गरज चित्रपट रसास्वादाची
By Admin | Updated: August 16, 2014 22:43 IST2014-08-16T22:43:43+5:302014-08-16T22:43:43+5:30
चित्रपटांवर शेरेबाजी करत सुटणं, हा झाला एक भाग आणि चित्रपटांचा आस्वाद घेऊन त्यातून स्वत:ला सुजाण, चांगला प्रेक्षक म्हणून घडवणं ही झाली दुसरी बाजू. आपल्याला नक्की कोणत्या बाजूला राहावंसं वाटतं?

गरज चित्रपट रसास्वादाची
>- गणेश मतकरी
आपल्याकडे आस्वाद या गोष्टीला तशीही फार कमी किंमत आहे, मग तो चित्रपटांचाच असं नाही. माङया मते, आपल्याला साहित्य, कला या सर्वच प्रांतांत महत्त्व वाटतं ते समजून घेण्यापेक्षा मत देण्याला. चित्रपटात ते जरा जास्त प्रमाणात आहे इतकंच आणि एका परीनं ते साहजिकच आहे.
घरात पहिल्यापासूनच आपल्याला शिकवणी मिळते, की चित्रपट करमणुकीसाठी आहे. चित्रपट ही कला असली तरी त्यातल्या ख:या ‘मास्टर्स’च्या कलाकृती आपल्यार्पयत पोहोचत नाहीत आणि चित्रपटगृहात दिसणारं सारंच एका पठडीचं असतं. त्यावर चर्चा होत नाही, गप्पा होतात. मतं व्यक्त केली जात नाहीत, निव्वळ शेरेबाजी केली जाते. त्यासंबंधी समीक्षा वाचली जात नाही, गॉसिप वाचलं जातं.
या परिस्थितीत चांगले चित्रपट पाहण्याची शिस्त तयार होणार कशी? आणि ती तयार झाली नाही, तर चांगला प्रेक्षक तयार होणार कसा? प्रेक्षकच बनला नाही, तर त्याला पाहण्यासाठी चित्रपट निर्माण करणार कोण? आपल्याकडे चांगला चित्रपट कोणता याविषयीही काही प्रमाणात संभ्रम आहे. काहींच्या मते केवळ गंभीर वा सामाजिक समस्या मांडणारा चित्रपटच खरा आणि व्यावसायिक चित्रपट टाकाऊ, तर काही जण ब्लॉकबस्टरच्या प्रेमात राहून कोणत्याही वेगळ्या प्रयत्नाला शिव्या देणारे. खरं तर असा सरसकट ‘सब घोडे बारा टक्के’ करणारा दृष्टिकोनच चुकीचा आहे. चित्रपट चांगला का वाईट, हे तो कोणत्या प्रेक्षकाला डोळ्यांसमोर ठेवून केलाय यावर ठरत नाही, त्याचा विषय गंभीर का विनोदी यावर ठरत नाही, तो तिकीट खिडकीवर चालला का पडला यावर ठरत नाही. ते ठरवण्यासाठी तुमची चित्रपटाकडे पाहण्याची एक दृष्टी तयार व्हावी लागते. चित्रपटाकडे करमणूक म्हणून पाहण्यास काहीच हरकत नाही; पण करमणुकीची व्याख्या आपण काय करतो याचाही विचार करायला हवा. केवळ पारंपरिक मेलोड्रामा, हाणामा:या वा खुर्चीतून पाडणारा विनोद हीच करमणूक आहे का ? चित्रपटानं तुम्हाला त्याच्या कथानकात अडकवणं, गुंतवणं हीदेखील करमणूकच झाली. मग त्यासाठी चित्रपट वरवरच्या ढोबळ पारंपरिक युक्त्या वापरो वा नवीनच एखाद्या मार्गानं तुम्हाला आकर्षित करो. त्यातून करमणूक व्हावी हे मान्य केलं, तरी चित्रपटाचा आस्वाद केवळ गोष्ट समजून घेण्यात, संवादांना दाद देण्यात वा एखाद्या तयारीच्या नायकाचा अभिनय पाहण्यात संपत नाही. ती तर सुरुवात असते. आपण जितकं खोलवर पाहू, तितक्या अधिक गोष्टी आपल्यार्पयत पोहोचतात. कधी कथेत वाहवत जाताना न समजून आलेल्या दिग्दर्शन, छायाचित्रण, संकलनासारख्या गोष्टींचं निरीक्षण आपल्याला माध्यमाचं नवं आकलन करून देतं, कधी आशयाचा एखादा छुपा पैलू आपल्याला नव्यानं दिसून येतो, तर कधी या चित्रकत्र्याच्या इतर कामाबरोबर घातलेली सांगड आपल्यासाठी चित्रपटाचा वेगळाच अर्थ लावून जाते. अर्थातच हे सारं केवळ तुम्ही ठरवून होत नाही, होणार नाही. पण मग मार्ग काय ? चित्रपटाचा रसास्वाद शिकवणारी उत्तमोत्तम पुस्तकं आज उपलब्ध आहेत. चांगल्या वेबसाइट्स आहेत. मात्र ही झाली साधनं. नुसती ती असून भागणार नाही. आपल्या बाजूनंही प्रयत्न हवा. केवळ पुस्तकांचा सल्ला आंधळेपणानं न स्वीकारता, किंवा हाताला लागेल तो नवा चित्रपट केवळ मिळतोय, म्हणून डाऊनलोड न करता आज प्रेक्षकानं विचारांची एक दिशा ठरवणो गरजेचे असते.
चित्रपटांच्या रसस्वादाकडे केलेलं दुर्लक्ष केवळ आपली प्रेक्षक म्हणून वाढ थांबवणार नाही, तर नव्या प्रयत्नांना मिळणा:या प्रतिसादाला आडकाठी करून एकूण चित्रपट उद्योगालाही ते संकटात आणू शकतं. चित्रपटाचं जाणीवपूर्वक रसास्वाद घेण्याचं कौशल्य ‘चित्रपट रसास्वाद’ शिबिरांतून मिळू शकतं.
राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय व फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीजचा महाराष्ट्र चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट रसास्वादाच्या ‘कार्यशाळा’ घेतल्या जातात. अशीच एक कार्यशाळा येत्या 12 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर्पयत पुण्यात आयोजित करण्यात आली आहे. www.nfaipune.gov.in या संकेतस्थळावर त्याची अधिक माहिती उपलब्ध आहे.
(लेखक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चित्रपटांचे अभ्यासक आहेत.)