सिनेमा आणि प्रेक्षक

By Admin | Updated: December 24, 2016 19:05 IST2016-12-24T19:05:33+5:302016-12-24T19:05:33+5:30

त्रिवेन्द्रम आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील पाब्लो नेरुदा या चिली देशातील प्रसिद्ध कवीच्या आयुष्यावरील चित्रपटाने माझ्या मनाची पकड घेतली. इथे दर काही तासांनी ताकदवान चित्रपट आपला ताबा घेतात

Movies and Observations | सिनेमा आणि प्रेक्षक

सिनेमा आणि प्रेक्षक

- सचिन कुंडलकर

त्रिवेन्द्रम आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील पाब्लो नेरुदा या चिली देशातील प्रसिद्ध कवीच्या आयुष्यावरील चित्रपटाने माझ्या मनाची पकड घेतली. इथे दर काही तासांनी ताकदवान चित्रपट आपला ताबा घेतात आणि आपण करत असलेल्या कामाविषयी विचार करायला लावतात. आपल्याकडे बनणाऱ्या चित्रपटांपेक्षा जगात सिनेमाचे तंत्र, सिनेमाची कथा कितीतरी पुढे गेली आहे आणि आपण अजूनही त्याच त्या जुन्या नात्यागोत्यांच्या आणि लग्नाच्या प्रेमाच्या गोष्टी आवळून बसलो आहोत हे लक्षात आले की फार दुर्दैवी वाटते.

 

चालू असलेले वर्ष संपताना मी लांबवर केरळमध्ये आहे. त्रिवेन्द्रम इथे चालू असलेला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पाहायला आलो आहे. हा भारतातील अतिशय सुनियोजित असा चित्रपट महोत्सव. इथे चित्रपटांची निवड उत्तम असते. जगभरात यावर्षी बनलेले चांगले सर्व चित्रपट इथे पाहता येतात. त्याचप्रमाणे चांगल्या दिग्दर्शकांच्या कामांचे ‘रेट्रोस्पेक्टिव्हज’ इथे भरवले जातात. दरवर्षी चित्रपट क्षेत्रातील मोठ्या तज्ज्ञांची इथे व्याख्याने होतात. मुंबई, गोवा इथे भरणाऱ्या मोठ्या दिखावेबाज आणि कुणी कसले कपडे घातले आहेत याची चर्चा करणाऱ्या, हिंदी सिनेमाच्या तारकांवर अवलंबून असलेल्या महोत्सवांपेक्षा इथे येणे मला वर्षानुवर्षे फार आवडते. अनेक वेळा मी बनवलेली फिल्म इथे असते आणि ती नसली तरी मी प्रेक्षक म्हणून इथे येऊन जगभरातील चित्रपट बघणे पसंत करतो. 
इथे चित्रपटावर प्रेम करणारा सामान्य माणूस आहे. हजारो विद्यार्थी, कामगार, सरकारी कर्मचारी, शिक्षक या काळात संपूर्ण सुटी घेऊन इथे महोत्सवात चित्रपट पाहतात. त्यावर चर्चा करतात. करमणूक या एकाच गोष्टीच्या पलीकडे जाऊन जगभरातील चांगल्या सिनेमांचा आस्वाद घेणारा सामान्य माणूस इथे आपल्याला सापडतो. गरीब- श्रीमंत असले भेदभाव नसतात. अनेक वेळा मी ज्या रिक्षाने चित्रपटगृहात आलो त्या रिक्षाचा चालक माझ्या समोरच्या रांगेत बसून चित्रपट पाहताना मला आढळला आहे. इथे चित्रपटाची निवड बारकाईने होते. त्यामुळे जगातील अनेक देशांमधून चित्रपट निवडणारे तज्ज्ञ इथे हजेरी लावतात. भारतातील यावर्षी बनलेल्या सर्वोत्तम चित्रपटांचा इथे खास विभाग असतो. मी नुकताच बनवलेल्या चित्रपटाच्या कामामधून मोकळा होऊन शांतपणे सुटी घेऊन दिवसभर सिनेमे पाहतो आहे. एकप्रकारे नवे काही शिकतो आहे. जगात लोक करत असलेले नवे प्रयोग पाहतो. नव्या कथा अनुभवतो. गर्दीत उभा राहतो. रांग लावून सावकाश चित्रपटगृहात जाऊन बसतो. रिक्षातून अनोळखी माणसांशी गप्पा मारत फिरतो. एका दिवसात इतरांप्रमाणेच चार ते पाच चित्रपट पाहून होतात. एक चित्रपट पाहून झाला की दुसरा पाहायला शहराच्या वेगळ्या भागात धावाधाव करत पोचतो. सर्व शहरातील माणसे या काळात चित्रपट आणि त्याच्या अनुभवाने भारलेली असतात. काही वेळा एखादा ताकदवान चित्रपट पाहिला की त्याचा अंमल मनावर इतका गडद राहतो की लगेच दुसरीकडे जाऊन वेगळा चित्रपट बघणे मनाला नकोसे होते. नुकत्याच घेतलेल्या चांगल्या अनुभवाच्या उबेत मनाला रेंगाळावेसे वाटते. 


एरवीपेक्षा इथे मन शांत आणि मूक होते. दर काही तासांनी ताकदवान चित्रपट आपला ताबा घेतात आणि आपण करत असलेल्या कामाविषयी विचार करायला लावतात. आपल्या देशात आणि मुख्य म्हणजे आपल्या महाराष्ट्रात बनणाऱ्या चित्रपटांपेक्षा जगात सिनेमाचे तंत्र, सिनेमाची कथा कितीतरी पुढे गेली आहे आणि आपण अजूनही त्याच त्या जुन्या नात्यागोत्यांच्या आणि लग्नाच्या प्रेमाच्या गोष्टी आवळून बसलो आहोत हे लक्षात आले की फार दुर्दैवी वाटते. केरळ आणि तामिळनाडूमधील प्रेक्षक भूतकाळातून बाहेर पडून अनेक चांगल्या नव्या तरु ण दिग्दर्शकांच्या प्रयोगांना दाद देतो हे पाहिले की महाराष्ट्रात असे कधी होणार असे वाटून जाते. इथला प्रेक्षक आपल्या भाषेतील फिल्म हिंदी किंवा इंग्रजी भाषेतील चित्रपटापेक्षा आधी पाहतो. याचे कारण तरुण माणसाचा विचार करून इथे दक्षिणेत सिनेमा बनतो. महाराष्ट्रात वयस्कर माणसांना जुन्यापान्या कथा आणि जुनी नाटके यावर आधारित चित्रपट बघायची चटक लागली असल्याने तरुण माणसांना मराठी चित्रपट पाहायचा कंटाळा येतो. 


सुप्रीम कोर्टाने नुकत्याच केलेल्या हुकुमाने इथे वादळ पेटले आहे. सक्ती आणि देशप्रेम या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. प्रत्येक चित्रपटाआधी राष्ट्रगीत वाजले की उभे राहावे लागते. असे दिवसातून चार- पाच वेळा देशभक्तीचे प्रदर्शन करावे लागते. काही विद्यार्थ्यांनी याविरोधात बंड केले आणि ते उभे राहिले नाहीत. त्यांचे सांगणे हे होते की असल्या देखाव्याने देशभक्तीचे खोटे प्रदर्शन करायची गरज नाही. इथे आपण चित्रपट पाहायला आलो आहोत, देशप्रेमाचे देखावे करायला नाही. देशप्रेमाचे खोटे दिखावे करायला फेसबुक आहे. इथे तो त्रास कशाला? जी मुले गाणे वाजल्यावर उभी राहिली नाहीत त्यांना पोलिसांनी पकडून तुरु ंगात टाकले आहे. दरवेळी गाणे लागले की चड्डी वर करून उभे राहायचे असले पोकळ दिखावू नियम करण्यात आणि ते पाळले जात आहेत की नाहीत हे तपासण्यात देशाच्या कोर्ट आणि पोलीस यंत्रणेचा बराच वेळ यापुढे जाणार असे दिसते. हे सरकार असले अनेक गुदगुल्या, चिमटे, चापट्या स्वरूपाचे कायदे करून लोकांचे लक्ष वेगळ्याच चर्चेत गुंतवून ठेवून आतल्या आत वेगळी क्रीडा खेळणारे आहे असे दिसते.


दिवसातून पाच वेळा गाणे लागते आणि पाच वेळा आम्ही उभे राहतो की नाही हे पाहायला पोलिसांचा फौजफाटा थिएटरबाहेर उभा असतो. मी जन्मायच्या आधी आणीबाणी नावाची एक काही गोष्ट आली होती म्हणतात. तसे काही पुन्हा सुरू होणारे की काय असे वाटते आहे. पाब्लो नेरु दा या चिली देशातील प्रसिद्ध कवीच्या आयुष्यावरील चित्रपटाने माझ्या मनाची पकड घेतली आहे. गेले वर्षभर आपल्यावर कुणीतरी लक्ष ठेवून आहे ही भावना या चित्रपटाने गडद केली आहे. आपण काय लिहितो, काय वाचतोय, कसे सिनेमे काढतोय त्यावर नव्या सरकारचा एक डोळा आहे. आपण सतत कुणाच्या तरी देखरेखीखाली आहोत ही भावना अधोरेखित केली जाणारे वातावरण गेल्या वर्षभरात तयार होते आहे. पाब्लो नेरु दाच्या कवितांना घाबरून त्याला मारायला एका पोलीस अधिकाऱ्याची नेमणूक केली गेली आहे. पण पाब्लो दरवेळी या अधिकाऱ्याच्या हातावर तुरी देऊन पळून जात आहे. त्याचे कुटुंबीय आणि त्याचे सहकारी त्याला तू देश सोडून पळून जा असे सांगत आहेत. पण पाब्लो त्याला तयार नाही. त्याचे त्याच्या देशावर प्रेम आहे. पण त्याच्या देशाच्या राष्ट्राध्यक्षाला पाब्लो आवडत नाही. त्याला पाब्लोची नाही तर त्याच्या कवितांची भीती वाटते, कारण त्याच्या कविता प्रश्न विचारून लोकांना जागृत ठेवतात. प्रत्येक वेळी पळून जाताना पोलीस अधिकाऱ्याला सापडेल अशा ठिकाणी पाब्लो एक कवितेचे पुस्तक ठेवून जातो. काही काळाने या धावपळीत आणि ताणात पाब्लोचे आणि पोलीस अधिकाऱ्याचे एक अव्यक्त नाते तयार होत जाते. ते दोघे एकमेकांना कधीही न भेटता तयार होणारे हे नाते. लेखकाचे आणि वाचकाचे नाते. पाब्लो धाडसी, खंबीर आहे. पोलीस अधिकारी त्याला ओळखू लागला आहे. शिकारी आणि प्राणी यांचे हे नाते. वाचक आणि लेखक यांचे तेच नाते. शासक आणि कलाकार यांचेही तेच नाते. 


पाब्लो कविता करत राहतो. त्याच्या कविता पोस्टातून जगभर जातील अशी व्यवस्था करीत राहतो. अचानक रात्री अपरात्री पोलिसांची धाड पडत राहते. पाब्लो सटकत राहतो. माझ्यासाठी बंदूक घेऊन फिरणाऱ्या माझ्या वाचका, मी इथे आहे. पाब्लो दुरून कवितांमार्फत पोलीस अधिकाऱ्याशी संवाद साधत राहतो. पोलीस अधिकारी आता पाब्लोला समजून घेऊ लागला आहे. पण त्याला पाब्लो हवा आहे, कारण पाब्लोला मारणे हे देशभक्तीचे एक महत्त्वाचे साधन होऊन बसले आहे. देशभक्ती नुसती असून चालत नाही, ती वारंवार सिद्ध करावी लागते. देशप्रमुखाच्या समोर आपल्या देशभक्तीचे पुरावे सतत सादर करावे लागतात. अखेरीस पाब्लोच्या कवितेचे चाहते पाब्लोला वाचवतात आणि याच्या मागावर आलेल्या पोलिसाचा बर्फाळ प्रदेशात खून करतात. चित्रपटाच्या शेवटी पाब्लो आपल्या शिकाऱ्यासमोर येतो. तोवर न भेटताही त्या दोघांचे नाते कवितेतून प्रगाढ झालेले असते. ते जवळजवळ एकरूप झालेले असतात. वाचक आणि कवी. शासक आणि कवी. पाब्लो अतिशय हळुवारपणे पोलीस अधिकाऱ्याचा निरोप घेतो. त्याच्या प्रेताचे डोळे मिटवतो. लेखक आणि वाचक यांच्या नात्याची ही गोष्ट. शासक कधीही वाचक नसतो. तो न वाचताच लेखकाची आणि कलाकाराची शिकार करतो. पण शासक जर वाचक झाला तर लेखकाला मारून टाकणे मूर्खपणाचे आहे हे त्याच्या लक्षात येते. लेखक आणि वाचक यांचे नाते कायमचे बांधले गेलेले आहे. लेखक त्या जागेवरून पळून गेला तरी त्याने वाचकासाठी तिथे एक कविता मागे सोडली आहे. ती शोधा.

(ख्यातनाम लेखक, दिग्दर्शक) kundalkar@gmail.com

Web Title: Movies and Observations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.