एक नन्ना देश

By Admin | Updated: July 11, 2015 18:49 IST2015-07-11T18:49:26+5:302015-07-11T18:49:26+5:30

देश दिवाळखोरीच्या दारात उभा. बँका बंद. एटीएम मशीन्स कोरडीठाक. दोनातल्या एकाला नोकरी नाही. नोकरी आहे, त्यांना सहा-आठ महिने पगार नाहीत. पेन्शन निम्म्याने घटलेलं. भाजी-ब्रेड-औषधं विकत घ्यायला पैसे नाहीत. गाडीत भरायला पेट्रोल नाही.

A Nanna Country | एक नन्ना देश

एक नन्ना देश

>आर्थिक संकटात सापडलेल्या ग्रीसच्या रस्त्यांवरचं, दुकानांतलं आणि घराघरांतलं अस्वस्थ वर्तमान..
 
- निळू दामले
 
 
ग्रीसची राजधानी अथेन्स. शहराचा मध्य भाग. शहराच्या मुख्य रस्त्यावरची दुकानं आणि कॅफे. दुकानांवर फलक लागले आहेत. 50 ते 70 टक्के सूट. दुकानांत तुरळक गर्दी. 
मुख्य रस्ता सोडून बाजूच्या गल्ल्यांत गेलं की दुकानांची शटर्स ओढलेली दिसतात. शटरवर ग्रीक भाषेत ग्राफिटय़ा चितारलेल्या. बहुधा निवडणुकीतल्या घोषणा वगैरे. मोठय़ा अक्षरात. काही शटर तळात गंजलेली, मोठाली भोकं पडलेली. खाली वाकलं, शटरच्या भोकामधे डोकावलं तर आत दुकानातली रिकामी कपाटं, शेल्फ दिसतात.  दुकान वर्ष- दोन वर्षं बंद आहे.
एका कॅफेत बरीच गर्दी. विविध वयांची माणसं. दाढीचे खुंट वाढलेले. कॅफेच्या मालकानं एका चाकाच्या टेबलावर ठेवलेल्या टीव्ही सेटभोवती माणसं जमलेली.
पंतप्रधान सिप्रास यांचं भाषण. ते नाना कार्यक्रम जाहीर करत आहेत. लोक टाळ्या वाजवतात. त्यातल्या काही टाळ्या अगदी उघडपणो उपहासात्मक असतात.
त्या गर्दीत एक वेल्डर पानोस अलेक्सोपोलुस. 2क्क्9 साली त्याला मालकानं कामावरून काढून टाकलंय. पेन्शन मिळतं. महिना साडेचारशे डॉलर्स. घरात तो एकटाच मिळवणारा आहे. सिप्रासांच्या आश्वासनातली 1क् टक्के आश्वासनं जरी खरी ठरली तरी खूप झालं, ग्रीस सुधारेल, असं पानोसचं मत आहे.
 
डाउन टाउन अथेन्समधली एक काहिशी काळवंडलेली इमारत. ग्रीक सरकारचं आर्थिक धोरण ठरवणारी माणसं या इमारतीत बसतात. एका खोलीत बसलेत प्रा. थियो शराकिस. ते अथेन्स विद्यापीठात अर्थशास्त्रचे प्राध्यापक आहेत. सरकारचं धोरण ते एका पत्रकाराला समजून देताहेत,
 ‘‘अहो केनेशियन सिद्धांताचा वापर करायचाय. मोठय़ा प्रमाणावर सार्वजनिक कामात पैसे खर्च करायचे आहेत. आपोआप लोकांच्या हातात पैसा जाईल, वस्तूंना मागणी येईल, वस्तूंचं उत्पादन सुरू होईल आणि अर्थव्यवस्था वळणावर येईल.’’  
पत्रकार प्रश्न विचारतो, ‘‘ते ठीक आहे. पण सार्वजनिक कामात गुंतवायला पैसे कुठून येणार? त्यासाठी कर्जाची मागणी करावी लागणार. घोळ तर तिथंच आहे, नाही का?’’
प्राध्यापक संथपणो पत्रकाराला समजून देतात.
त्यांना गेलं वर्षभर पगार मिळालेला नाही.
याच इमारतीसमोरच्या चौकातली एक दुपार.
दिमित्रीसािस्तुलास हा फार्मासिस्ट इमारतीकडं तोंड करून उभा राहिलाय. सकाळची गर्दीची वेळ. त्याच्याकडं पाहायलाही कोणाला वेळ नाही. अचानकच त्यानं खिशातून पिस्तूल काढलं, कानशिलाला लावलं, गोळी झाडली. त्या आवाजानं लोकांचं त्याच्याकडं लक्ष गेलं. त्याचं पेन्शन पंचावन्न टक्क्यानं कमी झालं होतं.
त्याच्या खिशातल्या कागदावर लिहिलेलं होतं- सरकारनं माङया जगण्याचे सगळे मार्ग बंद केलेत. कच:याच्या ढिगातून खाद्यपदार्थ काढून त्यावर पोट भरून जिवंत राहणं माङया नशिबी येऊ नये यासाठी मी माझं हे सन्मानाचं जीवन नष्ट करत आहे.  
 
अथेन्सचं उपनगर, एल्लिनिको. तिथं मानसोपचारतज्ञ डॉ. मारिया रोटा यांचं क्लिनिक. त्या सांगतात, ‘‘मंदी सुरू  होण्याच्या आधी माङयाकडं सामान्यपणो गरीब माणसं येत. आता सुस्थितीतल्या लोकांची गर्दी वाढत चाललीय. चांगले पगार असणारी, व्यावसायिक माणसं. नोक:या गेल्यात. व्यवसाय चालत नाहीये.’’   
डॉ. मारिया रोटा यांचं हे क्लिनिक अथेन्समधले लोक स्वत:हून चालवतात. दोनेकशे स्वयंसेवक गावातल्या माणसांना या क्लिनिकमधे आणतात. हे स्वयंसेवक स्वत: गेली दोनेक र्वष बेकार आहेत. घरी बसून तरी काय करायचं. निदान लोकांना मदत करावी या हेतूनं स्वयंसेवक आपला सर्व वेळ या कामावर खर्च करतात. स्थानिक लोकांची एक संघटना आहे. कुठली औषधं आणायची वगैरे निर्णय ही संघटना घेते. लोकांकडून देणग्या म्हणून औषधं गोळा करतात. घरातलं माणूस दगावलं की औषधं उरतात. तीही गोळा करून या दवाखान्यात आणली जातात.
 
पेरेमा. बंदराचं शहर. अथेन्सपासून तासाभराच्या अंतरावर. ग्रीसच्या अर्थव्यवस्थेत साताठ वर्षांपूर्वीपर्यंत जहाज बांधणी आणि जहाज देखभाल-दुरुस्तीचा वाटा मोठा होता. पेरेमा शहर 2 पर्यंत भरभराटलेलं शहर होतं.
आता पेरेमा भकास दिसतं. दिवसाही. बहुसंख्य दुकानं बंद आहेत. इमारती ओस पडलेल्या आहेत. अमेरिकेतल्या ओस पडलेल्या डेट्रॉईट शहराची आठवण येते. इमारतींच्या खिडक्या ओक्याबोक्या, दरवाजे जागेवर नाहीत. इमारतीत गवत वाढलेलं, भिंती शेवाळलेल्या. इमारतीच्या आसपास कुत्र्यांची वर्दळ.
कित्येक ठिकाणी इमारतींचं बांधकाम अर्धवट पडलेलं. चौकटी दिसतात, भिंती तयार नाहीत. लाद्याच्या चळती कंपाउंडमधे निमूट पडून, वर उचलून नेण्याची वाट पाहत. या:या मान वर करून जिराफांसारख्या उभ्या. काही तरी अघटित घडल्यावर माणसं एकाएकी पळून जातात तसं काही तरी घडलं असावं असं वाटतं. हे झालं दिवसाचं. रात्री रस्त्यावर दिवे लागत नाही. वीज नाही आणि दिवे फुटलेले आहेत. नवे दिवे बसवण्याची पालिकेची क्षमता नाही. बंदरच बंद पडल्यानं शहराला महसूल मिळत नाही. अनेक घरांतही दिवे दिसत नाहीत. नागरिकांजवळ विजेची बिलं भरायला पैसे नाहीत.
एका इमारतीच्या तळ मजल्यावर फूड किचन आहे. प्लॅस्टिकच्या ट्रेमधे भरलेली भाजी आणि ब्रेड घेण्यासाठी लोकांची रांग लागली आहे. परवापरवापर्यंत इथे अगदी किरकोळ पैशात ब्रेड-भाजी मिळत असे. तेवढेही पैसे नसल्यानं आता अन्न फुकटच वाटलं जातं. 
या रांगेत एक माणूस उभा. त्याचं नाव निकोस पेनागोस. साठीत पोचलेला. त्याला सहा मुलं आहेत. सहाही मुलं बेकार आहेत. निकोसचं पेन्शन एवढंच उत्पन्न. पेन्शनची रक्कम अध्र्यापेक्षा कमी झालीय. निकोसला दरमहा चारशे युरो मिळतात. निकोसची एकाद दोन मुलं चर्चच्या बाहेर रांग लावतात, तिथं वाटले जाणारे दानपैसे घेण्यासाठी. दोन मुलं कचरा ढिगातून अन्न शोधतात. निकोस सार्वजनिक अन्नछत्रमधे अन्न शिजवायला जातो, त्या बदल्यात त्याला काही अन्न मिळतं.
 
माही पापाकोन्सांटिनु. निवृत्त सनदी अधिकारी. एटीएमसमोर. कार्ड टाकलं. यंत्रनं पैसे नाकारले. माही दुस:या बँकेच्या एटीएम यंत्रसमोर उभ्या. त्याही यंत्रनं पैसे नाकारले. बँकेत पैसे नव्हते. माहींचा रक्तदाब वाढू लागला. वाणसामान विकत घ्यायला पैसे नाहीत. कारमधे बसल्या, घराकडं परत निघाल्या. कारमधे अजून पेट्रोल होतं. ते संपलं असतं तर ते घेण्याएवढेही पैसे जवळ नाहीत. वाटेत एक एटीएम यंत्र दिसलं. यंत्रसमोर कोणी उभं नव्हतं. पाहूया प्रयत्न करून असा विचार करून यंत्रसमोर उभ्या राहिल्या. चक्क 50 युरो यंत्रतून बाहेर पडले. 
2क्, 1क्, 5 युरोच्या नोटा गायब झाल्या आहेत. एक युरोची नाणीही गायब आहेत. एटीएममधून जास्तीत जास्त 6क् युरो बाहेर निघत, आता ती मर्यादा 5क् युरोवर आणण्यात आलीय. नोटा आणि एक युरोची नाणीही बाजारातून गायब असल्यान माणसं क्रेडिट कार्डानं पैसे देत आहेत. दुकानात जाऊन एक युरोची फुलं किवा ब्रेड वगैरे घेतला तरीही लोक क्र ेडिट कार्ड देतात.
दुकानदार म्हणतो, ‘‘आत्ता आम्ही क्रेडिट कार्डं घेतोय खरी, पण लोकांच्या खात्यात पैसेच नसतील तर कार्डावरचे पैसे मिळणार कसे? काही दिवसांनी कार्डंही चालेनाशी होणार आहेत.’’  
 
ग्रीस हा उत्पादक देश नाही. इथे बहुतेक गोष्टी आयात होतात. दररोजच्या वापरातल्याही. औषधं, कपडे, वाणसामान, मांस, पेयं. आर्थिक संकट निर्माण झाल्यावर निर्माण झालेल्या बंधनांमुळं बँकांचे आंतरराष्ट्रीय व्यवहार बंद आहेत. त्यामुळं आयात व्यवहार होत नाही. आयात व्यापा:यांचे चेक वटत नाहीत. परिणामी बाजारात वस्तूंचा तुटवडा आहे. कॅन्सरवरची औषधं बाजारात नाहीत. रक्तदाबावरची नेहमी लागणारी औषधंही बाजारात नाहीत. माणसं प्रचंड हादरलेली आहेत. 
 
एरिस हाजीजॉर्जियू. पत्रकार आहे. तो सांगतो,
‘‘आमचंही जगणं कठीण होत चाललंय. आमचा पेपर डावा आहे. आमच्या पेपरच्या मालकांचे समाजातल्या वरच्या थरातल्या लोकांशी घट्ट संबंध आहेत. वरच्या वर्गातल्या लोकांनी केलेले भ्रष्टाचार, त्यातून कमावलेले आणि परदेशात साचवून ठेवलेले पैसे इत्यादि बातम्या आम्हाला देता येत नाहीत. किक बॅक्सचे पैसे. आम्हाला त्यावर लिहायची परवानगी नाही. अलीकडं श्रीमंत वस्तीतल्या कारच्या काचांवर जाहिराती चिकटवलेल्या असतात. परदेशात जाण्याची, स्थलांतरित होण्याची सोय. सामान हलवणं, जागा मिळवणं, व्हिजा इत्यादि इत्यादि. आणि हो, मला चार महिने पगार मिळालेला नाहीये. तरी आम्ही ब:याच लोकांनी नोकरी सोडलेली नाही. कारण नोकरी सोडून 
जायचं तरी कुठं. नोक:या आहेत तरी कुठं?’’ 
 
जियानिस्टा. एक छोटं शहर. ट्रायनोस वाफियाडिस. तो सांगतो, ‘‘माझं वय आहे 24. आमचा सात जणांचा एक ग्रुप होता शाळेपासून. आता त्यातले सहा जण ग्रीस सोडून गेले आहेत. नोकरीच्या शोधात. मी कसाबसा टिकून आहे. गेले बरेच दिवस हे असं चाललंय. गावातली तरुण जोडपी हादरलीयत. म्हणताहेत मुलं नकोत. त्यांना लहानाचं मोठं करण्याची कुवत नाहीये. पुढल्या काही वर्षात या देशात केवळ म्हातारे उरतील. काम करणारी माणसं नाहीत, केवळ खाणारी माणसं उरतील. म्हातारे मेल्यावर? मला मुलं व्हावीशी वाटतात, पण बायको तयार नाहीये माझी. ती म्हणते, आपलीच खात्री नाहीये, मुलं कशाला आणखी?’’
 
या सगळ्या गदारोळात स्थिर असलेले काही मोजके लोकही ग्रीसमध्ये आहेत. त्यांच्याकडे गाळात रुतत चाललेल्या देशाच्या प्रश्नांवरची उत्तरं नसतील, पण त्यांनी स्वत:पुरते प्रश्न सोडवण्याचे मार्ग शोधले आहेत. पॉल एवमॉरिफडिस. कोको मार्ट नावाच्या कंपनीचा मालक. त्याचे भाऊही या व्यवसायात आहेत. ग्रीसमधे आर्थिक संकट सुरू होण्याच्या सुरुवातीलाच कोको मार्ट ही कंपनी सुरू झाली.  
अथेन्स शहराच्या मध्यवर्ती व्यापारी विभागात एक छोटं दुकान काढून कंपनी सुरू झाली. दुकानाचं खरं भाडं होतं सुमारे तीस हजार डॉलर. मंदीमुळं साताठ हजार डॉलर भाडय़ात दुकान सुरू झालं. युरोपात चांगल्या मॅट्रेसेसना मागणी होती. कोको मॅट या कंपनीनं ग्रीसमधेच भरपूर उपलब्ध असणारी लोकर, तागाचा धागा, कोको वनस्पतीचा धागा इत्यादि नैसर्गिक गोष्टींचा वापर करून दर्जेदार मॅट तयार केली. योग्य किमत ठेवली. युरोपात कोको मॅटला मागणी आली. 11 युरोपिय देशात कोको मॅटची 7क् दुकानं आहेत. नुकतंच एक दुकान न्यू यॉर्कमधे उघडलं. अमेरिकन जनतेला कोकोमॅट आवडली. अमेरिकेत आता आणखी 1क् दुकानं उघडण्याच्या बेतात कंपनी आहे. 2क्1क् साली कंपनीची उलाढाल सात कोटी डॉलर्सची होती. 
पॉलचं म्हणणं आहे, ग्रीसमधे वर्षाचे 3क्क् दिवस कडक ऊन पडतं. विविध वनस्पती आणि पिकं हे ग्रीसचं वैभव आहे. आम्ही कोको वनस्पतीच्या धाग्यांचा वापर आमच्या मॅट्रेसेससाठी करतो. ग्रीसकडं जे आहे त्याचा वापर करून समृद्ध व्हायचं सोडून नको त्या आयटी वगैरे गोष्टींच्या मागं लागलं तर अर्थव्यवस्थेचं नुकसान होईल नाही तर काय होईल?
 
अथेन्सच्या उत्तरेला कॉरिंथचं आखात आहे. तिथल्या डोंगरी विभागातलं एक गाव माऊंट हेलेकॉन. ग्रीसमधे नव्वद टक्के भाग डोंगरी आहे. 
माऊंट हेलेकॉनमधे गेलात तर तिथं स्टेलियॉस नावाचा सत्तावीस वर्षाचा तरुण भेटेल. ऐन मंदीच्या काळात स्टेलियसनं आपल्या गावातल्या वडिलोपार्जित जमिनीवरच्या द्राक्षाच्या बागेवर लक्ष द्यायला सुरुवात केली. इतर ग्रीक माणसांप्रमाणं अथेन्समधे जाऊन नोकरीबिकरी करण्याला त्यानं नकार दिला. वडील द्राक्षं पिकवत असत आणि द्राक्षाचा रस वाइन करणा:या कारखान्यांना विकत असत. ग्रीकमधे उत्तम द्राक्षं होतात पण चांगली वाइन होत नाही. स्टेलियोस, त्याचा भाऊ आणि कुटुंबीयांनी स्वत:ची वायनरी सुरू केली. मलरे, कॅबरने, सॉविग्नॉन, शारडोनी या वाइन्स स्टेलियोस बनवू लागला. माहुतारो या ग्रीक देशी वाइनचं उत्पादनही त्यानं सुरू केलं. वाइनचा दर्जा उत्तम ठेवला आणि  किंमतही चांगली ठेवली. 3क् डॉलर या किमतीत त्याच्या वाइनच्या बाटल्या किरकोळ दुकानात मिळू लागल्या. युरोपातल्या दहा देशात आणि अमेरिकेत त्याच्या वाइनला उत्तम बाजार मिळाला. गेल्या वर्षी त्यानं दोन लाख बाटल्या निर्यात केल्या. शिवाय ग्रीसमधेही त्याच्या देशी वाइन्सचा उत्तम खप होतो.
माऊंट हेलिनॉसचं हवामान उत्तम असल्यानं उत्तम दर्जाची ऑलिव्ह त्या गावात तयार होतात. चांगल्या नोक:या किंवा इतर गोष्टींसाठी अथेन्स किंवा युरोपातल्या इतर देशात गेलेले तरूण आता आपल्या गावात परतलेत. ऑलिव्ह पिकवू लागले आहेत. गावातली एक सहकारी संस्था ऑलिव्हचं तेल काढून देते, फुकट. गाळलेल्या तेलातलं दोन टक्के तेल सहकारी संस्थेच्या उपयोगासाठी घेतलं जातं. या ऑलिव तेलाला युरोपात उत्तम मागणी आहे.
(लेखक ख्यातनाम लेखक आणि मुक्त पत्रकार आहेत.)

Web Title: A Nanna Country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.