फ्लड लाईट्सच्या कृत्रिम उजेडातली एक जागी रात्र

By Admin | Updated: September 5, 2015 14:52 IST2015-09-05T14:52:14+5:302015-09-05T14:52:33+5:30

शाही पर्वणीची केवढी चर्चा झाली. सगळा शाहीच मामला तो. साधू-महंत राजेरजवाडय़ांच्या रुबाबात वाजतगाजत सजल्यासवरल्या रथांतून शाहीस्नानांना निघतात.

Night at a place in the light of the lights of the floodlights | फ्लड लाईट्सच्या कृत्रिम उजेडातली एक जागी रात्र

फ्लड लाईट्सच्या कृत्रिम उजेडातली एक जागी रात्र

>- मेघना ढोके
 
शाही पर्वणीची केवढी चर्चा झाली. सगळा शाहीच मामला तो. साधू-महंत राजेरजवाडय़ांच्या रुबाबात वाजतगाजत सजल्यासवरल्या रथांतून शाहीस्नानांना निघतात.
प्रशासनच नव्हे तर मंत्रीसंत्रीही त्यांच्या स्वागताला आपल्या असल्यानसल्या विनयाच्या पायघडय़ा घालत नव:या मुलीच्या पित्याच्या काळजानं हात जोडून उभे राहतात.
डुबक्या मारून सारे साधू आपापल्या आखाडय़ात सुखनैव परतले की सुटकेचा नि:श्वास टाकून मनावरचं टेन्शनचं ओझं पुढच्या पर्वणीर्पयत गोदेकाठी उतरवून ठेवतात.
तसं हे सारं काही नवं नाही. कुंभ दर कुंभ हेच घडतं. यंदा फरक एवढाच की, टीव्हीवरच्या लाइव्ह डुबकी कव्हरेजमुळे पहिल्या प्रहरी ज्यानंत्यानं आपापल्या घरात बसून हा सारा शाही थाटमाट पाहिला!
पण शाहीस्नानाच्या पहाटेचं तांबडं ज्या अंधा:या रात्रीतून फुटतं ती रात्र कशी असते? त्या रात्रीचं साधुग्राम कसं असतं? 
हे पाहायचं म्हणून पर्वणीच्या आदल्या रात्रीच त्र्यंबकेश्वर गाठलं. डोंगराच्या पोटातलं छोटुंसं त्र्यंबकेश्वर. एका बाजूला उंच ब्रrागिरी, त्याच्या डोक्यावर काळ्या गच्च ढगांनी धरलेलं छत्र आणि त्याच ब्रrागिरीच्या पोटात उगम पावलेली गोदावरी. विलक्षण सुंदर, शांत आणि प्रसन्न ब्रrागिरी मागं सोडून हीच गोदावरी आधी त्र्यंबकेश्वरी कुशावर्तात आणि पुढे नाशकात रामकुंडात माणसांची पापं धुवून देते! 
त्र्यंबकच्या साधुग्रामात उभं राहिलं तर समोर उभा ब्रrागिरी दिसतो. साधुग्रामातच नव्हे तर त्र्यंबकनगरीतच चाललेला उत्सवी, गोंगाटी सोहळा पाहून न पाहिल्यासारखं केल्यासारखा तटस्थ भासतो.
दुपारीच त्र्यंबकचं साधुग्राम गाठलं. नाशिकच्या साधुग्रामच्या तुलनेत तसं गरीबच! त्र्यंबकला दहा आखाडय़ांची आपापली मोठी स्थानं आहेत, त्यामुळे गावाबाहेरच्या साधुग्रामात राहणा:या खालशात अनिच्छेनेच ‘छावणी’ लावणारे तुलनेनं जास्त! पथारी लावून पडलेले साधू, बाजूला देवघरं, त्यांना लागून जरा आडोसा केलेले मुख्य महंताचे कोपरे, एखादी बाजबिज. त्यात महंताचा मोबाइल सारखा वाजतो. जिथून खालसा निघाला तिकडचे शहराच्या जवळपास येऊन ठेपलेले लोक सारखा फोन करतात. बाबाजी मात्र कळवळून सांगतात, ‘अगली पर्वणी आना, इस बार अब पास नहीं मिलेगा, अब नहीं कर सकते व्यवस्था!’
खालशात बख्खळ जागा रिकामी पडलेली असताना हे साधू भाविकांना ‘नका येऊ आता’ असं सांगत घायकुतीला का आलेत हे कळत नाही.
तिथून चालत निघावं त्र्यंबकच्या दिशेनं तर ठायीठायी बॅरिकेडिंग. पोलिसांचे ताफे. त्यात पाऊस. थोडीबहुत लोकांची गर्दी. पण गर्दीचे जे अंदाज वर्तवले जात होते त्या तुलनेत ती कमीच भासते.
चालत चालत पंच दशनाम आवाहन आखाडय़ाच्या मुख्य स्थानार्पयत पोहचलो. आखाडा समोर दिसत असताना रस्त्याच्या बाजूला छोटय़ाशा राहुटय़ा लावून, धुनी पेटवून, अंगाला राख फासून बसलेले काही पूर्ण नगA साधू दिसतात. त्यांच्यासमोर शिवजी-हनुमानजींचे फोटो. काही चिलीम ओढण्यात दंग. रस्त्यावरच्या बघ्यांच्या गर्दीपैकी काहींना ते ‘या या’ म्हणतात, नमस्कार केला तर स्वत:हून राखेचा अंगारा लावतात. मग पैसे टाका म्हणतात. श्रद्धेनं आलेले काही लोक गंमत पाहून पाचदहा रुपये टाकून चालू लागतात. काही साधूंना मात्र त्यांच्या राहुटय़ांसमोर महिलांनी उभं राहिलेलंही चालत नाही. ते लगेच आरडाओरडा करत संताप करायला लागतात. आपल्याला प्रश्न पडतो की, इतका त्रस होतो तर मग असे भर रस्त्यात राहुटय़ा लावून नगA का बसतात?
पण तो प्रश्न तसाच मुठीच गच्चं धरून ठेवावा लागतो. विचारणार कुणाला? पंच दशनाम आखाडय़ाकडे गेलं तर त्या आखाडय़ाच्या दाराभोवतीच साधूंची तुंबळ गर्दी. पोलीस बंदोबस्त. बंदोबस्ताला पुरुष कर्मचा:यांसह महिला कर्मचारीही उभ्या. त्याच भाविक महिलांना अडवतात, आत जाऊ नका सांगतात. महिलांना आखाडय़ात जायला बंदी आहे, अशी पाटीच मुख्य द्वाराच्या बाजूला लटकताना दिसते. महिला पोलीसही त्याकडे बोट दाखवून महिलांना बाजूला करतात. वाद घातला तर एक म्हणते, ‘आता आहे ना त्यांची तशी परंपरा, मग आपण पाळायला पाहिजे, व्हा बाजूला!’
दुसरी मात्र म्हणते, ‘बंदोबस्ताला आम्हाला उभं करतात आणि आत जाऊ देत नाही, हे चूकच आहे.!’ -तिचा संताप, चिडचिड, तिच्या चेह:यावर स्पष्ट दिसते.
गंमत वाटते, कर्तव्य बजवायला उभ्या दोघी, पण दृष्टी मात्र दोघींची वेगळी!
भर पावसात असे डय़ूटीवर हजर किती पोलीस चेहरे त्या गर्दीत भेटतात. साधूंची लगबग, त्यांची कर्मकांडं, त्यांचे संतापी आग्रह सारे आपल्या लेव्हलवर हाताळत गर्दीचं नियोजन करतात.
पाऊस जोरात आला म्हणून एका दुकानाच्या आडोशाला जाऊन उभं राहिलो. समोर कौलावरून पडणा:या पागोळ्या, त्याआड अंग चोरून उभं राहणा:या गर्दीत एक बंदोबस्तावरचा पोलीसही भेटतो. कोण? कुठून? पहिला कुंभ का? अशी प्रश्नोत्तरं झाली तर त्या मराठवाडय़ाकडून आलेल्या उत्साही तरुण पोलिसानं आनंदानं सांगितलं, आता पुढचा महिना- दीड महिना इथंच आहे. लोकं किती कष्टानं येतात इथं, आणि आम्हाला तर सरकारनं स्वत:हून पाठवलंय. मजा येतेय हे काम करण्यात.
एरवी चोरउचक्के, खुनी-दरोडेखोर यांच्या मागे धावणारे, राजकारण्यांच्या दिमतीला उभे राहणारे तरुण पोलीस, त्यांच्यापैकी अनेकांसाठी ही पर्वणी एक वेगळाच अनुभव होती. म्हणून मग बहुसंख्य तरुण पोलिसी चेहरे अंधा:या रात्रीही उत्साहानं बंदोबस्ताचा ङोंडा सांभाळत होते.
रात्रीचे जेमतेम दहाच वाजलेले असतील. कुशावर्ताच्या दिशेनं जाणा:या आणि तिकडून परतणा:या शाही मिरवणूक मार्गाच्या दोन्ही बाजूला बॅरिकेडिंग. त्या बॅरिकेडिंगपलीकडे, रस्त्यावर, फुटपाथवर, घरांच्या ओटय़ावर, दुकानांच्या पाय:यांवरच अनेक आयाबायांनी, बाप्यामाणसांनी लेकराबाळांसह एकेका चादरीसह पथा:या लावलेल्या दिसतात. काही पाय पोटाशी धरून, पावसाला आडोसा धरून बसलेले.
मिरवणूक पहाटे 3.15 ला निघणार असते. पण ती पाहायची म्हणून रस्त्याच्या दुतर्फा चांगली जागा पटकावून बसणा:यांची गर्दीच जास्त.
रस्त्याच्या बाजूला उभ्या दुमजली, 
 
तिमजली घरांच्या खिडक्या उघडय़ाच. जुन्या पद्धतीची अंधा:या जिन्यांची चाळीसच्या बल्बच्या प्रकाशात उजळलेल्या पाय:यांची घरं, तिथं खच्चून गर्दी. नातेवाईक तर असतातच, पण शाही मिरवणुका पाहायला आणि कुशावर्तात डुबकी मारायला आलेल्या गावोगावच्या माणसांची तिथं ‘पेड’ सोय झालेली असते. एका रात्रीसाठी रूमचे भाव चढे, खरंतर रूमचे नाहीच तर मोकळ्या गॅलरीचे आणि उघडय़ा खिडकीचे! हजार रुपयांपासून साताठ हजार रुपयांपर्यंत जेवणाखाण्याच्या, एसी-पंख्यांच्या सुविधांर्पयत घरमालक आलेल्यांना रात्रभरासाठी जागा भाडय़ानं देतात. एका रात्रीत अनेकांचे त्यादिवशी दहाबारा हजार रुपये सुटले, त्यांना खरी पर्वणी गाठता आली. पुढच्या पर्वणीत आणखी भाव वाढतील असं घरमालकांनी पुन्हा पुन्हा सांगितल्यानं आणि मिरवणूक पाहण्यापासून फोटोशूट करण्यार्पयत मोक्याच्या खिडकीची किंमत कळाल्यानंही आलेल्या भाविकांनी पुढच्या पर्वणीसाठी येणा:या नातेवाइकांचंही बुकिंग लगेहात करून टाकलं!
पुढच्या पर्वणीसाठीही त्या खिडक्या, गॅल:या पुन्हा बुक झाल्या.
त्या रात्री अख्ख्या त्र्यंबकेश्वर गावात कुणी झोपलंच नाही.. सगळीकडे उजळलेले दिवे, रस्त्यावरचे फ्लड लाईट्स, कुशावर्तातून होणा:या अनाऊन्समेण्ट, मीडियावाल्यांची लगबग, नसलेल्या गर्दीत त्यांचे गर्दी जमवून चाललेले लाइव्ह बाइट्स. कुशावर्ताच्या अवतीभोवतीची साफसफाई, ऐन दुष्काळात पुन्हा पुन्हा चाललेला रस्ते धुण्याचा कार्यक्रम हे सारं मध्यरात्र टळून गेली तरी चाललेलंच होतं.
बंदोबस्तावरचे पोलीस, त्यांचे साहेब, त्या साहेबांचे साहेब सगळे चोख गस्तीवर.
मधूनच पोलिसांसह साधूंची एखादी गाडी येते आणि तयारीचा आढावा घेऊन आली तशी निघून जाते.
तिकडे आखाडय़ात साधूंची स्नानं, पूजा, धार्मिक विधी, अंगाला राख फासण्याचे, फुलांच्या माळा घालण्याचे, जटा मोकळ्या सोडण्याचे, बांधण्याचे सगळे पारंपरिक विधी होऊन पहाटे मिरवणुका निघाल्या. साधू पूर्वी उंट-घोडे-हत्ती आणत. पण आता प्रशासनानं परवानगी नाकारल्यानं ट्रॅक्टर, टेम्पो सजवून, रथ आणून त्यावर मिरवणुका निघाल्या.
हर हर महादेव, बम बम भोलेच्या गजरात आखाडय़ामागून आखाडे पहाटे साडेतीनच्या सुमारात कुशावर्ताजवळ येऊ लागले. लोकांची दुतर्फा गर्दी, धरलेल्या जागा फळल्या होत्या. पण मिरवणूक तशी सुस्त, शांत होती. मात्र त्या मिरवणुकीत साधूंपेक्षा खालसावाल्या भीडचीच गर्दी जास्त. संसारी जनताच अधिक. साधूंबरोबर शाही डुबकी मारण्याचा ‘पास’ त्यांनाही मिळाला होता. तो आखाडय़ांनीच दिलेला. यंदा तर त्र्यंबकेश्वराचे पुरोहितही अग्नी आखाडय़ाच्या पासवर सोवळं नेसून मिरवणुकीत सहभागी झाले. गर्दी नुस्ती. ठेलाठेल. साधूंपेक्षा संसारींनीच तिथं गर्दी जास्त केली. ती गर्दी होणार हे जाणूनच ते साधुग्रामातले बाबाजी घायकुतीला आले असावेत, हे तेव्हा कळतं!
आणि मग कुशावर्तात डुबकी मारून माणसं परतीच्या वाटेनं निघू लागली. काही प्रचंड आनंदलेली. झपाटलेलीच. काही नागा साधू तर अत्यानंदानं आत्यंतिक वेगानं त्र्यंबकराजाच्या मंदिराकडे पळत सुटले. त्यांच्या मागे काही संसारी. आनंदलेले. ओलेते. पहाटेच्या अंधारात मग ही उत्साही, आनंदी पळापळ बराच काळ सुरू राहिली.
त्या गर्दीत एक आजीआजोबा दिसले. सत्तरीच्या तोंडावरचे. कुठून कसा त्यांनी साधूंबरोबर डुबकी मारण्याचा चान्स मिळवला. आणि मग दोघंही ओलेते, एकमेकांचे हात गच्च धरून मंदिराकडे निघाले.
त्यांचे ते कृतार्थ चेहरे अजून आठवतात. जशी जन्मभराची इच्छा पूर्ण झाल्यासारखे. आनंदी. शांत. सा:या साधूंच्या विरक्त गर्दीत ते दोनच चेहरे ख:या अर्थानं निवृत्त, विरक्त भासत होते.
आणि आयुष्यात पहिल्यांदा हजारोंच्या गर्दीत, दोघं एकमेकांचा हात धरून चालतही होते. ओल्या अंगानं!
मात्र ज्यांना अशी संधी मिळाली नाही त्या माणसांची तगमग पाहवत नव्हती. दुस:या घाटांवर अंघोळीला जा, दुपारी बारानंतर कुशावर्त जनतेला खुलं होईल हे त्यांना पटत नव्हतं. आखाडय़ांबरोबरची सामान्य जनता जाते मग आपण का नाही, आपल्याला का कुशावर्तावर जाता येत नाही या भावनेपोटी ते तडफडत पोलिसांशी भांडत होते.
देवाच्या दारातला हा भेदाभेद त्यांना छळत होताच.
असे किती किस्से, किती कहाण्या. किती आनंद आणि किती औदासिन्य आणि किती हताशा त्या रात्रीनं सकाळ होता होता अनुभवल्या.
पापं धुतली गेली की नाही माहिती नाही.
पण फ्लड लाईट्सच्या कृत्रिम प्रकाशात ‘उजेड’ झालेली ती टक्क जागी रात्र ख:या प्रकाशाच्या शोधात आधी पहाट आणि नंतर टळटळत्या भाजून काढणा:या उन्हाची सकाळ-दुपार झाली.
त्यात कुणी काय कमावलं? 
.याचे हिशेब कुणी लावावेत आणि कसे.?
 
खाकी आखाडय़ाची 
पोलीस पर्वणी
एक आजीबाई. सत्तरीच्या. आखाडय़ातली जन्ता साधूंबरोबर स्नान करते आणि आपल्याला पोलीस जाऊ देत नाही यामुळं संतापल्या.
त्या कुशावर्ताकडे मुसंडी मारायच्या.
महिला पोलीस दोघी-तिघी मिळून त्यांना टांगाटोळी करून मागे पाठवायच्या, पुन्हा आजी दोन पाच मिण्टांनी हजर.
असे कितीतरी लोक, पोलिसांशी हुज्जत घालणारे. जाऊ द्या म्हणणारे.
आणि बंदोबस्तावरचे तरुण पोलीस कधी हात जोडून, कधी रागावून, कधी शिट्टय़ा फुंकून, कधी दमदाटी करून मागे पाठवत.
ज्यांनी नियोजन केलं, ज्यांनी आखाडय़ांना संसारी लोकांना आपल्या मिरवणुकीत सहभागी करून घेण्याची परवानगी दिली ते नामानिराळे दूर राहिले आणि ‘डेस्परेट’ झालेल्या गर्दीच्या तोंडी या तरुण पोलिसांना उभं केलं.
परिणाम म्हणून हे पोलीस भर पावसात घामानं निथळत ती गर्दी हटवत, रोखत होते.
त्या गर्दीतला एक पोलीस, हवालदारच असावा.
तो एका आजोबांना म्हणत होता, ‘बाबा गाडी कधीची आहे? संध्याकाळी ना? मग नंतर या, मी पण येईन तुमच्या सोबत. पण आता मागे व्हा.’
या पोलिसांचं प्रसंगावधान, गर्दी सांभाळण्याचं स्कील, त्यांनी काढलेली माणसांची समजूत, एका रोपच्या मदतीनं फिरवलेली कुशावर्तासमोरची गर्दी.
हे सारं त्या कुंभाहून जास्त चित्तथरारक होतं.
पोलिसांच्या जांबाज हिमतीची कमाल करणारं.
फळाची अपेक्षा न करता काम कसं करतात, हे खरं तर साधूंनीही पाहावं अशी ती पोलीस पर्वणी होती हे नक्की.
पण दुर्दैवानं ते काही न्यूज चॅनलच्या लाइव्ह कॅमे:यांनी टिपलं नाही.
 
(लेखिका ‘लोकमत’मध्ये मुख्य उपसंपादक आहेत)
meghana.dhoke@lokmat.com
 

Web Title: Night at a place in the light of the lights of the floodlights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.