Metropolitan cities and its leaders in the world!.. | महानगरांचे भाग्यविधाते! 
महानगरांचे भाग्यविधाते! 

ठळक मुद्देसुकर भविष्यासाठी आजच ‘तयार’ होत असलेल्या जगभरातील शहरांमधल्या प्रयोगांची कहाणी..

- सुलक्षणा महाजन

प्रत्येक शहराच्या, महानगराच्या वेगवेगळ्या समस्या असतात. काळाच्या ओघात त्यात वाढ आणि बदलही होत असतात. वाहतुकीपासून ते पर्यावरणापर्यंत आणि पाण्यापासून ते कचर्‍यापर्यंत. अनेक समस्या नागरिकांच्या जीवनमानावर परिणाम करीत असतात. या समस्या आधीच हेरून त्यावर काम करावे लागते. त्या त्या महानगरांचे नायक म्हणवले जाणारे महापौर जर द्रष्टे आणि आव्हाने स्वीकारणारे असतील, तर ते या आव्हानांना यशस्वीपणे तोंड तर देतातच; पण त्यावर उपायही शोधतात. जगभरातील अशा अनेक ‘नायकां’नी आपल्या महानगराला एक वेगळेपण प्राप्त करून दिले आहे. 
जेमी लर्नर
कुरीचीबा ह्या ब्राझीलमधील शहराचे महापौर जेमी लर्नर हे 1971 ते 75, 79 ते 83 आणि 83 ते 92 असे तीन वेळा निवडून आले होते. तेथे नागरिक प्रत्यक्ष मतदान करून महापौर निवडतात. जेमी लर्नर हे व्यवसायाने वास्तू आणि नगररचना तज्ज्ञ असलेले राजकारणी आहेत. वयाच्या तिशीमध्ये महापौर असताना त्यांनी कुरीचीबा शहरामध्ये एकात्मिक सार्वजनिक वाहतूक प्रकल्प हा अतिशय नावीन्यपूर्ण प्रकल्प आखून तो राबविला. त्यांच्या ह्या बीआरटी (बस रॅपिड ट्रान्झिट) प्रकल्पाचा आज दोनशेपेक्षा जास्त जागतिक शहरांमध्ये विस्तार झाला आहे. त्यांच्या ह्या क्रांतिकारी प्रकल्पाने कुरीचीबा शहराचे स्वरूपच बदलून टाकले. तेथील शहरामधील वाहतूक कोंडी, प्रदूषण, अपघात अशा अनेक समस्या सुटल्यामुळे आणि वाहतूक परवडणारी झाल्यामुळे नागरिकांच्या जीवनमानाचा स्तर उंचावला. त्यांनी कुरीचीबा शहराला ‘आदर्श हरित शहर’ म्हणून जगामध्ये मान मिळवून दिला. प्रत्येकी 54 चौ.मी. (सहाशे चौ. फूट) इतक्या हिरवे बगिचे तेथे नागरिकांच्या सहभागातून निर्माण झाले आहेत. ‘जर तुम्हाला प्रदूषणाची समस्या सोडवायची असेल तर मोटारवापर कमी करा’, असाच संदेश ते शहरांच्या नेत्यांना देतात. त्यांच्या या सल्ल्याला जागून अनेक शहरांच्या महापौरांनी ती क्रांती अमलात आणली आहे. कोरियामधील सेउल, अमेरिकेतील सन फ्रान्सिस्को, इस्तंबुल, चीन, भारत आणि दक्षिण अमेरिकेतील अनेक देशांमधील शहरे वाहतुकीसाठी बीआरटीचा अल्पखर्चाचा, कार्यक्षम आणि लवचिक असलेला पर्याय स्वीकारत आहेत.
एन्रिक पेनेलोसा व ब्लूमबर्ग
कोलंबिया देशातील बगोता या शहराचे मेयर एन्रिक पेनेलोसा हे त्यांच्या पावलावर पाऊल टाकणारे दुसरे महत्त्वाचे महापौर. तेसुद्धा जेमी लर्नर यांच्याप्रमाणे वास्तू आणि नगररचनाकार आहेत. अमेरिकेतील अनेक विद्यापीठांमध्ये ते अध्यापनही करतात. सार्वजनिक वाहतुकीला सर्वाधिक प्राधान्य देऊन, पादचारी आणि सायकलींचा वापर सुकर करणारे, दोन वेळेला न्यू यॉर्क शहराचे महापौर म्हणून निवडून आलेले मायकल ब्लूमबर्ग हे अजून एक महत्त्वाचे नागरी नेतृत्व. त्यांनी वाहतूक तज्ज्ञ जेनेट सादिक खान यांच्या मदतीने आणि सल्ल्याने  न्यू यॉर्कच्या वाहतूक क्षेत्नामध्ये त्यांनी मोठय़ा सुधारणा घडवून आणल्या. मोटारींचे प्रस्थ कमी केले, पादचारी आणि सायकलींना रस्त्यावर प्राधान्य मिळवून दिले. रस्ते सुरक्षित केले. त्यांच्या या कामाला नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळाला. अब्जाधीश असलेल्या ब्लूमबर्ग यांनी आता अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी डेमोक्रॅटिक पक्षातर्फे आपली उमेदवारी जाहीर केली आहे.
ब्लूमबर्ग यांनी त्यांच्या विश्वस्त संस्थेमार्फत जगातील शहरांचे नेतृत्व प्रभावी आणि बळकट करण्याची मोठी मोहीम हाती घेतली आहे. ‘मेयर्स चॅलेंज’ अशी एक स्पर्धा दरवर्षी त्यांच्या संस्थेतर्फे घेतली जाते. त्याद्वारे  आपल्या शहरांमधील विशिष्ट समस्या सोडविण्यासाठी महापौरांनी सुचविलेल्या नावीन्यपूर्ण संकल्पना निवडल्या जातात. त्या प्रत्यक्षात राबविण्यासाठी प्रायोगिक प्रकल्पांना आर्थिक मदत दिली जाते. दक्षिण अमेरिका, युरोप आणि अमेरिका येथील अनेक शहरांनी त्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन नावीन्यपूर्ण नागरी प्रकल्प हाती घेऊन राबविले आहेत. 
जगातील अनेक शहरांचे महापौर अशा संकल्पनांपासून स्फूर्ती घेत आहेत. या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या महापौरांनी निवडलेल्या समस्या आणि त्यांनी शोधलेली नावीन्यपूर्ण उत्तरे यांचे विषय, प्रकार वेगवेगळे आहेत. त्या प्रकल्पांचे प्रत्यक्ष परिणाम बघून, मूल्यमापन करून नंतर त्यांना बक्षिसे दिली जातात. त्यातील काही उदाहरणे बघू. 
इस्माईल द तारो
मेक्सिकोमधील ‘गुआदालजार’ ह्या 1.82 लाख वस्तीच्या शहराचे महापौर इस्माईल द तारो यांनी शहरातील जमिनींवरील बांधकाम प्रकल्पांचे प्रस्ताव नगरपालिकेत सादर करण्यासाठी एक पारदर्शक पद्धत बनवली. त्यामुळे वेळेची बचत होऊन कार्यक्षमता वाढली. शहराच्या नियोजन आराखड्यानुसार प्रस्तावांची तपासणी करणे सुलभ झाले. नागरिकांना सर्व प्रकल्पांचे नियोजन पारदर्शकपणे बघण्याची, तपासण्याची सोय झाली. त्यामुळे शहरातील जमीन, नियोजनाचे नकाशे, बांधकाम व्यवहारामध्ये होणारा भ्रष्टाचार कमी झाला.  प्रकल्पांचे परिणाम बघून शहराच्या बांधकाम नियमात बदल करणे सोपे झाले. मेक्सिको देशानेही राष्ट्रीय पुरस्कार देऊन या प्रकल्पाचा गौरव केला आणि नावीन्यपूर्ण पद्धतीचे अनुकरण इतर शहरांनी सुरू केले. 
फेदेरिको
कोलंबिया देशातील मेडेलिन हे 2.50 लाख वस्तीचे डोंगर उतारावर वसलेले सुंदर शहर आहे. परंतु अनधिकृत झोपडवस्त्या, गरिबी, अंमलीपदार्थांची तस्करी आणि गुन्हेगारी यांनी पोखरलेल्या या शहरातील महापौर फेदेरिको यांनी गरीब लोकांची गुंड सावकारांकडून होणारी आर्थिक लूट थांबविण्यासाठी एका वस्तीमध्ये प्रयत्न केले. वस्ती पातळीवर एक कर्ज देणारी सामाजिक बँक सुरू केली. लहान उद्योग, फेरीवाले अशांना अर्थार्जनासाठी, कुटुंबातील समस्या, आजारपण, अशांसाठी पैशांची निकड असणार्‍या गरीब लोकांना सुलभ आणि कमी व्याजाने कर्ज मिळवून देण्याची व्यवस्था केली. शिवाय गरीब लोकांना अर्थसाक्षर करण्याची योजना राबवली. त्यामुळे सावकारी पाश कमी झाला. लोकांना दिलासा मिळाला. दहशत आणि गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाले. या प्रकल्पाचेही अनुकरण शहरातील इतर गरीब वस्त्यांमध्ये सुरू झाले. 
चिली देशातील सिन्दआगो शहराच्या शाळेतील 50 टक्के मुले अवास्तव लठ्ठ असल्याची समस्या लक्षात घेऊन तेथील महापौराने मुलांना पौष्टिक अन्न आणि शारीरिक व्यायाम यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने काही अभिनव खेळ तयार केले. शाळांना प्रोत्साहन देऊन त्या खेळांच्या स्पर्धा घेतल्या. त्याचे सकारात्मक परिणाम बघून हा कार्यक्रम आता सर्व शाळांमध्ये राबवला जात आहे. आर्थिक सुस्थिती आली तरी भावी पिढीतील मुलांना शारीरिक आणि बौद्धिक दृष्टीने सक्षम करण्यासाठी हे आवश्यक आहे ही त्यामागची भूमिका होती.
असे प्रकल्प फक्त गरीब देशांतच आवश्यक असतात असे नाही तर अमेरिकेतील शहरांनाही अनेक लहान-मोठय़ा समस्या भेडसावत असतात. कधी त्यांचे स्वरूप सामाजिक असते, तर कधी उद्योग-धंदे बदलले, कमी झाले की बेकारीसारख्या समस्या शहरांमध्ये निर्माण होतात आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी नावीन्यपूर्ण उपाय शोधावे लागतात. शहरांचा आर्थिक विकास ही महापौरांची जबाबदारी असते. कोठे कारखाने बंद पडतात, खाणींची शहरे खनिज संपून ओस पडतात, तेथील नागरिक आणि उद्योजक निघून जातात. त्यामुळे दुकानदारी कमी होते. बेकारी, बेरोजगारी वाढते. नवीन आर्थिक उद्योग शोधण्याचे आणि नागरिकांना त्यासातही नवीन कामांसाठी कौशल्य शिक्षण देणे अशी नवनवीन आव्हाने निर्माण होत असतात. त्यावर उत्तरे शोधण्यासाठी सर्जनशीलता लागते, तांत्रिक उपाय, नियोजन आणि आर्थिक गुंतवणूक लागते. अलीकडे सर्वच शहरांना हवामानबदलांमुळे शहरांवर आदळणार्‍या समस्यांचा विचार करणे आवश्यक झाले आहे. पूर, वादळे, हिमवादळे, उष्णतेच्या लाटा, समुद्राची वाढती पातळी अशा प्रकारच्या संकट काळात शहरातील विविध नागरी व्यवस्था कार्यरत ठेवणे, पर्यायी व्यवस्था निर्माण करणे आणि आपत्ती निवारण सज्जता राखणे अशा नवीन नवीन आव्हानांची भर पडते आहे. त्यात शहरांची आणि तेथील नेत्यांची कसोटी लागते आहे. या शिवाय मानवनिर्मित प्रदूषण कमी करण्यासाठी, सार्वजनिक वाहतूक प्रभावी करण्यासाठी आणि अपारंपरिक ऊर्जा वापर वाढविण्यासाठी खूप नवनवीन संकल्पना केल्या जात आहेत, प्रयोग केले जात आहेत. 
एका बाजूने जग झपाट्याने नागरी होत आहे. त्यामुळे जगातील प्रत्येक शहरात कमी-जास्त प्रमाणात समस्या निर्माण होत आहेत. येणार्‍या काळात त्यांना तोंड देण्यासाठी शहराला आणि नागरिकांना सज्ज करणे हे एक मोठे जागतिक आव्हान आहे. तसे पाहिले तर शहरे ही कायमच कोणत्या ना कोणत्या समस्यांना सामोरी जात असतात. परंतु हवामान बदल हे जागतिक आव्हान आहे. अशा शहरांना कार्यरत ठेवणे आणि नागरिकांच्या हालअपेष्टा कमी करून त्यांनाही चांगले जीवनमान मिळवून देणे अशी आव्हाने शहरांपुढे आहेत. शहरांच्या नेतृत्वाची त्यात मोठी कसोटीच लागते आहे. त्यासाठी शहरांचे नेतृत्व प्रगल्भ असणे, सक्षम, ज्ञानी आणि समस्या सोडविण्यासाठी सज्ज करणे हा ‘मेयर्स चॅलेंज’चा उद्देश आहे. आव्हाने स्वीकारणारे, महानगरांच्या समस्या सोडविणारे महापौर ही प्रत्येक शहराची गरज आहे. त्यासाठी प्रयोगशील, धाडसी, वेगळ्या वाटा शोधणारे, आव्हाने स्वीकारू शकणारे नेतृत्व घडविणे ही जगातील सर्वच शहरांची गरज आहे. नगर विकासाशी संबंधित तंत्नज्ञान, नियोजन, व्यवस्थापन, अर्थशास्र, समाज आणि पर्यावरण शास्र यांचे भान असणारे शहरांचे महापौर ही काळाची गरज आहे. अनेक महानगरांचे महापौर देशाच्या अध्यक्षांपेक्षाही जास्त लोकप्रिय असतात आणि देशांचे नेतृत्वही प्रभावीपणे करतात. 

sulakshana.mahajan@gmail.com
(लेखिका प्रख्यात नगर नियोजनतज्ज्ञ आहेत.)

Web Title: Metropolitan cities and its leaders in the world!..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.