माझा दीक्षा विधी
By Admin | Updated: August 29, 2015 14:59 IST2015-08-29T14:59:06+5:302015-08-29T14:59:06+5:30
दाट धुकं, आवारातील अस्वलाचं भेडसावणारं अस्तित्व,कुरकुरणा:या करकरणा:या खिडक्या, काजळी ओकून अंधारात भर घालणारा उदासवाणा जुनाट मिणमिणणारा कंदील, कौलावर चाललेली खसफस आणि त्या विस्तीर्ण इमारतीतला एकटा मी..कशी एखाद्या भयपटात चपखल बसेल अशी वातावरणनिर्मिर्ती झालेली होती. - तेवढय़ात बाहेरून मोठा आवाज आला.

माझा दीक्षा विधी
>प्रकाश ठोसरे
अनुवाद : अरविंद आपटे
वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून वनाधिकारी म्हणून कारकीर्द घडवण्याचा निर्णय मी घेतला होता. जून 1979 चा शेवटचा आठवडा. माझं देहरादूनचं दोन वर्षाचं व्यावसायिक प्रशिक्षण आणि मसुरीचा चार महिन्यांचा पायाभूत अभ्यासक्रम आटोपला होता.
माङो वडील महाराष्ट्र वन खात्यातून नुकतेच सेवानिवृत्त झाले होते. त्यांचे सहकारी खात्यात उच्च पदांवर होते. त्यामुळे साहजिकच त्यांनी माझी पोस्टिंग कुठं करायची असं माङया वडिलांना विचारलं. तत्काळ उत्तर मिळालं, ‘त्याला अगदी दुर्गम भागात आणि कडक
अधिका:याच्या हाताखाली पाठवा. त्याला खात्याचे सर्व पैलू कठोरपणो समजू देत.’ आता माङया पोस्टिंगच्या संदर्भात अधिका:यांपुढे ढोबळमानाने दोनच पर्याय होते, एकतर आलापल्ली किंवा मग मेळघाट.
त्या काळची आलापल्ली म्हणजे भारताच्या वनसंपदेची मक्का होती, आता मात्र गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद्यांच्या विघातक कृत्यांकरता कुप्रसिद्ध आहे. मेळघाटही कमीत कमी मानवी हस्तक्षेप असणारा मोठा वन प्रदेश होता आणि तिथे जे. एन. सक्सेना नावाचे कडक पंतोजी विभागीय वनाधिकारी (डीएफओ) होते. या ‘सक्सेना फॅक्टर’मुळे पारडं साहजिकच मेळघाटकडे झुकलं आणि माझी पहिली पदस्थापना पश्चिम मेळघाट वन विभागात झाली.
या विभागाचं मुख्यालय चिखलदरा या थंड हवेच्या ठिकाणी होतं. मला 1 जुलै 1979 ला रुजू व्हायचं होतं. दोन लोखंडी ट्रंका, सर्वसमावेशक होल्डॉल घेऊन आमची स्वारी 30 जूनला दुपारी 4 च्या सुमारास चिखलद:याला पोचली. माङया वडिलांनी माझं सामान अतिशय मायेने व निगुतीने भरलेलं होतं. मोठय़ा ट्रंकेत माझं वैयक्तिक सामानसुमान, पुस्तकं होती, तर दुस:या ट्रंकेत खाण्याचा भला मोठा डब्बा व शिधासामग्री (रेबनबॉक्स) ठासून भरलेली होती. जंगलातील दुर्गम भागात त्यांनी सोसलेली भुकेची कळ मला सोसावी लागू नये ही कळकळ त्यामागे असावी. विशेषत: जेव्हा वनवणवा किंवा अतिवृष्टीमुळे जगाशी संपर्क तुटतो तेव्हा ही रेबनबॉक्सच खरा आधार असते हा त्यांचा स्वानुभव होता. घनदाट जंगलातील मलेरियाच्या डासांपासून माझा बचाव व्हावा यासाठी ऑलिव्ह ग्रीन रंगाची मच्छरदाणी होल्डॉलमध्ये भरायला ते विसरलेले नव्हते.
पुढे कालांतराने वन्यप्राणी पाहण्यासाठी मचाणावर बसताना सभोवतालच्या वातावरणात बेमालूमपणो लपण्यासाठी याच मच्छरदाणीचा मी भरपूर उपयोग केला. माङया वडिलांनी त्यांच्या आवडत्या वॉकिंग स्टिकचाही माङयासाठी त्याग केला होता. मेळघाटातील
माङया भटकंतीत ह्या छडीने मला खूप चांगली साथ दिली. गिरिस्थानाचं वैशिष्टय़ असणारा खाली उतरलेल्या ढगांचा तो ढगाळ दिवस होता.
===
मी मसुरीच्या अकादमीतून आलो होतो. तिथे खेळांच्या
उत्कृष्ट सोयीसुविधा होत्या आणि त्याचा मी पुरेपूर उपभोग घेत होतो. प्रशिक्षण, योगासनं, व्यायामशाळा, खेळ आणि छंदांनी मला मागील चार महिने दिवसभर पूर्णपणो व्यस्त ठेवलेलं होतं. त्यामुळे वनविश्रमगृहात दुपारी चार वाजल्यापासून रात्रीच्या जेवणाची एकटय़ाने
वाट पाहत बसणं म्हणजे फारच नैराश्यजनक दृश्य होतं. ते पाहून अजीजने (विश्रमगृहाचा खानसामा) मला सुचवलं की मी एक किलोमीटरवर असणा:या रेंजर्स कॉलेजवर जावं कारण तिथे खेळांच्या ब:यापैकी सुविधा आहेत. त्यामुळे वेळ जायला मदत होईल. हे सांगतानाच तो हे सांगायला विसरला नाही की काळोखाच्या आत परतावं कारण त्या भागात संध्याकाळनंतर अस्वलं रेंगाळायला सुरुवात होते आणि अस्वलं काही कारण नसतानाही हल्ला करण्याची शक्यता दाट असते. (हा एकमेव प्राणी वगळता अन्य कोणी प्राणी कारणाशिवाय माणसाच्याच काय इतर कोणाही प्राण्याच्या वाटेला जात नाही, माणसाला तर प्राणी टाळतातच.)
रेंजर्स कॉलेजमधला हा फेरफटका खूपच उत्साहवर्धक होता. थकवून टाकणा:या बास्केटबॉलनंतर बॅडमिंटनच्या सिंगल्स झाल्या. हे घाम गाळणं मनाला टवटवीत करून गेलं. पण थोडय़ा वेळातच काळोख पडायला आला आणि अजीजचा अस्वलाबाबतचा इशारा आठवून मी वनविश्रमगृहाकडे निघालो. विचारांच्या नादात मी चालायला सुरुवात केली. मी वन उद्यानाच्या रस्त्याला लागलो होतो, विश्रमगृह 300 मीटरवर राहिलं होतं. अंधुक प्रकाश आणि धुक्यामुळे समोरचं स्पष्ट दिसत नव्हतं. रस्त्याला खेटून असलेल्या अस्पष्टशा दिसणा:या मोठय़ा दगडाने अचानक माझं लक्ष वेधलं. पाचेक मीटर अंतरावरून मला ते मोठं डुक्कर वाटलं. पण त्याच्या तोंडातून डोकावणा:या सुळ्याकडे लक्ष गेल्यावर डोक्यात प्रकाश पडला की 100 किलो वजनाचं हे एकांडं अस्वल आहे. हा बाबा काही कारण नसताना माङयावर हल्ला करून मला यमसदनाला पाठवू शकतो हे माहीत असल्याने त्याला ओलांडून जाण्याचा प्रश्नच नव्हता. मी हळुवारपणो माघार घ्यायला सुरुवात केली आणि तो दगड धुक्यात नाहीसा होण्याची वाट पाहत राहिलो. धोका टळल्याची खात्री पटल्यावर परत विश्रमगृहाकडे धाव घेतली. माझी मोठय़ा संकटातून सुटका तर झाली होती; पण आता धुक्यात माझी वाट हरवली होती आणि मिट्ट काळोख दाटला होता.
मी विश्रमगृहाच्या रखवालदाराच्या नावाने हाका मारायला सुरुवात केली. विश्रमगृहाची खिडकी किलकिली होऊन एक हात डोकावून मला रस्ता दाखवू लागला. मी त्याला बाहेर येऊन रस्ता दाखवण्यासाठी विनवणी केली. पण त्याने नम्रपणो पण ठामपणो नकार दिला. अस्वलाची वेळ झाली असल्याने विश्रमगृहाबाहेर पाय टाकण्याचा धोका पत्करायला तो तयार नव्हता. त्याने ज्या काही खाणाखुणा सांगितल्या त्या आधारे मी ऑलिम्पिक विजेत्याच्या वेगाने धुक्यातूनच विश्रमगृहाकडे धूम ठोकली. विश्रमगृहात अजीज काळजीत पडला होता. मी हातीपायी धडधाकट परतलो हे पाहून त्याचा जीव भांडय़ात पडला.
===
आज माङो बॉस सक्सेनासाहेब माङयासोबत रात्रीचं जेवण घेणार होते. आठच्या ठोक्याला त्यांचं आगमन झालं. त्या रात्री जेवणानंतर त्यांनी दिलेल्या काही टीप्स माङया नोकरीच्या पुढील प्रवासात खूप उपयोगी पडल्या. दहाच्या सुमारास सक्सेनासाहेब घरी परतायला निघाले. अजीज टेंभा घेऊन त्यांना सोडायला गेला. पाचच मिनिटं झाली असतील, मोठय़ा आवाजात धावा केल्यासारख्या हाका ऐकू आल्या. मी टॉर्च घेऊन बाहेर धाव घेतली. पण दाट धुक्यामुळे मला दहा फुटापलीकडलं काहीही दिसत नव्हतं. क्षणार्धात कोपरं आणि ढोपरं फुटलेली, धापा टाकणारी आणि घामेघूम झालेली अजीजची आकृती धुक्यातून प्रकटली. भेदरलेल्या अजीजला पाण्याचा ग्लास देऊन परतफेड करण्याची आता माझी पाळी होती. सक्सेनासाहेबांना सोडून अजीज विश्रमगृहाच्या आवारात प्रवेश करत असताना त्याला कॉफीच्या मळ्यात अस्वल दिसलं. वाळवीचं वारूळ खोदण्याच्या कामात महाराज व्यग्र होते. वाळवी त्याचं आवडतं खाद्य डोळ्यापुढे असल्याने त्याचं लक्ष अजीजकडे गेलं नाही. सुदैवच अजीजचं. तीच संधी साधून अजीजने विश्रमगृहाकडे धाव घेतली. त्या पन्नास फुटाच्या अंतरात तो दोन-तीन वेळा धडपडला. अस्वल काहीही कारण नसताना हल्ला करतो. तो जेव्हा मागच्या पायावर उभा राहतो तेव्हा ते सहा फूट उंचीचं धूड फारच भयानक दिसतं. माणसाच्या देहाचा वरचा भाग त्याच्या तीक्ष्ण नख्यांनी ओरबाडून आयुष्यभराकरता तो त्याला विद्रूप करून टाकतो.
अजीजची घाबरगुंडी वळली त्यात आश्चर्य (आणि लाजही) वाटण्यासारखं काही नव्हतं. अजीज लगेचच सावरला. त्याने माङयासाठी पाणी आणलं. माङया खोलीत मंद कंदील लावून आऊट हाऊसमधल्या स्वत:च्या खोलीकडे गेला. जवळपास एखादं वन्य श्वापद असल्यास त्याला घालवायला त्याने मोठय़ा आवाजात ट्रान्ङिास्टर लावला होता. मी माङया खोलीत
परतलो. दाट धुकं, आवारातील अस्वलाचं भेडसावणारं अस्तित्व, कुरकुरणा:या करकरणा:या खिडक्या, काजळी ओकून अंधारात भर घालणारा उदासवाणा जुनाट मिणमिणणारा कंदील, कौलावर चाललेली खसफस आणि त्या विस्तीर्ण इमारतीतला एकटा मी.. कशी एखाद्या भयपटात चपखल बसेल अशी वातावरणनिर्मिती झालेली होती. पण मला सांगायला आनंद वाटतो की, मी तेव्हा घाबरलो नव्हतो. एका वनाधिका:याचा मुलगा असल्याने माझी मानसिकता जन्मत:च तशी कणखर झालेली होती.
मी दिवसभराच्या (आणि संध्याकाळच्या) प्रसंगाची उजळणी करत होतो आणि माङया अंगठय़ाचा कुणीतरी कचकन चावा घेतला. त्या अंधुक उजेडात माझा चावा घेणारा तो जीव दिसला नाही. आणखी थोडा उजेड पाडल्यावर बघतो तर माङया पांढ:या शुभ्र चादरीवर व जमिनीवर रक्ताचे शिंतोडे दिसू लागले. रक्त थांबवण्याचा प्रयत्न करत असतानाच मी बाहेर जाऊन अजीजला हाका मारू लागलो. पण ट्रान्ङिास्टरच्या भसाडय़ा आवाजात त्याला हाका ऐकू जाणं शक्य नव्हतं
म्हणून मीच बाहेर पडून आऊट हाऊसमधून त्याला घेऊन आलो. त्याने माझी खोली, माझी जखम तपासली आणि सुचित केलं की अंगठय़ावरचे ते दोन व्रण सापाच्या डंखाचे वाटतात. साप? मला अस्वस्थ वाटू लागलं. माङया हृदयाचे ठोके वाढू लागले, घाम फुटला, घशाला कोरड पडली. अजीजने डॉक्टरच्या भूमिकेत प्रवेश केला आणि मी शांतपणो त्याच्या आज्ञा पाळायला सुरुवात केली. त्याने मला कडुनिंबाचा पाला चावायला दिला व चव विचारली.
‘कडू’ - मी म्हणालो. मग त्याने मला साखर खायला लावली. अशा आणखी काही परीक्षा केल्या आणि निदान केलं की हा सापाचा चावा असू शकत नाही. उंदीर असू शकतो. ‘चावल्यानंतर शरमेने उंदीर खोलीतच कुठेतरी दडून बसला असावा’ असं म्हणत त्याने जुन्या टेबलचा ड्रॉवर उघडला आणि त्यातून भल्या मोठय़ा उंदराने उडी मारली. क्षणार्धात माझी सगळी प्रतिकूल लक्षणं गायब झाली. अजीज खदखदून हसला आणि बाहेर पडला. मी स्वत:ला परत अंथरुणावर गुरगुटून घेतलं. वनाधिका:याच्या जीवनाचा खरा दीक्षा विधी पार पडला होता.
(लेखक महाराष्ट्राचे सेवानिवृत्त प्रधान मुख्य
वनसंरक्षक आहेत.)
pjthosre@hotmail.com