१९५७ चा सांगीतिक उठाव !
By Admin | Updated: March 8, 2015 16:28 IST2015-03-08T16:28:32+5:302015-03-08T16:28:32+5:30
पन्नासच्या दशकानंतर हिंदी गाण्यांची दुनिया प्यार, मोहब्बत, इश्क, साजन, सजनी. यातच आक्रसत गेली ती जवळजवळ गेल्या दशकापर्यंत. त्याला अपवाद १९५७ हे वर्ष.

१९५७ चा सांगीतिक उठाव !
विश्राम ढोले
पन्नासच्या दशकानंतर हिंदी गाण्यांची दुनिया प्यार, मोहब्बत, इश्क, साजन, सजनी. यातच आक्रसत गेली ती जवळजवळ गेल्या दशकापर्यंत. त्याला अपवाद १९५७ हे वर्ष. मदर इंडिया, नया दौर, दो आँखे बारह हाथ आणि प्यासा या चित्रपटांनी गाण्यांच्या माध्यमांतून टोकदार आणि परखड भाष्य करत वर्तमान अक्षरश: ढवळून काढलं!
------
स्वतंत्र भारतासाठी १९५७ हे एक विशेष वर्ष होते. एकतर स्वातंत्र्य मिळाल्याला त्या वर्षी दहा वर्षे पूर्ण होत होती. शिवाय पहिल्या स्वातंत्र्यलढय़ाचे म्हणजे १८५७ च्या ‘राष्ट्रीय’ उठावाचेही ते शताब्दी वर्ष होते. दुसर्या सार्वत्रिक निवडणुकाही त्याच वर्षी झाल्या. त्यामुळे एकूणच स्मरणासाठी, सिंहावलोकनासाठी आणि स्वप्नांसाठी १९५७ या वर्षाचे देशाच्या दृष्टीने मोठे औचित्य होते. कळत-नकळत हिंदी चित्रपटसृष्टीनेही हे औचित्य सार्थ ठरविले. चित्रपट आणि संगीत अशा दोन्ही पातळ्यांवर सार्वकालिक श्रेष्ठ आणि लोकप्रिय ठरू शकतील असे मदर इंडिया, नया दौर, दो आँखे बारह हाथ आणि प्यासा हे तब्बल चार चित्रपट या एकाच वर्षात रिलीज झाले. हे चार चित्रपट म्हणजे लोकशाहीवादी आणि आधुनिक वगैरे होऊ पाहणार्या एका नवस्वतंत्र देशाच्या स्वप्नांच्या आणि वास्तवाच्या चार प्रातिनिधिक कहाण्या होत्या. ग्रामीण सरंजामी व्यवस्थेत गरीब कुटुंबाची, स्त्रीची होणारी फरफट मदर इंडियामध्ये दाखवली होती, तर आधुनिकतेचा, यंत्रा-तंत्राचा प्रवेश पारंपरिक जगण्यामध्ये कोणते जीवनसंघर्ष घडवून आणतो याचे आशावादी चित्रण नया दौरमध्ये होते. दो आँखे बारह हाथ ही आधुनिक मूल्यांवर बेतलेल्या एका स्वप्नाळू प्रयोगाची गोष्ट होती, तर प्यासामध्ये एकूणच किडत चाललेल्या समाजव्यवस्थेची कविमनाने केलेली कठोर निर्भर्त्सना होती. ऐतिहासिक वर्षातल्या या ऐतिहासिक चित्रपटांमध्ये डावे-उजवे करणे तसे अवघडच आहे. तरीही निव्वळ सांगीतिक निकषांवरदेखील प्यासाचे स्थान त्यातही विशेष आहे असे म्हणता येते. उत्तम शब्द आणि उत्कृष्ट संगीत यांचा समसमा संगम असलेली हिंदी गाणी तशी बरीच सांगता येतील, पण त्या दोन्हींच्या माध्यमातून समाज आणि व्यवस्थेवर इतके थेट आणि टोकदार भाष्य करणारी गाणी प्यासानंतर (दुर्दैवाने) फारशी सापडत नाहीत. म्हणूनच ‘ये मेहलो ये तख्तों, ये ताजों की दुनिया’ किंवा ‘जिन्हे नाज है हिंद पर वो कहाँ है’ ही प्यासातील गाणीही ते वर्ष आणि त्या चित्रपटाइतकीच ऐतिहासिक ठरतात. जिन्हे नाझ है हिंदमधला बोचरा उपरोध बदनाम वस्त्यांच्या, त्यातील शोषित स्त्रियांच्या व्यथांकडे लक्ष वेधतो, तर ‘ये मेहलों ये तख्तों, ये ताजों की दुनिया’मधला कवीचा व्यवस्थेविरुद्धचा सात्त्विक संताप ती व्यवस्थाच नाकारू आणि लाथाडू पाहतो. एरवी हिंदी चित्रपटसृष्टी प्रस्थापित मूल्य आणि व्यवस्थेच्याच बाजूने बहुतेकवेळा उभी असते. त्यासाठी तडजोडी करण्यातच शहाणपण असल्याचे मानते आणि सांगत राहते. या पार्श्वभूमीवर ‘ये महलों ये तख्तों’ मधला व्यवस्थेविरुद्धचा इतका टोकदार उठाव खूप लक्षणीय आणि विरळा.
एस. डी. बर्मनचे उत्कृष्ट संगीत आणि गुरुदत्तचा थोडा मेलोड्रॅमॅटिक तरीही हृदयाला भिडणारा अभिनय या गाण्याला लाभलाय हे नक्कीच खरंय, पण या गाण्याला इतकी उंची मिळवून दिली आहे ती साहीर लुधियानवीच्या शब्दांनी. कवी आणि संवेदनशील व्यक्ती म्हणून जगू पाहणार्या या प्यासामधल्या विजयसारखीच उपेक्षा आणि हलाखी साहीरनेही एकेकाळी अनुभवली होती. शिवाय डाव्या विचारांशी झालेल्या ओळखीमुळे शोषणाचे रूप व्यवस्थात्मक कसे असते हेही माहीत झाले होते. आणि त्यासाठी व्यवस्था उलथवणे किंवा हटवणे हाच पर्याय असू शकतो असे वाटण्याइतपत संतापही तत्कालीन परिस्थिती आणि विचारांनी निर्माण केलेला होता. या सार्याचे वजन या गाण्यांमधील शब्दाला लाभले होते. म्हणूनच ‘ये मेहलों ये तख्तों’मधला क्षोभ फक्त प्यासामधल्या विजयचा नव्हता, तो साहीरचाही होता आणि त्याच्यासारख्या भावनात्मक संवेदनशीलतेने जगाकडे पाहू इच्छिणार्या तेव्हाच्या एका अख्ख्या पिढीचाही होता. स्वातंत्र्याने जागविलेली समतेची, संवेदनशीलतेची स्वप्नं पाहणार्यांची पदोपदी होणार्या स्वप्नभंगामुळे होत असलेली ती चिडचिड होती.
पण एका व्यापक पातळीवर विजयचा विलाप या तत्कालीन परिस्थितीच्याही सीमा ओलांडतो. तो एका कविमनाचाच विलाप होतो. भावना आणि वास्तव यात सदैव वास्तवाचीच बाजू घ्यावी, संवेदना आणि तर्कयात नेहमीच तर्काला झुकते माप द्यावे, मानवी मूल्य आणि क्रयमूल्य यात क्रयमूल्यालाच जवळ करावे असे मानणार्या एका मोठय़ा आणि प्रस्थापित विचारव्यूहाविरुद्धची ती एक सार्वत्रिक तक्रार बनते. त्याची पाळेमुळे थेट प्लेटोच्या रिपब्लिकपर्यंत जातात. प्लेटोच्या आदर्श राज्यात भावनेला अगदी हलके स्थान होते. आणि म्हणूनच भावनेच्या चष्म्यातून व्यक्ती आणि जगाचे आकलन करू पाहणार्या कवीला आणि कविदृष्टीला प्लेटोच्या आदर्श राज्यात मज्जाव होता. म्हणूनच महाल, दौलत, राज्य, ऐहिक सुख वगैरे वास्तवांना प्राधान्य देणार्या जगात व्यक्ती, प्रेम, निष्ठा, मैत्री यांना एक साधनापलीकडे काही स्थानच राहत नाही ही कवीची तक्रार असते. तुमचे वास्तवाचे जग सडले आहे, त्याची दुर्गंधी सर्वत्र भरून राहिली आहे आणि असे ‘आलम ए बदहवासी’ झालेले तुमचे जग मी नाकारतो. तुमचेच कर्तृत्व आहे ते. तुम्हीच ते सांभाळा ही या विफल कविमनाची बोचरी टीका आहे. म्हणूनच ‘ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है’ या भावनेचे नाते एका वेगळ्या पातळीवर ‘न कांक्षे विजयं कृष्णं न च राज्यं सुखानिचं’ या महाभारताच्या युद्धाला अर्जुनाने दिलेल्या भावुक नकाराशी आणि युद्धाची संहारकता अनुभवल्यानंतर विजयी युधिष्ठिराला वाटलेल्या ‘जया अयमंअजयाकर: प्रतिभातीमे’ या विषादाशी आहे. हे निराश कवीचे रु दन नाही. हा एका विशिष्ट दृष्टिकोनातून व्यवस्थेला दिलेला ठाम नकार आहे.
तशी व्यवस्थेवर बोचरी टीका करणारी बरीच गाणी हिंदी चित्रपटांनी दिली आहेत. प्यासापूर्वीही बुटपॉलिश, आवारा, श्री-४२0 मध्येही अशी सामाजिक संदर्भ असलेली काही गाणी होती. फिर सुबह होगी मध्येही ‘चीनो अरब हमारा, हिंदोस्ताँ हमारा. आसमाँपे है खुदा और जमींपें हम’ अशी साहीरचीच काही चांगली गाणीही आली. नंतर पुरब और पश्चिम, रोटी कपडा और मकान सारख्या मनोजकुमार वळणाच्या चित्रपटांमधून काही गाणी अधूनमधून येत गेली, पण व्यवस्थेवर इतके परखड आणि अर्थगर्भ भाष्य करू पाहणार्या तसेच तत्कालिक ते सार्वकालिक अशा दोन्ही कसोट्यांवर टिकणार्या ‘दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है’ ची उंची काही त्यांना गाठता नाही आली. पन्नासच्या दशकानंतर तर हिंदी गाण्यांची दुनिया प्यार, मोहब्बत, इश्क, साजन, सजनी यातच आक्रसत गेली ती जवळजवळ गेल्या दशकापर्यंत. प्रेमाच्या पलीकडे जाऊन समाज व व्यवस्थेवर भाष्य करण्याची हिंदी गाण्यांची ऊर्मी आणि उंची दोन्ही कमी झाली. म्हणूनच १९५७ च्या ‘ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है’ चा सांगीतिक उठाव महत्त्वाचा ठरतो. अगदी १८५७ च्या उठावासारखा.
> मेहबूब खान दिग्दर्शित मदर इंडियाला नौशाद यांचे संगीत होते, तर बी आर. चोप्रांच्या नया दौरला ओ. पी. नय्यर यांचे! दो आँखे बारह हाथचे दिग्दर्शन होते व्ही शांताराम यांचे, तर संगीत होते
वसंत देसाईंचे.
> नया दौरमधील साथी हाथ बढाना आणि दो आँखे बारह हाथमधील ए मालिक तेरे बंदे हम ही गाणीही खूप लोकप्रिय झाली.
> जिन्हे नाझ है हिंद पर वो कहाँ है हे प्यासामधील गाणे साहीरच्या एका पूर्वी लिहिलेल्या कवितेमध्ये चित्रपटास साजेसे बदल करून तयार करण्यात आले होते.
> प्लेटो हा प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञांमधील एक प्रमुख तत्त्वज्ञ. त्याच्या रिपब्लिकमध्ये त्याने आदर्श राज्यासंबंधीच्या काही तात्त्विक कल्पना मांडल्या आहेत.
> कुरुक्षेत्रावर जमलेल्या आपल्याच आप्तस्वकियांविरुद्ध लढण्याची वेळ आली तेव्हा अर्जुनाने युद्ध करायला नकार दिला. गीतेतल्या पहिल्या अध्यायात अर्जुनाच्या त्या मानसिकतेचे वर्णन आहे. त्यातील मूळ श्लोक असा -
न कांक्षेविजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च
किंनोराज्येनगोविंदमिकंभोगैर्जीवितेन वा
(अर्थ- हे कृष्णा, मला युद्धातून मिळणारा विजय, राज्य किंवा सुख याची कशाचीच इच्छा नाही. प्रियजनांची हत्त्या करून मिळालेल्या राज्याचा, सुखोपभोगाचा खरंच काय फायदा?)
> महाभारत युद्धातील हा विजय मला खरंतर पराजय भासतो आहे असा युधिष्ठिराचा विषाद शांतिपर्वात आला आहे.
(टीप- प्रा. शरद देशपांडे यांनी लिहिलेल्या ‘फिलॉसॉफी अँड हिंदी सिनेमा’ या निबंधातील काही संदर्भांचा या लेखामध्ये उपयोग करण्यात आलेला आहे.)