Memories of great marathi writer Ratnakar Matkari.. | ‘सूत्रधार’! - रत्नाकर मतकरी

‘सूत्रधार’! - रत्नाकर मतकरी

ठळक मुद्देगॅसचे फुगे आकाशात उंच उंच जाताना पाहाणं आकर्षक असेलही कदाचित; पण अवघ्या गगनाला कवेत घेण्याची इच्छा धरणार्‍या मुक्त पाखराला पाहण्यातला आनंद त्यात असूच शकत नाही. मतकरी गेल्यानं असं वाटत राहिलं; याचं काय करायचं? उत्तर कुणाकडे मागायचं?

 - स्वानंद बेदरकर

रत्नाकर मतकरी गेले. प्रयोगशील नाटकाचे एक पर्व संपले. या दोन वाक्यांनी मराठी नाट्यरसिक हलला. अगदी आतून हलला. कुणा व्यक्तीच्या जाण्यानं एखाद्या क्षेत्नाची मनोवस्था हलणे ही सोपी गोष्ट नव्हे. मराठी माणसाच्या बाबतीत तर ती अजिबातच सोपी नव्हे; पण मतकरींच्या बाबतीत असे झाले. ध्यानीमनी नसताना मतकरी गेले ही बातमी एखाद्या सळसळत्या बाणासारखी आली आणि रुतून बसली. बाण दोन प्रकारचे असतात, एक वाया जाणारा आणि दुसरा रुतून बसणारा. मतकरी हे दुसर्‍या प्रकारातले. याचा अर्थ असा की मतकरींनी नियतीने त्यांना दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडली. कलेच्या ज्या-ज्या क्षेत्नात ते गेले तिथे त्यांनी त्यांचं स्वत:च म्हणून जे थोडं-बहुत होतं ते प्रामाणिकपणे दिलं आणि आता निघून गेलेत.
जो माणूस असं प्रामाणिकपणे काही देतो त्याच्याच बद्दल हळहळ व्यक्त होते. ती हळहळ, खंत मानवी स्वभावाप्रमाणे भल्या आणि बुर्‍या या अशा दोन्ही पातळ्यांवरची असते. मतकरी गेल्यावरही ही अशी दोन्ही बाजूंनी चर्चा झाली. मतकरींना जे मिळालं नाही त्याबद्दलही बोललं गेलं. जे मिळालं ते कसं तोकडं आहे त्याचाही ऊहापोह करून झाला.
एखाद्या माणसाला तो गेल्यावर असं तराजूत तोलणं ही काही बरी गोष्ट नव्हे. कोणताही कलावंत हा त्याचं भागधेय घेऊन चालत असतो. त्याच्याकडे जे आणि जेवढं आहे तितकंच तो देऊ शकतो. त्या बदल्यात त्याला काय मिळालं आणि काय मिळालं नाही यावर त्याचं मोठेपण ठरत नाही. त्याचं मोठेपण त्याने आयुष्यभर उभ्या केलेल्या माहोलवर ठरतं.
रत्नाकर मतकरींनी त्यांचा म्हणून एक माहोल तयार केला. ही गोष्ट मला फार मोठी वाटते. प्रत्येक घरात आणि प्रत्येक पिढीत माझं काय चुकलं..? हा प्रश्न जोपर्यंत अवध्य आहे त्या काळापर्यंत मतकरींचं नाव घेतलं जाईल. ही बाब कोणत्याही लौकिक दिल्या-घेतल्यापेक्षा निखालस मोठी आहे. त्यामुळे तुलनेच्या काट्यात काहीही अर्थ नाही. 
अनुभवाचा लसलसता कोंभ ज्याला दिसतो तो वेगळ्याप्रकारे लिहितो आणि अनुभवाचा कोंभ ज्याच्या हाती असतो, त्याचे लेखन निराळे उतरते. त्यामुळे फरक होणं वा होत राहणं हे घडणारच. त्यातल्या चिरस्थायीपणाचा निर्णय काळ घेत असतो. तिथे पुरस्कार, सभा-संमेलनांचे अध्यक्षपद हा भाग गौण ठरतो. 
मतकरी इथे पुढे गेलेले दिसतात; कारण ते चालत राहिले. कशासाठीही थांबले नाहीत. त्यांच्या न थांबण्यामुळेच त्यांच्यातला सर्जक सतत व्यक्त होत राहिला. त्यामुळे वर्तमानपत्नातल्या बातम्यांमध्येसुद्धा त्यांना कथा, कादंबरी, नाटक यांचं बीज सापडत गेलं. छोट्या बातमीतल्या छोट्या घटनेत माणसांच्या जीवन संघर्षाचा मोठा पेच दिसणं, त्यातून कलाकृतीचा जन्म होणं यासाठी लागतो तो प्रातिभ रियाज. ज्याचा रियाज जेवढा तशी त्याची कलाकृती. इथेही मतकरींच्या लेखनाने आपण थक्क होतो. शतकपार झालेली पुस्तकसंख्या आणि काही अप्रकाशित साहित्य आज मतकरींच्या नावावर आहे. त्यांच्या या योगदानाने मराठी वाचकाच्या मनात त्यांनी आपली स्वतंत्न जागा निर्माण केली आहे याहून वेगळे काय हवे असते कलावंताला?
मतकरींनी साहित्याच्या ज्या क्षेत्नात पाऊल ठेवलं तिथे ते यशस्वी झाले. कथाकार म्हणून  गूढकथा या प्रकाराला त्यांनी हात घातला. मतकरींपर्यंतची गूढकथा ही फक्त वाचकप्रिय सदरात मोडली जात होती. तिला वाड्मयीन दर्जा आणि कलामूल्य प्राप्त करून देण्याचे र्शेय मतकरींकडेच जाते. बालरंगभूमीसाठी त्यांनी केलेलं काम हे अत्यंत सशक्त आणि लेखक म्हणून तर एकमेवाद्वितीय म्हणता येईल असं आहे. नाटकाच्या बाबतीत तर त्यांनी एका मुलाखतीत असं म्हटलं आहे की, ‘रंगभूमीला दोन पाऊल पुढे नेता येईल, असं काम मला करायला आवडतं.’ किंवा ‘मला जे करून पाहायचं आहे ते मी करून पाहात असतो.’ त्यांच्या या वाक्यापाठीमागची प्रयोगात्मकता खरोखरच नमनीय आहे. 
दरवेळी नवा विषय घेऊन नवी मांडणी करणं ही लेखक म्हणून प्रस्थापित झाल्यावर तशी अवघड वाटणारी गोष्ट असते; कारण जर ते प्रयोग फसत गेले, तर लेखकाच्या दृष्टीने ती बाब अवघड ठरते. त्यावर मतकरींचे म्हणणे असे होते की, ‘जर प्रयोगच करायचे नसतील मग लिहायचे कशाला?’ या त्यांनीच विचारलेल्या प्रश्नात स्वत:ला सतत तपासत राहाणारा आणि आव्हान देणारा-घेणारा लेखक मला दिसतो. या त्यांच्या विचारात दोन गोष्टी अधोरेखित होतात की, ज्या माणूस मतकरी आणि लेखक मतकरी यांना आपल्यापुढे उभ्या करतात, त्या म्हणजे व्यावसायिक फायद्यासाठी प्रयोगशीलता त्यांनी कधी नाकारली नाही आणि लेखक म्हणून सामाजिक प्रतिष्ठा जपून ठेवण्यासाठी आपल्यातल्या प्रयोगशीलतेला मागे सारणं त्यांना कधी जमलं नाही. 
वंचितांच्या बाजूने साहित्यकृतीतून वा प्रत्यक्षही ते उभे राहिलेत हे आपल्याला माहीतच आहे. त्यातून एक वास्तव ठसठशीतपणे पुढे येतं ते म्हणजे लेखन ही जीवनभर करावयाची व्रतस्थ उपासना आहे हे त्यांना पक्कं आकळलं होतं. म्हणूनच वयाच्या पंधरा-सोळाव्या वर्षांपासून वयाची एक्याऐंशी पार होऊनही ते लिहित राहिले. दीर्घकाळ लिहित राहिले. माणसाच्या मनोवस्थेचा, वर्तनाचा शोध घेत राहिले. 
चक्रधर स्वामींनी जी सूत्ने मांडली आहेत त्यात माणसाच्या वर्णनसूत्नात ते म्हणतात,  अधोमती, अधोरती, अधोगती हे सूत्न साहित्यनिर्मितीचे प्रमुख कारण आहे. मतकरींचे सर्वच साहित्य या सूत्नाभोवती फिरताना दिसते.
अम्लानपणे पाहाता आलं त्यांना माणसांकडे. म्हणूनच तर एकाच विषयावर बेतलेली वेगवेगळी नाटकं लिहिताना त्या विषयाचे विविध रंग ते दाखवू शकले. भूमिका घेतानाही त्यांच्या या निर्लेपवृत्तीचा त्यांना फायदाच झाला. मुळात निर्लेप व्यक्तीच भूमिका घेऊ शकते हेही त्यांनी प्रत्यक्ष काम करून कोणताही आविर्भाव न आणता मराठी सारस्वतांना दाखवून दिले. काळाच्या बदलत्या प्रवाहातही त्या त्या वेळी घेतलेल्या आपल्या भूमिकांवर ठाम राहू शकले. यासाठी माणूस अंतर्बाह्य एकच असावा लागतो. तसे मतकरी होते. त्यांचा सामाजिक क्षेत्नातील वावर पाहाता हा माणूस निर्मोहीपणामुळेच ताठ कण्याने उभा राहू शकला हे आपल्या लक्षात येते.
नाटक ही एक मिर्श कला आहे. त्यामुळे नाटककाराला चित्न-शिल्प-नृत्य-संगीत आणि साहित्य या सगळ्या कलांचा एकत्रित विचार डोळ्यापुढे ठेवावा लागतो. विषयानुरूप या सगळ्या कला नाटककाराला आपल्या नाटकात अंतर्भूत कराव्या लागतात. लोककथा-78  हे  ‘आरण्यक’  किंवा ‘विठू-रखुमाई’ हे नाटक यामध्ये विशेषत: संगीत आणि लोककलांच्या अंगाने जो विचार पुढे सरकतो त्यामध्ये मतकरींमधले हे विविध कलास्पर्शी व्यक्तिमत्त्व आपल्या मनात उतरत जाते. 
त्यांचे चित्नकलेवर विशेष प्रेम होते. व्यंगचित्न हा त्यांच्या अभ्यासाचा विषय होता. हे सगळे लक्षात घेतले की, या माणसाने आपल्या जीवनाचा आवाका किती मोठा ठेवला होता हे लक्षात येतं. चित्नपटांचं संवादलेखन यातही मतकरींनी आपलं नाव कोरलं. मराठी साहित्यात क्वचितच कुणी इतकं चौफेर आणि वैविध्यपूर्ण लिखाण केलं असेल. हे सारं करूनही रत्नाकर मतकरी हे नाव डोळ्यापुढे आलं की आपल्याला मात्न प्रतिभावंत नाटककार हीच त्यांची ओळख हृदयस्थ वाटते. 
मध्यंतरी ‘सूत्नधार’  ही नाट्यसंस्था स्थापन करून त्यांनी दिग्दर्शन आणि निर्मितीचंही काम केलं होतं. दूरदर्शन मालिकांचं संहितालेखन हा त्यांच्या प्रतिभेचा एक वेगळा आविष्कार. इतकं विपुल लिहिणारा लेखक जातो तेव्हा दु:ख तर होतंच; पण काळजी वाटत राहाते येणार्‍या पिढय़ांची. अशी व्रतस्थ माणसं त्यांना आता पाहायला मिळणार नाहीत. गॅसचे फुगे आकाशात उंच उंच जाताना पाहाणं आकर्षक असेलही कदाचित; पण अवघ्या गगनाला कवेत घेण्याची इच्छा धरणार्‍या मुक्त पाखराला पाहण्यातला आनंद त्यात असूच शकत नाही. मतकरी गेल्यानं असं वाटत राहिलं; याचं काय करायचं? उत्तर कुणाकडे मागायचं?

swanand.bedarkar@gmail.com
(लेखक मुक्त पत्रकार आहेत.)

Web Title: Memories of great marathi writer Ratnakar Matkari..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.