मॉडेल
By Admin | Updated: February 21, 2015 13:54 IST2015-02-21T13:54:52+5:302015-02-21T13:54:52+5:30
उजेडानं बिचार्याचे डोळे दिपायचे. लुडकायचा मधूनच! हळूहळू थोडा थोडा वाकत वाकत अचानकच गुडघ्यावरचे हात निसटायचे की झटका बसायचा!!

मॉडेल
>चंद्रमोहन कुलकर्णी
उजेडानं बिचार्याचे डोळे दिपायचे. लुडकायचा मधूनच! हळूहळू थोडा थोडा वाकत वाकत अचानकच गुडघ्यावरचे हात निसटायचे की झटका बसायचा!! ‘‘ओ बाबा, नीट बसा की मघासारखं.’’- आमचा आवाज जरा वाढायचा. .नंतर नंतर पोरं लक्षच द्यायची नाहीत त्याच्याकडे!!
--------------
फुल फिगर स्टडीचा दिवस असला की सर म्हणायचे,
‘‘आणा मॉडेलला बोलावून.’’
आम्ही लगेच पर्वती पायथ्याशी असलेल्या झोपडपट्टीत जाऊन मॉडेलला घेऊन यायचो. तशी बोलावून आणण्याची वेळही कमीच यायची, कारण बर्याच वेळा मॉडेल कॉलेजच्या आसपास घिरट्या घालतच असायचं खरं तर.
सातला कॉलेज सुरू. मॉडेलला आणून बसवून लाईट बिईट लावून अँगल वगैरे सेट होईपर्यंत आठ वाजायचे.
सेटिंग झालं, की मॉडेल म्हणायचं,
‘‘आलोच जाऊन!!’’
मॉडेल कसं?
वृद्ध. ठार ब्लॅक. पांढर्या मिश्या, पांढरे कपडे, फुल शर्ट, धोतर, टोपी.
एकच विशेष जबरदस्त गोष्ट : स्वच्छ निळे डोळे!!
मॉडेलला दिवसाचे बसायचे पाच रुपये मिळत. त्यामुळे तो म्हणायचा, ‘‘आलो, जरा जाऊन येतो!’’
पर्वती पायथ्याशी गुत्ता.
पव्वा लावून यायचा, किंचित डुलत डुलत येऊन जागेवर बसायचा. बसायच्या आधी लाईट ऑन करायच्या वेळी एक गोष्ट विसरायचा नाही : बार.
माणिकचंद नाहीतर गाय छाप काळ्या तंबाखूचा (जरा कडेला जाऊन पाठमोरा होऊन जोरात मळून) एक सणसणीत बार भरणार आणि मगच चढणार स्टुलावर बसायला.
पोझ कशी?
कंबर पाठ मान ताठ ठेवून दोन्ही हात गुडघ्यावर गुडघा पकडून धरल्यासारखी.
लाईट ऑन,
चित्र सुरू.
ड्रॉइंगबोर्डवर कागद, पिना वगैरे लावून पेन्सिलींना टोकबिक करून ड्रॉइंग करून होता होताच साडेदहा होत. छोटी सट्टी.
मॉडेल, पोरं, मास्तर. सगळे चहा प्यायला, बिड्या मारायला.
जरा वेळानं परत ड्रॉइंग सुरू.
मॉडेलनं जुना बार थुंकून देऊन नवीन भरलेला, त्यामुळे फ्रेश होऊन मघापेक्षा अजून ताठ बसलेला.
थोड्या वेळानं व्हायचं काय, तर ऊन चढायचं तसतशी मॉडेलला दारू चढायची.
कारण मुळातली पावशेर लावलेली. तंबाखू, बिडी, चहा या सगळ्याचा परिणाम आणि मुख्य म्हणजे प्रखर लाईट पडायचा त्याच्या डोळ्यावर.
अचानकच लुडकायचा मधूनच! उजेडानं बिचार्याचे डोळे दिपायचे.
हळूहळू थोडा थोडा वाकत वाकत अचानकच गुडघ्यावरचे हात निसटायचे की झटका बसायचा!!
महाराज जागे व्हायचे. करंगळी वर करून दाखवायचे आणि धार मारून यायचे.
पुन्हा धोतर सावरून बसले की पोरं म्हणायची, ‘‘बाबा, नीट बसा मघासारखं.’’
तो परत काहीतरी अँडजेस्ट केल्यासारखं करून बसायचा.
परत ड्रॉइंग सुरू.
तिसर्या सिटिंगला वातावरण तापायचं.
मघाच्या सिटिंगच्या वेळी केलेलं धोतराचं ड्रॉइंग आता फापलायचं!
‘‘ओ बाबा, नीट बसा की मघासारखं.’’
- आमचा आवाज जरा वाढायचा.
‘‘नीटच हाय नव्हंका!’’
मधेच सर यायचे.
‘‘अरे काय रे, काय करता ड्रॉइंग, बघा जरा नीट धोतर!’’
झालं.
परऽऽत सुरू सगळं पहिल्यापासून.
तोपर्यंत मॉडेलला चांगलीच चढलेली असायची. सर असेपर्यंत कसाबसा दम धरून तो जे ताठ बसलेला असायचा, तो सर गेले, की पार ढेपाळायचा. वाकूनच बसायचा जवळजवळ!
पोरं नंतर नंतर लक्षच नाही द्यायची त्याच्याकडे. धोतरबितर मनानं जमेल तसं काढून रंगवायला सुरु वात!
डोळे तेवढे निळे काढायला विसरायचं नाही!
काळा माणूस, पांढर्या मिश्या, निळे डोळे.
पांढरी टोपी. कधीकधी चेंज म्हणून ऑरेंज फेटा. किंवा डार्कग्रे जाकीट. धोतर.
असा स्टडी.
कसा होणार आमचा अभ्यास आणि कशी समजणार आम्हाला ह्यूमन बॉडी ! सगळा वेळ धोतराची साफसफाई करण्यातच जायचा.
कसला लाईट आणि कसली शेड? कसलं बोन स्ट्रक्चर आणि बायसेप्स नि ट्रायसेप्स!
परीक्षेपुरतं ठोकायचं काहीतरी, नि शेवटी व्हिक्टर प्रेरार्डच्या पुस्तकात बघून अँनॉटॉमी पाठ करायची आणि पुढच्या वर्गात जाऊन बसायचं!
त्यात तुम्ही अँप्लाईड आर्ट शिकत असाल, तर मग विचारायलाच नको. म्हणे मार्केटमधे ह्याचा काही उपयोग नसतो!
कसे होणार चित्रकार आम्ही?
इतक्या वेळा त्या मॉडेलचं चित्र काढलंय (चित्र नाही म्हणायचं: लाइफ म्हणायचं!) की आत्तासुद्धा मनानंच त्या मॉडेलचं चित्र काढता येईल.
डोळे तेवढे निळे काढायला विसरायचं नाही!
(लेखक ख्यातनाम चित्रकार आहेत.)