एव्हरेस्टवर कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 06:02 AM2019-05-12T06:02:00+5:302019-05-12T06:05:04+5:30

गिर्यारोहक जे जे वर नेतात, ते वरच पडून राहतं. बिअरच्या रिकाम्या बाटल्या, रिकामे कॅन्स,  पॅकेज्ड फूड, त्याचे रॅपर्स, किचन वेस्ट, जैविक आणि अजैविक कचरा, ट्रेकिंगसाठी लागणारी, खराब झालेली उपकरणं,  रिकामी ऑक्सिजन कॅनिस्टर्स, तंबू  गिर्यारोहकांची विष्ठा आणि वर्षानुवर्षे  ‘वरच’ पडून असलेले मृतदेह! - या सगळ्या कचर्‍याच्या भाराने  जगातल्या या सर्वोच्च हिमशिखरावर सध्या दलदल माजली आहे.

Mount Everest polluted with tons of trash | एव्हरेस्टवर कचरा

एव्हरेस्टवर कचरा

Next
ठळक मुद्देएका बर्फाळ कचरा-कोंडीची गोष्ट

- समीर मराठे

बेलाग आणि उत्तुंग अशी हिमालयाची बर्फाच्छादित शिखरं गिर्यारोहकांना नेहमीच साद घालत असतात. त्यातच हे शिखर जर एव्हरेस्ट असेल तर आयुष्यात एकदा का होईना, ते सर करायचंच, हे स्वप्नही कट्टर गिर्यारोहकांच्या मनात रुंजी घालत असतं.
हिमालयाचं अप्रतिम सौंदर्य हे एक कारण तर आहेच; पण त्याचबरोबर आपल्या क्षमतांचा कस पाहात, तिथल्या लहरी हवामानाशी झुंजत, जीवन-मरणाच्या आंदोलनावर हेलकावे खात त्या सर्वोच्च शिखरावर पोहोचल्याचा अवर्णनीय आनंद अनुभवण्यासाठी हे सारेच गिर्यारोहक जिवाचं रान करीत असतात.
गेल्या काही वर्षांपासून हा अनुभव मात्र तितकासा आनंददायी राहिलेला नाही. याचं कारण जगातल्या या सर्वोच्च शिखरावर साचत असलेला कचर्‍याचा ढीग. या बेलाग शिखरावर आपल्या पाऊलखुणा उमटवण्यासाठी जगभरातले गिर्यारोहक हिमालयात आपले तंबू ठोकत असले, तरी त्यांनी आणलेला हजारो टन कचरा आज हिमालयीनं पर्वतरांगांचं सर्वात मोठं दुखणं होऊन बसलं आहे.
जे कुठल्याही पर्यटनस्थळाचं होतं, तेच आज एव्हरेस्टचंही होऊ घातलंय. एव्हरेस्टवर चढाई करण्यासाठी गिर्यारोहक आपल्यासोबत तंबू, ऑक्सिजन सिलिंडर्सपासून तर पाण्याच्या, बिअरच्या  बाटल्या आणि अन्नाच्या पाकिटापर्यंत जे काही नेतात, ते तिथेच फेकतात. त्यामुळे त्या कचर्‍याचा एक अतिशय मोठा प्रश्न आ वासून उभा राहिलाय; पण त्यापेक्षाही गंभीर प्रश्न आहे, तो म्हणजे मानवी विष्ठेचा. त्याचं काय करायचं?. 
मोठे खड्डे करून ही मानवी विष्ठा त्यामध्ये पुरायची ही आजवरची परंपरागत पद्धत; पण त्यामुळे हा प्रश्न अधिकच बिकट होतोय. कारण उन्हाळ्यात जेव्हा बर्फ वितळतं, तेव्हा ही विष्ठा पुन्हा उघड्यावर येते आणि बर्फासोबत, वितळलेल्या पाण्यासोबत खाली येते, सगळीकडे मिसळते. एव्हरेस्टच्या पायथ्याशी असलेल्या नागरिकांचं आयुष्यच त्यामुळे धोक्यात आलंय. दिवसेंदिवस हा प्रश्न चिघळत चाललाय. 
नेपाळ सीमेवरून एव्हरेस्टवर चढाई करणार्‍यांची संख्या सर्वाधिक आहे. गेली काही वर्षे नेपाळ या समस्येशी झुंजतंय. यंदाही 14 एप्रिलपासून एव्हरेस्ट सफाई मोहीम त्यांनी सुरू केलीय. एडमंड हिलरी आणि तेनसिंग नोर्गे यांनी 29 मे 1953 रोजी एव्हरेस्ट जगात पहिल्यांदा सर केलं होतं. त्या मोहिमेची आठवण म्हणून ही सफाई मोहीमही 29 मेपर्यंत चालणार आहे. या मोहिमेंतर्गत एकूण किमान दहा हजार किलो कचरा एव्हरेस्टवरून खाली आणण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. अर्थात उद्दिष्टापेक्षा खूपच जास्त कचरा आज एव्हरेस्टवर अस्तित्वात आहे.
एव्हरेस्टवर एवढा कचरा का वाढतोय?. त्याचा प्राथमिक निष्कर्ष म्हणजे, जगभरातून एव्हरेस्टकडे जाणार्‍यांचा ओघ दिवसेंदिवस वाढतोच आहे आणि कचरा समूळ विल्हेवाटीची कोणतीही व्यवस्था तिथे नाही. हिमाच्छादित शिखरांची प्रचंड उंची आणि विपरीत हवामान, यामुळे कचरा, सांडपाणी निचर्‍याची कोणतीही कायमस्वरूपी व्यवस्था आजवर तिथे अस्तित्वातच येऊ शकलेली नाही.
एव्हरेस्टची समुद्रसपाटीपासूनची उंची आहे 20,029 फूट (8,848 मीटर). क्षणाक्षणाला बदलणारं हवामान आणि प्रत्येक क्षणी जीवन-मरणाची झुंज. अशावेळी तिथला कचरा वेचणार की आपला जीव वाचवणार, हा प्रश्नही कायमच महत्त्वाचा ठरला आहे आणि यापुढेही तो तसाच असणार आहे.
हिमालय आणि माउण्ट एव्हरेस्टवरील या कचर्‍याचं मग करायचं तरी काय? हा प्रश्न कसा सुटणार? त्यावर काही उपाय आहे की नाही? जगभरातले तज्ज्ञ आणि गिर्यारोहक या प्रश्नावर विचार करताहेत.
हिमालयातलं हे सर्वोच्च शिखर पादाक्रांत करणारे महाराष्ट्राचे पहिले एव्हरेस्टवीर सुरेंद्र चव्हाण यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली.
त्यांच्या मते एव्हरेस्टवरील कचर्‍याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे, त्यावर तातडीनं उपाय शोधला पाहिजे, हे खरंच; पण त्याला नेपाळ सरकारही तितकंच कारणीभूत आहे.
सुरेंद्र चव्हाण यांनी 18 मे 1998 रोजी एव्हरेस्ट सर केलं. त्यांनी एव्हरेस्टवर केलेली ही चढाई नेपाळच्या बाजूने नव्हे, तर चीनच्या बाजूने केली होती.
चव्हाण सांगतात, त्यावेळीही एव्हरेस्टवरील कचरा खाली आणण्याची बर्‍यापैकी व्यवस्था चीननं केली होती. अर्थात एव्हरेस्टच्या अगदी बेसकॅम्पपर्यंत चीनने केलेली रस्त्यांची व्यवस्था हे त्यातलं एक महत्त्वाचं कारण. त्यामुळे एव्हरेस्टवरील कचरा खाली आणणं त्यांना तुलनेनं जास्त सोपं होतं, आहे.
काही वर्षांपूर्वी एव्हरेस्टवर जाणार्‍यांसाठी नेपाळ सरकारनं रॉयल्टी फी प्रचंड प्रमाणात वाढवली. त्यासंदर्भात नेपाळ सरकारचं म्हणणं होतं, एव्हरेस्टवरील वाढत्या कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठीची ही तरतूद आहे. याच पैशांतून कचर्‍याचा नायनाट केला जाईल आणि गिर्यारोहकांच्या संख्येवरही नियंत्रण आणलं जाईल; ज्यामुळे एव्हरेस्टवरील कचरा आटोक्यात  येईल; पण नेपाळ सरकारनं यातलं काहीही केलं नाही. ना कचर्‍यासंदर्भात फारसं लक्ष दिलं, ना गिर्यारोहकांच्या संख्येवर नियंत्रण आणलं. याउलट पैसे मिळवण्याचा एक मार्ग म्हणूनच नेपाळनं त्याकडे पाहिलं.  
एव्हरेस्ट मोहिमांचंही आता बर्‍यापैकी व्यावसायीकरण झालं आहे. नव्या नियमानुसार आता कोणाही गिर्यारोहकाला वैयक्तिकपणे एव्हरेस्टवर जाण्याची परवानगी नाही. वेगवेगळ्या संस्थांना त्यासंदर्भातला परवाना देण्यात आला आहे. त्यांच्या माध्यमातूनच तुम्हाला एव्हरेस्ट मोहिमेवर जाता येऊ शकतं. गिर्यारोहकांच्या पूर्वतयारीपासून ते त्यांना प्रमाणपत्र देण्यापर्यंतचे सारे अधिकार या संस्थांकडे आहेत. अर्थातच गिर्यारोहकांकडून त्याचे पैसे ते आकारतात. त्यामुळे कचर्‍याच्या विल्हेवाटीची जबाबदारीही या संस्थांचीच असते, असायला हवी.
एक जागरूक प्रतिनिधी म्हणून प्रत्येक गिर्यारोहकानं किमान आपण आणलेला, केलेला कचरा संपूर्णपणे खाली आणणं हेदेखील अपेक्षितच आहे; पण हिमालयातील प्रतिकूल हवामानात जीव वाचवण्यालाच सर्वोच्च प्राधान्य मिळणं साहजिकच आहे. 
सुरेंद्र चव्हाण सांगतात, ‘लिव्ह नो ट्रेस’ (आपल्या कोणत्याही खुणा मागे ठेवू नका) ही संकल्पना तर प्रत्येक गिर्यारोहकानं मनाशी बाळगली पाहिजेच; पण एव्हरेस्टवरील कचरा कमी करण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर, गिर्यारोहकांचं प्रशिक्षण, त्यासाठीचे काटेकोर नियम, कायमस्वरूपी टॉयलेट्स, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान. यासारख्या प्रत्येक गोष्टीचा वापर करावा लागेल. काहीही करून ही समस्या तडीस न्यावीच लागेल, नाहीतर एव्हरेस्टच्या, हिमालयाच्या या विद्रुपीकरणाबद्दल निसर्ग आपल्याला कधीच क्षमा करणार नाही.
एव्हरेस्ट आणि हिमालयीन मोहिमांसंदर्भात मार्गदर्शन आणि सहाय्य करणारी ‘द हिमालयन क्लब’ नावाची एक नामांकित संस्था मुंबईत कार्यरत आहे. याच क्लबतर्फे गिर्यारोहणाच्या संदर्भात जगभरात प्रमाण मानलं जाणारं ‘द हिमालयन र्जनल’ हे नियतकालिक प्रकाशित केलं जातं. या र्जनलचे माजी संपादक आणि प्रख्यात गिर्यारोहक राजेश गाडगीळ यांनीही एव्हरेस्टवरील कचर्‍याच्या संदर्भात तीव्र चिंता व्यक्त केली.
गाडगीळ सांगतात, आपण केलेला, नेलेला कचरा आपणच परत आणणं, ही आदर्श स्थिती; पण आदर्श आणि वस्तुस्थिती यात कायमच तफावत असते. एव्हरेस्टवरील वाढत्या कचर्‍याच्या प्रश्नाला सर्वोच्च प्राधान्य दिलं पाहिजे, हेही खरं; पण हिमालयाची उंची, खराब हवामान, मानवी र्मयादा, बर्फाखाली गाडला गेलेला कचरा, शिवाय स्वत:च्या शरीराचंच ओझं होत असताना आपला जीव वाचवणं सोडून कोणी कचर्‍याची काळजी करेल, हे शक्यच नाही. त्यामुळे एव्हरेस्टवरील कचर्‍याचा प्रश्न सोडवण्यासाठी वेगळ्या मार्गांचा विचार करावा लागेल.
 प्रत्येक गिर्यारोहकानं किमान आठ किलो कचरा तरी परत आणला पाहिजे, असं बंधन नेपाळ सरकारनं घातलं होतं; पण प्रत्येक गिर्यारोहक किमान किती गोष्टी आपल्याबरोबर नेतो आणि आणू शकतो, याचाही वास्तव विचार करावा लागेल. 
एव्हरेस्टवर मुख्यत: कॅम्प तीन आणि चारसाठी ऑक्सिजन सिलिंडर्सची गरज पडते. एक सिलिंडर साधारण साडेतीन किलोचं. प्रत्येक गिर्यारोहकाला किमान चार सिलिंडर्स तरी लागतातच. 14 किलो वजन फक्त सिलिंडर्सचंच झालं ! इतर गोष्टी वेगळ्या. आपल्यासोबत किती आणि काय काय गोष्टी न्यायच्या, किती परत आणायच्या, यावर काहीही बंधन नाही. त्यासाठी घेतलं जाणारं डिपॉझिटही तसं किरकोळच. 
वातावरणाचा विचार केला, तर 18 हजार फुटावर कोणतीही गोष्ट सहजासहजी डिकंपोज होत नाही. समजा मुंबईत एखादी गोष्ट डिकंपोज व्हायला पाच दिवस लागत असतील, तर इथे त्याला पाचशे दिवस लागतील! 
नेपाळ सरकारसाठीही एव्हरेस्टवरील कचर्‍यापेक्षा सार्वजनिक आरोग्य, नोकरी, बेरोजगारी, शिक्षण. यासारखे अनेक प्रश्न जास्त महत्त्वाचे आहेत. त्यामुळे एव्हरेस्टवर कचर्‍याचा जो डोंगर उभा राहतोय, त्याच्या निराकरणासाठी आत्ता सुरू असलेले उपाय निश्चितच पुरेसे नाहीत. 
कुठल्याही पर्यटनासाठी जसे वेगवेगळे पॅकेजेस असतात, तसंच एव्हरेस्टचंही आहे. जास्त पैसे द्या, मग तुम्हाला जास्त सुविधा मिळतील; पण अशा मोहिमांसाठी ‘गिर्‍हाइकं’ तुरळक असतात. 
एव्हरेस्टवरील काही आधुनिक मोहिमांमध्ये मलविसर्जनासाठी बॅग देतात. ही बॅग नंतर खाली आणली जाते आणि त्या मलाची विल्हेवाट लावली जाते; पण कमीत कमी पैशांत आपली मोहीम आखणं हे प्रत्येकाचंच ध्येय असतं, त्यामुळे या ‘लक्झरी’कडे कोणीच फारसं लक्ष देत नाही.
एव्हरेस्टवरील कचरा कमी करायचा तर त्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रय} करायला हवेत. प्रत्येक मोहिमेतला निधी त्यासाठी राखून ठेवायला हवा. काही मोहिमा गिर्यारोहणाऐवजी केवळ कचर्‍यासाठीच आखायला हव्यात. या मोहिमेत केवळ कचरा उचलणं, त्याची योग्य विल्हेवाट लावणं हेच ध्येय असलं पाहिजे.
लष्करी शिस्तीनंच हे सारं करावं लागेल, त्याशिवाय पर्याय नाही. हिमालय या कचर्‍यानं विद्रूप तर होतोच आहे; पण त्याला एका टाइम बॉम्बचंही स्वरूप येत चाललंय. जगभरातील तज्ज्ञ यासंदर्भात काळजी व्यक्त करताहेत. या टाइम बॉम्बचा केव्हा विस्फोट होईल, काहीच सांगता येत नाही. त्यामुळे काळजी अगदी आज, आत्तापासूनच घ्यायला हवी.

काय काय आहे एव्हरेस्टवर?
जे गिर्यारोहक हिमालयातल्या या सर्वोच्च शिखरावर चढाईसाठी जातात, तिथे ते काय काय कचरा करतात? कुठल्याही पर्यटनस्थळी जे चित्र दिसतं, त्याचीच आवृत्ती याठिकाणीही पाहायला मिळते. बिअरच्या रिकाम्या बाटल्या, रिकाम्या कॅन्स, पॅकेज्ड फूड, त्याचे रॅपर्स, किचन वेस्ट, जैविक आणि अजैविक कचरा, ट्रेकिंगसाठी लागणारी, खराब झालेली उपकरणं, रिकामी ऑक्सिजन कॅनिस्टर्स, तंबू आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या गिर्यारोहकांची विष्ठा. यामुळे एव्हरेस्टला सर्वात मोठा धोका पोहोचतोय. 
दरवर्षी उन्हाळ्यात म्हणजे मे महिन्यात एव्हरेस्टच्या चढाईचा ‘सीझन’ सुरू होतो. प्रत्येक जण मोठय़ा जिद्दीनं, हिमतीनं आणि तयारीनं जगातल्या या सर्वोच्च शिखरावर चढाई करण्यासाठी निघत असला तरी, अत्यंत कठीण परिस्थिती, तुमचा सर्वांगीण कस पाहणारी चढाई, सातत्यानं बदलत असलेलं हिमालयाचे रौद्र-भीषण रूप, वादळी वारे, कोसळणारे बर्फाळ कडे यामुळे यातले बहुतांश जण आपलं स्वप्न पूर्णच करू शकत नाहीत. अनेकांना अध्र्यातूनच माघारी फिरावं लागतं, तर या संघर्षात मानवी शक्ती कमी पडल्यानं बर्‍याच जणांना त्या बर्फातच कायमची समाधी घ्यावी लागते. त्यांचे मृतदेहही वर्षानुवर्षे एव्हरेस्टनं आपल्या बर्फाळ बाहूंत ‘जतन’ करून ठेवले आहेत. 

दरवर्षी दीड लाख पर्यटक!
एव्हरेस्ट हे जगभरातल्या गिर्यारोहकांचं नुसतं आकर्षणच नाही, तर पट्टीच्या गिर्यारोहकांसाठी एक सर्वोच्च आव्हान म्हणूनही हे गिरीशिखर कायम खुणावत असतं. त्यासाठी जगभरातले नाणावलेले गिर्यारोहक ‘एव्हरेस्टवर चढाई’ हाच एक ध्यास, एक स्वप्न घेऊन जगत असतात.  
दरवर्षी जगभरातले जवळपास 1200 ते 1500 गिर्यारोहक हे शिखर सर करण्याचं स्वप्न घेऊन हिमालयात पाऊल ठेवतात. हे झालं फक्त एव्हरेस्टसंदर्भात. त्यापेक्षा छोटी शिखरं सर करणारे आणि हिमालय परिसरात फिरणारे अगणित गिर्यारोहक, पर्यटक तिथे भटकंती करीत असतात. सागरमाथा प्रदूषण नियंत्रण समितीच्या म्हणण्यानुसार अशा पर्यटकांची संख्या दरवर्षी जवळपास दीड ते दोन लाख इतकी प्रचंड आहे.
sameer.marathe@lokmat.com
(लेखक लोकमत वृत्तसमूहात उप वृत्तसंपादक आहेत.)

Web Title: Mount Everest polluted with tons of trash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.