Miracles in 'Kargill'! | ‘कारगील’मधील चमत्कार!

‘कारगील’मधील चमत्कार!

त्यावेळी माझे पती लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर नौशेरा सेक्टरमधील सुंदरबनीला युनिट १५ पंजाब कमांड करत होते. मी दिल्लीला माझ्या मुलींच्या सोबत राहत होते. त्यांच्या शिक्षणासाठी त्यांच्या सुट्ट्या लागल्या की सुंदरबनीला जायचो. फिल्ड एरियामधल्या मेकशिफ्ट घरांमध्ये राहायला मुलींना फार आवडायचे; पण त्या वेळेला शाळेच्या सुट्ट्या संपण्याआधीच परत यावं लागलं, कारण युद्धाचं वातावरण तापायला लागलं होतं. आमच्या जवानांची काही कुटुंबे पण तिथे होती. त्या सर्वांनाच परत पाठविण्याची तयारी सुरू झाली. सीओची पत्नी या नात्याने त्यांना समजावून सांगण्याची जबाबदारी माझी होती. 


‘घाबरू नका, सर्व काही ठीक होईल,’ असं त्यांना सांगताना माझ्या मनातली धाकधूक त्यांना कळू द्यायची नव्हती. नक्की काही कळत नव्हतं, की हे जे वातावरण आहे ते किती दिवस असंच राहील.
ऑलआउट युद्धच होईल की काय, हे नक्की सांगता येत नव्हतं; पण युनिटला लागूनच हायवे होता. तिथून बोफोर्स गन जाताना दिसत होत्या. त्यावरून अंदाज येत होता आणि माझ्या पतींच्या हाताला एक छोटीशी अ‍ॅल्युमिनिअमची कॉईन बांधलेली दिसली. ज्यावर त्यांचा सर्व्हिस नंबर कोरलेला होता. त्याबद्दल विचारलं तर ते म्हणाले, ‘‘युनिटमध्ये सगळ्यांनाच हे हाताला लावलं आहे. आयडेन्टीटीसाठी हे बांधतात. पुढे जास्त विचारलं नाही. कारण मला कळून चुकलं की कुठल्या परिस्थितीत याची गरज लागते ते. सर्व फॅमिलीना पाठविल्यानंतर मी व माझ्या मुली आम्ही दिल्लीला परतीचा प्रवास सुरू केला. सकाळी दिल्लीला पोहोचलो. घरात आवराआवर करेपर्यंत संध्याकाळ झाली. देवाला दिवा लावून, तुळशीला दिवा ठेवायला मी अंगणात जायला निघाले. दार उघडलं तर दारात आमच्या युनिटचा एक जवान उभा होता. ‘सत् श्री अकाल’ म्हणून त्याने अभिवादन केलं. मी म्हटलं, ‘‘हां, कैसे आना हुआ?’’ तो म्हणतो, ‘‘एसएम साहब ने भेजा है, मेसेज हैै आपके लिए. साहब को गोली लगी हैै छातीमें, जखमी हुये हैै. एलसीसे उनको अस्पताल लाये हैै.’’मी मागे फिरून ड्रॉइंगरूममध्ये खुर्चीवर बसले. त्याला म्हटलं, ‘‘आप ठीकसे बताओ अभी, किसको गोली लगी हैै?’’ तो पुन्हा तेच म्हणाला, ‘‘जी, सीओ साहब को गोली लगी हैै.’’ माझा विश्वासच बसेना. मी खात्री करण्यासाठी पुन्हा विचारलं, ‘‘किसको गोली लगी? अपने साहबको, सीओ साहब को, निंभोरकरसाहब को?’’ त्याने पुन्हा होकार दिला. माझ्या मुली घरीच होत्या. त्यांना धक्का बसला होता. तोठी दहावीत व धाकटी आठवीत. त्यांना चांगलीच समज होती. मला वाटलं देव अशा वेळेला तुम्हाला काहीतरी बळ देतो. मला आश्चर्य वाटलं. मी अजिबात गर्भगळीत झाले नाही किंवा रडले नाही. नुकतंच नवीन घरात शिफ्ट झाल्यामुळे लँडलाईन सुरू झालेला नव्हता. मी लगेच पैैसे घेतले आणि समोरच असलेल्या एसटीडी बूथवर गेले. एसएम साहेबांना फोन लावला. त्यांना म्हटलं, ‘‘साहब, आपको वाहे गुरू की सौगंध हैै, साहब जिस भी हालत में हैै, आप सही सही बताओ.’’ ते म्हणाले, ‘‘साहब को मोर्टर बॉम्ब का स्प्लिंटर लगा हैै, छाती में, लेकिन आप धीरज रखो, साहब को कुछ नही होगा, बच जायेंगे, तुसी फिक्र ना करो.’’
मी घरी परत आले. आम्हा तिघींच्या विमानाचे तिकीट काढायला सांगितलं. माझी मैत्रीण म्हणाली, की मुलींना माझ्याकडेच राहू दे, खूप खर्च होईल. त्या वेळेला आमच्या बजेटला परवडणारा नसायचा विमानप्रवास. पण मी तिला म्हटलं, मुलींनी त्यांना भेटणं फार जरुरीचे आहे. ज्यापण कंडिशनमध्ये असतील त्यांना आपल्या पापाला बघू देत.’’
मला अजून आठवतं, त्याच विमानामध्य एनडी टीव्हीची बरखा दत्त व तिची टीमसुद्धा होती. ते कारगिलकडे निघाले होते. त्या वेळेला ती एवढी फेमस नव्हती.In fact, that flight took her to fame माझी मन:स्थिती ठीक नव्हती; त्यामुळे मी तिच्याशी संवाद साधला नाही. जर बोलणं झालं असतं तर कदाचित कारगिल युद्धाचं बरखाचं पहिलं प्रक्षेपण तिथूनच झालं असतं.
आम्ही जम्मूला उतरून थेट अखनूर मिलिटरी हॉस्पिटल गाठलं. त्याही परिस्थितीत माझ्या पतींनी स्मितहास्य केलं आणि माझ्या डोक्यावरचं मणामणाचं ओझं कमी झालं. डॉक्टरांना भेटले. ते म्हणाले की काळजी करू नका. निंभोरकरांना दिल्लीला हलवण्याचा निर्णय झाला. सकाळी दिल्ली स्टेशनवरून सरळ आर. आर. हॉस्पिटलला गेलो. लगेच एचओडी डॉ. बोरकर आणि त्यांच्या टीमने यांचं चेकअप केलं आणि सांगितलं की अजिबात हालचाल करायची नाही; कारण स्प्लिंटर हृदयाच्या अगदी जवळ आहे. १.२ सें.मी.वर आणि फर्निक नर्व्हमध्ये रुतून बसलेलं आहे. ती नर्व्ह श्वासोच्छवास घेण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा भाग असते. जर स्प्लिंटर हललं तर फारच डेंजरस आहे. दुसऱ्याच दिवशी आॅपरेशन करायचं ठरवलं. रात्रभर झोप आली नाही. सकाळी ४-४.३० ला उठून अंघोळ करून पूजा केली. देवाला हात जोडले आणि इतके दिवस रोखून धरलेले अश्रू अनावर झाले. देवाच्याच कृपेने ऑपरेशन व्यवस्थित पार पडलं. डॉ. गांगुलींनी माझ्या हातावर तो बॉम्बचा तुकडा ठेवला. यांच्या छातीतून काढलेला आणि म्हणाले," This is the culprit. He is out of danger." त्या वेळेला मला त्यांच्यात देव दिसला.
आमच्यासोबत असलेले काही जवान ऑपरेशन थिएटरपासून हलायला तयार नव्हते. डॉक्टरांनी रागावलं की तेवढ्या वेळात गायब व्हायचे आणि डॉक्टर्स दिसेनासे झाले की पुन्हा हजर. ‘‘जब तक साहब का ऑपरेशन खत्म होकर बाहर नही लाते हम यहां से हिलेंगे नही.’’ खूप खूप जीव टाकतात हे लोक. जेव्हा हे जखमी झाले तेव्हा यांना घेऊन जीपमध्ये ठेवलं तर त्या जीपच्या बॉनेटवरच बॉम्ब येऊन पडला. तिथून लगेच यांना उचलून दुसऱ्या जीपमध्ये ठेवलं. जीप थांबवता येत नव्हती; तर सिनेमामध्ये पाहतो त्याप्रमाणे यांच्यासोबतचे जवान गाडीला लटकून कितीतरी अंतर गेले; पण यांची साथ सोडली नाही. जखमेतून फवाऱ्यासारखं रक्त उडत होतं. त्यातल्या एकाने आपली पगडी सोडून यांच्या जखमेवर घट्ट बांधली. सुरक्षित ठिकाणावर आल्यानंतर यांना अ‍ॅम्ब्युलन्समध्ये ठेवून अखनूरला हॉस्पिटलला आणलं. त्या वेळेच्या अ‍ॅम्ब्युलन्स म्हणजे वन टन लष्करी वाहनांच्याच बनवल्या होत्या. डोंगराळ भागातून तसल्या अ‍ॅम्ब्युलन्समधला प्रवास फारच वेदनादायक होता.
असो! या सर्वातून देवाच्या असीम कृपेनं व्यवस्थित बाहेर पडले, आणि दिल्ली पोस्टिंगची चॉईस असूनसुद्धा त्यांनी परत आपल्या युनिटमध्येच जाणं पसंत केलं. सर्जन कमोडर बोरकरांनी मला सांगितलं, की मी आज यांना ‘फिट टू कमांड’चं सर्टिफिकेट देतो आहे. हा एक चमत्कार आहे. जो बॉम्बचा तुकडा यांच्या खांद्यातून आत शिरला, तो पूर्ण फुफ्फूस कापत गेला, पण चमत्कार असा की इतक्या गुंतागुंतीतून त्या बाँबच्या तुकड्यानं ‘फर्निक नर्व्ह’ नावाची महत्वाची शीर तोडली नाही. हृदयापासून १ सें.मी.वर थांबला. तुम्ही लोकांनी काही चांगली कामं केली असतील त्याचं फळ असावं हे.’’ हे डॉक्टरांचेच शब्द आहेत.
आणखी दुसरी फार चांगली गोष्ट कदाचित चमत्कार म्हणता येईल. आमच्या युनिटमध्ये एकही जीवितहानी झाली नाही. इतक्या भयंकर गोळीबारात आणि बॉम्बच्या वर्षावात आमचे ट्रूप सतत असूनसुद्धा सर्वात गंभीर जखम कमांडिंग ऑफिसरलाच (सीओ) झाली. त्यामुळे आमच्या युनिटमध्ये सर्व म्हणायचे की, सीओ साहबने पुरे युनिट का खतरा अपने उपर ले लिया. या युद्धात अनेक लोक वीरगतीला प्राप्त झाले. त्यांना शतश: नमन. खूप जण गंभीररीत्या जखमी झाले आणि या युद्धात सहभागी होऊन लेफ्टनंट जनरल निंभोरकर यांच्यासारखे सुखरूप आहेत. त्या सर्वांनाच स्मरण करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करते.

  • शीला राजेंद्र निंभोरकर

Web Title: Miracles in 'Kargill'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.