ढाबळ

By Admin | Updated: May 2, 2015 17:57 IST2015-05-02T17:57:03+5:302015-05-02T17:57:03+5:30

मंडळी वेडी होतात कबुतरापायी. कोल्हापूरच्या भाषेत ‘नादखुळा’.कामधंदे विसरून लोक कबुतरांच्या नादी लागतात. बरबाद होतात. शांततेचा सिम्बॉल वगैरे जाऊ द्या,पण भुरळ पडते एवढं खरंय.

Nausea | ढाबळ

ढाबळ

चंद्रमोहन कुलकर्णी
 
परवाच जी. ए. कुलकर्णींची  चंद्रावळ  पुन्हा  वाचली. त्यावरून कबुतरांचा नाद माणसाला येडा करतो ते आठवलं. 
आठवलं :
पोलिस लाइनीत असताना आमच्या बिल्डिंगला अगदी लागूनच कबुतरांची एक ढाबळ होती.
लाकडी पट्टय़ांना तीन बाजूला फळकुटं, पत्रे जोडून जोडून केलेलं एक मध्यम आकाराचं खोपटं.
चौथ्या म्हणजे समोरच्या बाजूला षटकोनी भोकं असलेली, तारेची जाळी असलेलं दार.
एखादी प्लॅस्टिकची तुटकी, एखादी लोखंडी नाहीतर अॅल्युमिनियमची बादली. तसलंच एखादं भगुलं, एखादा तांब्या. वाडगा पडलेला एखादा. फाटकीतुटकी पोती, फडकी, काळपट बोळे इतस्तत: पसरलेले.
कबुतरांना पाणी प्यायला दगडात कोरलेला एक झकास वाडगा. आजूबाजूला पाणी सांडलेलं. 
ज्वारीनं भरलेलं पत्र्याचं एखादं डबडं. त्या ज्वारीची पिवळी टिंब पसरलेली जमिनीवर.
सायकलचे दोनचार वाया गेलेले, चेपलेले, मूळचा वर्तुळाकार गमावून लोळत पडलेले वृद्ध टायर.
फरशीवर, लाकडावर जिथेतिथे कबुतरांच्या विष्ठेचे पांढरेपांढरे डाग. काही ओले, बरेचसे वाळलेले.
आसमंतात पसरलेला विष्ठेचा तो छाती दडपणारा खिन्न वास.
गंजलेलं लोखंड गंजलेल्याच लोखंडावर थोडय़ा थोडय़ा वेळानं घासावं तसा, डोकं पिकवणारा तो कबुतरांचं गुटर्रगूं गुटर्रगूं आवाज.
अंगावर हण्ड्रेड शेड्स ऑफ ग्रे बाळगणारी फडफड. काही पक्षी पांढरे स्वच्छ. काही कबरे, भुरे.
हालचाल, हालचाल. फडफड. फडफड.
ते विशिष्ट पद्धतीचं बुदुक बुदुक चालणं, मोहकपणो माना वेळावणं. पंख पसरून मधूनच उगाचच उडय़ा घेणं..
 एकमेकांमध्ये मिक्स होतील, एकमेकांत बुडून जातील अशा पद्धतीनं एकमेकांच्या अंगावर बसून जुगणं.
अचानक उडायला लागली चारपाच जणं, की पायांच्या, चोचींच्या लाल गुलाबी रंगात पांढ:या-ग्रे चे फटकारे एकमेकांत मिसळून जात. 
पंखांची, शेपटांची कातरीकातरीची नक्षी आसमंतात.
अक्षरश: भूल पड़ते माणसाला. 
वेळकाळाची शुद्ध रहात नाही. 
मोहरतो माणूस.
एखादा बनियन आणि चट्टय़ापट्टय़ांची चड्डी घातलेला इसम अचानक हातात टायर घेऊन आकाशात उंचच उंच फेकत फेकत तोंडात बोट न घालताच कुईकुईकुई अशी कर्कश शिट्टी वाजवायचा.
दोन दिवसाची खुरटी दाढी वाढलेला एखादा अजून पिडक तोंडानं रेकल्यासारखा जिवाच्या आकांतानं ओरडायचा,  
 ए? आ, आ?आ?आ? आ!  
खूण पटवून एखादा कबुतरांना नावांनी हाक मारायचा.
कबुतरांच्या पायात खुणोची वळी आणि ओळखीसाठी ठरलेल्या खुणा असतात.
नावं भारीभारी.
काळ्या. लाडानं त्याला काळू म्हणायचं. 
पांढ:या. दैयर. काळा दैयर, कब:या.
पांढरंफटक बिनडागाचं कबुतर असलं, की नेहरू ! जीएंच्या कथेमधल्यासारखी एखादी चंद्री, काळी अक्का.
फुल्ल टाइमपास.
मंडळी वेडी होतात कबुतरापायी. कोल्हापूरच्या भाषेत नादखुळा. कामधंदे विसरून कबुतरांच्या नादी लागतात. बरबाद होतात.
शांततेचा सिम्बॉल वगैरे काही नसतात कबुतरं.
.. पण भुरळ पडते एवढं खरंय.
 
(लेखक ख्यातनाम चित्रकार आहेत.)

Web Title: Nausea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.