पाऊल टाकेन तर पुढेच
By Admin | Updated: April 16, 2016 18:52 IST2016-04-16T16:15:05+5:302016-04-16T18:52:35+5:30
डॉक्टर लिव्हिंग्स्टन 1841 साली धर्मप्रसारासाठी आफ्रिकेला गेला. तिथल्या दुष्काळाचं खापर लोकांनी लिव्हिंग्स्टनच्या माथी फोडलं. त्यानं खोदलेल्या विहिरी बुजवल्या, दिशाभूल केली, फसवे वाटाडे पुरवले. विनाकारण हल्ले केले. त्याचा अन्नसाठा आणि औषधं पळवली. मलेरिया-आमांशाने त्याला पछाडलं. पण तो हरला नाही.

पाऊल टाकेन तर पुढेच
>- ही वाट दूर जाते
- डॉ. उज्ज्वला दळवी
हे दृश्य देवदूतांनीही डोळे भरून पाहावं असंच आहे. पायथ्याशी शुभ्रधवल आणि वरवर जाता अधिकाधिक गडद होत जाणारे, वर ढगांशी एकरूप होणारे हे फेसाळत्या पाण्याचे गगनचुंबी स्तंभ! इथले लोक म्हणतात तसा हा ‘गर्जणारा धूर’च आहे खरा.’’
‘व्हिक्टोरिया’ धबधब्याचं रमणीय दर्शन घेणारा डॉक्टर लिव्हिंग्स्टन हा पहिलाच युरोपियन होता.
डॉक्टर झाल्यावर, 1841 साली तो धर्मप्रसारासाठी आफ्रिकेला गेला. तोपर्यंत तिथे गेलेले युरोपियन किना:यालगतच ठाण मांडून बसले होते. अंतर्भागातल्या वाळवंटातून, निबिडघोर अरण्यांतून, काळनागिणी नद्यांतून मजल मारणं डच-पोर्तुगीजांना जमलं नव्हतं. ते सोबत सशस्त्र सैनिकांचा मोठा लवाजमा घेऊन जात, गावक:यांना वन्यपशूंसारखे गोळीबाराने टिपत, त्यांच्या लहानग्यांना गुलाम म्हणून उचलून नेत. त्या अत्याचारांचा सूड घेऊ बघणा:या टोळ्यांनी, मलेरिया-कॉल:यासारख्या आजारांनी आणि हिंस्त्र पशूंनी तो प्रदेश युरोपियनांना दुर्गम केला होता.
लिव्हिंग्स्टन तिथे गेला तो त्या अडाणी टोळीवाल्यांना धर्माचं ज्ञान देऊन सुसंस्कृत करायला. टोळक:यांच्या माणुसकीवर पूर्णपणो विश्वासून, हिंस्त्र श्वापदांपासून बचावापुरतीच शस्त्रं सोबत घेऊन तो आफ्रिकेच्या अंतरंगात भिनला. अगदी सुरु वातीच्याच काळात टोळीची गुरं राखताना सिंहाशी झटापट होऊन त्याचा खांदा कायमचा जायबंदी झाला. त्याने स्थानिक बोलीभाषांत, चालीरीतींत, जडीबुटीच्या औषधांत रस घेतला. पाश्चात्त्य डॉक्टरकीने टोळक:यांचे आजार बरे केले. आफ्रिकेतल्याच एका समविचारी धर्मोपदेशकाच्या मुलीशी त्याचा विवाह झाला. त्यानंतर त्यांच्या मुलाबाळांनीही टोळक:यांच्या जेवणातल्या कुरकुरीत भाजलेल्या सुरवंट-नाकतोडय़ांचा, रसाळ बेडकांचा, मांसल हिप्पोपोटॅमसचा आस्वाद घेतला.
लिव्हिंग्स्टनच्या आफ्रिका वास्तव्याच्या सुरुवातीच्याच काळात सतत चार वर्षं अवर्षण झालं. एरवीच्या सुजल-सुफल भागांतही रखरखाट झाला. टोळकरी मांत्रिकांच्या मम्बोजम्बोनेही पाऊस पडेना. त्यांनी त्याचं खापर लिव्हिंग्स्टनच्या धर्मप्रसाराच्या माथ्यावर फोडलं. तरी त्यांचा दृष्टिकोन समजून घेत सामोपचाराने वागल्यामुळे काही जमातींशी दिलजमाई झाली. त्याला तिथे सच्चे दोस्त मिळाले तसेच ‘शत्रूचा मित्र तो शत्रूच’ या नात्याने वैरीही आंदण मिळाले. काही जमातींनी बिनपाण्याच्या वाळवंटातही त्याला पाण्यात पाहिलं. त्यांनी लिव्हिंग्स्टनने खोदलेल्या विहिरी बुजवल्या, कधी दिशाभूल करून सोप्या वाटांपासून दूर नेलं, फसवे वाटाडे पुरवले. टोळक:यांना पशू मानणा:या डच बंडखोरांनी त्या मानवतावाद्यावर विनाकारण हल्ले केले. खोडसाळपणो कित्येकदा त्याचा अन्नसाठा आणि औषधं पळवली. जवळजवळ सुरुवातीपासूनच मलेरिया-आमांशाने त्याला पछाडलं. त्याच्या पायांना क्षतं पडली. पण ध्येयासाठी पुढे टाकलेलं पाऊल लिव्हिंग्स्टनने कधीही मागे घेतलं नाही.
जून 1849 मध्ये त्याचा ताफा कलाहारी वाळवंटात शिरला. तिथे बैलगाडय़ांची वाळूत रुतलेली चाकं ओढून बैल थकून जात. नव्या बोलीभाषांशी नवे शाब्दिक गैरसमज-गोंधळ होत, भलत्याच दिशा दाखवल्या जात. मृगजळांचेही चकवे लागत. एक महिन्याने त्यांचा काफिला वाळवंटापारच्या मोठय़ा तळ्यावर पोचला. तिथून पुढचा, वेगवेगळ्या नद्यांच्या पात्रंतला प्रवास झाडांची खोडं पोखरून बनवलेल्या होडग्यांतून, लव्हाळ्यांच्या तराफ्यांतून झाला.
त्याच्याच शब्दांत सांगायचं तर,
‘‘नदीचं खडकाळ पात्र, खळाळता जलौघ, कोसळते धबधबे सा:यांशी झुंजतानाच चिवट लव्हाळ्याच्या आणि धारदार, करवतकाठी गवताच्या, किडय़ा-मच्छरींनी बुजबुजलेल्या उंचाडय़ा भिंतींनी एकाएकी वाट रोखली. त्या तोडायचा-कापायचा निकराचा प्रयत्न फोल ठरला. दिवसभर झटल्यावर एक हिप्पोपोटॅमस पोहत पोहत ती गवती साडी लपेटून-ओढून पुढे घेऊन गेला. त्याच्या मागे मोकळ्या झालेल्या वाटेने घाईघाईने जाऊन आम्ही एका बेटावर पोचलो. तिथे योगायोगाने आमचे दोस्त टोळीवाले भेटले. त्यांच्या मदतीने पुढची मजल मारली.’’
अशा अनेक अनपेक्षित परीक्षा त्याला द्याव्या लागल्या. त्या पाणवाटांत सुसरींचाही सुळसुळाट होता. सिंहाची डरकाळी आणि शहामृगाची आरोळी ऐकताना एकसारखंच भय वाटे. तशातही 1852 साली विस्तीर्ण पात्रच्या झाम्बेसी नदीचा मागोवा घेण्यात त्याला यश आलं. स्थानिक टोळ्यांच्या सहकार्याने, आफ्रिकेच्या अंतर्भागातल्या पाणवाटांवरून स्त्री धर्म, संस्कृती आणि युरोपचा व्यापार पसरला तर गुलामविक्र ीपेक्षा कितीतरी अधिक फायदा होईल असा दावा त्याने त्याचवेळी केला.
जून 1852 मध्ये त्याने पुन्हा उत्तरेकडे कूच केलं. तिथल्या जमातींच्या न्यायी म्होरक्यांशी दोस्ती केली. तेवढय़ात त्याच्या जुन्या दोस्तांचा डचांनी सपशेल पराभव केला. टोळक:यांनी गनिमी काव्याची लढाई सुरू केली. त्यामुळे त्या प्रदेशातून जाताना लिव्हिंग्स्टनला वाटाडे मिळणं कठीण झालं. तो प्रदेशच टाळून उत्तरेचा मार्ग शोधावा लागला. काहीवेळा वाटेतली जंगलं एकाहाती कापून वाट काढावी लागली. आंबवलेल्या नरमांसाचा पुख्खा झोडणा:या जमातीही त्याच वाटेवर त्याला भेटल्या. वयात आल्यावर पौरु ष सिद्ध करायला मनुष्यवधाची मर्दुमकी गाजवणा:या टोळक:यांचंही मैत्र त्याला लाभलं. त्या सा:यांशी सख्य साधत, त्यांना धर्माचा उपदेशही करत त्याने आगेकूच चालू ठेवली.
होडग्यांतून, आफ्रिकेच्या पोटातलं पाणी हुडकत भटकतानाच त्याला व्हिक्टोरिया धबधबा सापडला. अटलांटिक महासागरापासून हिंदी महासागरापर्यंत आरपार आफ्रिकायन करून 1856 मध्ये तो आंतरराष्ट्रीय विक्र मवीर म्हणून इंग्लंडला परतला. त्याचं प्रवासवर्णनाचं पुस्तक गाजलं. त्याच्या झाम्बेसी प्रकल्पाला सरकारी पाठबळही मिळालं. पण त्याच्या गो:या सहका:यांना प्रवासातल्या हालअपेष्टा ङोपेनात. त्यांनी झपाटलेल्या लिव्हिंग्स्टनला वेडय़ात काढलं.
त्याच काळात, लिव्हिंग्स्टनच्या प्रकृतीची काळजी घ्यायला आलेली त्याची पत्नी मलेरियाने मृत्युमुखी पडली. मोहिमेलाही अपेक्षेप्रमाणो यश मिळालं नाही. चौसष्ट साली सरकारने पाठिंबा काढून घेतला. वृत्तपत्रंनी अपयशावर टीकेची झोड उठवली. आजारी लिव्हिंग्स्टन एकटा पडला.
पण तो हरला नाही. त्याने नाईल नदीचा उगम शोधायची नवी मोहीम सुरू केली. त्या दलदलीत इतके हाल झाले की दोन इमानी सेवक सोडता सारे सहप्रवासी कंटाळून पळून गेले. त्यांनी शिधा-औषधं तर पळवलीच, शिवाय लिव्हिंग्स्टन वारल्याची अफवाही पसरवली.
सततच्या आजारांनी खंगलेल्या, नुकतंच एक भीषण हत्त्याकांड पाहून खचलेल्या लिव्हिंग्स्टनचा जगाशी संपर्कतुटला. जन्मभर गुलामगिरीविरु द्ध बोलणा:या लिव्हिंग्स्टनला आजारपणात गुलामांच्या व्यापा:यांच्या आधारानेच जगावं लागलं.
एका धाडसी अमेरिकन वार्ताहराने 1871 साली त्याला शोधून काढलं. त्यांची भेट फार गाजली.
लिव्हिंग्स्टनची एकांडी शिलेदारी मरेपर्यंत चालूच राहिली. त्या अखंड ध्यासप्रवासातच, 1873 मध्ये तो एकाकीपणोच मरण पावला. त्याच्या मनकवडय़ा इमानी चाकरांनी त्याचं पार्थिव युरोपला धाडण्यापूर्वी त्यातलं हृदय तेवढं काढून आफ्रिकेच्या अंतर्भागातच पुरलं.
साधकाचं हृदय त्याच्या साध्याच्या अंतरंगाशी कायमचं एकरूप झालं.
(लेखिका गेली तीस वर्षे सौदी अरेबिया
आणि त्याआधी इंग्लंडमध्ये वास्तव्याला होत्या. ‘मानवाचा प्रवास’ हा त्यांच्या संशोधनाचा विषय आहे.)
ujjwalahd9@gmail.com