आणि जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन मुळातून बदलून जाईल. दृष्टी बदलली, की बाहेरच्या गोष्टींविषयीचं अतिरेकी आकर्षण कमी होईल. व्यापक जीवनस्पश्री मानसिकता निर्माण होईल. अशी मानसिकता गणपतभाऊंसारख्या व्यक्तींमध्ये आंतरिक परिवर्तन घडवून आणेल. असं परिवर्तन झालं, की गैर काही करण्याची प्रवृत्तीच निर्माण होणार नाही. हे सगळं अर्थात मोठय़ा प्रमाणावर लगेच होणार नाही. ते करणं सोपंही असणार नाही. पण, या समस्येवरील हा एक अत्यंत मूलभूत स्वरूपाचा उपाय आहे हे निश्‍चित. या बाबतीत जनजागृती आणि समाजप्रबोधन केलं तर त्याचे परिणाम खूप दूरगामी स्वरूपाचे होतील, यात काहीच शंका नाही.
  (लेखक हे महर्षी न्यायरत्न विनोद यांचा विशुद्ध अध्यात्माचा आणि अभिजात योगसाधनेचा वारसा चालविणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे योगगुरूआणि योगोपचारतज्ज्ञ आहेत.)

Web Title: Nirmala: Mistaken bud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.