गृहिणी-सखी-सचिव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 06:01 AM2019-11-10T06:01:00+5:302019-11-10T06:05:01+5:30

‘फोटोंचा कॉपीराईट’ या विषयावर  एकदा सुनिताबाई आणि माझा  एक छोटासा वाद झाला. सुदैवाने कुठलीही कटुता न येता हा वाद मिटला आणि प्रकाशचित्रकाराचा कॉपीराईट सुनिताबाईंनी मान्य केला. तसेच त्यांच्या फोटोसेशनचे. वेगवेगळी कारणे सांगून त्यांनी  कधीच, कोणाला आपले फोटो काढू दिले नाहीत. पण बर्‍याच वर्षांचे  प्रयत्न आणि सं‘वादा’नंतर,  एका बेसावध क्षणी का होईना,  माझा हट्ट त्यांनी मान्य केला. 

memories of Sunitabai Deshpande on her death anniversary by Sateesh Paknikar | गृहिणी-सखी-सचिव

गृहिणी-सखी-सचिव

googlenewsNext
ठळक मुद्देदि. 7 नोव्हेंबर ही सुनीताबाई देशपांडे यांची पुण्यतिथी. त्यानिमित्त.

- सतीश पाकणीकर

काही व्यक्तींना एखादे काम कसेही झाले तरी ते फक्त होण्याशी मतलब असतो. काही व्यक्ती याच्यापेक्षा थोड्या पुढे असतात. त्यांना ते काम निगुतीने होण्यात थोडाफार रस असतो. त्यामुळे त्या कामात थोडं इकडं-तिकडं झालं तरी त्या ते चालवून घेतात. पण काही व्यक्ती अशा असतात की त्यांना एखादे काम त्याच्या नियोजित पद्धतीनेच झालेले आवडते, उलटपक्षी ते तसेच व्हावे असा त्यांचा आग्रह असतो. आणि असं असण्याचा सगळा त्नास त्यांच्या वाटयाला येतोच. अशा व्यक्तींना ‘ए’ टाईप व्यक्ती म्हणतात असं एक डॉक्टर मला सांगत होते. पुस्तकाच्या पानांवर काळे ठिपके दिसल्याने व त्यातला एखादा ठिपका एखाद्या शब्दावर आल्याने अर्थ बदलतो म्हणून स्वत: सही केलेलं पुस्तकच बदलून द्यायला निघालेल्या सुनीताबाई या अशी व्यक्ती होत्या. त्या त्यांच्या सगळ्याच मतांशी अगदी ठाम असत. त्यापासून जरादेखील ढळत नसत. याचा अनुभव मला वेळोवेळी येत गेला होता. 
माझ्या पहिल्या थीम कॅलेंडरमध्ये मला सहर्ष मदत करणार्‍या सुनिताबाईंचा हा स्वभाव माहित असल्याने पुढच्याच वर्षी मी त्यांच्या घरी पोहोचलो ते ‘आनंदयात्नी पु.ल.’ ही नवी थीम घेऊनच. त्यात मी काढलेली   पुलंची प्रकाशचित्ने वापरणार होतो. त्याच्या पूर्वीच प्रकाशचित्नकार देवीदास बागूल आणि सुनीताबाई-पु.ल. यांच्यामध्ये फोटोंच्या स्वामित्व हक्कावरून तात्विक वाद बराच तीव्र झाला होता. बागुलांनी काढलेले पुलंचे फोटो पु. ल. सत्कार समितीने विनापरवानगी वापरल्याबद्दल त्यांनी पुलंशी पत्न व्यवहार केला होता. त्यात बागुलांबरोबर अनेक मान्यवरांच्या सह्या होत्या. मी बागुलांच्या स्वामित्वहक्काबाबतच्या भूमिकेशी सहमत होतो. या पत्नयुद्धात बागुलांना पाठिंबा देणारे महारथी हळूहळू मागे हटले आणि मी एकटाच बागुलांबरोबर राहिलो होतो. 
पुलंच्या ‘चित्नमय स्वगत’ या पुस्तकासाठी सुनिताबाईंनी मी काढलेले काही फोटो मागितले होते. ते फोटो व त्याची परवानगी मी अतिशय आनंदाने दिली होती. पण मी बागुलांना त्यांच्या  स्वामित्वहक्काबाबत दिलेल्या सहकार्याच्या भूमिकेमुळे थोडा तणावही होताच. तरीही प्रत्यक्ष समोरासमोरच्या भेटीत आदरातिथ्य, माझी विचारपूस करणे हे त्यांच्याकडून चुकले नव्हते. या सार्‍या पार्श्वभूमीवर आता मी पुलंचे फोटो कॅलेंडरमध्ये वापरणार होतो. सुनिताबाईंची प्रतिक्रि या यावर कशी असणार याचाच मी विचार करीत होतो. माझे पुलंच्या त्या प्रकाशचित्नांचे एडिटिंगचे काम पूर्ण झाले होते. एकेदिवशी -‘संध्याकाळी जरा वेळ ठेऊन घरी येऊ शकाल का?’ असे विचारणारा सुनिताबाईंचा फोन आला. त्यावेळी त्यांच्या घरी त्यांचे एक स्नेही व मुंबईतील प्रसिद्ध प्रकाशचित्नकारही येणार आहेत हे त्यांनी मला सांगितले. मला कल्पना आली की ही बैठक नक्कीच ‘फोटोंचा कॉपीराईट’ याविषयी असणार आहे. मी संध्याकाळी ‘मालती-माधव’ या त्यांच्या निवासस्थानी पोहोचलो. 
मला कल्पना होती की माझा सुनिताबाईंशी सामना होता आणि त्यांच्याबरोबर एक विख्यात, प्रथितयश व्यक्ती होती. विषय अवघड, संवेदनशील होता. स्वामित्व हक्काचा !  सुनिताबाईंच्या मते, मी काढलेल्या भाईंच्या फोटोंमध्ये माझ्याबरोबरच भाईंचाही कॉपीराईट आहे/होता. चर्चा सुरू झाली. त्या त्यांच्या आग्रहावर ठाम होत्या. मी त्यांना विचारले, ‘तुम्ही फोटोग्राफी ही एक कला आहे असे मानता ना?’ त्यांचा अर्थातच होकार आला. मी म्हटले की, मी तुम्हाला चार प्रश्न विचारतो. त्यांच्या उत्तरानंतर मला तुमचे स्वामित्वहक्काविषयीचे मत सांगा. मी साक्षात ‘सरस्वतीपुत्नाच्या’ घरीच बसलेलो. त्यामुळे असेल, पण मला शब्द सुचत होते, बोलण्याचे धैर्य आले होते. मी प्रसंग उभा करू लागलो.
मी : ‘मुंबईची गिरगाव चौपाटी आहे. वेळ संध्याकाळची आहे. निसर्गाची सुंदर प्रकाशयोजना आहे. सूर्यास्त होत आहे. मी हे दृश्य माझ्या कॅमेर्‍यात पकडले. या प्रकाशचित्नाचा कॉपीराईट कोणाचा?’
सुनीताबाई : ‘प्रकाशचित्नकाराचा म्हणजे तुमचा. कारण निसर्गाला कॉपीराईट कुठे आहे?’
मी : या प्रकाशचित्नात काहीतरी कमी आहे असे मला वाटले. विचार करताच लक्षात आले की, यात मानवी अस्तित्व यायला हवे. मी खूप भाग्यवान. मला तेवढ्यात तेथे पु. ल. फिरायला आले आहेत असे दिसले. मी फ्रेम पकडून बसलो. काही क्षणातच माझ्या फ्रेममध्ये भाई आले. सूर्यप्रकाश भाईंच्या पाठीमागून असल्याने ‘सिल्ह्युट’ प्रकारचा उत्तम फोटो मला मिळाला. या प्रकाशचित्नाचा कॉपीराईट कोणाचा?’’
सुनीताबाई : ‘तुमचा आणि भाईंचा.’ 
मी : ‘बरं ! आता मी इतका भाग्यवान नाही की, तेथे माझ्यासाठी भाई फिरायला यावेत. पण मला फोटोत मानवी अस्तित्व हवेच होते. तेवढ्यात तेथे एक कचरा गोळा करणारी छोटी मुलगी आली. मला मानवी अस्तित्वाबरोबरच एक हालचालही मिळाली. पुन्हा एक उत्तम फोटो मला मिळाला. या प्रकाशचित्नाचा कॉपीराईट कोणाचा?’’
सुनीताबाई : ‘तुमचा ! कारण ती मुलगी कोणी सेलिब्रिटी नाही. पु. ल. हे सेलिब्रिटी आहेत.’ 
मी : ‘सुनीताबाई, न्यायदेवतेच्या डोळ्यांवर पट्टी आहे. ती लहान-थोर जाणत नाही. तिच्यापुढे सर्वांना समान न्याय आहे.’
माझा चौथा प्रश्न बाकी होता. समोर बसलेली विख्यात, प्रथितयश व्यक्ती माझ्या धाडसाने चकित झाली होती. 
मी : ‘मी फिल्मच्या छोट्याशा तुकड्यावर अभिव्यक्त होतो. तुम्ही लेखक लोक बुद्धी, पेन व कागद यांच्या साहाय्याने  अभिव्यक्त होता. मी एखाद्याचा फोटो काढला तर त्याला व्यक्तीचित्न म्हणतात, तसेच तुम्ही एखाद्याबद्दल लिहिलेत तर त्यालाही व्यक्तीचित्नच म्हणतात. मग मला आता सांगा की ‘औक्षवंत हो मुली’ या लता मंगेशकर यांच्यावर लिहिलेल्या व्यक्तीचित्नावर भाईंचा व लता मंगेशकर यांचा कॉपीराईट हवा. कारण लता मंगेशकरही सेलिब्रिटी आहेत. मग तशी काही नोंद त्या पुस्तकात आहे का?’’
माझ्या या चौथ्या प्रश्नाने त्यांना अंतर्मुख केलं. त्याचं कोणतंच उत्तर त्यांच्याकडे नव्हतं. माझ्या युक्तिवादाने मी सुनीताबाईंना माझा मुद्दा पटवून देण्यात यशस्वी झालो होतो. तेही कोणतीही कटूता न आणता. अर्थात या विषयाला अनेक कायदेशीर पैलू आहेत आणि तो मोठा विषय होऊ शकतो याची मला जाणीव आहे. पण सुनीताबाई आणि माझ्यातला हलकासा असलेला ताणही दूर झाला होता. त्यांनी खिलाडूपणे माझा कॉपीराईट मान्य केला होता. त्यांनी मला परत एकदा कॅलेंडरसाठी प्रचंड मदत केली.  त्या नोव्हेंबर महिन्यात भाईंच्या जन्मिदनी ‘आनंदयात्नी पु. ल.’ हे कॅलेंडर प्रकाशित झालं. ते सर्वार्थाने निदरेष कॅलेंडर पाहून सुनीताबाई हरखून गेल्या. 
मी वरचेवर त्यांच्याकडे जात राहिलो. 2000 साली माझ्याकडे पहिल्यांदा डिजिटल कॅमेरा आला. बदलत्या तंत्नज्ञानाने ही नवी गंगा आणली होती. कधी-कधी याविषयी त्या बोलत, विचारत. एकदा चांगली संधी साधून मी त्यांना विचारले की, ‘सुनीताबाई, मला तुमचा फोटोसेशन करायची इच्छा आहे. कधी करू या?’  यावर त्यांचे उत्तर होते की- ‘मला फ्लॅशचा त्नास होतो.’ मी म्हणालो, ‘पण मी तर फ्लॅश न वापरता काढीन.’ यावर त्यांची पळवाट होती की - ‘माझे फोटो चांगले येत नाहीत.’ मीही हट्टी मुलासारखा म्हणालो, ‘आता डिजिटल कॅमेरा आहे. त्याच्या डिस्प्लेवर लगेचच आपल्याला फोटो बघायला मिळतो. मी तो तुम्हाला दाखवीन. तो जर तुम्हाला आवडला नाही तर आपण डिलीट करून  टाकू.’ - यावर लगेचच त्यांनी सांगितले की, ‘मी हल्ली घरी गाऊन घालते. साडी नेसत नाही. म्हणून नको.’’ यावर मी निरुत्तर झालो. पण मनातला विचार काही लोपला नाही. पुढे काही वर्षे गेली. आणि 2008 च्या जुलै महिन्यात त्यांना जी. ए. कुलकर्णी प्रथम पुरस्कार जाहीर झाला. मला खूप आनंद झाला. आनंद दोन गोष्टींसाठी- एक म्हणजे पुरस्कार मिळाल्याचा आणि दुसरं म्हणजे तो घेण्यासाठी का होईना सुनीताबाई सर्वांना सामोरं जाणार म्हणून. 
मी त्यांना अभिनंदनाचा फोन केला. आणि म्हणालो, ‘सुनीताबाई, पुरस्कार घेण्यासाठी आता तुम्ही साडी नेसणार असाल ना? पुरस्काराचा कार्यक्र म झाल्यावर आता आपण फोटोसेशन करू शकतो की.’ माझा हट्ट त्यांनी बेसावध क्षणी का होईना मान्य केला. 
10 जुलै 2008 रोजी सकाळी मी त्यांच्या घरी पोहोचलो. पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला होता. मंडळी निवांत झाली होती. त्यांचा भाचा डॉ. दिनेश ठाकूर, त्यांची पत्नी सौ. ज्योती, बंधू डॉ. र्शद्धानंद ठाकूर, र्शीमंत बाबासाहेब पुरंदरे, महेश एलकुंचवार, दिलीप प्रभावळकर, डॉ. शिरीष प्रयाग, बापू कांचन आदी सुहृद गप्पांमध्ये रंगले होते. कोणीतरी त्यांना काही ओळी लिहून पाठवल्या होत्या. त्यात लिहिलं होतं, ‘सुनीताबाई, आज तुमच्या सन्मानासाठी आम्हीच आम्हाला मिरवले आहे. कारण तुम्ही आहात हीच आमची र्शीमंती आहे. अशी एखादी व्यक्ती असते, की जी केवळ जीवनमूल्यांच्या आधारानं जगू पाहते. ही गोष्टच आम्हाला धीर देणारी आहे. तुमचं पुस्तक ‘आहे मनोहर तरी.’ वाचलं तेव्हा ही जाणीव आम्हाला पहिल्यांदा झाली. आणि एक व्यक्ती- कणखर, स्वयंसिद्ध व्यक्ती म्हणून कितीतरी बायकांना आणि पुरु षांनाही खूप दिलासा मिळाला.’ 
- जणूकाही तेथे आलेल्या प्रत्येकाचे मन हेच  तर सांगत होते.
आधीच उत्तम ‘स्कीन कॉम्प्लेक्शन’ असलेल्या सुनीताबाईंच्या चेहर्‍यावरचे हसू जास्तच स्निग्ध झाले होते. मी काही अनौपचारिक असे क्षण कॅमेराबद्ध केले. पूर्वेकडच्या खिडकीतून येणारा प्रकाश हा एकमेव स्त्नोत. उत्सवमूर्तीला काही सूचना करता येतील अशी परिस्थिती नव्हती. त्या जेथे बसल्या होत्या त्याच ठिकाणी मला फोटो घेणे गरजेचे होते. मी कॅमेर्‍यावर टेली लेन्स लावली. त्यांच्या नकळत मी फोटोसेशन सुरूही केला होता. त्यांचे हावभाव, त्यांची नजर, त्यांचे हसू, हळूहळू एक एक फ्रेम ! पंधरा मिनिटांत माझं काम झालं होतं. बर्‍याच वर्षांची माझी इच्छा फलद्रुप झाली होती. 
मी त्या फोटोंचे एडिटिंग केले. परत एकदा त्यांना फोन केला. माझ्या लॅपटॉपवर मी त्यांना ते एडीट केलेले सर्व फोटो दाखवले. त्यांच्या चेहर्‍यावर परत एकदा हसू पसरले. त्यांच्या नकळत टिपलेल्या त्या भावमुद्रा पाहताना त्यांना परत एकदा त्या आनंदसोहळ्याचा अनुभव आला असेल का? चेहरा तर ते सांगत होता. मला आवडलेली खळाळून हसतानाची त्यांची भावमुद्रा त्यांनाही खूप आवडली. मग त्यांच्या डोळ्यांत पाणी का दाटून आले असेल? काहीच न बोलता त्या उठल्या. वॉकरला धरून हळूहळू चालत आत गेल्या. काही वेळात परत बाहेर आल्या. त्यावेळी त्यांच्या हातात चार कॅसेट्स होत्या. पुलंच्या कॅसेट्सचा संग्रह होता तो. ‘तुम्ही खूप छान फोटो काढलेत माझे’, असं म्हणत माझ्या जवळ येत त्यांनी तो संग्रह मला दिला. माझ्यासाठी अमूल्य भेट होती ती. 
नंतर परत ते फोटो पाहताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली. मी आश्चर्याने दंग झालो आणि सुनीताबाईंपुढे नतमस्तकही ! मी त्यांचे ‘सोयरे-सकळ’च्या प्रकाशनात 1998 साली फोटो टिपले होते. बरोबर दहा वर्षांनी पुरस्काराच्यावेळी त्यांनी परत तीच जांभळी फुले असलेली साडी नेसली होती. माणसाचा साधेपणा, व्यविस्थतपणा, किती असावा, त्याच्या गरजा किती कमी असाव्या याचा तो साक्षात्कार होता. पुलंसारख्या प्रतिभावान, सर्व गुणसंपन्न व्यक्तीची पत्नी- गृहिणी, सखी व सचिव अशा रूपांत वावरताना हा साधेपणा जास्तच उजळून आला होता. जणू संत तुकाराम महाराजांनी अभंगात म्हटल्याप्रमाणे ‘जोडोनियां धन, उत्तम वेव्हारें, उदास विचारें वेच करी’ हेच सार्‍या आयुष्याचे ब्रीद या साधेपणातून आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्या या भूतलावर आल्या असाव्या.                               
(उत्तरार्ध)
sapaknikar@gmail.com                                
(लेखक प्रसिद्ध प्रकाशचित्रकार आहेत.)

Web Title: memories of Sunitabai Deshpande on her death anniversary by Sateesh Paknikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.